विश्वास दृढ करणारे निकाल

विवेक मराठी    25-Dec-2020
Total Views |

जम्मू-काश्मीरच्या जिल्हा विकास परिषदांमधील विजय हे पहिले पाऊल आहे. तेथील सर्व नागरिकांच्या मनात भारताबद्दल आत्मीयता निर्माण करण्यासाठी विविध समाजपयोगी कार्यक्रम-उपक्रमांमधून आणि समविचारी स्थानिक लोकांना/पक्षांना मदतीला घेऊन भाजपाविषयी लोकांच्या मनात विश्वास निर्माण करावा लागेल. त्या दिशेने सुरुवात तर झालीच आहे, तिला पुढल्या काळात अधिक गती मिळेल असा विश्वास या निकालांनी निर्माण केला आहे.

bjp_1  H x W: 0

ऑगस्ट
2019मध्ये, कलम 370 आणि 35- रद्द करण्याचा निर्णय संसदेत संमत झाला, त्याच वेळी जम्मू-काश्मीरला असलेला विशेष राज्याचा दर्जा हटवत केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला आणि लडाख त्यापासून वेगळे करण्यात आले. स्वातंत्र्योत्तर कालखंडातली ही देशाच्या दृष्टीने आणि त्याच्या आंतरराष्ट्रीय परिणामांच्या दृष्टीनेही अतिशय महत्त्वपूर्ण घटना. ‘जम्मू-काश्मीर हा भारताचा अंतर्गत मामला आहेअशी कबुली देत बहुतेक देशांनाही गप्प बसणे स्वीकारले, ही गोष्टही सूचक होती. शतकानुशतकांची चिघळलेली जखम बरी करण्याच्या दिशेने केंद्र सरकारने टाकलेले हे धाडसाचे पाऊल होते.

अशा या केंद्रशासित प्रदेशात 180 जागांसाठी झालेल्या जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुकालक्षवेधी ठरत्या, तरच नवल! जम्मूतील 140 आणि काश्मीर खोर्यातील 140 जागांसाठी 8 टप्प्यांत झालेल्या या निवडणुकांचे निकाल नुकतेच जाहीर झाले. निवडणुकीआधी झालेली 7 प्रादेशिक पक्षांचीगुपकार आघाडी’ 112 जागांवर विजय मिळवत प्रथम क्रमांकावर असली, तरी 75 जागांवर विजय मिळवत भाजपा जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरला आहे. मतदानाच्या आकडेवारीतही भाजपाने अन्य पक्षांना धोबीपछाड दिली आहे. यातून मिळणार्या संदेशाकडे भाजपा विरोधकांनी डोळेझाक केली, तर त्याच्या परिणामांना त्यांना पुढच्या निवडणुकांमध्ये सामोरे जावे लागेल हे नक्की.

या निवडणुका अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण होत्या. मतदानात नागरिकांचा सहभाग लक्षणीय होता. मतदानाच्या टक्केवारीत झालेली वाढ त्याची निदर्शक आहे. लोकशाही मूल्यांची रुजवात व्हावी ही तिथल्या नागरिकांची इच्छा आहे. या निवडणुकांमुळे जम्मू-काश्मीरमध्ये गेली अनेक वर्षे लोकशाही प्रक्रियेला जी खीळ बसली होती, ती निघाली. जम्मूमध्ये भाजपाने घेतलेली आघाडी आणि काश्मीरच्या खोर्यात गुपकार आघाडीने मिळवलेले वर्चस्व दोन्ही ठिकाणच्या नागरिकांच्या मानसिकतेचे दर्शन घडवणारे आहे. 370 आणि 35- रद्द केले असले, तरी काश्मीरच्या खोर्यातल्या नागरिकांच्या मनातली शंका, अविश्वास अद्याप संपलेला नाही आणि त्याच वेळी जम्मूतील नागरिकांना या निर्णयामुळे झालेला आनंद या दोन्हीचे प्रतिबिंब निकालात पडलेले आहे.

सुरुवातीला गुपकार गँगला वैचारिक समर्थन देणारी काँग्रेस, प्रत्यक्ष निवडणुकीत मात्र गुपकार आघाडीत सामील झाली नाही. या गँगमुळे आपल्यावर देशद्रोही शिक्का असेल अशी बहुधा भीती वाटल्याने काँग्रेसने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. त्यांचे स्वबळ किती सीमित झाले आहे, याची कल्पना त्यांना हाती आलेल्या निकालावरून आली असावी.

माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्या पीडीपी पक्षाला फक्त 27 जागांवर समाधान मानावे लागले आहे. पक्षाच्या या घसरणीकडे त्या कसे पाहतात, यावर त्यांची पुढची वाटचाल आणि त्यांचे राजकीय भवितव्य अवलंबून असेल. भाजपाला पराभूत करायचे या एकमेव ईर्षेने, आजवर शत्रू मानल्या गेलेल्या नॅशनल कॉन्फरन्सशी केलेली हातमिळवणी महागात पडली कीहातात तिरंगा घेणार नाहीही केलेली घोषणा महागात पडली, याचा विचार त्यांना करावा लागेल. निकालानंतर काही काळातच या आघाडीत धुसफुस सुरू झाल्याच्या आलेल्या बातम्या आघाडीतील बिघाडीचेे आणि आघाडी अल्पजीवी असल्याचे संकेत देणार्या आहेत.

अपक्षांचा विविध भागात 50 जागांवर झालेला विजयही लक्ष वेधून घेणारा आहे. यातील 40 अपक्ष उमेदवारांना भाजपाचे समर्थन होते, ही बाब भाजपा विरोधकांनी नोंद घेण्याजोगी. तसेच भाजपा सहयोगी असलेल्या जम्मू-काश्मीर अपनी पार्टीला 12 जागांवर मिळालेला विजय जमेस धरता, एकूण 127 जागांवर भाजपाशी वा त्याच्या विचारधारेशी सहमती असलेले उमेदवार निवडून आले आहेत, असे म्हणता येईल. 280 जागांमधील 127 जागांवर मिळालेले यश असे या निकालाकडे पाहिले, तर भाजपाचे आणि त्याच्या सहयोगी पक्षाचे, तसेच समर्थन लाभलेल्या अपक्षांचे अभिनंदन करायला हवे.

हे सकारात्मक बदलाच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे. वाट खूप दूरची आहे. इथे खर्या अर्थाने लोकशाही नांदण्यासाठी येथील नागरिकांच्या मानसिकतेत मूलगामी बदल होणे आवश्यक आहे. त्यासाठी निवडणुकीतील विजयाइतकीच, वेळ आणि संयम दोन्हीची गरज आहे. 370 आणि 35- पुन्हा लागू होणार नाही हे त्यांना ठामपणे सांगतानाच, या तरतुदींमुळे ते मुख्य धारेत आजवर सामील होऊ शकले नाहीत आणि त्याचे किती दुष्परिणाम त्यांना भोगावे लागले/लागत आहेत, याची जाणीव त्यांना - विशेषत: काश्मीर खोर्यातील मुस्लीमबहुल भागात करून द्यावी लागेल. त्यासाठी जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुकांच्या माध्यमातून चंचुप्रवेश झाला, हे उत्तम. आता हा मार्ग अधिक प्रशस्त करायला हवा. सत्ताकारण आणि समाजकारण हातात हात घालून गेले, तर होणारे सकारात्मक बदल जम्मू-काश्मीरसाठी आणि देशासाठीही लाभदायक ठरतील.

अलीकडच्या काळात देशभरातल्या विविध निवडणुकांमध्ये भाजपाला मिळालेले यश हे भाजपा विरोधकांच्या मनात अस्वस्थता निर्माण करणारे आहे, मग ते बिहार विधानसभा निवडणुकीतील असो की हैदराबाद महापालिका निवडणुकीतील वा गुजरातेतल्या पोटनिवडणुकांमध्ये मिळालेले यश असो - याच मालिकेतील जम्मू-काश्मीरमधील जिल्हा विकास परिषदांमध्ये मिळालेले यशही मांडता येईल. हे यश अपघाताने मिळालेले नाही, तर त्यामागे विचारपूर्वक केलेले नियोजन आहे, निर्धार आहे. कोणतीही निवडणूक - मग ती राज्यस्तरावरची असो वा स्थानक स्वराज्य संस्थांची, भाजपा सगळ्या निवडणुका गांभीर्याने घेत आहे असा संदेश देणारे हे निकाल आहेत.

जम्मू-काश्मीरच्या जिल्हा विकास परिषदांमधील विजय हे पहिले पाऊल आहे. तेथील सर्व नागरिकांच्या मनात भारताबद्दल आत्मीयता निर्माण करण्यासाठी विविध समाजपयोगी कार्यक्रम-उपक्रमांमधून आणि समविचारी स्थानिक लोकांना/पक्षांना मदतीला घेऊन भाजपाविषयी लोकांच्या मनात विश्वास निर्माण करावा लागेल. त्या दिशेने सुरुवात तर झालीच आहे, तिला पुढल्या काळात अधिक गती मिळेल असा विश्वास या निकालांनी निर्माण केला आहे.