उच्च तात्त्वि अधिष्ठान - भाग 2

विवेक मराठी    17-Feb-2020
Total Views |

धार्मिक वर्चस्वापेक्षा राजकीय वर्चस्व अधिक फायद्याचे असल्याने महाराजांनी त्यालाच प्राधान्य दिले. राजकीय वर्चस्वाने धार्मिक उद्दिष्टेही आपोआप साध्य होत असल्याने धार्मिक लढायांच्या फंदात ते पडले नाहीत. हा त्यांचा राजकीय-धार्मिक विवेक!


shivaji_1  H x

महाराजांच्या कार्याला उच्च तात्त्वि अधिष्ठान असले, तरी त्याची व्यावहारिक बाजूही बळकट राहील याची ते काळजी घेत असत.आपले राज्य 'श्रीं'च्या वरदेचे असले, तरी त्याचा सर्व भार ईश्वरावर टाकून स्वतः निष्क्रिय राहण्याचा त्यांचा पिंड नव्हता. महाराज हे थोर विवेकी असल्याने त्यांचा दृष्टीकोन सम्यक आणि समतोलच राहिला.

त्यांचा धर्माभिमान आणि त्यांची श्रध्दा डोळस आणि प्रागतिक होती. त्यामुळेच समुद्रबंदीसारखी घातक रूढी ते मोडू शकले. त्याचप्रमाणे नेताजी पालकरांचे आणि अनेकांचे शुध्दीकरणही करून घेऊ शकले. ही पावले क्रांतिकारकच होती. पण त्यातही त्यांचा समतोल व कालभान आश्चर्यकारकच होता. हा आपला पुरोगामी दृष्टीकोनही त्यांनी आपल्या प्रजेला फार अगम्य व दुखावणारा ठरेल असा कधीही ठेवला नाही. सर्वसाधारणपणे कुठलाही समाज श्रध्दा आणि अंधश्रध्दा यानुसारच चालतो. त्याला फार तर्कनिष्ठ व बुध्दिनिष्ठ वागायला जमत नाही, ह्याचे त्यांना विलक्षण भान होते. त्यामुळे ह्या समाजसुधारणांची गती त्यांनी योग्य तीच ठेवली. त्यामुळेच स्वराज्यात हिंदू-मुसलमान दंगे का उसळले नाहीत आणि अपशकुन झाले म्हणून एखादी मोहीम माघारी का फिरली नाही, ह्याचेही आकलन होईल.

शिवाजी महाराजांनी ज्या व्यवस्थेविरुध्द उठाव केला, त्या व्यवस्थेत (परकीयांची सत्ता) राजकीय, सामाजिक आणि आर्थिक गुलामगिरी होतीच. पण मध्ययुगातील सर्वच प्रश्नांना कुठे ना कुठे धार्मिक संदर्भ येतच असे. त्यामुळेच धार्मिक अत्याचार, आक्रमणे आणि अन्याय यांचीही खूप मोठी परंपरा त्यांच्यासमोर होती. त्यावर प्रतिक्रिया म्हणून तेही तसेच वागले असते, तर सहज कळण्यासारखे होते. पण महाराज इथेच अपवाद ठरतात. त्यांच्या मनात धार्मिक सूड ह्या संकल्पनेला जागा नाही. मुसलमान संत, ख्रिश्चन धर्मगुरू यांचा ते आदरच करत. देवळांप्रमाणे त्यांनी मशिदी, दर्गे, चर्च यांचे रक्षणच केले. पीर, दर्गे, मशिदी यांना चालू असणारी जुनी इनामे चालूच ठेवली. नवीन मात्र दिली नाहीत. कोणतेच मोठे धार्मिक आक्रमण त्यांनी केले नाही. हे सर्व त्यांची उच्च तात्त्वि भूमिकाच दर्शवतात.

सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे त्यांची तात्त्वि भूमिका उच्च राहिली, तरी व्यवहार सावधच राहिला. त्यांनी अन्य धर्मीयांकडून आपल्याकडे राजकीय सत्ता घेण्याचेच ध्येय ठेवले होते व ते पूर्ण करण्यात मात्र त्यांनी कुठलीही कसूर केली नाही. राजकीय उद्दिष्टे साधण्यात त्यांनी कुठल्याही धार्मिक विचारांची / आग्राहांची / रूढींची तमा बाळगली नाही. त्यासाठी कुठल्याही धर्माच्या व्यक्तीशी, सत्तेशी त्यांनी सर्व प्रकारचा संघर्षच केला. धार्मिक वर्चस्वापेक्षा राजकीय वर्चस्व अधिक फायद्याचे असल्याने त्यांनी त्यालाच प्राधान्य दिले. राजकीय वर्चस्वाने धार्मिक उद्दिष्टेही आपोआप साध्य होत असल्याने धार्मिक लढायांच्या फंदात ते पडले नाहीत. हा त्यांचा राजकीय-धार्मिक विवेक!

शत्रूंच्या स्त्रिया ही हक्काची संपत्ती मानण्याचा तो काळ होता. पण महाराज इथेही वेगळे वागले. त्यांनी अत्यंत कठोरपणे स्त्रियांची अब्रू जपण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या शत्रूंनीही त्यांचे हे मोठेपण मान्य केले आहे. रणांगणावर नेहमीच दोन सैन्यांची लढाई होत असे. त्यातील जे सैनिक मारले जात, त्यांचे सामान धुळीत पडे. त्यात अनेक वेळेला त्यांचे धर्मग्रांथ असत. महाराजांचे प्रमुख शत्रू मुस्लीम असल्यामुळे अनेक वेळा कुराण हा त्यांचा पवित्र ग्रांथ धुळीत पडे. त्याचा अनादर होऊ नये म्हणून तो आदरपूर्वक उचलणे, पेटीत ठेवणे व पुढच्या मुक्कामावर त्या धर्माच्या अनुयायांच्या ताब्यात देणे याविषयी महाराज दक्ष असत. खाफीखान व अन्य मुस्लीम लेखकांनी तसे लिहून ठेवले आहे. धुळीत पडलेल्या धर्मग्रांथाबाबत इतके दक्ष असणारे महाराज ह्याच ग्रांथासाठी आपल्यावर चालून येणाऱ्या त्या धर्मीयाला मात्र त्वरित धुळीला मिळवत असत!

संत सत्पुरूष समागम

धर्माबाबत सश्रध्द आणि वैयक्तिक चारित्र्याबाबत अत्यंत दक्ष असणारे महाराज संतांची आणि सत्पुरुषांची नेहमीच चाड ठेवत असत. अशा संत-सत्पुरुषांच्या भेटी-गाठी, तसेच कीर्तने, प्रवचने ऐकण्याची त्यांना खूप आवड होती. हा जिजाऊसाहेबांचा वारसा होता. अशा भेटींतून, श्रवणातून मिळणारे आंतरिक समाधान त्यांना खूप महत्त्वाचे वाटत असावे. अत्यंत धकाधकीच्या दिनचर्येतून वेळ काढून ते अशा मंडळींना नेहमी भेटत असत. त्यातील प्रमुख नावे - संतश्रेष्ठ तुकाराम महाराज, समर्थ रामदास, बाबा याकुत केळशीकर (मुस्लीम), मौनीबुवा पाटगावकर, परमानंदबुवा पोलादपूरकर, निश्चलपुरी गोसावी, नारायणदेव चिंचवडकर, जयरामस्वामी वडगावकर, विठ्ठलस्वामी निगडीकर, रंगनाथस्वामी निगडीकर, भाऊदासबाबा (एकनाथांचे वंशज), बोधलेबुवा, धामणगाव आनंदमूर्ती ब्रह्मनाळकर, त्र्यंबक नारायण वाराणसीकर हे सर्व संत वेगवेगळया धार्मिक व वांशिक पार्श्वभूमीतून आलेले होते. तसेच स्वराज्याच्या सर्व भौगोलिक विभागांतून आले होते. महाराजांची सर्वसमावेशक वृत्तीही त्यातून दिसते. आंतरिक सभ्यता आणि मोठेपणा याखेरीज हे शक्य नाही.

केवळ संत-महंतांच्या भेटीवर महाराज संतुष्ट नसत. देवळे, मठ उत्सव यांचे दैनंदिन कामही सुरळीत चालावे, असा त्यांचा आग्राह असे. त्यांनी त्यासाठी वेगवेगळया सनदा, नेमणुका दिल्या होत्या. त्याप्रमाणे कामकाज चालते की नाही, यावरही त्यांचे लक्ष असे. उदा., दि. 25 मे 1642च्या पत्रात महाराज रोहिडखोऱ्याच्या देशपांडयास लिहितात - 'तुझे खोरीतील गाव आम्ही रोहिडेश्वरास दिल्हा, देवाचे पूजेस माणसे नेमिली ती तुवा काढिली, तरी तू याचा जाब देण्यास येणे.'

इथे महाराजांमधल्या अस्सल देवभक्त व खंदा प्रशासक अशा दोन्ही गुणांचे दर्शन घडते.