कार्यकर्ताभाव जपणारे दांपत्य नयना आणि डॉ. विनय सहस्रबुध्दे

विवेक मराठी    25-Feb-2020
Total Views |

घर-संसार आणि कार्यक्षेत्र एकमेकात मिसळून जाते, त्याचे जसे लाभ असतात तसे तोटेही असतात. खाजगी आयुष्य राहत नाही. विनयजी आणि नयनाचं दांपत्यजीवन तसेच होते. अशा वेळेला दोघांनीही आपापला तोल सांभाळावा लागतो. कार्यकर्ता तोच, विचारधारा तीच, पण कामाचे क्षेत्र बदलले की कार्यपध्दतीत जमीन-अस्मानाचा फरक पडतो. रडायचे नाही इतके सरळ साधे सूत्र घेऊन जगणाऱ्या नयनाने तेही अंगीकारले. कुठे अडकायचे नाही. चक्रासारखे सतत काम करीत राहायचे. सातत्य आणि निरंतर विचार आणि त्याप्रमाणे आचार यामुळे नयना कुठे थबकत नाही. विनयजींनाही ती थांबू देणार नाही.

vinay sahasrabuddhe famil

 
विनयजींशी माझी ओळख फार जुनी. 1988मध्ये जनसंघ आणि भाजपाचे नेते, माजी खासदार स्व. रामभाऊ म्हाळगी यांच्या नावाने प्रशिक्षण केंद्र असावे, त्यात आपल्या कार्यकर्त्यांचे योग्य त्या परीने प्रशिक्षण व्हावे, अशा प्रशिक्षित कार्यकर्त्यांमुळे पक्ष पुढे जाण्यास गती मिळेल असा विचार करून स्व. प्रमोद महाजन आणि स्व. वसंतराव पटवर्धन यांनी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीची (RMP) स्थापना झाली. प्रबोधिनीच्या स्थापनेपासून विनय सहस्रबुध्दे यांच्याशी माझी ओळख. त्यावेळी मी रुईया महाविद्यालयात अध्यापन करत होते आणि तरुण भारत या वर्तमानपत्रात लेखन करीत असे. ह्या दोन्ही गोष्टी माटुंगा, दादर, वडाळा भागात. काही वेळा मी चालतच रुईयातून निघून प्रबोधिनीच्या कार्यालयात जे कोणी असे त्याच्याशी बोलून तरुण भारतमध्ये संपादक सुधीर जोगळेकर यांना भेटायला जात असे. विनयजींच्या अभ्यासू वृत्तीची, वैचारिक उंचीची आणि चिंतनशील स्वभावाची ओळख तेव्हापासूनच झाली होती. मात्र त्यांची पत्नी नयनाशी घट्ट ओळख झाली ती अगदी अलीकडे. दिल्ली मुक्कामी! विनयजी दिल्लीला भाजपाच्या केंद्रिय कार्यकारिणीचे पदाधिकारी म्हणून आले आणि नंतर नयनासुध्दा बदली होऊन दिल्लीत आली. त्याआधी नयना तिच्याशी केवळ तोंडओळख होती. लग्नाआधी ती अभाविपचे काम करीत असे, आता महाराष्ट्र बँकेत कामाला आहे इतकीच जुजबी माहिती होती.
 
आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

2014 साली दिल्लीत आमची भेट झाली. तेव्हा नुकत्याच स्थापन झालेल्या महिला बँकेत ती अधिकारी म्हणून रुजू झाली होती. विनयजी पक्षाच्या कामामुळे व्यग्र. अनेकदा त्यांना दिल्लीबाहेर जावे लागे. एकुलता एक मुलगा आशय शिकत होता आणि त्याचबरोबर त्याचा स्वत:चा व्यवसायही सुरू होता. त्यामुळे तो ठाण्यात, नयना दिल्लीला आणि विनयजी बहुतेक वेळा प्रवासात. दिल्लीत स्थिरावताना सुरुवातीला थोडे अवघड गेले. मी दिल्लीत तिच्याहून थोडी जुनी होते. कामानिमित्त ये-जा करणारी होते. त्यामुळे दिल्ली परिचयाची होती. त्यामुळे नव्याने आलेल्यांना मी मदत करत असे. त्या सुरुवातीच्या काळात नयनाला माझा आधार वाटत असे, असे तिने एकदा बोलताना सांगितले. ती आमच्या ओळखीची सुरुवात.


आमच्या दोघींमधील आणखी एक समान धागा म्हणजे भारतीय स्त्री शक्ती ही महिलांसाठी काम करणारी संघटना. त्याच्या स्थापनेच्या काळात मी सक्रिय होते. आम्ही स्त्री शक्तीची पहिली बैठक नाशिकला घेतली होती. आता नयना स्त्री शक्तीची राष्ट्रीय पदाधिकारी होती. दिल्लीतून ती हे काम हिरिरीने करत असे. त्यात मलाही सामील व्हायची संधी मिळाली. एक संशोधक या नात्याने स्त्री शक्तीच्या अभ्यास प्रकल्पात मी सामील झाले. आम्ही दोघी कोकणकन्या असल्याने तिची आणि माझी जोडी छान जमली.


नयना मूळची रत्नागिरीजवळच्या 'कर्ले' गावची. वडील वासुदेव धोंडो लिमये तेथील शाळेत शिक्षक होते. तेथील रत्नागिरी शिक्षण संस्था व क्रेडिट सोसायटीचे कामही करायचे. आजोबा गांधीवादी, त्यामुळे समाजाशी बांधीलकी उपजतच निर्माण झाली. सर्व लिमयांचे मूळ गाव कर्ले. तेथेच त्यांची मोठी बागायत. आई कमलचे लग्न झाले तेव्हा ती मॅटि्रक होती. दरम्यान हिंदीच्या परीक्षा देऊन पंडित ही पदवी त्यांनी प्राप्त केली. नंतर मुले मोठी झाल्यावर आईने बी.ए. पदवी मिळवली, तेही घर-संसार करून. घराचा, परसाचा, बागायतीचा व्याप मोठा होता. आईचा स्वभाव धडपडया. उद्यमशील. बागेत पडलेल्या, पिकलेल्या वस्तू - उदा. आंबे, फणस, झाप, झावळया, फुले, फळे विकायचे, राहिले तर त्यावर प्रक्रिया करून विकायचे. घरी दुभती जनावरे होती. दूधदुभते, त्याचे निगुतीने सारे करणे, त्यातूनही चार पैसे कमावणे. तिन्ही मुलींना आणि एका मुलाला तीच सवय लागली. मुलींना निर्णयस्वातंत्र्य होते. घरी भेदभाव नव्हता. अशा वातावरणात मोठी झालेली नयना भरपूर कष्टाळू होती. रोजचे पाच कि.मी. चालून शाळा आणि महाविद्यालय करायचे, घरातले काम करायचे, तरी शाळेतील क्रमांक सोडायचा नाही. स्वतंत्र वृत्तीच्या नयनामध्ये कळत्या वयापासूनच 'स्त्री'वादी विचारांची रूजवण झाली होती. अकरावीत असताना यूथ होस्टेलच्या कार्यक्रमांत सहभागी होणे, रत्नदुर्ग नावाच्या पर्वतारोहणप्रेमी संस्थेतर्फे दुर्गभ्रमण, विविध ठिकाणी भाषण करायला जाणे अशा गोष्टी करता करता रमेश माईणकर यांच्या संपर्कातून अभाविपच्या कामात ती सहभागी झाली आणि आयुष्याला नवी दिशा मिळाली. तेव्हा अभाविपमध्ये अनेक युवती काम करीत होत्या. काही पूर्ण वेळ म्हणून घराबाहेर, वेगळया ठिकाणी राहून काम करत होत्या. त्यांचे संघटनेतले पालक होते सदाशिवराव देवधर! अशा युवती जीवनभर सामाजिक कामात सक्रिय राहाव्या, म्हणून त्यांना समविचारी जोडीदार मिळावा, समविचारी कार्यकर्त्याशी त्यांचे लग्न व्हावे ह्याची चिंता करणारे सदाशिवराव देवधरजींसारखे धुरीण संघटनेत होते.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/
 

इंग्लिश आणि अर्थशास्त्र घेऊन द्विपदवीधर झालेली सुंदर आणि गुणवान कार्यकर्ती नयना तेव्हा रत्नागिरीतच नोकरी करत होती. पदवी मिळाल्यानंतर एका शाळेत शिकवत होती. तेव्हाच तिने आपले पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आणि लगेचच तिला बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरी लागली. तिच्यासमोर त्यांनी विनय सहस्रबुध्दे या कार्यकर्त्याचा प्रस्ताव ठेवला. कार्यकर्ता म्हणून ते एकमेकांना ओळखत होते, पण संपूर्ण आयुष्याचा साथी या दृष्टीने भेटणे, बोलणे आवश्यक होते. मा. गीताताई गुंडे यांनी त्यांची भेट घालून दिली आणि लग्न जमले.

vinay sahasrabuddhe famil

विनय प्रभाकर सहस्रबुध्दे हे मूळचे धुळयाचे. वडील प्रभाकर कृष्णाजी सहस्रबुध्दे हे खादी कमिशनमध्ये नोकरीला, तर आई सुधा बालवाडी शिक्षिका. विनयजी लहानपणापासूनच हुशार. त्या काळात चौथीत असताना हुशार विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असलेल्या विद्यार्थ्यांत त्यांची निवड होऊन ते नाशिक विद्यामंदिरच्या वसतिगृहात राहू लागले. अकरावीत उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी पुण्याच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयात प्रवेश घेतला. तेथेच अभाविपचे काम करू लागले. 1975 साली आणीबाणीत सत्याग्रह केल्यामुळे त्यांना येरवडा तुरुंगात राहावे लागले. त्यानंतर वडिलांची बदली मुंबईतील इर्ला येथील कार्यालयात झाली. विनयजींसारख्या हुशार तरुणाला राम नारायण रुईया महाविद्यालायासारख्या ख्यातनाम संस्थेचे वलय लाभले. भित्तिचित्रे, हस्तलिखिते, साहित्यिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व विकास पावले. पत्रकारिता आणि लेखन याची त्यांना मुळातच आवड होती. ते चिंतनात्मक लेखन करत राहिले. रा.स्व. संघाचे बाळकडू मिळालेले होतेच, त्यावर स्वत:च्या विचारप्रक्रियेतून कृतीची झिलई चढली. स्व. यशवंतराव केळकर यांच्या प्रोत्साहनामुळे ते Student's Experience in Interstate Livingचे काम पाहू लागले. अन्य राज्यांतील विद्यार्थी अदलाबदली करून कार्यकर्त्यांच्या घरी राहात असत. शिकत असत. विशेषतः ईशान्य भारतातील मुलांना राष्ट्राच्या मूळ प्रवाहात सामावून घेण्यासाठी हा प्रकल्प होता. 1984 साली राज्यशास्त्रात द्विपदवीधर झाल्यावर ते दोन वर्षांसाठी पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून बाहेर पडले. अभाविपचे राष्ट्रीय महासचिव झाले. त्यानंतर नोकरी करू लागले, पण सामाजिक कामाशी संपर्क कायम होता. स्व. वसंतराव पटवर्धन आणि स्व. प्रमोद महाजन ह्यांच्या सल्ल्याने नोकरी सोडून ते प्रबोधिनीत आले. या दोघांचे उत्तुंग स्वप्न त्यांनी वास्तवात साकारले. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रबोधिनीची कीर्ती पोहोचली. उत्तमोत्तम शिष्यगण तयार केला. दरम्यान मुंबई विद्यापीठातून भारतातील निवडणूक प्रक्रिया आणि आवश्यक सुधारणा या विषयात पीएच.डी. केले. आता ते राज्यसभेचे खासदार आहेत. भाजपाच्या वैचारिक अभ्यासगटात महत्त्वाची कामगिरी बजावत आहेत.

विनयजींना लग्नासाठी होकार देताना त्यांचे rational विचार, सामाजिक काम करण्याचा निर्धार या गोष्टी विशेष आवडल्याचे नयनाने सांगितले. 1987 साली दोघे विवाहबध्द झाले. लग्नानंतरची एक गोष्ट विनयजींनी सांगितली. त्यावेळी विनयजी कॅम्लीन इंडिया या कंपनीत PRO म्हणून काम करत होते. अशी नोकरी करणे हे आपल्या आयुष्याचे लक्ष्य नाही, हे ध्यानात येत होते. त्याच काळात रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे काम करावे असाही प्रस्ताव आलेला होता. त्याला उत्तर देणे आवश्यक होते. पण नुकतेच लग्न झालेले, नयनाची बदली अजून ठाण्याला झाली नव्हती. ती रत्नागिरीहून वेळ मिळेल तशी ठाण्यात येत होती. तशीच ती एकदा ठाण्यात आली होती. रामभाऊ म्हाळगीमध्ये काम करणार की नाही याबाबतचा निर्णय कळवण्याचा पाठपुरावा होत होता. रस्त्यात नयना रत्नागिरीला चालली असताना विनयजींनी नयनाच्या कानावर ही गोष्ट घातली आणि ''आता काय करावं? तुझं काय म्हणणं आहे?'' असे विचारले. तिने सांगितले की ''नक्की असं वेगळं काम करावं. घर-संसार चालवण्यासाठी मी आहे. माझी नोकरी आहे.'' डिसेंबरमध्ये त्यांनी हा निर्णय घेतला. 8 फेब्रुवारीला प्रबोधिनीचे काम सुरू केले. 7 मेला आशयचा जन्म झाला आणि तेव्हाच विनयजींची मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवर निवड झाली. थोडयाच काळात कार्यकारी परिषदेवर - executive councilवर निवड झाली. सामाजिक कामाचा झपाटा सुरू झाला. घराची जबाबदारी नयनाने घेतली. आजही विनयजी आवर्जून नमूद करतात, ''सर्व आर्थिक व्यवहार नयना स्वतंत्र रितीने पाहते. आज जे काही आर्थिक स्थैर्य आहे, ते नयनाच्या कुशल गुंतवणुकीमुळे आणि व्यवहारामुळे. मला त्यात रसही नाही आणि गतीही नाही.''

ठाण्यात आल्यावर नयनाला खरे तर तिला महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करायची इच्छा होती, पण ते झाले नाही. तिने बँक ऑफ महाराष्ट सोडली नाही. आज पदोन्नती घेत घेत ती आता दिल्ली विभागात साहाय्यक महाव्यवस्थापक (Assistant General Manager) म्हणून काम पाहते. या सर्व काळात ती भारतीय स्त्री शक्तीचे काम करायची. आशयच्या जन्मानंतर तिची धावपळ होत असे, पण विनयजी घरकामातसुध्दा पूर्ण मदत करीत असत. हे काम माझे नाही, हे बायकांचे असा पुरुषी बाणा नव्हता. त्यामुळे खरेखुरे सहजीवन फुलत झाले. आशयवर तेच संस्कार झाले आहेत. त्याचा स्वत:चा व्यवसाय आहे. सून शिवदा आर्किटेक्ट-इंटीरियर डिझायनर आहे. तीही स्वतंत्रपणे काम करते. आशयला कधी अभाविप, संघ किंवा शाखेत जाण्याचा आग्रह केला नाही. पण त्याला आई-वडील करत असलेल्या कामाबद्दल जाण आहे. त्याचे महत्त्व माहीत आहे. वेळोवेळी चर्चा किंवा मतभिन्नताही तो व्यक्त करतो. सामाजिक भान आणि समानतेची भावना यांचे योग्य ते मिश्रण त्याच्या व्यक्तिमत्त्वात आहे. संपन्न अभिरुची विकसित झाल्यामुळे साहित्य, चित्रपट, नाटक, त्यातील सौंदर्यस्थळे यावर समीक्षात्मक लेखन केलेले त्याचे ब्लॉग तरुणाईला भावतात. त्याचप्रमाणे आई-वडिलांकडून त्याच्या अवाजवी / फारशा अपेक्षा नाहीत. आपल्याकडून वडिलांच्या पदाचा दुरुपयोग होऊ नये याची तो काळजी घेतो.

विनयजींनी त्यांच्या आयुष्यातील आणखी एक प्रसंग सांगितला, जेव्हा नयनाचे मोलाचे सहकार्य त्यांना मिळाले. 2005 साली मा. प्रमोद महाजन यांचा मृत्यू झाला. प्रबोधिनीचा मोठा आधार गेला. एक प्रकारचे पोरकेपण आले. त्याच वेळी विनयजींनी राजकारणात यावे असे ठरले. मा. गडकरी अध्यक्ष असताना ते अध्यक्षांचे सहयोगी म्हणून भाजपाचे काम करू लागले. 2014नंतर राष्ट्रीय उपाध्यक्षपदाची जबाबदारी आल्यावर दिल्लीला येणे आवश्यक होते. तेव्हा नयना महाराष्ट्र बँकेतून दीर्घकालीन सुट्टी घेऊन दिल्लीत आली.

अर्थात नयनाच्या मते महिला बँकेत काम करायचे हेसुध्दा एक आकर्षण होते, पण दुर्दैवाने ती बँक विलीन झाली आणि नयना पुन्हा बँक ऑफ महाराष्ट्रच्या दिल्ली कार्यालयात रुजू झाली. विनयजी नयनाच्या सामाजिक कामातही रस घेतात, चर्चा करतात, नवे काही सुचवतात. त्यांच्या बोलण्यातून नयनाबद्दल कृतज्ञतेची झाक असलेला अभिमान जाणवतो. तिचा कामाचा झपाटा, साधेपणा, घर-ऑफीसच्या कामाचे केलेले नियोजन ह्याचबरोबर तिने विनयजींच्या आईच्या शेवटच्या वर्ष-दीड वर्षाच्या आजारपणात तिची केलेली सेवा. विनयजींच्या अनुपस्थित अनेकदा हॉस्पिटलला दाखल करावे लागायचे. अंथरूणाला खिळलेल्या सासूबाईंचे सर्वकाही तिने प्रेमाने आणि निरपेक्ष भावाने केले.

सामाजिक क्षेत्रात प्रस्थापित झालेले असताना वयाच्या पन्नाशीनंतर राजकीय क्षेत्रात यायचे ठरले तर दोन क्षेत्रातील बदल समजून घेत, त्याचा स्वीकार करावा लागतो. नव्या क्षेत्राची सवय करून घ्यावी लागते. आजही अनेक ताणतणावाच्या वेळी नयना स्थिर असते. बुध्दिप्रामाण्यवादी रास्त निर्णय घेते. त्याचबरोबर भारतीय स्त्री शक्ती या संस्थेची अखिल भारतीय उपाध्यक्ष म्हणूनही काम बघते. महिला सक्षमीकरण आणि स्त्री-पुरुष समानता याचा प्रचार आणि प्रसार हे ध्येय ठेवून भरपूर वैचारिक लेखन, देशभर विविध विषयांवर अभ्यासपूर्ण व्याख्याने देणे, त्यासाठीचे वाचन, अभ्यास ह्यातच नयना व्यग्र असते. या विषयांशी संबंधित 'स्त्रीभान' नावाचे तिचे पुस्तक अलीकडेच प्रसिध्द झाले आहे.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/
 

बाबूजींचे लोकप्रिय गाणे कसे ऐकताना सोपे वाटते, पण म्हणायला गेले की कळते किती अवघड आहे ते. नयना- विनयजींसारख्या कार्यकर्त्यांच्या संसाराचेही तसेच असते. वरून साधेसरळ वाटणारे त्यांचे आयुष्य अनेक अडीअडचणींनी, खाचखळग्यांनी भरलेले असते. सांसारिक बाजू सांभाळणे, आर्थिक कसरत, व्यवहार निभावणे हे सगळे एकटीने सांभाळणे, हे काही सोपे नसते. बहुदा ते पत्नीलाच करावे लागते. नयनाने ते यशस्वीपणे आणि शांतपणे केले. जेव्हा कार्यकर्ता पूर्णवेळ निघतो, तेव्हा तो 24#7 स्वत:च्या कामातच व्यग्र असतो. तो घरात हजर असला, घरगुती कार्यक्रमांत सहभागी होत असला तरी मन आणि विचार कामातच असतात. अनेकदा घर-संसार आणि कार्यक्षेत्र एकमेकात मिसळून जाते, त्याचे जसे लाभ असतात तसे तोटेही असतात. खाजगी आयुष्य राहत नाही. विनयजी आणि नयनाचं दांपत्यजीवन तसेच होते. अशा वेळेला दोघांनीही आपापला तोल सांभाळावा लागतो. कार्यकर्ता तोच, विचारधारा तीच, पण कामाचे क्षेत्र बदलले की कार्यपध्दतीत जमीन-अस्मानाचा फरक पडतो. रडायचे नाही इतके सरळ साधे सूत्र घेऊन जगणाऱ्या नयनाने तेही अंगीकारले. कुठे अडकायचे नाही. चक्रासारखे सतत काम करीत राहायचे. सातत्य आणि निरंतर विचार आणि त्याप्रमाणे आचार यामुळे नयना कुठे थबकत नाही. विनयजींनाही ती थांबू देणार नाही. स्त्री शक्तीची कार्यकर्ती म्हणून काम करताना दिलेला नारा हे तिच्या जगण्याचे सूत्र आहे - 'नारी परिवर्तन की ओर'.

9869067070