अर्थव्यवस्थापनाचा मानवी चेहरा

विवेक मराठी    30-Dec-2020
Total Views |

व्यापार करताना त्या संबंधातील बाकी सर्व उपचार (decorum) सांभाळतानासुद्धा महाराजांचा मानवी विवेक कुठेही सुटलेला नाही. माणसे आणि वस्तू (commodity) ह्यातील नेमका फरक ओळखणे त्याचप्रमाणे धोरण ठरवणे, हेच महाराजांचे खास वैशिष्ट्य आणि हेच महाराजांचे खरे मोठेपण! अन्यथा माणसांची बाजारू, उपभोग्य वस्तू (Tradable commodity) बनवणे हा त्या काळचा रूढ प्रकार होता. त्यातल्या नफ्याचा विचार करता त्यातील मूल्यांचा (मानवी) विचार करणारा महाराजांचा मानवी विवेक म्हणूनच कालातीत वाटतो.

shivaji maharaj_1 &n

आतापर्यंतच्या विवेचनातून आपल्याला महाराजांच्या अनेक पैलूंचे दर्शन घडले. त्यांची ताकद, त्यांचे शौर्य, चातुर्य, दूरदृष्टी असे अनेक पैलू आपण पाहिले. राज्यकर्ता, व्यापारी, उद्योजक अशा त्यांनी वठवलेल्या अनेक भूमिका आपल्यासमोर आल्या. तथापि माणुसकी आस्था ह्या गुणांचेही ते आश्रयदाते होतेच. कारण मुळात ते उत्तम माणूस होते. त्यांचा अर्थवाद कायम विवेकी होता. महाराजांनी व्यापारवृद्धीचा कायम आग्रह धरला. त्यासाठी त्यांनी अनेक गोष्टींचा / कल्पनांचा उपयोग केला. विविध प्रकारचा माल आणि सेवासुद्धा दिल्या. पण घेणाऱ्या आणि देणाऱ्याचे माणूसपण सांभाळून दिल्या, हे विशेष! त्यामुळेच त्यांनी गुलामगिरीच्या प्रथेला केला विरोध!

गुलामगिरी आणि महाराज

महाराजांच्या १६७७७८ दक्षिण दिग्विजयाच्या वेळी इंग्रज, डच, फ्रेंच इ. परकीय व्यापारी कंपन्यांचे प्रतिनिधी त्यांना येऊन भेटले होते. त्यांनी महाराजांना आपापले नजराणेही अर्पण केले. महाराजांनी जिंकलेल्या प्रदेशात त्यांनी व्यापारी सवलतीही मागितल्या. महाराज आणि डच यांच्या व्यापारी संबंधाचे स्वरूप तत्कालीन डच कागदपत्रांमध्ये सापडते. डचांच्या विनंतीवरून आदिलशाही कारकिर्दीत असलेल्या अटींवर महाराजांनी डचांना १५ जुलै १६७७ रोजी एक कौलनामा दिला. कौलनाम्याबद्दल आभार मानण्यासाठी आणि नजराणा देण्यासाठी डचांतर्फे हर्बर्ट डी जागेर हा प्रतिनिधी महाराजांना येऊन भेटला. त्या भेटीविषयीच्या अहवालात जागेर म्हणतो, घोडदळातील पायदळातील काही सैनिकांनी डच वकिलांना राजाच्या छावणीपर्यंत पोहोचवलं. महाराजांचा तंबू उत्तम रितीने शृंगारलेला होता. (व्यापारी भेट म्हणून महाराजांचा तंबू उत्तमरित्या शृंगारलेला होता. एरवी तो अत्यंत साधा असे.) तंबूतील एका बाजूस राजांसाठी सुवर्णखचित आसन ठेवले होते. सुमारे अर्ध्या तासाने महाराजांनी जनार्दन पंडित त्यांचा भाऊ रघुनाथ पंडित या मुत्सद्द्यांसह तंबूत प्रवेश केला. महाराज स्थानापन्न झाल्यावरच दोघे मुत्सद्दी बसले. (सुवर्णासन, महाराजांचे अर्धा तास उशिरा येणे, सर्व मुत्सद्द्यांनी त्यांना सर्वोच्च मान देणे . सर्व गोष्टी परिपूर्ण व्यापारी कामकाजाच्या निदर्शक आहेत.) महाराजांनी तंबूत प्रवेश करताच डच वकील उठून उभे राहिले. महाराजांनी जरीचा अंगरखा घातला होता. डोक्याला जिरेटोप होता. उजव्या हातात रत्ने आणि पाचू यांच्या मुठीची लांब तलवार सुवर्णखचित म्यानात विराजत होती. (हाही व्यापारी भपक्याचाच भाग.) जवळच पानाचा सोन्याचा डबा होता. दोन्ही बाजूस प्रमुख सरदार होते. (उत्कृष्ट राजशिष्टाचाराचा हा नमुना वाटतो.) महाराजांनी डचांच्या सदिच्छा भेटींचा आनंदाने स्वीकार केला. (Perfect gesture of goodwill.) डच कंपनीला मदत करण्याचे पूर्वी दिलेल्या कौलनाम्यावर मोर्तब करण्याचे मान्य केले. कामकाज पूर्ण केले. (Business Complete.) निकोलस क्लेमंट या दुसऱ्या दूताबरोबर महाराजांनी मित्रत्वाच्या काही गोष्टी केल्या. डच कंपनीच्या व्यापाराची सद्य:स्थिती आम्हाला महाराजांच्या कानावर घालायची होती. पण महाराजांनी त्याची आवश्यकता नसल्याचे सांगितले, कारण त्यांना त्याची पूर्वकल्पना होती. (Well informed already.) वेळही मर्यादित होता. (No wastage of time.) आम्ही काही वेळ तिथे बसलो आणि परतविडे भेटी यांचा स्वीकार केल्यावर परतलो. डच गव्हर्नर जनरलला देण्यासाठी काही भेटी हर्बर्टकडे महाराजांनी दिल्या.”

वरील भेटीनंतर महाराजांनी २४ ऑगस्ट १६७७ रोजी डचांना एक कौलनामा दिला. या कौलनाम्यातील सर्वात महत्त्वाचे कलम पुढीलप्रमाणे आहे – ‘मुसलमानांच्या राज्यात कोणाकडूनही अटकाव होता तुम्हाला स्त्रीपुरुष यांची गुलाम म्हणून खरेदी विक्री करण्याची परवानगी होती. परंतु आता माझ्या राज्यात तुम्हास स्त्री-पुरुषांची गुलाम म्हणून खरेदी विक्री करण्यास परवानगी नाही. जर तुम्ही तसे करण्याचा प्रयत्न कराल, तर माझे लोक तुम्हाला प्रतिबंध करतील. तरी हे कलम कटाक्षाने पाळले पाहिजे.’

आदिलशाही शिवशाही यांच्यातला नेमका फरक ह्या कलमात दिसतो. व्यापार करताना त्या संबंधातील बाकी सर्व उपचार (decorum) सांभाळतानासुद्धा महाराजांचा मानवी विवेक कुठेही सुटलेला नाही. माणसे आणि वस्तू (commodity) ह्यातील नेमका फरक ओळखणे त्याचप्रमाणे धोरण ठरवणे, हेच महाराजांचे खास वैशिष्ट्य आणि हेच महाराजांचे खरे मोठेपण! अन्यथा माणसांची बाजारू, उपभोग्य वस्तू (Tradable commodity) बनवणे हा त्या काळचा रूढ प्रकार होता. तो त्या काळचा एक किफायतशीर धंदा होता. त्यातल्या नफ्याचा विचार करता त्यातील मूल्यांचा (मानवी) विचार करणारा महाराजांचा मानवी विवेक म्हणूनच कालातीत वाटतो.

He never fought for any price, but he always. Stood for some values! म्हणूनच श्रीमंत योगी!

सामान्य माणूस हाच केंद्रबिंदू

महाराजांना लष्करी हालचाली, व्यापारी संबंध, राजनैतिक व्यवहार अशा अनेक गोष्टींची उत्तम जाण होती. हिंदवी स्वराज्याची एक व्यापक चळवळही त्यांनी उभी केली. परिस्थितीशी सतत झगडून त्यांनी ती यशस्वीही केली. पण त्यांच्या सर्व योजनांचा केंद्रबिंदू होता सामान्य माणूस ! अशा सामान्य माणसांनी बनलेली आपली रयत सुखी झाली पाहिजे, ह्याचीच त्यांना आस असे. त्यामुळेच ह्या सर्वसामान्य माणसांची त्यांनी कधी Commodity / उपभोग्य वस्तू होऊ दिली नाही. परकीय मुलखातील लुटीच्या वेळीही गरीब लोक, स्त्रिया, गाई, धार्मिक स्थळे, धार्मिक व्यक्ती ह्यांना त्यांनी अथवा त्यांच्या सैनिकांनी कधी उपद्रव दिला नाही. तसा उपद्रव देण्यासाठी महाराजांची सक्त ताकीद असे आणि तिचे उल्लंघन झाल्यास कडक शिक्षाही केल्या जात. न्यायव्यवस्था, आर्थिक कर, जकात, प्रशासन यामध्ये वर्ण, जात, धर्म, पंथ, भाषा, आर्थिक स्थिती ह्यावरून भेद केला जात नसे. ह्या सगळ्यांमधून महाराजांची आर्थिक मानवता चांगली दिसून येते. ‘सर्वास पोटास लावणे आहे हा त्यांचा मुख्य उद्देश असे. स्वराज्याच्या कामास ज्यांचे साह्य झाले, त्यांची त्यांनी नेहमीच आर्थिक कदर केली. विशेष कामगिरीकरता विशेष बक्षीस, वेळच्या वेळी रोख किंवा वरातांनी (Cheques) वेतन, याशिवाय युद्धात जखमी झाल्यावर त्वरित रोखीने नुकसानभरपाई (जखमनाम्याच्या दरबारात) हे सर्व ते देतच असत. पण दुर्दैवाने या कामात कोणाचे मरण ओढवल्यास त्यांच्या विधवांना निवृत्तिवेतन (Family Pension), तसेच त्यांच्या अनाथ मुलांना बाल परवेशीसारख्या योजनांमधून मदत केली जाई. गोरगरिबांबद्दल महाराजांना सदैव कळकळा असे. त्यामुळेच ते सदैव मानवतावादी भूमिका घेत. मुख्यतः आर्थिक दैन्यामुळे सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यात अनेक संकटे उभी राहतात हे त्यांना माहीत होते. त्यामुळे आर्थिक विषयांची जास्तीत जास्त काळजी घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्या संबंधात दोन उदाहरणे देण्यासारखी आहेत.

१. सुरतेच्या स्वारीच्या वेळी (सुरतेची लूट नव्हे, तर नुकसानभरपाईची मोहीम) सोने, चांदी, जडजवाहीर अशा मौल्यवान गोष्टींव्यतिरिक्त इतर सर्व गोष्टी ते तिथे जमलेल्या भिकारी गरीब लोकांना वाटून टाकत होते, असे परकीय प्रवाशांनी इतरांनी लिहून ठेवले आहे. त्यामुळे अनेकांची गरिबी काही काळ तरी नक्कीच दूर झाली असेल.

 

२. त्यांचे एक सरसेनापती प्रतापराव गुजर यांनी युद्धात हरवलेल्या बहलोलखानाला 'धर्मवाट' देऊन सोडून दिले. महाराजांना ते अजिबात आवडले नाही. त्यांनी त्याबद्दल प्रतापरावांची कानउघाडणी केली. महाराजांच्या अपेक्षेनुसार बहलोलखान परत स्वराज्यावर चालून आल्याने रागाच्या भरात प्रतापरावांनी बहलोलखानावर केवळ जणांनिशी हल्ला केला आणि हौतात्म्य पत्करले. त्यांच्या मृत्यूच्या बातमीने महाराज कळवळले. त्यांच्यातला राज्यकर्ता बाजूला होऊन त्यांच्यातला माणूस जागा झाला. आपल्या आदेशाचे पालन करताना प्रतापरावांना मरण पत्करावे लागले, ह्याचे त्यांना विलक्षण दुःख झाले. आपला सहकारी आपला एक मित्रही होता, ह्याचे त्यांना भान होते. प्रतापराव घरातले कर्ते पुरुष होते. त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबाची काळजी घेणे हे त्यांना आपले कर्तव्यच वाटले. त्यातूनच महाराजांनी प्रतापरावांच्या जानकी नावाच्या मुलीला आपली सून करून घेतली. कर्त्या पुरुषाच्या निधनानंतर प्रत्येक कुटुंबावर आर्थिक आणि इतर अडचणी येतातच, याचे भान ठेवून महाराजांनी राजाराम ह्या आपल्या धाकट्या मुलाशी हे लग्न लावले. महाराजांच्या मृत्यूपूर्वी काही आठवडे हे लग्न झाले. महाराजांची ही अर्थपूर्ण माणुसकी आजच्या राज्यकर्त्यांनीही लक्षात ठेवावी अशीच आहे.