उच्च तात्त्वि अधिष्ठान - भाग 1

विवेक मराठी    17-Feb-2020
Total Views |

ह्यापूर्वीच्या चार लेखांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुनिश्चित ध्येयाबद्दल आपण माहिती घेतली. यापुढच्या काही लेखांमधून आपण त्यांच्या तात्त्वि अधिष्ठानाची माहिती घेऊ.

shivaji_1  H x

अगदी सुरुवातीपासून महाराजांनी 'हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा' असेच जाहीर केले होते. हे राज्य 'श्रीं'च्या वरदेचे/कृपेचे आहे, ही त्यांची श्रध्दा कधीही भंग पावली नाही. आपण एक ईश्वरी कार्य करण्यास उभे असून आपल्याला त्यात कधीही अपयश येणार नाही, असा त्यांचा दृढ विश्वास होता. आपला धर्म व आपली संस्कृती ह्यांचे रक्षण हा त्यांचा प्रमुख कार्यक्रम राहिला.

आपल्या धर्माचा, परंपरेचा, भाषेचा त्यांना उत्कट अभिमान असला, तरी त्यांनी परधर्मीयांचा, परभाषिकांचा द्वेष किंवा दुःस्वास कधीच केला नाही. आपल्या धर्मातील, परंपरेतील चांगल्या गोष्टींचे रक्षण करण्यासाठी त्यांनी अनेकदा शस्त्र उचलले, पण परधर्मीयांच्या चांगल्या गोष्टींचाही सन्मान व संरक्षण केले. उदा., - परधर्मीयांची प्रार्थनास्थळे, धर्मग्रंथ आणि त्यांच्या स्त्रिया, मुले व धर्मगुरू यांना त्यांनी कधीही उपद्रव दिला नाही. त्यांच्या शत्रूंनीही याबद्दल त्यांची प्रशंसाच केली आहे. उदा. खाफिखानाचे लिखाण. त्यांचे सर्वच शत्रू नीतिमत्तेच्या बाबतीत फार आग्राही नव्हते, पण त्यांच्यावर लढाईत विजय मिळविल्यावरही महाराजांचे नैतिक वर्तन मात्र सदैव उच्चच राहिले. मनाची स्थिर आध्यात्मिक बैठक व रचनात्मक (Constructive) दृष्टीकोन असल्याशिवाय असे होणे शक्य नाही. आपली लढाई नेमकी कोणाशी व का आहे? त्या लढाईनंतरची सत्ता नेमकी का व कोणासाठी मिळवायची आहे? ह्याची निश्चिती असल्याशिवाय कोणी तसे वागू शकत नाही, जसे महाराज आयुष्यभर वागले.

महाराजांचा काळ म्हणजे सतरावे शतक. या काळात सर्व गोष्टींना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या धर्माचाच संदर्भ असे. धार्मिक कट्टरतेच्या या काळात शिवाजी महाराजांचे सर्वधर्मसहिष्णू असणे हे क्रांतिकार्यच होते! मुसलमान सुलतान इतरांना व ख्रिश्चन राज्यकर्ते ख्रिश्चनांशिवाय इतरांना तुच्छ आणि हीन समजत. त्यांच्या राज्यात इतर धर्मांच्या प्रजेला समान दर्जाची प्रजा म्हणून मान्यता मिळत नसे. भिन्नधर्मीय प्रजाजनांमध्ये धर्मभेदानुसार पक्षपात न करणारे राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न 17व्या शतकाच्या मध्याला महाराजांनी केला. ही ऐतिहासिकदृष्टया अत्यंत पुरोगामी घटना ठरते. धार्मिक कट्टरतेच्या या काळात नवे प्रदेश ताब्यात आल्याबरोबर भिन्न धर्मांच्या सर्व प्रजाजनांना समान मान्यता देण्याचे कर्तव्य त्यांनी चोख बजावले.

आज्ञापत्रातील धर्माच्या संकल्पनेप्रमाणे हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन अशा प्रस्थापित धर्मसंस्थांपेक्षा धर्म शब्दाचा अर्थ हा प्रजेमध्ये परस्पर अविरोध राखणे असा व्यापक सांगितला आहे. ह्या व्यापक अर्थामध्ये वरील प्रस्थापित धर्मसंस्थांचाही समावेश होतो. पण विशेष असे की, आज्ञापत्रात परंपरागत प्रस्थापित धर्म संपूर्णपणे मान्य न करता, 'परंपरागत जो उत्तम, वडील आचरत असतील तोच धर्म आचरोन कीर्तिलाभ होईल ते करावे,' असे स्पष्ट सांगितले आहे.

आज्ञापत्रातील इतर काही उल्लेख 'आपली सकल प्रजा निरुपद्रवी होत जावी, धर्मपथप्रवर्तक असावी. या प्रजेच्या करुणेस्तव ईश्वरे संपूर्ण कृपानुग्राहे आपणास राज्य दिले आहे. या ईश्वराज्ञेस अन्यथा केलियाने ईश्वराचा क्षोम होईल, हे संपूर्ण भय चित्तात आणोन राज्यमदारूढ (सत्तेचा अहंकार) न होता सर्वकाळ अप्रमत्त (निगर्वी) होऊन प्रजेचे हितकार्यी सादर असावे.'

यातून स्वतःच्या सदसद्विवेकाशी प्रामाणिक राहून एक जबाबदार राज्यव्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न दिसतो. धर्मपथप्रवर्तक म्हणजे धर्माने, सज्जनपणे वागणारे लोक असा अर्थ होतो. राज्यकर्ते आणि रयत हे दोन्ही जर धर्मपथप्रवर्तक असतील किंवा झाले, तर तो संपूर्ण समाजच चार नाही तर दहा पावले पुढे जाईल, ह्यात काही शंकाच नाही. असे सामायिक उन्नयन करायला बघणे (महाराजांनी) हे खरोखरच अत्यंत धोरणी आणि दूरदर्शीपणाचे होते आणि आहे.

पराक्रमाच्या बळावर राज्य मिळविता येते. वाढविताही येते पण केवळ त्यामुळे ते टिकत नाही. मग दीर्घकाळ ते टिकवायचे असेल, तर त्याची प्रशासकीय घडी पक्की व विधायक असली पाहिजे, हे त्यांनी ओळखले होते. त्यानुसारच ते वागत होते. लोककल्याण हेच त्यांचे मुख्य अधिष्ठान असायला हवे, हे ओळखून प्रशासन लोकाभिमुख ठेवण्याचीच त्यांनी सतत खटपट केली.

राज्याभिषेकाच्या प्रसंगी महाराजांनी, ''धर्माप्रमाणे म्हणजे कायद्यावर अधिष्ठित अशा न्यायाने राज्य करीन'' असे देव, गुरू, अग्नी यांना साक्षी ठेवून वचन दिले आणि अशा रितीने जनतेला राजकीय स्वातंत्र्याबरोबरच सुराज्याचेही वचन दिले, हे त्या राज्याभिषेकाचे खास वैशिष्टय होय! कारण असे वचन देण्याची सक्ती त्यांच्यावर कोणीच केली नव्हती. महाराजांनी ते स्वयंस्फूर्तीने केले म्हणून ते विशेष! त्यांच्या पूर्वीच्या राज्यकर्त्यांनीही (आदिलशाही, निजामशाही इ.) असे वचन स्वयंस्फूर्तीने दिले नव्हते, हेसुध्दा लक्षात ठेवण्याजोगे.

त्यांच्या अन्यधर्मीय शत्रूंना त्यांचा धर्मच श्रेष्ठ वाटत असे. पण महाराज इथेही वेगळे ठरले. स्वतः कट्टर हिंदू धर्माभिमानी असूनही त्यांनी राज्यकारभारात सर्व धर्म समानच मानले. राज्याभिषेकाचे सर्व विधी हिंदू धर्मानुसारच साजरे केल्यावरही, 'राज्यकारभारात हिंदू धर्माचे वर्चस्व राहील' असे कधीच म्हटले नाही. त्यांनी सतत 'स्वधर्म' नव्हे, तर 'सध्दर्मा'चाच पुरस्कार केला! तो अपूर्व आणि म्हणूनच काळाच्या पुढे जाणारा होता.

धर्मरक्षण व प्रजारक्षण हे ईश्वरी आज्ञेने प्राप्त झालेले कर्तव्य आहे आणि राज्यलाभसुध्दा, प्रजेचा संरक्षणकर्ता म्हणून ईश्वरकृपेनेच झालेला आहे व त्यामुळे ईश्वरशरण होऊन राज्यकारभार करावा अशी निष्ठा असावी, असे जे आज्ञापत्रात म्हटलेले आहे त्याचे मूळ वरीलप्रमाणे सांगता येते.

*** याविषयी अधिक पुढच्या लेखात ***