मा.गो. (बाबूराव) वैद्यसंघपरिवाराचे भीष्माचार्य

विवेक मराठी    28-Dec-2020
Total Views |

बाबूराव वैद्य गेले. वय फक्त 97 वर्षे. संघवय - जवळपास 90 वर्षे! संघशरण जीवन जगलेला, कालपर्यंतचा बहुधा सर्वात ज्येष्ठ स्वयंसेवक. सर्व सरसंघचालकांना पाहिलेले असे अन्य कोणी आज हयात असेल का? सर्व कालात, कालानुरूप संघकामाची चिकित्सा व मांडणी करणारा भाष्यकार! ‘गगन गगनाकार’ - ‘सागर सागरोपमा’ असे संघकामाचे वर्णन करणारा दृढव्रती! राष्ट्र, राज्य, धर्म या संदर्भात संघकामाची शाश्वत मांडणी करणारा विचारवंत. कोणत्याही राष्ट्रीय प्रश्नाची संघविचारातून तर्कनिष्ठ उकल करणारा, आजन्म कृतिशील राहणारा स्वयंसेवक. मा.गो. वैद्य यांना जवळून अनुभवलेल्या महनीयांनी त्यांच्या आठवणींना दिलेला उजाळा.

RSS_1  H x W: 0

बाबूराव वैद्य यांच्याशी माझा प्रथम परिचय झाला 1953 सालच्या पुणे येथील संघ शिक्षा वर्गात. त्या काळात देशभरातील सर्व संघ शिक्षा वर्गात नागपूरहून मुख्य शिक्षक पाठविले जात. बाबूराव 1952 व 1953 अशी दोन वर्षे पुण्याच्या वर्गात मुख्य शिक्षक म्हणून होते. त्या वेळची त्यांची कृश मूर्ती आजही माझ्या डोळ्यासमोर आहे. उण्यापुर्‍या 66-67 वर्षांच्या आमच्या परिचयातील शेवटची भेट गतवर्षीच नागपूरच्या एका कार्यक्रमात झाली. त्यांच्या शरीरयष्टीत काहीही बदल नव्हता. आधीच थोडे पुढे झुकलेले खांदे आणखी पुढे झुकून शरीराचा काटकोन झालेला होता. तथापि स्वच्छ खणखणीत वाणी व स्पष्ट विचार यामध्ये कोठेही उणेपणा आला नव्हता.

या दीर्घ काळात मी त्यांना असंख्य वेळा भेटलो. त्यांच्याबरोबर अनेक कार्यक्रमांत, बैठकांत व प्रवासात सहभागी झालो. माझ्यासाठी संघ व आनुषंगिक विविध विचार व व्यवहार याविषयी मुक्त संवाद करण्याचे, विश्वासाने वादविवाद करण्याचे स्थान म्हणजे बाबूराव वैद्य. विशेषत: गेल्या 30-35 वर्षांत विविध केंद्रीय बैठकांत आम्ही वारंवार व सलग दिवसेंदिवस एकत्र असू. त्या काळात अनौपचारिक संवादाची व त्यांच्या अधिकृत भाषणांची संधी मला अनेक वेळा मिळत गेली. त्यातीलच काही विशेष स्मृती मी प्रस्तुत करीत आहे.

संघसंबंधित कोणत्याही विषयावर त्यांच्याकडे स्पष्ट व नि:संदिग्ध भूमिका असे. शारीरिक कार्यक्रमातील विषय असो, मूलभूत संघकामाविषयी बौद्धिक विषय असो, राजकीय क्षेत्र असो, किंवा उपयोजित (अिश्रिळशव) विषय असो, बाबूरावांचे चिंतन व अभिव्यक्ती अगदी नेमकी व चपखल असे. 2004-05 या वर्षी भरलेल्या विश्व संघशिबिरात माझ्याकडे सर्वाधिकारी म्हणून जबाबदारी होती. पूर्ण आठवडा आम्ही एकत्र होतो. त्या काळामध्ये विश्वव्यापी झालेल्या संघाचे दर्शन व त्याची विविध रूपे बाबूराव यांच्याबरोबरच्या चर्चेतून उलगडत होती. 2004 सालच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या महत्त्वाच्या केंद्रीय बैठकीत राजकीय क्षेत्राविषयी त्यांच्याशी व्यापक संवाद साधता आला. त्यापूर्वीच काही वर्षे पूर्ण काळ दिल्लीत राहून संघाचा अधिकृत ‘प्रवक्ता’ या नात्याने त्यांनी राजकीय क्षेत्राचा जवळून अनुभव घेतला होता. त्या क्षेत्रातील मांडणी व व्यवहार यातील मूलगामी परिवर्तनाचे त्यांनी आग्रहाने प्रतिपादन केले होते. त्यानंतर आज 10-15 वर्षांनी हे परिवर्तन हळूहळू प्रत्यक्षात येत आहे.

सुमारे 10 वर्षांपूर्वी एका दिवाळी अंकात त्यांनी ‘मृत्यू’विषयी लिखाण केले होते. ‘मी मृत्यूला अजिबात भीत नाही. त्याच्या स्वागताला मी सदैव सिद्ध आहे’ असा विषय मांडून वाचकांना त्यांनी जणू काही चकित केले होते. त्यानंतर लगेचच्या माझ्या नागपूर फेरीत त्यांच्या घरी जाऊन या विषयावर मी सविस्तर चर्चा केली. सर्व प्राणिमात्रांना स्वाभाविक वाटणारी मृत्यूविषयक भयाची भावना कशी नाहीशी होऊ शकते? असा प्रश्न मी त्यांना केला. उत्तरादाखल ते म्हणाले, “एक म्हणजे प्रत्येक प्राणिमात्राला जे अटळ आहे, त्याचे भय बाळगून कसे चालेल? दुसरे म्हणजे मी माझ्या डोळ्यासमोर काही उदात्त उद्दिष्ट ठेवून त्यानुसार काम करण्यात माझे आयुष्य यशस्वी झाले आहे. मी ‘कृतार्थ’ आहे. मग ‘न टळणार्या’ गोष्टीचे दु:ख कशाला?” त्यानंतरच्या काळात याच भूमिकेतून त्यांनी दोन गंभीर दुखणी सहजगत्या पार केली. त्यामुळेच अखेरपर्यंत ते बौद्धिकदृष्ट्या सक्षम राहिले. शारीरिकदृष्ट्यासुद्धा यथासंभव सहभाग करीत राहिले.

संघाचे कार्य हे जीवनात स्वयंस्वीकृत असे व्रत आहे. त्यातून आजीवन पाय मागे घेणे नाही. अशी ‘संघशरणता’ कायमच त्यांच्याबाबत अनुभवाला येत राहिली. आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात ते नागपूरच्या ख्रिश्चन मिशनरी महाविद्यालयात संस्कृतचे प्राध्यापक होते. त्या वातावरणातही ते संघव्यवहाराचे दर्शन (प्रदर्शन नव्हे!) स्वाभाविकपणे देत असत. संचालक मंडळही त्यांना उचित मान देत असे. संघाच्या अधिकार्‍यांनी केलेल्या सूचनेवरून, नागपूर तरुण भारतची जबाबदारी घेण्यासाठी त्यांनी ही प्रस्थापित नोकरी नि:स्पृहपणे सोडली. आर्थिक नुकसान होते, अधिक कष्ट होते, अनिश्चितता होती, पण ते संघव्यवहाराचे दर्शन होते. त्याच काळात महाराष्ट्राच्या विधान परिषदेवर त्यांची नियुक्ती झाली. अधिवेशन चालूच होते, शासकीय अधिकार्‍यांनी तत्काळ रुजू व्हा अशी सूचना केली. वर टिप्पणी केली की, त्यामुळे सर्व भत्ते व आर्थिक लाभ लगेच मिळू लागतील. परंतु संघकामाचे महिनाभराचे प्रवास लागलेले होते. त्यामुळे या सर्व लाभांवर पाणी सोडणे स्वाभाविकपणेच होऊ शकले.

M g vaidya_1  H

संघकामासाठीचे प्रवास त्यांनी आयुष्यभर उतारवयातसुद्धा चालू ठेवले. गुजरात भूकंपानंतर त्या क्षेत्रात त्यांच्याबरोबर प्रवसाचा मला योग आला. त्या वेळी त्यांचे वय 80च्या घरात होते. परंतु अडचणीचे प्रवास व कार्यक्रमांची गर्दी यात वयाची कोठेही बाधा आली नाही. त्याच काळात लातूर येथील आमच्या तरुण कार्यकर्त्यांच्या आग्रहावरून एका विशाल एकत्रीकरणासाठी त्यांनी नागपूर-लातूर हा खडतर प्रवास केला. सुमारे 5000 तरुणांची उपस्थिती असलेल्या या कार्यक्रमात त्यांनी राष्ट्र, राज्य, धर्म, पंथ या विविध संकल्पनांविषयी अतिशय सुंदर मूलगामी मांडणी केली.

संघव्यवहारातून ‘संघशरणता’ हा शब्दप्रयोग केला जातो. व्यावसायिक व कौटुंबिक आयुष्य जगत असताना संघविचार व व्यवहार सदैव अग्रस्थानी असणे म्हणजे ‘संघशरणता’. बाबूरावांच्या जीवनात ती ओतप्रोत भरलेली दिसते. बाह्य दर्शनापासूनच ते अनुभवात येत राहिले. कुठल्याही कार्यक्रमात त्यांच्या मस्तकावर संघाची काळी टोपी असे. दिल्लीत प्रवक्ता म्हणून काम करताना उच्चभ्रू वातावरणातदेखील त्यांच्या पोषाखात बदल झाला नाही. कुटुंबातही संघविचार व व्यवहार ओतप्रोत भरलेला अनुभवास येतो. सुपुत्र मनमोहनजी हे गेली 35 वर्षे प्रचारक असून संघाचे सह सरकार्यवाह म्हणून उच्च दायित्व सांभाळत आहेत. दुसरे सुपुत्र राम हे गेली 25 वर्षे प्रचारक या नात्याने विश्वविभागात कार्यरत आहेत. हे दोघेही जण उच्चविद्याविभूषित (झह.ऊ.) असून परंपरागत घर/संसार, अर्थकारण न करता सफेद वेषातील संन्याशाचे व्रत आचरण करीत आहेत.

तृतीय सरसंघचालक पू. बाळासाहेब देवरस यांनी संघकामाचा आधार म्हणून ‘देवदुर्लभ कार्यकर्ता’ या शब्दात अशा व्यक्तींचे वर्णन केले आहे. बाबूराव हे अशा कार्यकर्ता समूहाचे अग्रेसर होते. बाळासाहेब देवरसांच्या कारकिर्दीत सामूहिक संघनेतृत्वाची कल्पना प्रत्यक्षात आली. त्याची सुरुवात झाली सरसंघचालकांच्या विजयादशमी भाषणापासून. नागपूरमधील विजयादशमी उत्सवाचे हे भाषण म्हणजे पंतप्रधानांच्या लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणाइतकेच महत्त्वाचे. त्यातील विषयांची निश्चिती व मांडणी करण्यासाठी बाळासाहेबांनी 5-6 प्रमुख कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करण्याची प्रथा सुरू केली. त्यात बाबूराव वैद्यांचे कायम स्थान असे. चर्चेची टिप्पणी करणे, त्यांची सूत्रबद्ध मांडणी करणे व बाळासाहेबांना दाखवून भाषणाचा अंतिम मसुदा तयार करणे हे काम बाबूराव करत असत. एका अर्थाने बाबूराव त्यानंतरच्या सर्व सरसंघचालकांचे सल्लागार या नात्याने नेहमीच कार्यरत राहिले. संवादात, बैठकीत, त्यांची काही मते व मांडणी आग्रही व टोकाची असत. परंतु संघशरणतेची मर्यादा त्यांनी कधीही उल्लंघन केली नाही. त्यांच्या व संघकामाच्या यशाचे मर्म यातच आहे. गेल्या सुमारे 12 वर्षांपासून, वयाची 85 वर्षे पूर्ण झाल्यानंतर संघाच्या बैठकीत त्यांचे अधिकृत येणे थांबले. तीन वर्षांपूर्वीच्या नागपूरमधील प्रतिनिधी सभेत त्यांना आवर्जून बोलाविले होते. पू. सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी बाबूराव वैद्य यांचे स्वागत केले. पू. डॉ. हेडगेवारांचे प्रतिनिधी या नात्याने सरसंघचालक मोहनजींसमोर बाबूराव नतमस्तक झाले आणि संघविचाराचे, परिवाराचे भीष्माचार्य म्हणून सरसंघचालक बाबूरावांपुढे नतमस्तक झाले आणि नंतर दोघांची गळाभेट झाली. ते दृश्य अवर्णनीय होते.

रा.स्व. संघाच्या या भीष्म पितामहाला आपल्या सर्वांच्या वतीने श्रद्धांजली!

विवेकानंद रुग्णालय, लातूर