शिवशंकरभाऊ व्रतस्थ सेवेकरी

विवेक मराठी    15-Feb-2020
Total Views |

 

bhau_1  H x W:

****अश्विनी मयेकर*****
शेगांवचे श्री संत गजानन महाराज संस्थान आणि त्याचे व्यवस्थापकीय विश्वस्त शिवशंकरभाऊ पाटील हा अद्वैत समास होता. एक धार्मिक संस्थान किती प्रकारची सेवा कार्ये करू शकते, त्याचा मार्ग शिवशंकरभाऊंनी आखून दिला. व्रतस्थ सेवेकरी असणे म्हणजे काय, याचा चालताबोलता आदर्श म्हणजे शिवशंकरभाऊ. व्यवहारात शुचिता पाळणे म्हणजे काय याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे त्यांनी संस्थानात रुजवलेली कार्यसंस्कृती. असे अनेक आदर्श कृतीतून रुजवणारे शिवशंकरभाऊ यांचे आज वृद्धापकाळाने देहावसान झाले. त्यांच्या पंचाहत्तरीचे औचित्य साधून साप्ताहिक विवेकसाठी घेतलेली ही दीर्घ मुलाखत पुनःप्रकाशित करत आहोत.
शेगावचं श्री गजानन महाराज संस्थान आणि संस्थानाचे व्यवस्थापकीय विश्वस्त म्हणून धुरा सांभाळणारे शिवशंकरभाऊ पाटील हे एक अद्वैत आहे. 'महाराज आणि भक्त यांच्यातला आम्ही दुवा आहोत. त्यांच्या दरबारात भक्तांचा मान पहिला, मग आमचा' हे शब्द कृतीत उतरवणारे शिवशंकरभाऊ पाटील. सेवाकार्याचा एक आदर्श आपल्या कामातून निर्माण करणारे. 'मंदिर हे समाज मंदिर कसं होऊ शकतं, बहुदिशांनी समाजासाठी अनेक उपक्रम करताना व्यवस्थापन कसं पारदर्शक ठेवता येतं,' याचा वस्तुपाठ म्हणजे शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थान. हा आदर्श निर्माण झाला तो भाऊंचं कुशल नेतृत्व आणि त्यांच्यातील व्यवस्थापन कौशल्यामुळे. शिवशंकरभाऊ येत्या 12 जानेवारीला वयाची 75 वर्षंपूर्ण करत आहेत. स्वामी विवेकानंदांची जयंती आणि भाऊंचा जन्मदिवस एकच... हा आनंदयोग आहे. 'मी नाही, माझं काम बोलेल' या विचारावर श्रद्धा ठेवून गेली 52हून अधिक वर्षं ते नि:स्पृहपणे काम करत आहेत. हा लेख म्हणजे प्रसिध्दिपराङ्मुख सेवेकऱ्याच्या अजोड कार्याला विवेक परिवाराने केलेला सलाम आहे.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

'सेवा' हा शब्द आपण हल्ली खूप सैलपणे वापरतो. पण या शब्दाचा नेमका अर्थ समजून घ्यायचा असेल तर शेगावच्या श्री गजानन महाराज संस्थानाने उभे केलेले 42 सेवाप्रकल्प आणि त्यांची कार्यपद्धती पाहावी. हे केवळ धार्मिक संस्थान नाही, तर मानवतेचं मंदिर आहे आणि म्हणूनच आध्यात्मिक, वैद्यकीय, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहे. भक्तांनी महाराजांच्या चरणी वाहिलेला निधी पुन्हा जनसेवेसाठी उपयोगात आणणं हा इथला धर्म आहे. 'सेवा हीच सर्वश्रेष्ठ साधना' अशी विचारसरणी आहे. पराकोटीचा साधेपणा, मन प्रसन्न करणारी स्वच्छता, पारदर्शक कारभार ही मूल्यं आचरणात आणणारं हे संस्थान आहे.

निरपेक्ष वृत्तीने सेवा करणं म्हणजे येरागबाळयाचं काम नाही. संस्थानाने उभारलेली कामं, त्यात कार्यमग्न असलेली माणसं पाहिली की आलेला माणूस अंतर्मुख होतो. भाऊंच्या घराण्यात तर सेवेची दीर्घ परंपरा आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्व घडणीवर झालेल्या संस्कारांविषयी बोलताना भाऊ म्हणाले...
सेवावृत्ती ही बाहेरून कोणीतरी लादायची गोष्ट नाही. ती तुमच्यात मुळातच असावी लागते, तर दृढ होते. आणि असली तर संस्कारांमुळे बहरते.
आमच्यात ही सेवावृत्ती रुजवली घरातल्या संस्कारांनी. साधुसंतांची निरपेक्ष भावाने सेवा करणारी आमच्या घराण्याची आजची सातवी पिढी आहे. नागझरीचे संत गोमाजी महाराज हे आमच्या घराण्याचे गुरू होते. त्यानंतर गर्गाचार्य महाराजांच्या सेवेची संधी मिळाली आणि मग गजानन महाराजांची भेट झाली. असे हे 7 पिढयांत संक्रमित झालेले संस्कार आहेत. त्यातून असे घडत गेलो.
 

bhau_1  H x W:  
 
दुसरं कारण म्हणजे संसर्ग... सहवास... खूप थोरामोठयांचा सहवास मला लाभला. त्यातूनही घडण होत गेली. मूळची सेवावृत्ती दृढ होत गेली.
 
अगदी तरुण वयातच, जेमतेम विशीचा उंबरा ओलांडलेला होता तेव्हापासून भाऊ मंदिरात सेवा देत आहेत. बहुधा त्यांचं ते विधिलिखित असावं. भाऊंनी सांगितलं...
 
शेगावातल्या शाळेत मॅट्रिकपर्यंत शिक्षण झालं. अभ्यासात फारशी गोडी नव्हती. 11 महिने खेळायचं, 1 महिना अभ्यास करायचा ही पद्धत. मॅट्रिक पास झाल्यानंतर वडिलांनी विचारलं, ''पुढे काय?'' तर मी म्हटलं, ''तुम्ही सांगाल तसं..''
ते म्हणाले,''अमरावतीला जा पुढचं शिकायला...'' मात्र काही काळाने त्यांचा विचार बदलला. म्हणाले,''ते शिक्षण घेऊन तू काय करशील? सरकारी कचेरीत बाबू होशील...तसलं शिक्षण नको.'' एकूण धार्मिक-आध्यात्मिक विषयांकडे माझा ओढा पाहून त्यांनीच सुचवलं की ,'आळंदीला वारकरी शिक्षण संस्थेत जा.' पुन्हा तोही विचार त्यांनी बदलला. त्यांना वाटलं, हा वारकरी शिक्षण संस्थेत जाऊन साधू झाला तर घरच्या काय कामाचा राहील? घरची गडगंज शेती होती, तीच पाहावी असा शेवटी निर्णय झाला. शेतीचं काम पाहायचं म्हणजे संध्याकाळी खळ्यात जायचं. तिथे दिवाणजी, कारभारी सगळा दिवसभराच्या कामाचा तपशील सांगत. दुसऱ्या दिवशी काय करायचं ठरलं आहे याचा माहिती देत. हे सगळं ऐकायचं आणि घरी निघून यायचं. मला प्रत्यक्ष काहीच काम करावं लागत नव्हतं. मग एक दिवस वडिलांना म्हटलं, ''शेतात तर मला काहीच काम करावं लागत नाही. दुसरं काही सांगा.'' तेव्हा मंदिरात फरशा बसवायचं काम चालू होतं. वडील म्हणाले,''तिथे जाऊन देखरेख कर.'' आणि मी मंदिरात सेवेकरी म्हणून दाखल झालो.
 
वडिलांचे मित्र होते गफूरभाई म्हणून. ते म्हणाले,''तू आता सेवा करायला निघालाय. सेवा म्हणजे काय... नेकी कर, दरिया में डाल, भूल जा... और सेवा करते वक्त दुनिया से कुछ अपेक्षा रखोगे तो निराशा हाथ में आयेगी।''
 
हा मला मिळालेला पहिला उपदेश. त्याचं कधी मी विस्मरण होऊ दिलं नाही.
2010मध्ये महाराजांच्या समाधीला आणि संस्था स्थापनेला शंभर वर्षं पूर्ण झाली. अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे ही महाराजांची भक्तांना शिकवण. या शिकवणीनुसार आजही वर्षाचे 365 दिवस शेगावात अन्नदान होतं. रोज हजारो भाविक आणि जवळपासच्या खेड्यातले गरीब लोक याचा लाभ घेतात. सर्वांना जेवण एकच. महाराजांनी भक्तांमध्ये कधी गरीब-श्रीमंत असा भेद केला नाही. त्यांच्या भक्तांनीही ही परंपरा जपली आहे.
 

anand sagar_1  
आयुर्वेद या भारतीय उपचार पद्धतीचा रुग्णांना लाभ व्हावा या हेतूने शेगावात 1963 साली धर्मार्थ आयुर्वेदिक दवाखान्याची स्थापना झाली. हे वैद्यकीय सेवेतलं पहिलं पाऊल. त्यानंतर धर्मार्थ ऍलोपॅथी दवाखाना, धर्मार्थ होमिओपॅथी दवाखाना, फिजिओथेरपी विभाग, अपंग पुनर्वसन केंद्र, नेत्र शस्त्रक्रिया शिबिरं, जिथे सरकारी रुग्णालयं नाहीत किंवा प्राथमिक स्वास्थ्य केंद्रासारखीही सुविधा नाही अशा ठिकाणी फिरती रुग्णालयं, आदिवासी विभागाकरिता फिरती रुग्णालयं, दारिद्र्यरेषेखालील गरिबांसाठी ग्रामीण आरोग्य सेवा योजना अशा विविध दिशांनी वैद्यकीय सेवा विभाग काम करू लागला. आतापर्यंत लाखो लोकांना या सगळ्या उपक्रमांचा फायदा झाला आहे.
वारकरी संप्रदायाची शिकवण देणारी वारकरी शिक्षण संस्था हा शेगावातील एक महत्त्वपूर्ण उपक्रम. 1964 साली ही शिक्षण संस्था स्थापन झाली, तेव्हा पुरुषोत्तम पाटील व्यवस्थापकीय विश्वस्त होते. प.पू. (वै.) मामासाहेब दांडेकर यांच्या हस्ते तिचा शुभारंभ झाला, तर प.पू. धुंडामहाराज देगलूरकर यांच्यासारख्या विद्वानांचं मार्गदर्शन लाभलं. इथे कीर्तन, भजन, प्रवचन, भारुड यांच्या शिक्षणाबरोबरच श्रीमद्भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, श्रीमद्भागवत, 
संतगाथा आदी ग्रंथांचं अध्ययन करतात.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

शिवशंकरभाऊंनी व्यवस्थापकीय विश्वस्त म्हणून जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी संस्थानाचं काम विविध दिशांनी वाढायला सुरुवात झाली होतीच, मात्र या वाढीला आणि विस्ताराला भाऊंच्या कारकिर्दीत अफाट वेग आला. तोवर सेवा म्हणून भाऊंनी मंदिर बांधकामावर देखरेख, गजानन वाटिकेच्या उभारणीत सहभाग घेतला होताच. जेव्हा पुरुषोत्तम पाटील यांच्यानंतर त्यांच्याकडे हे पद चालून आलं, तेव्हा ते स्वीकारण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यामागची कारणं सांगताना ते म्हणाले,
 
ही जबाबदारी येण्याआधी शेगावातल्या 11 संस्थांचा पदाधिकारी म्हणून काम केलं होतं. नगरपरिषदेचा 6 वर्षं अध्यक्ष, सेल पर्चेसिंग सोसायटीचा 3 वर्षं अध्यक्ष, कॉटन जिनिंग ऍंड प्रोसेसिंगचा 3 वर्षं, लायन्स क्लबचा 1 वर्ष अध्यक्ष, गोरक्षण संस्थेचाही सचिव होतो. आणि शिवाय 5 धार्मिक संस्थांचा पदाधिकारी होतो. ज्या संस्था डबघाईला आल्या होत्या, बुडित होत्या, भांडणतंटे होते.. अशाच संस्थांची जबाबदारी माझ्यावर आली होती. अशा संस्थेचा मला अध्यक्ष केलं गेलं. त्या सर्व संस्था मी महाराजांच्या कृपेने वर आणल्या. नगरपरिषदेचा अध्यक्ष झालो तेव्हा तिचं वार्षिक उत्पन्न 18 लाख होतं. ते 5 वर्षात 58 लाख झालं. नगरपरिषदेच्या खात्यात रक्कम शिल्लक पडू लागली.
 
पण ज्या संस्था सावरून मी बाहेर पडलो, त्या मी बाहेर पडताक्षणी पुन्हा मूळपदाला पोहोचल्या. आपण सावरलेली संस्था नंतर पुन्हा डबघाईला येणार असेल, तर काम केल्याचा काय फायदा?
 
anand sagar_1  
या अनुभवांच्या पार्श्वभूमीवर, मी संस्थानाच्या व्यवस्थापकीय विश्वस्तपदाची जबाबदारी घ्यायला तयार नव्हतो. तुम्ही सांगाल ती सेवा करीन पण हे पद नको, असं माझं म्हणणं होतं. मी ऐकत नाही हे लक्षात आल्यावर आमचे ट्रस्टी जपसिद्ध कोटीचे डॉ. टी.के. पाटलांना भेटायला गेले. त्यांना मी मानत असे. त्यांनी दिलेला सल्ला ऐकत असे. माझ्या नकाराचं कारण ऐकल्यावर ते म्हणाले, ''हे तुमचे विचार खूप चांगले आहेत. पण या जबाबदारीला नाही म्हटल्यावर तुम्ही काय करणार आहात?'' मी म्हटलं, ''शेती करीन घरची.'' त्यावर त्यांनी मला विचारलं,''ती शेती तरी राहणार आहे का? आपण जे शरीर जोपासतो, ते तरी राहणार आहे का? मग काहीच जर राहणार नसेल तर आत्ताच नाक का दाबून घेता?...'' या प्रश्नावर मी निरुत्तर झालो.
ते पुढे म्हणाले, ''ईश्वरइच्छेने जे काही व्हायचं असेल ते होत राहतं. ईश्वर आपल्याला निमित्तमात्र करतो. त्याचा अहंभाव बाळगू नये आणि कर्तृत्व आपल्याकडे घेऊ नये.''
''ठीक आहे'' असं म्हणून त्यांच्याकडून निघालो आणि ट्रस्टींना वृत्तान्त कथन केला. म्हटलं, ''डॉक्टरांनी असा सल्ला दिला असला तरी हे पद स्वीकारण्याची माझी सध्या तयारी नाही.'' ट्रस्टी निघून गेले. दुसऱ्या दिवशी पहाटे डॉ. टी.के. पाटील घरी आले. ''महाराजांना तुमच्याकडून सेवा हवी आहे, नाही म्हणायचं नाही. तुम्हाला जबाबदारी घ्यावी लागेल.'' असा आदेश दिल्यावर माझं बोलणंच संपलं. थोड्याच दिवसांत जबाबदारी स्वीकारत कामाला सुरुवात केली.

संत श्री गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाची आज विदर्भातल्याच नव्हे, तर महाराष्ट्रातल्या दर्जेदार अभियांत्रिकी महाविद्यालयात गणना होते. त्याच्या स्थापनेची हकिकतही रंजक आहे. भाऊ म्हणाले,
 
मी व्यवस्थापकीय विश्वस्त झालो, तेव्हा केंद्र सरकारकडून निरोप घेऊन एक राजकीय नेते शेगावला आले असताना म्हणाले की, ग्रामीण विभाग आणि धार्मिक स्थळाच्या ट्रस्टच्या दोन इंजीनियरिंग कॉलेजना परवानगी दिली आहे. एक शेगाव, दुसरे तुळजापूर. हा प्रस्ताव माझ्यासमोर आला तेव्हा मी हे शक्य होणार नाही असं सांगितलं. कारण शेगावसारख्या छोट्या गावात इंजिनियरिंग कॉलेज येणं म्हणजे छोट्या तलावात हत्ती डुंबायला उतरण्यासारखं आहे. शेगावचं जे एक ग्रामीण आणि धार्मिक वातावरण आहे, त्याला पोषक असणार नाही. तेव्हा सर्व बाजूंनी विचार करता हे आवाक्याबाहेरचं काम करणं शक्य नाही असं मी म्हटलं. त्यावर ते म्हणाले, 'ट्रस्ट तयार नसेल तर कॉलेज देणं शक्य नाही.' यानंतर सर्व बाजूंनी मला आग्रह होऊ लागला. मी सांगितलं, 'एकदा जबाबदारी घेतली आणि ती जर नीट पार पाडता आली नाही, तर संस्थेकरिता योग्य होणार नाही.' शिवाय नकाराचं कारण,'आमच्याकडे पैसा नाही, जागा नाही, आणि लागणारा अनुभव नाही.' तर ते म्हणाले, 'तुमच्या या तिन्ही अडचणी सोडवल्या जातील. त्याकरिता दर वर्षी तुम्हाला 2 कोटी रुपये देण्यात येतील. शिवाय 35 एकर जागा आणि अनुभवी प्रिन्सिपॉलही देता येईल. ही पूर्तता आम्ही करतो. आता तुम्ही का नाही म्हणता?' मी म्हटलं, 'हा प्रस्ताव ट्रस्टींसमोर ठेवून एकमताने मान्य झाला तर पुढला विचार करू.' ते बाहेर पडल्यावर सगळ्यांनी मला घेरलं. मी म्हटलं, 'यांनी आत्ता आश्वासन दिलं खरं... सर्वच राजकारणी लोक आश्वासनांची पूर्तता करतील हा भरवसा कोण देतो ते सांगा. कॉलेज घेतलं गेलं आणि संस्थेच्या नावाला बट्टा लागला तर आम जनता कोणाला जबाबदार धरेल?' तरीही सगळ्यांनी जोर धरला आणि श्री गजानन शिक्षण संस्था, संस्थानच्या अधिपत्याखाली चालेल असा वेगळा ट्रस्ट करून कॉलेज घेण्यात आलं. सरकारने आम्हांला 33 एकर जमीन दिली. आम्ही ओळखीच्या, भरवशाच्या व्यक्तीला - पी.जी. पाटील यांना प्रिन्सिपॉल म्हणून नेमलं.
 
anand sagar_1  
कॉलेज सुरू झाल्यावर काही काळाने ते नेते पुन्हा आले. तेव्हा आम्ही त्यांना 35 एकर जागा मिळाल्याचं सांगितलं. आणि 2 कोटी रुपये आणि प्रिन्सिपॉल देण्याची विनंती केली.
त्यावर ते म्हणाले, 'तुमचं कॉलेज तर सुरू झालं आहे. तूर्तास आमच्याजवळ पैसे नाहीत.' पण नंतरही ते पैसे आले नाहीत.
 
पहिल्या वर्षी फक्त 17 लाखांत इंजीनियरिंग कॉलेजचं एक वर्ष पूर्ण केलं. पहिल्याच वर्षी शासकीय कॉलेजपेक्षाही उत्तम रिझल्ट लागून, उमेश कौल हा विद्यार्थी विद्यापीठात पहिला आला.
 
सरकारचा असा अनुभव आल्यानंतर परत कधी सरकारकडे पैसे मागितले नाहीत. जिथे सरकार वर्षाला 2 कोटी देणार होतं तिथे आमचा वर्षाचा खर्च फक्त 17 लाख झाला. आजही आमच्या कॉलेजचं नाव ग्रामीण विभागात टॉपवर आहे. केवळ फीच्या पैशातून कॉलेज चालवूनही आमच्याकडे चांगली रक्कम शिल्लक असते.
 
सरकारी इंजीनियरिंग कॉलेजपेक्षा उत्तम निकाल असणारं, आवश्यक त्या पायाभूत सुविधा, सुसज्ज इमारत, आवश्यक ती सगळी इक्विपमेंट, स्टाफ पात्रतेचे सर्व निकष पूर्ण करणारं असं हे कॉलेज आहे.
कॉलेज चालवायला घेतल्यावर संचालक मंडळ स्थापन केलं. त्यांची मिटिंग घेतली. त्यांना विचारलं, 'आपण काय करायचं?' त्यावर ते म्हणाले की पहिली प्रशासकीय इमारत अशी भव्य आणि सुंदर करायची की त्याचा प्रभाव पडला पाहिजे.' त्यावर मी म्हटलं, 'आपला भारतीय विद्यार्थी बाह्य रूपाला भुलणारा नाही. शिकवणारा शिक्षक चांगला असेल, तर तो झाडाखालीही चांगलं शिकवेल आणि विद्यार्थीही तिथे येतील.' ते सगळ्यांना पटलं आणि साधेपणा आणि सौंदर्य यांचा मिलाफ असणाऱ्या कॉलेजच्या एकेक इमारती उभ्या राहिल्या.
 
कॉलेजमध्ये शिकवायला जी प्राध्यापक मंडळी आली होती त्यांना त्यांच्या मुलांसाठी इंग्रजी माध्यमाची शाळा हवी होती. त्यातून एक दर्जेदार इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू झाली. भारतीय संस्कारांना, मातृभाषेला महत्त्व देणारी अशी ही शाळा आहे. त्याला जोडून कनिष्ठ महाविद्यालय सुरू झालं. अतिशय कडक शिस्तीचं पालन करणारी असा तिचा लौकिक आहे. इथल्या शिस्तीविषयी एक किस्सा भाऊंकडून ऐकला. ते म्हणाले,
 
शाळेतल्या शिक्षकांनी आपला पूर्ण वेळ विद्यार्थ्यांना द्यायचा, इथे शिकवणाऱ्या शिक्षकांनी बाहेर खाजगी शिकवण्या करायच्या नाहीत आणि इथे जो विद्यार्थी शिकायला येईल त्याने खाजगी शिकवण्यांना जायचं नाही, या अटींवर शाळा सुरू करायला परवानगी दिली. जर एखादा विद्यार्थी खाजगी शिकवणीला जातो असा सुगावा लागला, तर शाळेच्या मुख्याध्यापिका मोटरसायकलवरून क्लासमध्ये जायच्या आणि त्या क्लासचालकाची हजेरी घ्यायच्या. दुसऱ्या दिवशी पालकांनाही शाळेत बोलावलं जायचं. आणि या शाळेचे नियम पाळायचे नसतील तर खुशाल दुसऱ्या शाळेत घाला असं सांगण्यात येई. आज या शाळेत 2700 ते 2800 विद्यार्थी आहेत. शाळेतून बाहेर पडलेले 70 विद्यार्थी मेडिकलचं, तर 200 मुलं इंजीनियरिंगचं शिक्षण घेत आहेत.
 
एकातून दुसरं काम समोर येत गेलं आणि त्या कामाला न्याय देणारी व्यक्ती भाऊंना सापडत गेली. मतिमंद विद्यालयाची सुरुवातही अशी झाली. भाऊ म्हणाले,
 
इंजीनियरिंग कॉलेजमध्ये प्रो. स्वामी म्हणून मॅथमॅटिक्सचे प्रोफेसर होते. त्यांच्या पत्नीने मतिमंद मुलांना शिकवण्याचं विशेष प्रशिक्षण घेतलं होतं. आपण शेगावात मतिमंदांसाठी विद्यालय सुरू करावं का, अशी त्यांनी विचारणा केली. सुरुवातीला माझ्या काही ते पचनी पडलं नाही. मी नकार दिला. त्यानंतर काही दिवसांनी जेव्हा परत इंजीनियरिंग कॉलेजमध्ये रात्री जायची वेळ आली, तेव्हा स्वामी मॅडम घरी परतताना दिसल्या. चौकशी केली तेव्हा कळलं की जवळपासच्या खेड्यातल्या मतिमंद मुलांचे खेळ घेण्यासाठी, त्यांना काही शिकवण्यासाठी त्या जातात. अशा 190 मतिमंद मुलांची यादी त्यांच्याकडे आहे. तेव्हा हा विषय किती गंभीर आहे, आणि स्वामी मॅडम किती तळमळीने काम करू इच्छिताहेत याची जाणीव झाली आणि अक्षरश: चारच दिवसांत शेगावात निवासी मतिमंद विद्यालय सुरू झालं. आतापर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर 3 सुवर्णपदकांसह अनेक बक्षिसं या शाळेच्या विद्यार्थ्यांनी मिळवली आहेत.
शेगावचा आनंद सागर प्रकल्प म्हणजे धर्म आणि विज्ञान यांचा अनोखा संगम असलेला प्रकल्प. केवळ शेगावसाठी नव्हे, तर संपूर्ण विदर्भाचा मानबिंदू ठरावं असं हे थक्क करणारं, अनेक विक्रम करणारं काम. या भागात एकूणच पाण्याची बोंब. नगरपरिषदेचं पाणी मंदिराला मिळत नसे आणि गावकऱ्यांनाही 5-6 दिवसांनी पाणीपुरवठा होई. मंदिराला पाणी मिळावं म्हणून जी विहीर खोदली, तिला पाण्याचे जिवंत झरे लागले आणि मंदिराची पाण्याची चिंता दूर झाली. पण गाव मात्र तहानलेलंच होतं. ते मोठ्या अपेक्षेनं मंदिराच्या विश्वस्तांकडे पाहू लागलं. संस्थानने पाइप लाईन टाकून अनेक घरांना नळाने पाणी दिलं, पण ते पुरेसं नव्हतं. काहीतरी कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या उद्देशाने विचार सुरू झाला. तेव्हा शेगावच्या दक्षिणेला ब्रिटिशकालीन एक विस्तीर्ण तलाव आहे अशी माहिती मिळाली. डॉ. लोबो या ब्रिटिश महिला डॉक्टरचा तो बोटिंग क्लब होता. संपूर्ण गाळाने भरलेला आणि झाडाझुडपांनी वेढलेला अशी त्याची अवस्था होती. 9 किलोमीटरवर असलेल्या नागझरी इथून वाहणाऱ्या मन नदीतून पंपाद्वारे पाणी उपसून तलावात भरलं, तर पाझरामुळे संस्थानाच्या विहिरींना आणि गावाला पाणी उपलब्ध होईल, या विचाराने हा तलाव जलसंचयासाठी संस्थानला मिळावा असा सरकार दरबारी अर्ज केला. शासनाची परवानगी मिळाली आणि तलाव असलेला 300 एकराचा परिसर दरसाल 300 रुपयांच्या लीजवर संस्थानाला मिळाला.
300 एकरचा हा परिसर विकसित करण्यासाठी 300 कोटी रुपयांचा खर्च होईल असा अंदाज होता. त्या वेळी संस्थानकडे शिलकीत होते फक्त 30 लाख रुपये. तीन भागांमध्ये असणाऱ्या या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी 125 कोटी रुपये लागतील असा अंदाज होता. पण भाऊंच्या नेतृत्वाखाली सर्वांनी कामाचा असा काही रात्रंदिवस धडाका लावला की ते काम 20 कोटीत, तेही 3 वर्षात पूर्ण झालं. सगळे चकित झाले. यावर भाऊंचं उत्तर होतं, ''पैसा नसतो तेव्हा कर्तव्यनिष्ठा काम करते.''
 
संस्थानाचं काम दशदिशांनी वाढत असलं तरी कोणतंही काम करताना, त्यासाठी वेगवेगळ्या परवानग्या मिळवताना, कोणत्याही राजकीय पुढाऱ्याकडे शक्यतो शब्द टाकायचा नाही, नियमांत बसत असेल तर परवानगी मिळेल, अन्यथा नाही, हे भाऊंचे विचार. त्याचं कटाक्षानं पालन होतं. आज अनेक पक्षांचे राजकीय पुढारी महाराजांच्या दर्शनाला येतात, अनेकांचे भाऊंशी स्नेहसंबंध आहेत. तरीही भाऊ कुठल्याही राजकीय पक्षाच्या मंचावर कधीही दिसत नाहीत. या संदर्भात बोलताना भाऊ म्हणाले,
मी कधीच कोणत्याही पक्षाच्या नेत्याला शक्यतो मंदिराचं काम करायला सांगितलं नाही. पण त्यांच्यापैकी कोणी जर दर्शनाला येणार असतील त्यांच्या स्वागतासाठी वेळेआधी हजर राहतो. मंदिराचं काम सरकारी नियमानुसार करायचं, हे पथ्य आजतागायत पाळलं. त्यासाठी कधी कोणाकडे शब्द टाकला नाही. कोणत्याही पद्धतीने त्यांना निरोप द्यायचा खटाटोप केला नाही. महाराजांची इच्छा असेल तर काम होईल, नाहीतर नाही. आपण कष्टांत आणि प्रयत्नांत कसूर करायची नाही.
या संस्थानचं आणखी एक वैशिष्टय म्हणजे 'सेवाधारी' ही अतिशय स्तुत्य अशी संकल्पना. आज संस्थानाच्या सर्व उपक्रमात या सेवाधाऱ्यांचा अमूल्य सहभाग आहे. 3 दिवस, 7 दिवस, 15 दिवस आणि 1 महिना असे कालावधी ठरलेले आहेत. या कालावधीत ज्याला जसा वेळ असेल तसा तो सेवेसाठी येतो. 25 सेवाधाऱ्यांचा एक गट आणि प्रत्येक गटाचा एक प्रमुख अशी व्यवस्था आहे. दोन वेळचं भोजन म्हणजे महाराजांचा प्रसाद, निवासाची सोय, सेवाधाऱ्याचा पोशाख आणि घरी जाताना प्रसादाचा नारळ दिला जातो. ही सेवा पूर्णपणे ऐच्छिक आहे. तरीही आज अकरा हजार सेवाधारी वेगवेगळ्या विभागात सेवा देत आहेत. साडेतीन हजारांची प्रतीक्षा यादी आत्ता संस्थानकडे तयार आहे. ही सेवाधारी संकल्पना कशी सुचली, याविषयीची हृद्य आठवण भाऊंनी सांगितली. ते म्हणाले,
 
अन्नदान हे इथे सर्वात महत्त्वाचं मानलं जातं. दर्शनाला येणाऱ्या महाराजांच्या भक्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती, पण त्या प्रमाणात स्वयंपाकासाठी माणसं उपलब्ध नव्हती. तेव्हा काही जण म्हणायचे की बंद करा हे अन्नदान. पण मी त्याला तयार नव्हतो. यावर मार्ग काय याचा विचार करत होतो. ऋषिपंचमी म्हणजे महाराजांचा समाधी दिन. त्या दिवशी लोक मोठ्या प्रमाणात दर्शनाला येणार याची खात्री होती. तेव्हा स्वयंपाकाची काय व्यवस्था करायची, याचा विचार माझ्या डोक्यात चालू होता. माझ्या मळ्यात जवळपासच्या खेड्यातून येणारे 10-12 लोक होते. त्यांनी माझ्याकडे एक दिवस सुट्टी मागितली. मी कारण विचारलं, तर म्हणाले, 'भाऊ, आम्ही सेवा म्हणून एके ठिकाणी पोळ्या करण्याचं काम घेतलंय.' ते मी लक्षात ठेवलं होतं. ऋषिपंचमीचा दिवस जवळ आला, तसं त्यांच्यापैकी एकाला बोलावून म्हटलं, ''रामा, तुम्हांला पोळ्या करण्याकरता यावं लागतंय...'' त्यावर तो लगेच उत्तरला,''भाऊ, आम्ही तर वाटच पाहून राह्यलो, तुमी कदी बोलावता याची'' त्यांना म्हटलं, ''तुम्ही या, तुमच्या राहण्या-जेवणाची व्यवस्था करतो.''
ऋषिपंचमीच्या आदल्या दिवशी यात्रा होती. संध्याकाळच्या वेळी आम्ही 3-4 ट्रस्टी देवळाच्या आवारात बसलो होतो. अचानक पावसाची खूप छान सर आली. तर एकाने म्हटलं, 'भाऊ, भजे करायला सांगा...' त्याप्रमाणे भजी करायला सांगून मी पुन्हा गप्पा मारायला लागलो. आणि आपण रामाला आणि बाकीच्या मजुरांना बोलावलंय, त्याची मला अचानक आठवण झाली. ते आले की नाही पाहायला मी गेलो. ते सगळे सांगितल्याप्रमाणे आले होते आणि ते करतायत काय हे पाहायला खिडकीतून डोकावलो, तर एक विलक्षण दृश्य दिसलं. ते लाल मिलो जवारीच्या भाकरीवर मिरपूड घालून पाण्याशी खात होते. मी रामाला म्हटलं, ''हे काय करून ऱ्हायला तुम्ही? मी तुम्हांला इथं जेवायला बोलावलं होतं. मग हे का खाऊन ऱ्हायला?'' त्यावर तो म्हणाला, ''सेवेकरी जेवण घेऊन आला होता... पण आम्हीच नाही म्हटलं. भाऊ, आमची सेवा उद्यापासून आहे... उद्या आम्ही सेवा करू आणि नंतर महाराजांचा भाजीभाकरीचा प्रसाद घेऊ.'' त्यांचे ते भाव बघून मला गहिवरून आलं. अक्षरश: गार झालो. ही सेवाधाऱ्याची वृत्ती आणि ट्रस्टी भजे पार्टीचं नियोजन करताहेत, ही गोष्ट मनाला लागली.... तेव्हापासून मी ठरवलं की आजपासून सगळं बंद. ठरवलं, याच्यापुढे वर्षातल्या महत्त्वाच्या चार उत्सवांपलीकडे देवळातलं काही घेणार नाही. बाकीचे ट्रस्टी म्हणाले, 'मग आम्हीही काही घेणार नाही.' ट्रस्टी बोर्डची मीटिंग बोलावली आणि त्यात सर्वांनी मिळून ठरवलं की, 'आजच्यानंतर 4 मुख्य उत्सवांपलीकडे इथलं काही घ्यायचं नाही...' हे ट्रस्टींनी ठरवलं, मग मी तर इथला व्यवस्थापक आहे. म्हणून मी ठरवलं की मी इथलं पाणीही पिणार नाही. आज मी इथे जे पाणी पितो ते माझ्या घरून आणलेलं असतं.
 
पहिल्या वर्षी आमच्या शेतावरचे मजूर आले. पण दर वर्षी उत्सवाच्या वेळी येणाऱ्या भक्तांची संख्या वाढतच गेली. मग आणखी काही गावातून सेवेसाठी लोक येऊ लागले. मग मंदिराचा परिसर मोठा झाला, तशी झाडण्याची पंचाईत होऊ लागली. मी रामाला विचारलं, ''रामा, कसं करता येईल?'' तो म्हणाला, ''आमची पोरं येतील की...'' मग पाच-सात मुलं आली. हळूहळू इतर गावातली तरुण मुलंही सेवा देण्यासाठी येऊ लागली. 200/250 जणांचा सेवाधाऱ्यांचा ग्रूप झाला.
 
महाराजांच्या प्रकट दिनाला जेव्हा 100 वर्षं झाली, तेव्हा चार ते साडेचार हजार सेवाधारी होते. ते सगळे स्वत:च्या खर्चाने येत होते, स्वत:च्या खर्चाने जात होते. इथे फक्त महाराजांचा भाजी-भाकरीचा प्रसाद घेत होते. गुलाल लावला, नारळ दिला की 'गजानन महाराज की जय' म्हणून आनंदाने आपापल्या घरी परतत होते.
 
त्या प्रकट दिनानंतर मी ठरवलं की अशी निरपेक्ष सेवा करणाऱ्यांना आपण या निमित्ताने कपडेलत्ते आणि धान्य द्यायचं. सगळे शेतकरी कुटुंबातून आलेले. मंगल कार्यालयात गव्हाच्या, डाळीच्या गोणी आणि कापडाच्या थप्प्या लावून ठेवल्या होत्या. सगळयांना तिथे बोलावलं. ते पाहिल्यावर त्यांच्यातले प्रमुख पुढे आले आणि विचारलं... 'हे काय आहे?' त्यांना सांगितलं, 'हे तुम्हांला वाटप आहे.' त्यावर ते म्हणाले, 'वाटप कसलं करता...आम्हांला तर काही अपेक्षा नाही.' मंदिराचे जे कर्मचारी होते ते म्हणाले, 'पण भाऊंनी तर आम्हांला सांगितलं आहे.' ते माझ्या भेटीला आले, 'भाऊ हे आमच्याकरता बरं नाही... आमाले हे पटूनच न्हाई ऱ्हायलं...' त्यावर मी म्हटलं, 'हे बघा गड्याहो, तुमी प्रमुख लोकं घरचे चांगले आहात. तुम्हाला हे नाही घेतलं तर काही फरक पडत न्हाई...पण तुमच्याबरोबर काम करणाऱ्या अनेकांची घरची गरिबी आहे. दोन वेळा पोटाला अन्न मिळेल याची खात्री नाही. तरीही ते कसलीही अपेक्षा न करता सेवा करायला येतात. हा त्यांच्या मनाचा किती मोठेपणा आहे. तुम्ही नाई म्हटलं तर ते ही घेणार नाहीत. कमीत कमी त्यांच्या घरी तरी हे जाऊ द्या...' मग त्यांनी माझं ऐकलं. सगळ्यांनी स्वीकारलं. महाराजांचा प्रसाद म्हणून दिलेलं धान्य आपल्या घरी ठेवलं आणि घरातलं धान्य मंदिराच्या राशीत आणून जमा केलं. 500 बोरी वाटलं, त्यातलं 250 बोरी वापस आलं.
 
बाहेर चांगले पगार देऊन कामाला माणसं मिळत नाहीत अशी ओरड ऐकू येते. पण आमच्याकडे उलटी स्थिती आहे. ज्याला ज्या विषयात रस आहे तिथे तो रुजू होतो. आज बाहेरही सेवा म्हणून काम करू इच्छिणारी माणसं मिळतील, पण त्यांच्या या वृत्तीला पोषक वातावरण कामाच्या ठिकाणी मिळेल का? हा खरा प्रश्न आहे.
शिवशंकरभाऊ म्हणजे एक चिंतनशील व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या जीवनविषयक चिंतनाला आजवरच्या अनुभवांची व्यापक बैठक आहे. त्यामुळेच त्यांच्या शब्दाला वजन येतं. बोलता बोलता ते खूप सहजपणे मोठा विचार देऊन जातात. त्यांच्या आत ही प्रक्रिया सतत चालूच असते. त्यांचा जन्म विवेकानंदांच्या जन्मदिवशीच... जो दिवस आपण युवादिन म्हणून साजरा करतो. त्या पार्श्वभूमीवर भाऊ आजच्या तरुण पिढीकडे कोणत्या दृष्टीने बघतात, तरुणांकडून त्यांच्या काय अपेक्षा आहेत, हे जाणून घ्यावंसं वाटलं. समस्त पालक वर्गाला, समाजाला अंतर्मुख करणारा प्रश्न त्यांनी समोर ठेवला. ते म्हणाले,
 
आजच्या मुलांना प्रेरित करणारं ध्येय, उद्दिष्ट त्यांच्यासमोर ठेवतो का आपण? पूर्वी आईवडिलांवर संस्कारांची जबाबदारी असे. आता त्यांनी हे काम घरातल्या टी.व्ही.वर सोपवलं आहे. सरकार करत असलेली सवलतींची खैरात, निरनिराळी शासकीय धोरणं यामुळेही तरुणांमधली जिद्द कमी होते आहे असं वाटतंय. पोट भरलेलं असेल तर धावायची ऊर्मी कमी होते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. शिक्षण क्षेत्रात विविध कोर्सचं उदंड पीक आलंय, पण एवढं शिकून चांगली नोकरी मिळायची खात्री वाटतेय का मुलांना? ती का वाटत नाही या प्रश्नाचं उत्तर आपण शोधलं पाहिजे.
 
'नेकी कर, दरिया मे डाल' हे सूत्र मनाशी जपत आणि आचरणात आणत तरुणपणी सुरू झालेला हा सेवेकऱ्याचा प्रवास वयाच्या पंचाहत्तरीतही चालू आहे... त्याच तटस्थपणे, त्याच निर्मोहीपणे... अशी माणसं आहेत, म्हणून समाज तग धरून आहे.

9594961865