काफिरिस्तान

विवेक मराठी    17-Feb-2020
Total Views |

हिंदुकुश पर्वतरांगांमध्ये दऱ्याखोऱ्यांत, पर्वतांच्या कुशीत कैक मानवी वस्त्या वसल्या आहेत. उत्तर पाकिस्तानच्या, उत्तर अफगाणिस्तानच्या व उत्तर भारताच्या भागात अशा कैक जमाती राहतात. काही जमाती अशा ठिकाणी वसल्या होत्या की तिथे पोहोचणेसुध्दा दुरापास्त होते. एक प्रकारे त्या दुर्गम असल्याने या जमाती शेकडो वषर्े इस्लामी आक्रमणांपासून वाचल्या. अरब, तुर्की, पारसी, अफघाणी, मुघल असे अनेको हल्ले भारतावर झाले, पण या वसाहती सुरक्षित राहिल्या. यांची भाषा काश्मिरी भाषेसारखी, प्राकृतमधून उद्भवलेली आणि यांचा धर्म प्राचीन हिंदू धर्माचा एक पंथ. या प्रांताचे अलीकडचे नाव - काफिरिस्तान.

History of Kafiristan_1&n

इस्लामच्या दृष्टीला माणसे दोन रंगात दिसतात - मोमीन (जे अल्लाहला मानतात) आणि काफिर (जे अल्लाहला मानत नाहीत). या कारणास्तव या दुर्गम भागातील लोकांना 'काफिर' व त्यांच्या प्रांताला 'काफिरिस्तान' हे नाव पडले.

 

आज, या काफिरिस्तानची गोष्ट ...


काफिरिस्तान हे बाहेरच्यांनी दिलेले नाव. यांचे स्वत:चे नाव होते - दरद. दरद
, दरददेश किंवा दरदिस्तान म्हणजे अफगाणिस्तानमधील काफिरिस्तान, पाकिस्तानमधील चित्राल व भारतातील गिलगिट, बाल्टिस्तान, चिलास, हुंझा व नगर हा प्रांत.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

या प्रांताचा उल्लेख महाभारतात आला आहे. युधिष्ठिराने इंद्रप्रस्थ येथे राजसूय यज्ञ केला, त्याआधी पांडवांनी दिग्विजय यात्रा केली होती. त्या वेळी अर्जुनाने उत्तरेची मोहीम सांभाळली होती. त्याने काश्मीर, कम्बोज, बह्लिक, दरदा इत्यादी राजांना युध्दात हरवले होते. प्रथेनुसार ज्या राजांना जिंकले असते, त्यांना राजसूय यज्ञाचे आमंत्रण दिले जाते. तेव्हा राजसूय यज्ञाला दरद, किराट, मालव, सौवीरादी राजे आले होते. महाभारतातील सभापर्वात हे वर्णन आले आहे.

गिलगिट बाल्टिस्तानमधून चीनकडे जाणारा प्राचीन मार्ग आहे. या मार्गाने अनेक प्रवासी, व्यापारी, यात्रेकरू, बौध्द भिक्षू, काश्मिरी पंडित ये-जा करत असत. शेकडो वर्षे हा मार्ग वापरात होता. या मार्गाने बुध्दाचा शांतिसंदेश भारतातून मध्य आशियात व चीनमध्ये गेला. या मार्गावरील प्रवाशांनी इथल्या खडकांवर अक्षरश: हजारो चित्रे रेखली आहेत. कृष्णाची, बलरामाची, बुध्दाची, स्तूपांची अनेक चित्रे इथे पाहायला मिळतात. भरपूर लेखदेखील लिहिले आहेत. सोगडियन, तिबेटी, चिनी, पर्शियन अशा विविध भाषांतून हे लेख आहेत. मात्र 80% लेख ब्राह्मी लिपीत आहेत. क्वचित काही लेखांमधून दरदा राजाचा 'दरदराया' असा उल्लेख येतो.

भारतीय साहित्यात काश्मीरचा प्रसिध्द इतिहासकार कल्हण याने राजतरंगिणीमध्ये दरदांच्या राज्याची व तेथील राजांची सविस्तर माहिती दिली आहे. फा-हियान, सुंग-युन, वू-कोंग आदी चिनी यात्रेकरू या मार्गाने भारतात आले होते. त्यांच्या प्रवासवर्णनातून दरददेशाची माहिती मिळते. चौथ्या शतकात आलेला फा-हियान सांगतो - तो खोतान येथून दरददेशात आला. इथे त्याने सिंधू नदी ओलांडली व पलीकडे स्वात प्रांतात गेला आणि तिथून तो गांधारमध्ये गेला. हा प्रवास करायला त्याला 99 दिवस लागले! त्याच्या वर्णनातून दरददेशातील बौध्द भिक्षू, तेथील अनेक बौध्दविहार, तेथील चालीरिती यांची माहिती मिळते.

सहाव्या ते आठव्या शतकादरम्यान दरददेशात पटोलशाही राजांनी राज्य केले. पटोलदेव नवसुरेंद्रादित्यानंदीदेव हा या घराण्यातील प्रसिध्द राजा. याच्या शिलालेखातून कळते की पटोल राजे स्वत:ला भगदत्तचे वंशज म्हणत. या राजांच्या काळातील बुध्दाचे ब्राँझ पुतळे पाहायला मिळतात. राजा वज्रादित्यनंदीची राणी परमदेवी मंगलहंसिका हिने करवून घेतलेला एक सुंदर बुध्द पुतळा आता न्यूयॉर्कच्या आर्ट म्युझियममध्ये आहे.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/ 

आठव्या शतकात करकोटा घराण्याच्या ललितादित्य मुक्तपीड या महान राजाने दरददेश जिंकला. या राजाने व नंतर त्याच्या वंशजांनी बह्लिकपासून बंगालपर्यंत राज्य केले.

दरदा या प्रांताच्या नावावरून येथील भाषांना 'दार्दिक' भाषा म्हटले गेले. इथे बोलल्या जाणाऱ्या काश्मिरी, नुरीस्तानी, कलशाला आदी भाषा प्राकृत भाषेतून तयार झाल्या आहेत. दरददेशातील लोक इंद्र, यम, शक्ती, महानदेव (महादेव) आदी देवतांची उपासना करत. वेदांमधील इंद्र-वृत्र युध्दाची कथा यांच्या लोककथांमध्ये आढळते. अग्निपूजा, पशुबळी आदी रूढी हे पाळत असत.

दरददेशाच्या आजूबाजूचा प्रदेश जोपर्यंत हिंदू व बौध्दधर्मीय होता तोपर्यंत या लोकांना आपला धर्म निर्भयपणे पाळता आला. आठव्या शतकापासून सोळाव्या शतकापर्यंत एक एक करत या प्रांताच्या शेजारील राज्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला. दरददेशाचा अफगाणिस्तान व पाकिस्तानमधील भाग केवळ दुर्गम असल्याने स्वधर्म टिकवून होता. एकोणिसाव्या शतकापर्यंत हे लोक स्वधर्म टिकवून होते. 1893मध्ये ब्रिटिशांनी भारत-अफगाणिस्तानदरम्यान डयूरँड सीमा आखली. त्याबरोबर, 1895मध्ये अफगाणिस्तानच्या अब्दुर रेहेमान खानने काफिरिस्तानवर हल्ला केला व तेथील सर्व नागरिकांचे इस्लामीकरण केले. येथील सर्व लोकांनी इस्लाम धर्म स्वीकारल्यावर त्या प्रांताचे 'काफिरिस्तान' हे नाव बदलून - नूरिस्तान (प्रकाशाचा देश) असे ठेवले.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की धर्मांतरण झाल्यावर नूरिस्तान अफगाणिस्तानातील सर्वात धोकादायक प्रांत झाला. हा प्रांत तालिबानच्या अमलाखाली आला व लष्कर-ए-तोयबाच्या, अल-कायदाच्या अतिरेक्यांना इथे थारा मिळू लागला.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

  

डयूरँड सीमेच्या पूर्व भागातील म्हणजे चित्राल प्रांतातील लोक स्वधर्माचे पालन करत राहिले. कलश, अकशून, कट अशा यांच्या वेगवेगळया जातीजमाती इथे होत्या आणि आहेत. 1947मध्ये भारताची फाळणी झाल्यावर चित्राल प्रांत पाकिस्तानमध्ये गेला. चित्रालमधील कलश लोकांचे धर्मांतर सुरु झाले. आता साधारण 50% लोक इस्लामधर्मीय झाले आहेत.

 

गिलगिट व बाल्टिस्तान भागात चौदाव्या शतकात मध्य आशियातील सुफी इस्लाम घेऊन आले. तेव्हापासून येथे धर्मांतर सुरू झाले होते. 1947मध्ये पाकिस्तानने गिलगिट व बाल्टिस्तानचा ताबा घेतल्यावर या भागाचे संपूर्ण इस्लामीकरण झाले. आता तिथे बुध्दमूर्ती करणारा कोणी कलाकार नाही. कृष्ण-बलरामाचे चित्र रेखाटणारा प्रवासी नाही. बौध्द धर्माचा अनुयायी नाही आणि बुध्दाचा शांतिसंदेश वाहणाराही कोणी नाही.

दरददेशाची एक जमात आहे हुंझा. या हुंझा जमातीचे काही लोक जम्मूमध्ये राहतात. ते आपल्या रूढी, श्रध्दा, पूजापध्दती इथे अगदी मोकळेपणे सांभाळतात. स्वातंत्र्यानंतर भारताने या जमातीला अनुसूचित जातीजमातींमध्ये समाविष्ट केले असल्याने त्यांना अनेक सवलतीसुध्दा मिळतात.

या प्राचीन जमातींना आसरा मिळाला तो फक्त आणि फक्त भारतात. अल्पसंख्याक असल्यामुळे पाकिस्तानमध्ये व अफगाणिस्तानमध्ये ज्या जमातींचा छळ झाला, त्यांना भारताने सहज आपले म्हटले. शेकडो वषर्े हे असेच होत आहे. खरोखर यात काहीच नवीन नाही. पारशी असोत, ज्यू असोत, तिबेटी बौध्द असोत, ज्यांना गरज होती त्यांना भारताने आसरा दिला. नुसता आसरा दिला नाही, तर त्यांना सामावून घेतले. म्हणूनच CAA हा काही 'नवीन' कायदा नाही. गरजवंताला आश्रय देणे ही आपली संस्कृती आहे. आपले culture आहे. आपले जीवनमूल्य आहे. CAAने फक्त ही संस्कृती संविधानात आणली आहे, इतकेच.


आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

संदर्भ -

The Hindu-Buddhist Sculpture of Ancient Kashmir and its Influences - John Siudmak

Gilgit in Ancient Times - Buddha Prakash

Violence In Nuristan, Formerly Kafiristan - Martin W. Lewis, 18 Jan 2010.