हिंदुत्वाचा प्रखर भाष्यकार लोपला

विवेक मराठी    20-Dec-2020
Total Views |

M g vaidya_1  H
 
रा. स्व. संघाचे सर्व सहा सरसंघचालकांचे सहकारी म्हणून काम केलेले व रा. स्व. संघाचे प्रथम प्रवक्ते श्री. मा. गो. उपाख्य बाबूराव वैद्य यांच्या निधनामुळे हिंदुत्वाचा एक प्रखर भाष्यकार लोप पावला आहे. जणू एका युगाचा अंत झाला आहे. रा. स्व. संघ समजून घेण्यासाठी आज भरपूर साधनसामुग्री उपलब्ध आहे पण ज्या काळी संघाबद्दल काहीही माहिती उपलब्ध नव्हती तेव्हापासून बाबूराव ती साधनसामुग्री तयार करीत राहिलेत आणि अभ्यासकांना, जाणकारांना देत राहिलेत. त्यांच्या या बौद्धिक संघर्षाची परिणिती त्यांना अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख नेमण्यात झाली व पुढे संघाने प्रवक्ता नेमायचे ठरविले तेव्हा तेच पहिले प्रवक्ता झाले. स्वाभाविकपणे रा. स्व. संघाच्या दिल्ली कार्यालयातून त्यांनी काम बघणे सुरू केले.

लौकिक अर्थाने बाबूराव वैद्य रा. स्व. संघाचे प्रचारक नव्हते, पण प्रापंचिक प्रचारक म्हणून ते शेवटच्या श्‍वासापावेतो कार्यरत होते. संघाबद्दल कुठलीही माहिती हवी असेल तर बाबूराव हे अखेरचे उत्तर राहत असे. सर्व सरसंघचालकांना त्यांनी बघितले होते. त्यांच्या समवेत काम केले होते. संघाच्या अंतरंग व्यवस्थेतही ते होते त्यामुळे सगळे जण संदर्भासाठी त्यांच्याकडेच येत असत. बाबूरावही अशी माहिती तपासून देत व त्यावर आपले परखड मत व्यक्त करीत असत. दोन वर्षांपूर्वी संघाचे पंजाब प्रांतातील पहिले प्रचारक मोरुभाऊ मुंजे यांच्यावरील एक पुस्तक त्यांचे पुत्र दीपक मुंजे यांनी सिद्ध केले. त्या पुस्तकाचे विमोचन सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते झाले, पण पुस्तक प्रकाशनापूर्वीच त्यांनी सांगितले होते, बाबूरावजींना दाखवून द्या. त्यांची अनुमती असेल तर प्रसिद्ध करा. मग मी प्रकाशन समारंभाला येतो.


बाबूराव बालपणापासून स्वयंसेवक होते. घरच्या परिस्थितीमुळे त्यांना विवाह करावा लागला, पण त्यांचे ठरले, जी तारीख ठरली होती त्यावेळी ते त्यावेळच्या मद्रासला संघाच्या शिक्षावर्गात मुख्य शिक्षक म्हणून राहणार होते. त्यांनी चक्क नकार दिला व काही वर्षांनी त्याच मुलीशी त्यांचा विवाह झाला. मात्र एकदा दिली ती पसंती तेव्हाही कायम होती. त्यांनी पुन्हा मुलगी वगैरे बघितली नाही.
 

त्यांचे संपूर्ण जीवन तसे संघमय होते. संस्कृतमध्ये सुवर्णपदकासह एम. ए. झाल्यावर ते नागपूरला मॉरिस कॉलेजमध्ये काही वर्षे प्राध्यापक होते. नंतर त्यांनी प्रो. रघुवीर यांच्यासह कोष काम केले व मग हिस्लॉप महाविद्यालयात संस्कृतचे विभाग प्रमुख झालेत. हिस्लॉप हे ख्रिश्‍चन कॉलेज असूनही त्यांचे स्वयंसेवकत्व महाविद्यालयाने मान्य केले होते. तेथील प्राचार्य मोझेस यांचे ते अतिशय विश्‍वासू सहकारी होते. वास्तविक त्या महाविद्यालयात सर्व व्यवस्थित सुरू होते. ते उपप्राचार्यही झाले असते (प्राचार्य मात्र नाही कारण फक्त ख्रिश्‍चन व्यक्तीच प्राचार्य होईल हा नियम होता) पण बाळासाहेब देवरस यांनी त्यांना तरुण भारतमध्ये जाण्याला सांगितले. हिस्लॉपमध्ये त्यांना मिळत होता त्याच्या निम्मा पगार त.भा. त मिळणार होता, पण संघाने सांगितले म्हणून कुरकुर न करता ते तरुण भारतात आले. ते भाऊसाहेब माडखोलकर यांचे उत्तराधिकारी होणार हे सर्वांना माहीत असतानाही उपसंपादक म्हणून त्यांनी कामाला प्रारंभ केला. भाऊसाहेब निवृत्त झाल्यावर त्यांनी स्वत:ला संपादकपद मिळण्यापूर्वी व्यवस्थापनाला सांगितले की, श्री. पां. चिं. करकरे सर्वात ज्येष्ठ आहेत त्यांना निवृत्त होण्याला थोडाच काळ उरला आहे, ते संपादक होतील. मी कार्यकारी संपादक म्हणून काम बघीन. श्री. करकरे यांच्या निवृत्तीनंतर ते मुख्य संपादक झालेत.

त्यांनी तरुण भारतला शिस्त लावली. वृत्तपत्र म्हणून निघू लागले. स्वत: स्वयंसेवक असतानाही अन्य सर्व विचार प्रवाहांना त्यांनी त. भा.तून स्थान दिले. अनेक वादही रंगविलेत. एक ख्यातनाम वक्ते म्हणून त्यांचा लौकिक होता. वैचारिक निष्ठा व वैचारिक अधिष्ठान इतके पक्के होते की बाळासाहेब सरसंघचालक असताना त्यांची विजयादशमीची भाषणे बाबूरावांनी लिहून दिली होती. पुढे प्रकृती अस्वास्थ्यामुळे बाळासाहेबांची विजयादशमीची काही भाषणेही बाबूरावांनी वाचून दाखविली होती.

वयाच्या 60 व्या वर्षी ते तरुण भारतच्या संपादकपदावरून निवृत्त झाले. त्यापूर्वी पुलोद सरकारच्या काळात ते महाराष्ट्र विधान परिषदेवर राज्यपाल नामनियुक्त सदस्यही झाले होते. संपादकपदावरून निवृत्त झाल्यावर ते श्री नरकेसरी प्रकाशनाचे प्रबंध संचालक व अध्यक्ष झालेत. निवृत्तीनंतर त्यांनी तरुण भारतात ‘भाष्य’ हे साप्ताहिक सदर सुरू केले. मराठी वृत्तपत्रसृष्टीत सर्वाधिक काळ चाललेले ते एकमेव सदर असावे. अतिशय व्यस्त प्रवास, कार्यक्रम, सभा, बैठकी, भाषणे, बौद्धिके यातून वेळ काढून ते साप्ताहिक लिखाण करीत असत.

संघ, शिक्षण, राजकारण, समाजकारण, धार्मिक आदी जवळजवळ सर्व विषयांवर ते अधिकारवाणीने लिहीत असत. जवळजवळ 1 डझन पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. अतिशय शिस्तबद्ध जीवन हे त्यांचे वैशिष्ट्य होते. वेळेच्या बाबतीत ते अतिशय पक्के होते. कार्यक्रमात उशीर झाला तर ते संयोजकांना सांगून कार्यक्रमातून निघूनही जात.

आपण आयुष्याची शंभरी नक्की गाठणार हा त्यांना विश्‍वास होता. आता आतापावेतो आशीर्वाद देताना सांगत, ‘‘बघा... अजून इतक्या दिवसांनी माझी शंभरी होणार आहे, तोवर तुम्ही तब्येत ठीक ठेवा.’’ पण गेल्या वर्षभरापासून काहीसे परावलंबित्व त्यांच्या वाटेला आले व त्यांनी पटकन परिस्थितीशी जुळवून घेत ‘मृत्यू हा माझा मित्र आहे’ हे सांगणे सुरू केले. आताही कोविड पॉझिटिव्ह झाल्यावर ते रुग्णालयात भरती झाले. त्यावर मात करून यशस्वी होऊन परतले. पण शेवटी आपल्या मृत्युसख्याला त्यांनी कवटाळले. एक अतिशय संपन्न, संपृक्त व यश जीवन जगून, आपल्या नंतर आपले दोन पुत्र संघाला प्रचारक म्हणून देऊन त्यातील एक डॉ. मनमोहनजी सह सरकार्यवाह आहेत तर डॉ. राम हे परदेशात हिंदू स्वयंसेवक संघाचे काम बघतात. बाबूरावांनी शतकाच्या वाटेवर असताना या जगाचा निरोप घेतला. प्रखर हिंदुत्वाचा भाष्यकार लोप पावला.

- सुधीर पाठक