गाडगेबाबा : प्रबोधनाचे विचारपीठ

विवेक मराठी    24-Feb-2020
Total Views |

 

**डॉ. अजय देशपांडे***

 

आधुनिक संत म्हणून ओळखले जाणारे संत गाडगे महाराज यांनी अज्ञान, अंधश्रध्दा, अनिष्ट रुढी-परंपरा, व्यसनाधीनता यांसारख्या सामाजिक समस्या दूर करण्यासाठी तळमळीने कार्य केले. याबाबत समाजप्रबोधन करण्यासाठी त्यांनी कीर्तनाचा मार्ग अवलंबला. 23 फेब्रुवारी ही त्यांची जयंती. त्यानिमित्त त्यांच्या कार्याचे हे स्मरण.

gadgebaba_1  H

 

 

सकारात्मक विचारांच्या कृतिशीलतेचा अखंड असा ऊर्जास्रोत म्हणजे गाडगेबाबा. शिक्षण, स्वच्छता, अहिंसा, एकता, विज्ञान, मानवता, नैतिकता यांचा आग्राह धरणारे चालते-बोलते विचारपीठ म्हणजे गाडगेबाबा. विवेक आणि विज्ञान, विचार आणि कृतिशीलता, विधायकता आणि विनम्रता, संघटनशक्ती आणि संयमाचे सामर्थ्य या गुणांचे, विचारांचे अपूर्व मिश्रण गाडगेबाबांच्या व्यक्तिमत्त्वात, विचारात आणि कार्यात झालेले दिसते. 

 

संत नामदेवाने कीर्तन परंपरेचे प्रवर्तन केले. 'नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी' या संत नामदेवांच्या शब्दांचा वसा आणि वारसा संत तुकारामांनंतर गाडगेबाबांनी प्राणपणाने जोपासला. आयुष्यभर देवळात न जाणारा हा माणूस विचार, कार्य आणि कृतीने देवमाणूस ठरला. अंधश्रध्देला नकार देत, कर्मकांडे नाकारत वंचितांचे उपेक्षितांचे अश्रू पुसत गाडगेबाबांनी प्रबोधनाचे कार्य केले. झाडूच्या माध्यमातून स्वच्छतेची क्रांती गाडगेबाबांनी खडूच्या माध्यमातून घडणाऱ्या शैक्षणिक क्रांतीशी जोडली.

गाडगेबाबा म्हणजे संध्याकाळी कोण्यातरी पारावर भरलेली प्रबोधनाची पाठशाळा होती. विधायक विचार आणि विधायक कृतिशीलता हा गाडगेबाबांचा मूलमंत्र होता. माणसांच्या मनातून व्यसनाधीनता, अंधश्रध्दा दूर व्हावी, माणसाने पक्षिहत्या-प्राणिहत्या करू नये, हिंसाचार करू नये, माणसे सदाचाराने वागावी, सामोपचाराने जगावी, जातीच्या भिंती तुटाव्यात, मानवतेचे बंध जुळावे यासाठी गाडगेबाबांनी आयुष्यभर प्रयत्न केले. अंगावर चिंध्या पांघरलेल्या या माणसाने विधायक विचारांचे बावन्नकशी सोने समाजावर अक्षरशः उधळले.

गाडगेबाबांचे कीर्तन म्हणजे प्रबोधन विचारांची कार्यशाळाच होय. देवाच्या संदर्भातील जनमानसातील अंधश्रध्दा, नवस वगैरे विचारांवर गाडगेबाबा शब्दांचे आसूड उगारत. शिक्षणाचा पुरस्कार करीत असत कीर्तनात गाडगेबाबा अनेक प्रश्न विचारीत. लोक बोलू लागले की संवादातून गाडगेबाबा सहजपणे प्रेरक विचार लोकांना समजून सांगत. जगण्याचे तत्त्वज्ञान अगदी सोप्या सरळ भाषेत सांगून गाडगेबाबा समाजपरिवर्तनाचे मोठे कार्य करीत होते. शिक्षणाच्या संदर्भात समाजमन जागृत करताना गाडगेबाबांच्या अखेरच्या कीर्तनातला पुढील संवाद लक्षवेधी असा आहे -

 

हे लोक का गरिबीत राहिले? एक तर याहिले नाही विद्या. काय नाही?

- वि ऽ द्या. ..

ज्याले विद्या नसेल त्याले खटाऱ्याचा बैल म्हटलं तरी -

- चाले ऽ ल. ...!

आता तरी सुधरा. आता तरी मुलाले शिक्षण द्या. पैसे नाही म्हणाल तर जेवणाचं ताट मोडा. हातावर भाकरी खा. बायकोले लुगडं कमी भावाच घ्या. इव्हायाले पाहुनचार करू नका, पण मुलाला शाळेत घातल्या विना सोडू --

न ऽ का ऽ. .!

विद्या मोठं धन आहे. विद्या मोठं धन आहे. यातलेच माणसं दिल्लीच्या तख्तावर भाषेण करतात आणि यातलेच माणसं बोरीबंदराच्या ठेसनावर पोते उचलतात. ते माणसं हे कोण? हे काही बैल नाहीत ना? कोण आहेत?

माणस ऽ ऽ . .!

मोठी, मोठी गोष्ट आहे विद्या, मोठी गोष्ट आहे. .या टायमाला विद्या मुलाले न शिकवाल, तर तुम्हाला आम्हाला विद्या नाही, तर मजुरी तरी लागली! पण पुढं तुमच्या मुलाला मजुरी लागणार नाही, तर बूटपॉलिश करावे लागेल.

इधर आ..... देड आना. ..चले जाव....!

बूटपॉलिश करावे लागेल.

 

अशा प्रकारच्या संवादातून गाडगेबाबा शिक्षण, ग्राामस्वच्छता, आरोग्य, अंधश्रध्दा, जातिभेद, धर्मभेद, विज्ञान, नैतिकता अशा अनेक महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन करीत असत. हे मार्गदर्शन बोलीभाषेत मनोरंजक पध्दतीने होत असे. त्यामुळे सामान्य माणसे त्यांचे विचार ऐकून आचरणात आणण्याचा प्रयत्न करीत. विविध सामाजिक विषयांवर जनसमुदायाला विचारप्रवृत्त आणि कृतिप्रवण करण्याचे विलक्षण सामर्थ्य गाडगेबाबांच्या कीर्तनात होते. गाडगेबाबांच्या कीर्तनाचे हे ऐतिहासिक यश आहे, वैशिष्टयही आहे. देवीदेवतांच्या नावाने गावोगावी भरणाऱ्या जत्रांमध्ये प्राणिहत्या, पक्षिहत्या सररास चालत असत. अशा ठिकाणी प्राणिहत्या, पक्षिहत्या होऊ नये म्हणून गाडगेबाबा तेथे जाऊन लोकांना उपदेश करीत. लोकमानसातील अंधश्रध्दा दूर करण्यासाठी गाडगेबाबांनी आयुष्यभर प्रयत्न केले. गाडगेबाबा लोकशिक्षक होते, समाजशिक्षक होते.

गाडगेबाबांनी त्यांच्या हयातीत - म्हणजे 1956पूर्वी महाराष्ट्रात नाशिक, त्र्यंबकेश्वर, पंढरपूर, पुणे, आळंदी, देहू, ब्रह्मपुरी (सातारा), मुंबई, राहुरी वरवंडी, (नगर) मूर्तिजापूर, आमला (दर्यापूर), ऋणमोचन (अमरावती), उमरी (यवतमाळ), अचलपूर नागरवाडी, संभू सावरगाव (औरंगाबाद), दोनद (अकोला), अमरावती, भुसावळ या ठिकाणी केलेले संस्थात्मक कार्य फार महत्त्वाचे आहे. धर्मशाळा, प्रसूतिगृह, अंध-अपंग सदावर्त, वाचनालय, प्रकाशन समिती, प्रिंटिंग प्रेस, आश्रम शाळा, विद्यालय, वसतिगृह, बाल वसतिगृह, आदिवासी आश्रम शाळा, गौरक्षण संस्था, कुष्ठधाम, अनाथ विद्यार्थी वसतिगृह या आणि अशा कितीतरी संस्था निर्माण करून गाडगेबाबांनी लोकसेवेचे कार्य केले. विदर्भातील पूर्णा नदीवर ऋणमोचन येथे पाच घाट आणि दोनद येथे दोन घाट बांधले. औरंगाबाद जिल्ह्यातील संभू सावरगाव येथे तलाव बांधला. गाडगेबाबांचे हे संस्थात्मक कार्य फार मोठे आहे. पंढरपूर येथे संत चोखामेळा धर्मशाळा, नाशिक, त्र्यंबकेश्वर, आळंदी, देहू आदी ठिकाणी बांधलेल्या धर्मशाळा, मुंबई येथे जे.जे. हास्पिटलमध्ये दाखल झालेल्या रुग्णांच्या नातेवाइकांना राहण्यासाठी बांधलेली धर्मशाळा या आणि अशा अनेक धर्मशाळा, शिक्षण संस्था, वसतिगृहे, काढणाऱ्या गाडगेबाबांनी समाजसेवा, प्रबोधनाचे कार्य, परिवर्तनाचे कार्य कसे करावे याचा कृतिशील आदर्श निर्माण करून ठेवला आहे. भुकेलेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी, उघडयानागडयांना वस्त्र, गरीब मुलामुलींना शिक्षणासाठी मदत, बेघरांना आसरा, अंध-पंगू रोग्यांना औषधोपचार, बेकारांना रोजगार, पशु-पक्षी-मुक्या प्राण्यांना अभय, गरीब तरुण-तरुणींचे लग्न, दुःखी व निराशा असणाऱ्यांना हिंमत ही दशसूत्री गाडगेबाबांनी प्रत्यक्ष समाजसेवेतून साकारली. गाडगेबाबांचे आयुष्य म्हणजे समाजसेवेचा दीपस्तंभ होय.

 

गाडगेबाबा कर्ते सुधारक होते. त्यांनी शब्दांद्वारा विचारक्रांती घडवून आणण्याचा प्रयत्न केला. कीर्तन हा गाडगेबाबांच्या क्रांतिकार्याचा केंद्रबिंदू होता. या कीर्तनातली त्यांची भाषा विलक्षण परिणामकारक होती. संतांच्या काव्याचा समकालाच्या संदर्भात अर्थ उलगडून सांगण्याचे त्यांचे कसब विलक्षण प्रभावी होते. 'मरण सगळयाचा काटा काढणार पण कीर्ती मरत नाही', 'ज्या माणसाले भजन करायची लाज वाटेल तो माणूसच नाही', 'देव देवळात नाही. ..कुठे आहे? या जगात देव आहे, जगाची सेवा करा', 'सर्वात मोठे वैभव माणसाचे दयावंत होण्यात आहे' ही आणि अशी वाक्ये गाडगेबाबांच्या विचारवैभवाची साक्ष देतात. जनसमुदायाला विचारप्रवृत्त आणि कृतिप्रवण करणारी भाषा हे गाडगेबाबांचे एक सामर्थ्य होते.

 

माणसांना विचारप्रवृत्त करणारी वाणी आणि विधायक- रचनात्मक सामाजिक कार्याद्वारा समाजमनाला सदाचारी व कृतिप्रवण करणारी ऊर्जा ही दोन सामर्थ्ये गाडगेबाबांजवळ होती. त्यामुळे त्यांची वाणी, त्यांचा झाडू, त्यांचे विधायक, संस्थात्मक कार्य यांनी महाराष्ट्रात इतिहास घडविला.

गाडगेबाबांचे कार्य वर्तमानाला प्रेरणा देणारे आहे आणि उज्ज्वल भविष्यकाळाला रचनात्मक मानवतावादाच्या सर्जनशील विचारांची साद घालणारे आहे.

 

9850593030

deshpandeajay15@gmail.com


(लेखक समीक्षक असून सर्वधारा या नियतकालिकाचे कार्यकारी संपादक आहेत.)