धूर सोडू नका, विजेप्रमाणे चमका!

विवेक मराठी    10-Feb-2020
Total Views |

***रमेश पतंगे***

सीएए आणि एनआरसी यांच्या विरोधात देशभर दिशाभूल करणारी आंदोलने सध्या सुरु आहेत. खरे तर या मंडळींचा खरा डाव काय आहे, हे समजून घेणे आवश्यक आहे. आणि देशातील राष्ट्रभक्त नागरिकांना सत्य काय आहे हे समजावून सांगण्याची गरज आहे.

 
CAA_1  H x W: 0
 

देशातील काही शहरांतील एका कोपऱ्यात नागरिकत्वविरोधी आंदोलन चालू आहे. हे आंदोलन मोदी शासनाविरुध्द असल्यामुळे गिधाडासारखी नजर ठेवून असलेल्या प्रसिध्दी माध्यमांना तो मोठा बातमीचा विषय वाटतो. म्हणून कोपऱ्यातील आंदोलनदेखील पहिल्या पानावरील ठळक बातमीचा विषय होतो, अग्रालेखाचा विषय होतो, अग्रालेखाच्या पानावरील लेखाचा विषय होतो. राईचा पर्वत करणे अशी एक म्हण आहे. त्याचे दृश्य रूप म्हणजे आपली वर्तमानपत्रे आहेत.

हे आंदोलन करणारे कोण आहेत? मुसलमान आहेत. आंदोलने कुठे चालू आहेत? जामिया मिलिया मुस्लीम विद्यापीठात, अलीगढ मुस्लीम विद्यापीठात, देशघातक चळवळीचा अड्डा असलेला जवाहरलाल नेहरू विद्यापीठात, जामा मशिदीच्या परिसरात. हे आंदोलन कुणी सुरू केले? प्रथम विद्यार्थ्यांनी सुरू केले, नंतर त्यात महिलांना उतरविण्यात आले.

नागरिकत्व कायदा देशातील नागरिकांना संरक्षण देणारा आहे, त्यांचे नागरिकत्व काढून घेणारा नाही. हा कायदा एवढेच म्हणतो की, शेजारील मुस्लीम देशांतून जे मुसलमान देशात येतात, त्यांना देशाचे नागरिकत्व मिळाणार नाही. हा कायदा राज्यघटनेच्या कलम 11प्रमाणे केला गेला आहे. हे कलम 11 असे आहे - संसदेने नागरिकत्वाच्या हक्काचे कायद्याद्वारे विनियमन करणे - या भागाच्या पूर्वगामी तरतुदींतील कोणत्याही गोष्टींमुळे नागरिकत्वाचे संपादन व समाप्ती आणि नागरिकत्वविषयक अन्य सर्व बाबी यांच्यासंबंधी कोणतीही तरतूद करण्याच्या संसदेच्या अधिकाराचे न्यूनीकरण होणार नाही. याचा थोडक्यात अर्थ असा की, नागरिकत्वाविषयीचा कायदा करण्याचा अधिकार संसदेला आहे. या संसदेच्या कायद्याविरुध्द आणि घटनेच्या कलमाविरुध्द मुसलमान आंदोलनात उतरले आहेत, महिलांना उतरविले आहे.

या महिला बुरखाधारी आहेत. त्यातील सुशिक्षित किती आणि अनपढ किती? यातील किती जणींनी संविधान वाचले आहे? ज्यांनी वाचले त्यांना ते किती समजले? नागरिकत्व कायदा किती समजला? असले प्रश्न आपण विचारायचे नाहीत. कारण त्या महिला आहेत. महिलांसंबंधी तुम्ही असले आक्षेप घेता, म्हणजे तुम्ही महिलाविरोधी आहात अशी ओरड चालू करतील. पण आपण हे प्रश्न लक्षात ठेवले पाहिजेत.

या आंदोलनकर्त्यांची एक घोषणा आहे - 'ला इलाही इल्लिला', याचा अर्थ होतो, अल्ला एकच आहे. ही घोषणा 1946 आणि 47 साली उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब येथे देण्यात येत होती. त्या घोषणेत आणखी काही शब्द होते ते असे - 'पाकिस्तान का मतलब क्या - 'ला इलाही इल्लिला' अल्ला एकच आहे म्हणजे पाकिस्तानात राम, कृष्ण, महावीर, गौतम, गुरू नानक यांना काही स्थान नाही. पाकिस्तान झाले आणि या सर्वांच्या कत्तली सुरू झाल्या. जे थोडेबहुत जगले वाचले, त्यांचे धार्मिक छळ सुरू झाले. कारण 'ला इलाही इल्लिला'.

CAA_1  H x W: 0

या छळग्रस्त सर्वांना भारतात बोलावले पाहिजे होते. 50 ते 60 वर्षे काँग्रेसचे राज्य होते. ज्यांच्या नेत्यांनी पाकिस्तान निर्माण केले आणि भारतातील हिंदूंची ससेहोलपट केली ते, पाकिस्तानातील हिंदूना आणि अन्य धर्मियांना कसे जवळ करणार? ते काम नरेंद्र मोदी यांनी केले. पाकिस्तान-बांगला देशातील मुसलमानांना भारताचे नागरिकत्व नाही. आंदोलन करणारे मुसलमान म्हणतात की, त्यांनाही नागरिकत्व दिले पाहिजे. आंदोलनकर्ते फार हुशार आहेत. त्यांनी महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संविधान, भगतसिंग, राजगुरू इत्यादी क्रांतिकारक यांच्या प्रतिमा ठेवलेल्या आहेत. भगवद्गीता, बायबल ठेवलेले आहे. इतिहासात गुजरातवर आक्रमण करणाऱ्या मुस्लीम सुलतानाने सैन्याच्या आघाडीवर गायींचे कळप ठेवले. हिंदू गायींना मारत नाहीत. मग ते बाण कसे चालवणार? त्याची आठवण झाली. या प्रतिमा ठेवून घोषणा तीच - 'ला इलाही इल्लिला'.

यांच्या समर्थनार्थ कोण कोण उतरले आहेत? सर्वप्रथम काँग्रेस उतरली आहे. मुसलमानांना इंग्रज आवडती राणी म्हणत असत. काँग्रेसने तो वारसा स्वीकारला. त्याच्या जोडीला ममता बॅनर्जी. मुसलमानांच्या मतांवर सत्तेवर येणे, हा तिचा राजकीय अजेंडा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस जी म्हणतेच की, आम्ही मुसलमानांच्या मतांमुळे निवडून आलो. त्यांना पाठिंबा देणारी शिवसेना. जिच्या नेत्याला फक्त मुख्यमंत्रिपद पाहिजे. मग त्यासाठी काहीही करायला तयार.

यांच्या जोडीला देशातील सगळे डावे पक्ष आहेत. डावे विचारवंत आहेत. राष्ट्रवादीसारखे ते निव्वळ स्वार्थवादी नाहीत आणि शिवसेनेसारखे ते केवळ मुख्यमंत्रीवादी नाहीत. त्यांना डोके आहे. मोदी सत्तेत आल्यापासून भाजपा, संघ, मोदी, संघ समर्पित सर्व संस्था यांच्या विरुध्द कोणती व्यूहरचना केली असता तिच्यात यश मिळेल, याचा ते सातत्याने विचार करताना दिसतात. त्यांची कोणतीही कृती स्वार्थाची, बिनडोकपणाची, किंवा मुख्यमंत्रिपदाच्या हवेची नसते, त्यांचा गेम प्लान काय आहे, ते प्रथम समजून घेऊ या.

त्यांचा गेम प्लान म्हणजे राजकीय खेळाची योजना अशी दिसते - मोदी सरकारला बहुमत आहे. बहुमत असले तरी बहुमताच्या बळावर मोदी सरकारला सुखाने राज्य करू द्यायचे नाही. सुखाने राज्य करू द्यायचे नसेल तर सातत्याने काही ना काही कटकटी निर्माण करीत राहिले पाहिजे. कटकटी निर्माण करीत असताना त्यामागे काही सैध्दान्तिक भूमिका मांडता आली पाहिजे. त्यांनी ठरविले की, अशी भूमिका मांडण्यासाठी संविधान, अल्पसंख्य, दलित, महिला, आदिवासी या सर्व घटकांचा आपल्याला भरपूर उपयोग करता येईल. तसा त्यांनी सुरू केला आहे.

 

समाजात कलाकार, लेखक, अभिनेते इत्यादींना आदराचे स्थान असते. या क्षेत्रात डाव्या मंडळींचे काम फार पूर्वीपासूनचे आहे. कलाकार, लेखक, अभिनेते आपआपल्या गुणांमुळे मोठेच असतात. तेवढेच ते दुसऱ्या बाजूला अतिशय क्षुद्र मनाचे असतात. पैसा, प्रसिध्दी, मानमरातब, सत्कार, सन्मान, वेगवेगळया पदव्या यांचे अतिशय हापापलेले असतात. वर्तमानपत्रात फोटो आला नाही किंवा आपले नाव कुठे झळकले नाही, तर ते फार अस्वस्थ होतात. स्वतःच बातम्या पेरत राहतात. उगाचच वादंग निर्माण करतात. या सर्वांची ही गरज डावी मंडळी भागवितात. बाटलीच्या गरजेसारखी ही गरज आहे. मग खाल्ल्या अन्नाला जागून मोदी सरकारविरुध्द पत्रक काढ, कधी मोर्चा काढ, कधी पुरस्कारवापसी कर असली नाटक ते खेळू लागतात. सामान्य माणसाला ही सर्व मंडळी मोठी वाटतात, पण ती किती छोटी असतात, याचा अनुभव ते कधी घेत नाहीत. सामान्य माणसावर त्याचा काहीतरी परिणाम होतो.

 

या डाव्यांनी आता संविधान हाताशी धरले आहे. डावे म्हणजे बहुतेक कम्युनिस्ट आणि माक्र्सवादी असतात. संविधान जेव्हा निर्माण झाले, तेव्हा त्याला सर्वात जास्त विरोध या लोकांनी केला. त्यांना रशियासारखे संविधान पाहिजे होते. कामगार वर्गाकडे सर्व सत्ता देणारे संविधान पाहिजे होते. डॉ. बाबासाहेबांनी ते केले नाही. आता ते संविधानभक्त झाले आहेत. रावणाने रामाची आरती करावी किंवा अफजलखानाने शिवाजी महाराजांना कुर्निसात करावा, अशातली ही गोष्ट झाली.

या लोकांची वक्तव्ये वाचली तर मोदी विरोधाचे एक कथानक पुढे येत जाते. दोनच उदाहरणे घेऊ या. एक आहेत 'हिंदू' या दैनिकाचे संपादक एन. राम आणि दुसरे आहेत प्रकाश करात. चेन्नईवरून प्रकाशित होणारे इंग्लिशमधील 'हिंदू' हे दैनिक अतिशय प्रतिष्ठित आहे. राजीव गांधी यांच्या बोफोर्स भानगडी या दैनिकानेच प्रथम बाहेर काढल्या. मुंबईतील एका कार्यक्रमात ते म्हणतात, ''सीएए आणि एनआरसी दुसरे तिसरे काही नसून हिंदुराष्ट्र प्रोजेक्टचा एक भाग आहे. आर्थिक अपयश झाकण्यासाठीचा हा एक प्रयत्न आहे. हिंदुराष्ट्रातून मुसलमानांना वगळण्याची ही योजना आहे. ती घटनाबाह्य आहे, म्हणून ती टिकणार नाही.''

याच कार्यक्रमातील असेच एक अफलातून वक्ते आहेत गोपाळ गुरू. हिंदूंना शिव्या देण्यातच या गोपाळाचे गुरुत्व प्रकट झाले आहे. ते म्हणतात, ''शाहीन बागेत आंदोलन करणाऱ्यांनी राजकारणाला कलाटणी देण्याचा मार्ग दाखविलेला आहे. आम्ही त्यांना सलाम करतो.'' प्रकाश करात म्हणतात,'' केंद्र सरकार संविधानावरच हल्ला करीत आहे. केरळ सरकारने सीएए विरोधात ठराव पारित करणे, यात काहीही गैर नाही. केंद्र सरकारचा कायदा घटनाबाह्य आहे.''

एन. राम काय किंवा प्रकाश करात काय, दोघेही जण नागरिकत्व कायदा घटनाविरोधी असल्याचे सांगतात. पण तो घटनाविरोधी कसा आहे, कोणत्या कलमांच्या विरोधात जाणार आहे आणि तो कसा जाणारा आहे, हे मात्र कुणीच सांगत नाही. त्यासाठी घटनेचा अभ्यास असावा लागतो. घटनेचे समतेच्या संदर्भातील 14वे कलम आहे. ते म्हणते की, नागरिकाला कायद्याप्रमाणे समान संरक्षण मिळेल. कलम 15 म्हणते की, धर्म, वंश, जात, लिंग यावरून राज्य भेदभाव करणार नाही. नागरिकत्व कायदा नागरिकांमध्ये कसलाही भेदभाव करीत नाही. तो फक्त एवढेच म्हणतो की, भारतातून फुटून निघालेल्या मुसलमानांना पुन्हा भारताचे नागरिकत्व मिळणार नाही. आणि या फूटपाडयांना नागरिकत्व मिळावे म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना हातात हात घालून काम करीत आहेत.

या सर्वांचा प्रयत्न मोदी सरकारविरुध्द जनतेच्या मनात अविश्वास निर्माण करण्याचा आहे. म्हणून खोटे विषय उत्पन्न करून, ज्यांना काही समजत नाही त्यांना आंदोलनाला बसवून, प्रसिध्दी माध्यमांना हाताशी धरून आणि खिशात ठेवून हा सर्व खेळ चालू आहे. हा आगीशी खेळ आहे. महात्मा गांधींनी तो खेळला. त्यांनी 1920 साली खिलाफत चळवळीला पाठिंबा दिला. हिंदू-मुस्लीम भाई भाईच्या घोषणा दिल्या. त्या आताही दिल्या जातात. 'रघुपती राघव राजाराम' या भजनात अल्ला घुसवला. परिणाम 1947 साली देश दुभंगण्यात झाला. मुसलमानांना तुम्ही अगोदर भारतीय आहात, तुमची संस्कृती भारतीय आहे, तुमचा वंश भारतीय आहे, तुम्ही अरब किंवा तुर्क नव्हेत, हे सांगणे आवश्यक होते. त्याऐवजी त्यांच्या डोक्यात फुटीरता भरली. तेच काम आता ही सर्व मंडळी करतात.

तेव्हा हिंदू समाज झोपलेला होता. आज तो जागा आहे. देशात त्याला मोदींचे नेतृत्व आहे, महाराष्ट्रात तो नेतृत्वहीन आहे. मुसलमान समाज रस्त्यावर उतरू शकतो, शांततामय आंदोलन करू शकतो, महिला उतरू शकतात. हिंदू समाज काही झोपलेला नाही. त्यालाही रस्त्यावर उतरून आंदोलन करायचे आहे. सर्व घडामोडींविषयी त्याला आपला रोष प्रकट करायचा आहे. परंतु त्याला सांगणारे कुणी राजकीय क्षेत्रात दिसत नाही.

 

एक रडगाणे मात्र तो रोज ऐकतो - 'शिवसेनेने विश्वासघात केला. शिवसेनेचा भ्रमनिरास होईल आणि उद्या ती आमच्याबरोबर सत्तेत येईल.' या सर्वांना आता हे सांगण्याची वेळ आलेली आहे की, पुढील पाच वर्षे यातील काही होणार नाही, हे लक्षात ठेवा. हातात आलेली सत्ता कुणी सुखासुखी सोडत नाही. सोडण्याचे काही कारणही नाही. शिवसेना पक्षप्रमुखांनी वाघाचे दात आणि नखे काढून ठेवली आहेत, त्यामुळे काँग्रोस आणि राष्ट्रवादी, या वाघाला उगाचच त्रास देणार नाहीत. काँग्रोस आणि राष्ट्रवादीला सत्तेत राहण्याचीच सवय आहे. आणि आपले 'कोट'कल्याण करून घेण्याची भूक आहे, ते कशाला सत्ता सोडतील?

वर दिलेला सर्व गेम प्लान उद्ध्वस्त करायचा असेल तर पुरुषार्थाशिवाय पर्याय नाही. हा महाराष्ट्र शिवरायांचा आहे. दीड-दोन लाख सैन्याने वेढलेल्या शाहिस्तेखानाच्या छावणीत शिरून त्याची तीन बोटे कापणाऱ्या शिवरायांचा आहे. मोजके मावळे बरोबर घेऊन कोंढाण्याचा दुर्गम कडा दोरीने चढून उदयभानला स्वर्गाला पाठविणाऱ्या तानाजीचा आहे. जो पराक्रम करतो त्याला विजय मिळतो. जो जे गेले त्याच्याविषयी केवळ रडत बसतो, त्याच्या हाती... झोळी येते.

महाभारतात विदुलेचे अख्यान आहे. तिचा मुलगा संजय सिंधू देशाचा राजा होता. एका लढाईत तो हरला. (म्हणजे निवडणूक हरला.) निराश होऊन घरी बसला. राज्य गेल्याचा शोक करीत बसला. मुलाचा हा अवतार बघून विदुला संतापली. ती मुलाला म्हणाली, '''अरे, तू जन्मतःच मेला का नाहीस? म्हणजे मी दोन दिवस रडले असते. आता तुला पाहून रोज रडावे लागते. ऊठ, पराक्रम कर. धूर काढून धुमसत राहण्यापेक्षा विद्युल्लतेप्रमाणे क्षणभर चमकणे अधिक श्रेयस्कर. तेव्हा ऊठ आणि पराक्रम कर.''

ही वेळ सारा महाराष्ट्र ढवळून काढण्याची आहे. गल्लीबोळात मरगळलेल्या कार्यकर्त्यांत उत्साहाचा वारा भरण्याची आहे. तो संघर्षशील आहेच, तो पराक्रमालादेखील तयार आहे, वाट्टेल ते सोसायलादेखील तयार आहे, त्याला फक्त दिशा देण्याची गरज आहे, नेतृत्व देण्याची गरज आहे. एकेकाळी पराक्रम केलेल्या गोपीनाथरावांचे स्मरण करा आणि रणांगणात उतरा.

vivekedit@gmail.com