भाषामृत

विवेक मराठी    25-Feb-2020
Total Views |

***शिवकन्या शशी***

27 फेब्रुवारी हा 'मराठी भाषा दिवस' म्हणून साजरा केला जातो. आपल्या प्रचंड मोठया देशात जिथे जिथे सीमाभाग येतात, तिथे तिथे अशा दोन, तीन, चार भाषांचा स्वीकार सरकारी पातळीवर झाला पाहिजे. भाषांचा बफर झोन सर्व स्तरांवर जाणीवपूर्वक निर्माण केला पाहिजे. तितक्या भाषांमध्ये गावातल्या पाटयांपासून, शाळांपासून ते सरकारी कामकाजापर्यंतचे व्यवहार झाले पाहिजेत. ज्याला जी भाषा येते, त्याला त्या भाषेतून व्यवहार करण्याचा पर्याय पाहिजे. राज्यांच्या भाषेवरून एकमेकांचा दुस्वास करून तंटेबखेडे निर्माण करण्याऐवजी भाषांचे पर्याय खुले ठेवले की माणसांची मने मोकळी राहतात.

marathi_1  H x

प्रिय जयराज,

सीना आणि भीमा यांच्या संगमावरून हे पत्र. हत्तरसंग कुडलसंगम. 360 शिवलिंगे एकाच शाळिग्राामावर कोरलेले जगातले एकमेव लिंग. वर्षातून एकदा लिंगपूजा केली तरी वर्षभर केल्याचे पुण्य मिळते. हजारो वर्षांपूर्वीही लोक देवपूजेत कसा शॉर्टकट तयार करून ठेवायचे बघ!

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/
 

कर्नाटकतल्या श्रवणबेळगोळ येथील गोमतेश्वराच्या पायाशी कोरलेला तो मराठीतला सुप्रसिध्द पहिला (?) शिलालेख 'श्रीचावुंडराजें करवियलें' तुला माहीतच आहे. दुसरा असाच कोकणात अक्षी या ठिकाणी सापडला. आणखी एक या कुडलसंगमावरच्या संगमेश्वर मंदिराच्या तुळईवर कोरण्यात आला आहे. मघाशीच पाहिला. त्यावर लिहिले आहे, 'वाछितो विजयी होईबा' म्हणजे 'जो वाचेल तो विजयी होईल'. सहज मनात विचार आला, पार कर्नाटकातल्या हसन जिल्ह्यातील श्रवणबेळगोळपासून ते तिकडे कोकणापर्यंत आणि त्या दोघांच्या मध्ये - इथे सोलापूरपर्यंत ही मराठी भाषा लिहिली जात होती! बोलली जात असणारच.

मग स्वातंत्र्यानंतर भाषावार प्रांतरचनेत असे काय झाले की बेळगावातून प्रवास करताना मराठीचे हाल दिसले. मराठी फलकावर डांबर फासलेले, मराठी शाळा बंद पाडण्यात मोठा पुढाकार, महाराष्ट्रातून येणाऱ्या, मराठी पाटया असलेल्या एसटीवर हल्ले.. एक ना दोन! आमच्यावर कन्नड लादली जातेय असा इथल्या मराठी भाषकांचा टाहो आहे. त्यांना मराठीत व्यवहार हवा आहे, तो करू दिला जात नाही. कर्नाटक सरकार आपल्याशी सूडबुध्दीने वागतेय, अशी तिथल्या मराठी भाषकांची कितीतरी वर्षांपासूनची भावना आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीने पूर्वी यात काम केले. या चळवळीवर महाराष्ट्रातल्या विधानसभेत नेतेही निवडून गेले. पण आज तो प्रभाव कमी होताना दिसत आहे, आणि लोक हवालदिल झाल्यासारखे वाटत आहेत.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

आपल्या भोवतालची मराठी काढून घेतली आणि तिच्या जागी आपल्याला लिहिता-वाचता न येणारी अशी अनोळखी भाषा कुणी सक्तीची केली आहे, अशी क्षणभर जरी मी कल्पना केली तरी मला गरगरल्यासारखे, घुसमटल्यासारखे झाले. मग त्या लोकांचे काय होत असेल, याची कल्पना कर.

अशा वेळी मला आपल्याच सोलापूर शहराबाबत तुला लिहावेसे वाटत आहे. हे शहर महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश यांच्या बरोब्बर तिठयावर आहे. मराठी, कन्नड, तेलगू आणि हैदराबादी हिंदी ऐकत ऐकत आपण मोठे झालो. आजही या सगळया भाषा अगदी एकमेकींच्या गळयात गळे घालून नांदताना दिसतात. भाषेवरून आपण कधीही कुणाचा दुस्वास केला नाहीच, पण ऐकला वा पाहिला नाही. मराठी मोठया प्रमाणात असली, तरी बाकीच्या दोन्ही भाषांच्या माध्यमातल्या शाळा आहेत, त्या भाषा महाविद्यालयात एक एक विषय म्हणून आहेत. कुणाला वाटलेच त्या त्या भाषेत पाटी लावावी, तर ते लावतात. त्यावर कोण जाऊन काळे फासत नाही. मुळात त्यात राजकारण या व्हायरसचा शिरकाव झालेला नाही. कानडी मुलखातून लग्न होऊन इथे येऊन, मराठी आवडीने लिहा-वाचायला शिकण्याची परंपरा जशी आपल्या घरात आजीपासून आहे, तशी ती शहरातल्या आणि परिसरातल्या कित्तीतरी घराघरात आहे. तसेच, इथून मुली बाजूच्या राज्यांत गेल्या की त्या त्या भाषा शिकतात, आपल्या मुलांना अर्थातच शिकवतात. कधीही बेकी आली नाही.

जिथे तीनचार भाषा एकत्र येतात, तिथले शब्द, वाक्प्रचार, वाक्यरचना, बोलणे, उच्चारण यांचा एकमेकांवर परिणाम होतो. तसेच आपलेही आहे. आपल्या बोलण्याला एक लय आहे, ज्याला बाकीचे तथाकथित 'शुध्द'वाले 'हेल' म्हणतात! तसा तथाकथित 'शुध्द'लाही एक 'हेल' असतो, पण ती 'लय' होते! असो. आपली भाषा इतक्या बहुविध लोकांमधून हेलकावत जाते, तिला 'हेल' येणारच... आणि जिथे हेल तिथे लय येतेच. तर, अशा आपल्या हेलकावणाऱ्या लयीला कुणी हसले, हेटाळणी केली तरी बिलकुल कमीपणा वाटून घेऊ नये. आपण कमीपणा वाटून घेण्यासारखे काय केले आहे? काहीच नाही. उलट तीनचार भाषांच्या संगतीने बहुविधतेला उभे करून ठेवायचे काम, या जगाचे सपाटीकरण होण्याच्या काळात आपण मोठया खुबीने पार पाडत आहोत, याचा आता जरा अभिमान बाळगायची वेळ आली आहे. मुळात अनेकांमध्ये वावरू लागलो की अभिमान बाजूला पडतो. जे एकजिनसी, एकरंगी असतात, त्यांना अभिमान, दुराग्राह चिकटतो. पण आता, अभिमान बाळगणे, त्याचे वेळोवेळी प्रदर्शन करणे याशिवाय तुमचे अस्तित्वच मान्य केले जात नाही. तर, बाळगा जरा अभिमान, आणि तीनचार भाषाभगिनींचा नांदता संसार जगाला दाखवा!

 

आपल्यातल्या या बहुभाषिकतेचा सखोल विचार करून परस्परांच्या भाषेची देवघेव अव्याहतपणे चालू राहावी, म्हणून साने गुरुजींनी आंतरभारतीची कल्पना मांडली होती. चांगले उपक्रम वर्षानुवर्षे राबवले होते. आज त्याकडेही आपले दुर्लक्ष होत आहे. जिथे बहुविधता असते, तिथे समन्वयाची गरज असते. समन्वयासाठी सम्यक विचार पाहिजे, तिथे थाटामाटाचा अभिनिवेश कामाचा नाही, अभिनिवेशी राजकारण आणि राजकारणी तर नाहीच नाही.

आपल्या प्रचंड मोठया देशात जिथे जिथे सीमाभाग येतात, तिथे तिथे अशा दोन, तीन, चार भाषांचा स्वीकार सरकारी पातळीवर झाला पाहिजे. भाषांचा बफर झोन सर्व स्तरांवर जाणीवपूर्वक निर्माण केला पाहिजे. तितक्या भाषांमध्ये गावातल्या पाटयांपासून, शाळांपासून ते सरकारी कामकाजापर्यंतचे व्यवहार झाले पाहिजेत. ज्याला जी भाषा येते, त्याला त्या भाषेतून व्यवहार करण्याचा पर्याय पाहिजे. मदतीला इंग्लिश किंवा/आणि हिंदी आहेच. पण राज्यांच्या भाषेवरून एकमेकांचा दुस्वास करून तंटेबखेडे निर्माण करण्याऐवजी भाषांचे पर्याय खुले ठेवले की माणसांची मने मोकळी राहतात. प्रसंगी दुसरी-तिसरी भाषा आपखुशीने शिकली जाते. वापरली जाते. कुठलीही भाषा अमृतच आहे, पण ती सक्तीची केली, वेठीस धरण्याचे साधन केले, दुसऱ्यांवर कुरघोडी करण्यासाठी वापरली की तिचे क्षणात विष होते. बेळगाव हे असे निर्माण केलेले विष आहे. देशभरातल्या आणखी कुठल्या कुठल्या सीमांवर अशा प्रकारची विषवल्ली लावण्याचे आणि तिला पध्दतशीर खतपाणी घालण्याचे काम केले जात आहे, हे परत तपासून पहायची वेळ आली आहे. त्यांचे उच्चाटन करण्यासाठी असे बफर झोन तयार करणे गरजेचे आहे.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

यंदाही आपण मराठी भाषा दिवस साजरा करू, परंतु त्याचबरोबर आपल्यातल्याच एका अवयवावर जी बळजबरी होत आहे, तिचा आवाज दोन्ही राज्यांतील राज्यकर्त्यांपर्यंत, वेळ पडलीच तर केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी जे जे आवश्यक आहे, ते ते करण्यासाठी पाठिंबा देण्यासाठी एकत्र येऊ, या निश्चयावर हे संगमावरील पत्र थांबवत आहे.

सांगायचे राहिलेच! धाकटयाने कर्नाटकी मुलीस पसंती कळवली आहे, असा परवाच काकांचा फोन आला होता. आता त्या कानडी मुलीच्या होकाराची वाट पाहत आहेत! होकार आला, तर 'मराठीने केली कानडी बाईल' अशी आपल्या घराण्याची लग्नपरंपरा कायम ठेवू. सर्व काही जुळून आले तर मराठी-कानडी लग्नात आपण सगळे भेटूच!

 

तुझी,

शिवकन्या.