सूर गेला असा...

विवेक मराठी    20-Feb-2020
Total Views |

 

***सुधीर जोगळेकर**

 

 

डोंबिवलीतील ज्येष्ठ भावगीत गायक तसेच गीत नवे गाईन मी, सरींवर सरी, बाबुल मोरा, चित्रगंगा, स्वरभावयात्रा, तीन बेगम आणि एक बादशहा यांसारख्या असंख्य सांगितिक कार्यक्रमांचे संकल्पक विनायक जोशी यांचे शनिवारी 15 फेबु्रवारी रोजी आकस्मिक निधन झाले. ते 59 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने डोंबिवलीच्या सांस्कृतिक वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांना श्रध्दांजली अर्पण करणारा भावपूर्ण लेख. 


vinayk joshi_1  

 

 

16 तारखेच्या रविवारपासून डोकं जे भणाणून गेलं आहे, ते ठिकाणावर येण्याची शक्यताच दिसत नाही. त्या दिवशी पहाटे तीन-सव्वातीनच्या सुमारास मोबाइल वाजला. अर्धवट झोपेत असल्याने डोळे उघडून जेमतेम कुणाचा आहे हे पाहिलं आणि विनायक आत्ता कशाला फोन करतोय? असा विचार मनात येऊन मी फोन बंदही करून टाकला. पण त्या आवाजाने झोप डिस्टर्ब झाली ती झालीच. बराच वेळ झोप येईना. शेवटी चार वाजता उठलो आणि थोडंसं आवरून लिहायला बसलो. इतक्यात पुन्हा फोन वाजला. विनायकचाच होता. ''काय रे?'' असं म्हणत मी फोन हातात घेतला आणि विनायकऐवजी वेगळाच आवाज कानावर आला. पण तरीही काही लक्षात आलं नाही. मग दुसऱ्या बाजूने पुन्हा आवाज आला, ''मी गिरीश प्रभू बोलतोय सुधीरजी, विनायकच्याच फोनवरून बोलतोय. विनायक गेला.'' माझा माझ्याच कानांवर विश्वास बसेना, पण मग गिरीशने एकेक गोष्ट सांगितली, तशी माझ्याच पायाखालची जमीन हादरल्यासारखी झाली.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

आदल्या दिवशीच तर विनायकशी बोलणं झालं होतं. इंदूरला जाऊन आल्यावर वेळ काढून बसू आणि यंदाच्या स्वरतीर्थच्या कार्यक्रमाविषयी बोलू, असं तो म्हणाला होता. मला काही कळेचना. तेव्हापासूनचे पुढचे अठरा-वीस तास कसे गेले, ते कळलंच नाही. विनायकला परलोकीच्या प्रवासासाठी निरोप दिला खरा, परंतु अजूनही मन ते खरंच मानायला तयार नाही. कवी आणि गजलकार जयंत कुलकर्णी हे आमचे सामाईक मित्र. भारत विकास परिषद, स्वरतीर्थ अशा अनेक संस्थांत बरोबर काम केलेले. त्यांनी आपल्या भावना इतक्या मोजक्या शब्दात व्यक्त केल्या की त्या दोन ओळी समोर धरल्या तरी पुरेत. विनायकचं गाणं, विनायकचं संकल्पन, विनायकचं संयोजन, विनायकचा स्वभाव हे सारं सारं त्या दोन ओळीत सामावल्यासारखं वाटलं. जयंतने लिहिलं होतं -


सूर गेला असा, दूर देशी कसा,

रिक्त मंचा अता, कोणता भरंवसा..

विनायकचं जाणं हे अशा असंख्य वेदनांना जन्म देणारं होतं.

तीन-चार महिन्यांपूर्वीच परममित्र प्रकाशनाने प्रसिध्द केलेल्या 'स्वरभावयात्रा' या त्याच्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाच्या निमित्ताने त्याचा सारा गोतावळा 'सुयोग'मध्ये जमला होता. 2018 सालातले 52 रविवार विनायकने लोकसत्ताच्या लोकरंग पुरवणीसाठी भावगीतांच्या 90 वर्षांच्या वाटचालीचा जो आलेख मांडला होता, त्याने लेखक म्हणून त्याच्याकडून असलेल्या रसिकांच्या वाढत्या अपेक्षा तर व्यक्त झाल्या होत्याच, तसाच खुद्द विनायकचाही स्वतःच्या लेखनशैलीवरचा विश्वास द्विगुणित झालेला दिसला होता. लेखनाचे नवे प्रकल्प त्याच्या डोक्यात रुंजी घालू लागले होते. याशिवाय नवनवे सांगीतिक कार्यक्रम त्याच्या मनात होतेच.

 

परंतु किरण जोगळेकरच्या अकाली जाण्याने डोंबिवली चतुरंगमध्ये जे शैथिल्य येऊ लागलं होतं, त्याला पुन्हा एक धक्का देऊन ऊर्जितावस्था आणणं गरजेचं होऊन बसलं होतं. विनायकला त्यासाठीही वेळ हवा होता. बँकेची वाढत्या जबाबदाऱ्यांची नोकरी सांभाळून तो वेळ काढणं अधिकाधिक कठीण होत चालल्याचं त्याच्या ध्यानात येऊ लागलं होतं. त्यामुळेच सुयोगच्या कार्यक्रमात अनेकांनी 'नोकरी सोड, व्हीआरएस घे' असे सल्ले त्याला देऊ केले होते. डोंबिवली ते नरीमन पॉइंट आणि तिथून चतुरंग कार्यालय करून रात्री उशिरा डोंबिवलीला परत असा रोजचा प्रवास झेपण्यापलीकडचा झालाय हे त्यालाही जाणवत होतं. पण त्याचं मन ते जाहीरपणे कबूल करायला तयार नव्हतं.

तब्येत साथ देत नव्हती, रोजची जागरणं, रेल्वेचा जीवघेणा प्रवास, अधनंमधनं प्रकृतीच्या कुरबुरी वाढू लागल्या होत्या. पूर्णिमाजवळ ते बोलून दाखवलं असतं तर सगळंच बंद झालं असतं, ही कल्पनाही त्याला सहन होण्यापलीकडची होती. इंदूरचा गजानन महाराज प्रकटदिनाचा कार्यक्रम त्याने असाच, कुणाच्या तरी आग्राही विनंतीला भरीस पडून घेतला होता. शुक्रवारी ऑफिस करून तो इंदूरला गेला होता. कार्यक्रमाच्या आधीच थोडा त्रास सुरू झाला होता. पण कार्यक्रम करायचाच हे त्याने मनाशी पक्कं ठरवलेलं असल्याने तो डॉक्टरला सांगण्याच्या भानगडीत पडलाच नाही. कार्यक्रम तसाच रेटून न्यायचा हे त्याच्या डोक्यात पक्कं होतं. कार्यक्रम पार पडला. रसिकांनी उदंड प्रतिसाद दिला. कार्यक्रम करून रसिक पांगले आणि ठरल्याप्रमाणे बसने विनायक, गिरीश आणि ऋषिराज परत यायला निघाले. त्रास सुरू झालाच होता. काही तास बहुधा त्याने तसेच अस्वस्थतेत काढले. एकदा घरी पोहोचू आणि डॉक्टरला दाखवू असं त्याच्या मनात असावं. पण ती वेळ यायची नव्हती. धुळयाच्या जवळपास बस आली असताना त्रास वाढला, उलटीची भावना झाली, पण तीही होईना आणि धुळे शहर येण्याआधीच सारं काही संपलं.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/
 

बसवाहकाला कल्पना दिली होतीच. त्याने झपाटयाने बस धुळयाच्या सिव्हिल हॉस्पिटलकडे वळवली, पण तिथे जाणं हे फक्त उपचारापुरतंच राहिलं होतं. हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांनी सहकार्य केलं, प्रसंग जाणला आणि पार्थिव शवागारात हलवलं. पहाटेचा दीड वाजला होता. संपूर्ण अनोळखी गाव, उत्तररात्रीचा प्रहर. उठवायचं कुणाला? हा प्रश्न होताच. पण घरी कळवणं गरजेचं होतं. विनायकचे व्याही जळगावमध्ये होते, त्यांना कळवलं आणि मग वाट पाहणं सुरू झालं. पहाटे दीड ते दुपारचे बारा. पोलीस, पोस्ट मॉर्टेमच्या औपचारिकता वेगाने पार पडल्या. सगळया औपचारिकता पूर्ण करून पार्थिव डोंबिवलीकडे निघालं. विनायकचा फॅन क्लब मोठा. सगळीच मंडळी घराकडे झेपावली. रात्री आठ वाजता अंत्यदर्शनानंतर पार्थिव अंत्यसंस्कारासाठी निघालं आणि अनेकांच्या भावनांचे बांध फुटले. चतुरंगसाठी तर हा धक्का सहन करण्यापलीकडचा होता. विद्याधर निमकर चतुरंगचा संस्थापक. चाळीस वर्षांपासूनची आमची मैत्री. तो तर ढसाढसा रडला.


vinayk joshi_1   

विनायक आणि विनायकसारखे नावाजलेले अन्य कलाकार यांच्यामध्ये एक मूलभूत फरक आहे. अनेक कलाकार स्वतः मोठे होतात आणि मग त्यांच्या छायेत सह-कलाकारांना वावरावं लागतं. विनायकचं तसं नव्हतं. त्याने सहकलाकारांना इतकं मोठं केलं की विनायकच्या शब्दाला मान देत, कसलीही अपेक्षा न ठेवता कलाकार त्याच्या कार्यक्रमांत सहभागी होत. गिरीश प्रभू त्याचा बँकेतला सहकारी. विनायकच्या आग्राहावरून तो सिंथेसायझर वाजवायला लागला आणि विनायकशिवाय कुणाकडेच त्याने साथ केली नाही. दिलेला शब्द पाळायचा हे विनायकचं ब्रीद होतं. कार्यक्रम आयोजित करणारी मंडळी मेहनत घेऊन, बराच पैसा गुंतवून कार्यक्रम आयोजित करत असतात हे माहीत असल्यामुळेच आपली तब्येत महत्त्वाची नाही, असं ठरवून विनायक कार्यक्रमांना जायचा. इंदूरला जातानाही 27 फेब्रुवारीच्या पहाटे 6 वाजता नांदेडमध्ये स्वरभावयात्रा करायची, हे त्याने ठरवून टाकलं होतं. विनायकच नाही, तर स्वरभावयात्रा कशी करायची? असा प्रश्न क्षणभर सहकलाकारांच्या मनात उभा राहिला. परंतु विनायकला श्रध्दांजली अर्पण करायची, तर त्याच्या जाण्याला दहाही दिवस पुरे होत नसूनदेखील नांदेडला जायचं आणि स्वरभावयात्रा सादर करायची, हे सर्वांनी निश्चित केलं आणि तसं नांदेडकरांना कळवलंही.

 

2002च्या जुलै महिन्यात बाबूजी उर्फ सुधीर फडके गेले, आणि त्यांच्या पंचाहत्तरीनिमित्त स्थापन झालेल्या अमृतमहोत्सव समितीला 'स्मृती समिती' असं नामाभिधान देण्यात आलं. सुधीर फडके, ललिता फडके, श्रीधर फडके यांच्या सांगीतिक वाटचालीचा समग्रा आढावा घेणारा 'सुलश्री' असा कार्यक्रम करण्याची कल्पना पुढे आली. डिसेंबर 2002अखेरीस कार्यक्रम पक्का झाला. डोंबिवलीच्या इतिहासात प्रथमच डोंबिवली जिमखाना मैदानावर 1500 ते 2000 खर्ुच्या बसतील अशी गॅलरीची रचना उभी करण्यात आली. तीन बाजूंनी गॅलऱ्या उभ्या केल्या आणि तब्बल सहा तासांचा भरगच्च कार्यक्रम समितीने केला. विनायक त्या स्मृती समितीचा संस्थापक विश्वस्त होता. गेल्या 17-18 वर्षांत विनायकच्या संकल्पनेतून समितीने असंख्य कार्यक्रम आणि उपक्रम पार पाडले.

 

चतुरंगने रंगसंमेलनांचं आयोजन मुंबईबाहेर करायचं ठरवल्यानंतर डोंबिवलीचीच निवड केली. जीवनगौरव पुरस्कार देणारी तीन-चार संमेलनं आजवर डोंबिवलीत पार पडली. त्याशिवाय दर वर्षी होणारा 'चैत्रपालवी' हा सांगीतिक कार्यक्रम होताच. हे सारे कार्यक्रम सुखरूप पार पडत गेले ते किरण जोगळेकर आणि विनायक जोशी यांच्यासारखे दोन खंदे कार्यकर्ते आणि त्यांच्यावर विश्वास प्रकट करणारी टीम हाताशी होती म्हणूनच. काळाच्या ओघात 2016मध्ये किरण गेला आणि चारच वर्षांत विनायकही.

 

विनायक चतुरंगप्रमाणेच स्वरतीर्थ सुधीर फडके स्मृती समितीचा एक विश्वस्त होता. गेली 16-17 वर्षं दर वर्षी काही नवीन देण्याचा विनायकचा प्रयत्न असे. यंदाही अशाच एका महोत्सवी कार्यक्रमाची जुळवाजुळव विनायकने सुरू केली होती. 'देवमाणूस' हा बाबूजींनी संगीत दिलेला आणि राजदत्तांचं दिग्दर्शन लाभलेला 1970 सालचा चित्रपट. गदिमा आणि बाबूजी ही जोडी त्यातही होतीच. यातली बाबूजींनी संगीत दिलेली आणि आशाबाईंनी गायलेली, 'कुणीतरी बोलवा दाजीबाला' ही लोकप्रिय झालेली लावणी. स्वतः बाबूजीही ती अनेकदा गात असत. या गाण्याचं यंदा पन्नासावं वर्ष. या पन्नासाव्या वर्षाच्या निमित्ताने लावण्यांचा जल्लोश उडवावा, ही विनायकच्या मनातली मूळ कल्पना. लावणीला प्रारंभ झाला तो पेशवाईच्या उत्तरार्धात. शाहीर परशराम, राम जोशी, अनंत फंदी, होनाजी बाळा, प्रभाकर, सगनभाऊ, अण्णा भाऊ साठे अशी लावणीकारांची परंपरा. इ.स. 1560 ते 2020 असा जवळपास 460 वर्षांचा लावणीचा प्रवास. फडाची लावणी, बैठकीची लावणी, निर्गुणी लावणी, शृंगारी लावणी असे लावण्यांचे कितीतरी प्रकार. या साऱ्याचा वेध घ्यायचा, तर 'सुलश्री'सारखाच किमान सहा तासांचा पट मांडावा लागेल, हे त्याला दिसत होतं. त्यातच बाबूजी आणि अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्द्यांचा योग नेमका जुळून आला होता. इंदूरहून परत आलो की काम सुरू करतो, असं आमचं बोलणंही झालं होतं.

पण तो योग नव्हता, नसावा. सुधीर फडके स्मृती समिती स्थापन झाली आणि 2006 साली समितीचे विश्वस्त सुरेंद्र पटवारी सर गेले. चारेक वर्षांपूर्वी दुसरे विश्वस्त पंडित रसिक हजारे गेले. तिसरे विश्वस्त धनंजय भोसेकर भारताबाहेर कॅनडात जाऊन स्थिरावले आणि आता चौथे विश्वस्त विनायक जोशी गेले. समितीला बसलेला हा धक्का भरून न निघण्यासारखा आहे. विनायकने अगदी सुरुवातीच्या काळात 'स्वरांकन' या बॅनरखाली कार्यक्रम केले. सुभाष घैसास यांनी आपल्या सहजसुंदर ओघवत्या शैलीत त्याचं निवेदन केलं. नंतरच्या 'सरींवर सरी'ला भाऊ मराठे लाभले. भाऊला बदलून नव्या दमाचा सूत्र संचालक घ्यावा असं फारसं विनायकलाही वाटलं नाही. सरींवर सरी, बाबुल मोरा, तीन बेगम एक बादशाह, वसंत बहार, जरा सी प्यास, सूर नभांगणाचे, गीत नवे गाईन मी, ज्योति कलश छलके, करात माझ्या वाजे कंकण, येई वो विठ्ठले असे डझनावारी नवनवे कार्यक्रम विनायकने केले.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

 

स्वरभावयात्रा हा त्याचा आणखी एक कार्यक्रम. इंदूर येथे भरलेल्या 74व्या वार्षिक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्याने तो सादर केला आणि इतिहास घडला. त्याच शीर्षकाचा त्याचा स्तंभ लोकसत्तामधून प्रसिध्द होऊ लागला होता. त्या स्तंभासाठी विनायकने जी मेहनत घेतली, तिला तोड नाही. विनायकने अनेक तरुण, होतकरू आणि गुणवंत कलाकारांना आपल्या कार्यक्रमात साथ दिली, तीही त्यांच्या त्यांच्या गुणवैशिष्टयांचा मान राखत.

 

विनायकसाठी भाऊ मराठे, आदिती जोगळेकर-हर्डीकर, चंद्रशेखर टिळक, सच्चिदानंद शेवडे, प्रसाद भिडे, मिलिंद जोशी, मंगला खाडिलकर, धनश्री लेले, समीरा गुजर अशा अनेक निवेदकांनी काम केलं. यंदासाठीदेखील एक नवा सूत्रसंचालक त्याच्या मनात पक्का होता. विनायकचे प्रवास, विनायकचे कार्यक्रम, विनायकची आरक्षणं हे सारं तसं एकखांबी काम. ते त्याचा मुलगा गंधार पाहत असे. गंधार चांगलं निवेदन करू शकेल असं त्याचं मत होतं. ते त्याने गिरीश प्रभूकडे बोलूनही दाखवलं होतं. यंदाच्या लावण्यांच्या विशेष कार्यक्रमासाठी असाच एक नवा निवेदक मनात आहे, असं तो म्हणाला होता.

 

परवाच्या इंदूरच्या कार्यक्रमात तसे गिरीश आणि ऋषिराज असे दोनच वादक होते. श्री गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्ताने भक्तिगीतांचा एक अगदी छोटासा कार्यक्रम त्याने केला. तब्बेत बरी नव्हती तरीही केला. संयोजकांना त्रास नको, म्हणून त्यांना काहीही कल्पना न देता त्रास सोसत सोसत केला. पण कार्यक्रमाच्या शेवटी खूपच आग्राह झाला आणि त्याला 'बाबुल मोरा' ही त्या दिवशीच्या संकल्पनेत न बसणारी भैरवी गायचा आग्राह श्रोत्यांनी केला. कलाकारासाठी श्रोते हेच मायबाप. त्यांची मागणी कशी अव्हेरायची? असा विचार करत विनायक ती भैरवी गायला आणि ती भैरवी त्याच्या जीवनाचीच भैरवी ठरली.

 

sumajo51@gmail.com