मराठी भाषेची संगणकावरील आश्वासक वाटचाल

विवेक मराठी    26-Feb-2020
Total Views |

***विवेक गिरिधारी***

 

संगणकावर व मोबाइलवर भारतीय भाषांचा वापर लक्षणीय प्रमाणात वाढतो आहे. यात मराठी भाषेचीही वाटचाल दमदार होते आहे. मराठी भाषा दिनानिमित्त या आश्वासक बदलांचा मागोवा घेणारा हा लेख.


Marathi keyboard app-Mara

 

संगणकावर, मोबाइलवर व इंटरनेटवर विनासायास मराठीचा वापर करता येणे ही काळाची निकडीची गरज बनली आहे. इंग्लिशची जुजबी ओळख असणारा, परंतु वापरासाठी अथवा व्यक्त होण्यासाठी देशी भाषांची निवड करणारा भारतातील वर्ग अलीकडे मोठ्या संख्येने वाढत आहे. हा वाढीचा नवा आयाम लक्षवेधी आहे. या वर्गाची भूक वाढती आहे. हा वर्ग उद्या व्यावसायिक वापरासाठीदेखील संगणकावर अथवा मोबाइलवर देशी भाषा पसंत करतो आहे, हे चाणाक्षपणे हेरून आता ई-कॉमर्सच्या अथवा ई-वॉलेटच्या कंपन्यांची पावले हळूहळू पण ठामपणे भारतीय भाषांकडे वळत आहेत. उदाहरण म्हणून अनेक जण वापरत असलेल्या ‘पेटीएम’ या मोबाइल अॅपच्या सेटिंगमध्ये जाऊन ‘भाषा निवड’ हा पर्याय उघडून बघा. तुम्हाला त्यात इंग्लिशबरोबरच मराठी, बंगाली, तामिळ, तेलगू, गुजराथी, कन्नड, मल्याळम, पंजाबी व उडिया हे पर्याय दिसू लागतील. गळेकापू व्यावसायिक स्पर्धा त्यांना हे सर्व करायला भाग पडते आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. या कंपन्यांचे देशी भाषांविषयीचे प्रेम काही एकाएकी उफाळून आलेले नाही. जे सरकारी आदेशानेसुद्धा घडेल की नाही हे सांगता येत नाही, ते मार्केटच्या रेट्याने घडून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. देशी भाषेतील संकेतस्थळांच्या वापरांना चांगले दिवस आले आहेत. मोठ्या प्रमाणात वापरले जाणारे आयआरसीटीसीसारखे संकेतस्थळही आता हिंदीत आले आहे. कदाचित पुढील टप्प्यात ते मराठीसह अन्य भारतीय भाषांतही उपलब्ध होईल. फ्लिपकार्ट व अॅमेझॉन यासारख्या आघाडीच्या शॉपिंग कंपन्यांनीदेखील हिंदी भाषेतून संकेतस्थळ अर्थात आपले पोर्टल वापरण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. देशी भाषेतील ग्राहक राजा सगळ्यांना खुणावतोय, एवढे मात्र खरे!

प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या केपीएमजी व गूगल या सल्लागार कंपन्यांनी काही वर्षांपूर्वी केलेल्या सर्वेक्षणानुसार २०२१अखेरपर्यंत भारतातील २० कोटीहून अधिक इंटरनेट वापरकर्ते हिंदीचा वापर करतील, तर मराठीतून इंटरनेटचा वापर करणाऱ्यांची संख्या ५ कोटीचा टप्पा ओलांडेल. भारतीय भाषांतून इंटरनेट वापरणाऱ्यांपैकी एकट्या हिंदी वापरकर्त्यांचा हिस्सा ३८ टक्के असेल. येत्या नजीकच्या काळातील भारतीय भाषांमधील इंटरनेटचे वापरकर्ते जवळपास ५० कोटीच्या आसपास असणार आहेत. त्यात हिंदीच्या खालोखाल मराठी भाषिक मुसंडी मारण्याची चिन्हे आहेत.

Marathi keyboard app-Mara

स्वभाषेतून होणारे वंचित समूहाचे सक्षमीकरण

चीन, जपान व कोरिया यासारखी राष्ट्रे वेगाने प्रगती करताना दिसतात. तेथील स्थानिक मातृभाषेचे ज्ञानभाषेशी जोडलेले त्याच्या मुळाशी नाते आहे. तेथील माहिती तंत्रज्ञानाची भाषा स्थानिक भाषेशी जोडलेली आहे. असे घडले तरच ज्ञान तळागाळापर्यंत व बहुजन समाजापर्यंत पोहोचण्याची प्रक्रिया घडू शकते. यासाठी भाषेचे प्रश्न अतिरेकी अस्मितेचे न करता गरजेच्या व सर्वसमावेशकतेच्या भावनेतून सोडविले पाहिजेत. अल्पशिक्षित व आर्थिकदृष्ट्या निम्नस्तरातील व्यक्तीलासुद्धा भाषिक माध्यमातूनच ज्ञानाची कवाडे उघडली जाऊ शकतात. हे केवळ इंग्लिशच्या अर्धवट अंधानुकरणातून होणे अवघड आहे. उलट ज्ञानभाषा व लोकभाषा एक झाल्यामुळे इंग्लिश भाषेच्या अडचणीमुळे ज्ञानाच्या परीघाबाहेर राहिलेल्या मोठ्या वंचित समाजासाठी ज्ञानाच्या कक्षा रुंदावणार आहेत. यातून या वंचित समूहांचे नक्कीच सक्षमीकरण होऊ शकणार आहे, याकडे सर्वांचे लक्ष वेधण्याची गरज आहे.

जागतिक स्तरावरील भाषानिहाय सद्य:स्थिती

जगभरातील एकूण भाषांपैकी ६० टक्के लोक फक्त प्रमुख दहा भाषाच बोलतात, अशी युनायटेड नेशनची आकडेवारी सांगते. या दहा भाषांमध्ये इंग्लिश प्रथम क्रमांकावर असून चिनी भाषा द्वितीय क्रमांकावर आणि हिंदी भाषा तृतीय क्रमांकावर आहे. बंगाली भाषादेखील जगात सातव्या क्रमांकावर आहे. प्रथम मातृभाषा असणाऱ्या व किमान एक कोटीपेक्षा अधिक लोकांचा समूह असणाऱ्या जगात एकूण ९१ भाषा आहेत. त्यात मराठीचा क्रमांक चक्क दहावा आहे. जर्मन, फ्रेंच व कोरियन या भाषाही आपल्या खाली आहेत.

असे असले, तरी जगभरातील एकूण इंटरनेट वापरापैकी फक्त २५% इंग्लिश भाषिक आहे आणि ही संख्या दिवसेंदिवस घसरते आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. याचे प्रमुख कारण म्हणजे अन्य भाषांमधील इंटरनेटचा वाढता प्रसार! एकूण जगाच्या ५५% लोकसंख्या असलेल्या आशियात सध्या इंटरनेटची घनता (पेनिट्रेशन) ५४%च आहे. हे प्रमाण जर वाढले तर ते जगाची आकडेवारी बदलू शकते, हे लक्षात घेतले पाहिजे. २००९च्या युनेस्कोच्या आकडेवारीनुसार १९९८ ते २००५ या कालावधीत इंटरनेटवरील इंग्लिश वेब पेजेसचे प्रमाण ७५ टक्क्यांवरून ४५ टक्क्यांपर्यंत घसरले आहे. एकूणच ही आकडेवारी बरीच बोलकी आहे. दुसरीकडे भारतात व चीनमध्ये इंग्लिश माध्यमातून शिकणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात सातत्याने वाढत आहे, ही वस्तुस्थितीदेखील ध्यानात ठेवायला हवी.

विकिपीडियाचे समृद्ध दालन

विकिपीडिया ही काही आता आपल्यासाठी नवीन बाब राहिलेली नाही. आपण अनेकदा विविध प्रकारची माहिती धुंडाळताना त्याचा आधार घेत असतो. सर्वांना त्यांच्या-त्यांच्या भाषेत जगातील सर्व माहिती, सर्व ज्ञान मोफत उपलब्ध करून देणे हे या विकिपीडियाचे उद्दिष्ट आहे. आज मराठीसह भारतातील २१ भाषांमध्ये विकिपीडिया उपलब्ध आहे. विकिपीडियावरती खूप मोठ्या प्रमाणात माहिती टाकण्याचे महाकाय काम अद्याप बाकी आहे. हे काम समाजातील जाणत्या व बुद्धिजीवी वर्गाचे अधिक आहे. भारत विकिपीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात करतो, परंतु या विकिपीडियात भर घालण्यास मात्र भारतीय लोक उदासीन असतात, असे निरीक्षणही अनेकदा नोंदविले जाते.

२००३ या एकाच वर्षात मराठी, तामिळ व तेलगू भाषेचे विकिपीडिया स्थापन झालेले असतानासुद्धा प्रत्यक्ष विकिपीडियावरील लेखांच्या संख्येत मात्र चांगलीच तफावत आहे. तामिळ भाषेत ९१ हजाराहून अधिक लेख आहेत, तर तेलगू भाषेत ६५ हजाराहून लेख आहेत. मराठीने आत्तापर्यंत फक्त ५६ हजारांचा आकडा पार केलेला आहे. ही आकडेवारी आपल्या ‘मराठी बाण्याला’ नक्कीच शोभणारी नाही. यात प्रत्येकाने आपापल्या परीने योगदान देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अभय नातू यांच्यासारखी माणसे तर चिवटपणे सेवाभावी वृत्तीने २००५पासून मराठी विकिपीडियात शांतपणे आपले योगदान देत आहेत. १९९६पासून व्यवसायानिमित्ताने अमेरिकेत गेलेले अभय नातू तेथे राहूनही आपल्या परीने आपल्या मातृभाषेची सेवा करीत आहेत. शंभराहून अधिक जण असे सेवाभावी काम करीत आहेत, म्हणूनच तर मराठी विकिपीडियाने ५० हजार लेखांचा महत्त्वाचा टप्पा पार केला आहे!

 

मराठी पाऊल अडखळते कुठे?

संगणकावर सहजतेने मराठीमध्ये टंकन करता येणे हा आजही अनेकांपुढचा यक्षप्रश्न असतो. पत्रव्यवहार, ई-मेल अथवा ४-५ पानांपुरता मराठी लेखनाचा मर्यादित वापर करणाऱ्यांचे फोनेटिक पद्धतीने वापर करण्याने भागून जाते. परंतु मायक्रोसॉफ्टने ‘गूगल इनपुट टूल’ ही टंकन करताना अनेक मराठी शब्दांचे पर्याय देणारी महत्त्वाची ऑफलाइन सेवा अलीकडे बंद केल्यामुळे नव्याने संगणक अथवा लॅपटॉप खरेदी करणाऱ्यांना ती पूर्वीसारखी इंटरनेटवर सहजी उपलब्ध नाही. त्यांना ती ऑनलाइन पद्धतीने वापरावी लागेल, जे पूर्वीइतके सुखावह नाही. त्यापेक्षा सी-डॅक या सरकारी यंत्रणेने परिश्रमपूर्वक विकसित केलेला इन्स्क्रिप्ट कळफलक (कीबोर्ड) वापरणे सोयीचे ठरते. यात ज्या प्रकारे आपण मराठीमध्ये लेखन करतो, त्याचप्रमाणे अक्षरे आणि त्यांच्या काना, मात्रा, वेलांट्या, रफार इत्यादी टंकित करणे अपेक्षित असते. साधारणपणे नेटाने शिकल्यास जेमतेम दोन आठवड्यात हा कळफलक सफाईदारपणे वापरता येऊ शकतो. ज्येष्ठ सनदी अधिकारी (निवृत्त) लीना मेहेंदळे या इन्स्क्रिप्ट कळफलक वापरून संगणकावर मराठी टंकन करण्याबाबत विशेष आग्रही आहेत. त्या स्वतः याचा हिरिरीने प्रचार करीत असतात. सर्वात महत्वाचे म्हणजे ते ऑफलाइन पद्धतीने वापरता येऊ शकते.

या पद्धतीने केलेले टंकन हे मराठी युनिकोड प्रकारचे असते. युनिकोड म्हणजे लिपिचिन्हांचे प्रमाणीकरण. हे प्रमाणीकरण जागतिक पातळीवर करण्यात आलेले असल्यामुळे संगणकावर टंकलिखित (टाइप) केलेले जगभरात दुसर्‍या कोणत्याही संगणकावर वाचता येऊ शकते, हा या तंत्रज्ञानाचा सर्वांत मोठा फायदा आहे. एखाद्या शब्दाच्या आधारे इंटरनेटवर ‘सर्च’ करता येऊ शकते. इन्स्क्रिप्टमध्ये टंकन हा अलीकडच्या काही वर्षांपासून संगणकावर मराठी वापरण्यासाठी समर्थ पर्याय म्हणून पुढे आला आहे. खरे तर शाळांमध्येच याची तोंडओळख झाल्यास ही मुले पुढील आयुष्यात अगदी सफाईदारपणे संगणकावर मराठी वापरू शकतील. यातून ग्रामीण भागातील मुलांमध्ये एक प्रकारचा संगणक हाताळण्याचा आत्मविश्वास येईल. सर्व खरे आहे, पण यासाठी पुढाकार कोण घेणार?

 

सुमारे साडेआठ कोटी मराठी जनतेच्या भवितव्याचा प्रश्न कळत-नकळत मराठी भाषेशीही अप्रत्यक्षपणे जोडला गेलेला आहे. सामान्यजनांच्या भवितव्याशी तर तो अधिकच गंभीरपणे निगडित आहे. म्हणूनच संगणकावर सहजपणे टंकन करणे, अद्ययावत ज्ञान मराठीत आणणे व मराठी विकिपीडिया समृद्ध करणे यासाठी त्याचा प्रचार करण्याचा दृष्टीने ‘मराठी राजभाषा दिन’ ही एक अत्यंत चांगली संधी आहे.