कणाहीन 'कंट्रोल+झेड' सरकार

विवेक मराठी    26-Feb-2020
Total Views |

***देविदास देशपांडे***

 उध्दव ठाकरे यांच्या हस्ते भाजपच्या निर्णयांना कंट्रोल+झेड करणे एवढेच त्यांना करायचे आहे. कणाहीन ठाकरे सरकारपुढे मम म्हणण्याशिवाय पर्यायही नाही. अर्थात आपल्या संभावित औट घटकेच्या राज्यात त्यांनी करून ठेवलेला उपद्वयाप निस्तरताना नंतर येणाऱ्यांच्या नाकी नऊ येणार, हे नक्की! 
 

sena_1  H x W:
 

'कुठलाही मूर्ख युवक एखाद्या कीटकाला रगडून मारू शकतो, मात्र जगातील सर्व प्राध्यापक मिळूनही त्याला पुन्हा उभा करू शकत नाहीत' असे जर्मन तत्त्वज्ञ आर्थर शॉपेनहाउएर याचे एक वचन आहे. एखादी व्यक्ती उत्साहाच्या भरात किंवा सत्तेच्या कैफात वाटेल ते कृत्य करू शकते, परंतु त्याला सकारात्मक वळण देणे भल्या भल्या विद्वानांनाही शक्य नसते, असा त्याचा अर्थ. महाराष्ट्रात सध्या सत्तेवर असलेल्या उध्दव ठाकरे सरकारची पावले या दिशेने नक्कीच पडत आहेत. भारतीय जनता पक्षाच्या 'आपले सरकार'ला टिच्चून ठाकरे यांनी 'स्वत:चे सरकार' आणून दाखवले खरे. मात्र या सरकारचे वेगळेपण सकारात्मक किंवा विधायक कृत्यांतून दाखविणे राहिले दूर, त्याऐवजी आधीच्या सरकारच्या निर्णयांवर फुली मारण्यातच आपली शक्ती खर्च करायचे त्यांनी ठरविलेले दिसते.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची ही आघाडी झाली तीच मुळात जनादेशाचा विश्वासघात करून. केवळ भाजपला रोखणे आणि त्यातही देवेंद्र फडणवीस यांना दूर ठेवणे या 'उदात्त' हेतूने ही तीन तिघाडी झाली. म्हणजेच उध्दव ठाकरे व त्यांचे बोलभांड सेनापती संजय राऊत यांनी पहिल्यांदा जनादेश फिरविला. राज्यातल्या जनतेने विश्वासाने सोपविलेल्या जागांचा दुरुपयोग करून एकदाचे ठाकरे सरकार आले खरे. हा अधर्म खरा, मात्र तो आपल्या स्वप्नातील महाराष्ट्र घडविण्यासाठी आहे हे दाखविणारे एखादे तरी काम करावे ना? तेही नाही. मुळात हे सरकार चालेल का आणि चालले तरी किती काळ, ही शंका जर त्या सरकारमधील घटकांनाच भेडसावत असेल, तर आपल्या बळावर काही करून दाखवण्याची ऊर्मी येणार तरी कुठून?

 

मग बाळ वॉशिंग्टनने ज्याप्रमाणे हातात आलेली कुऱ्हाड आपल्याच बागेतील झाडांवर चालविण्याची मर्दुमकी दाखविली, तसेच काहीसे या सरकारने केले. राज्यातील महाआघाडी (उर्फ शिवआघाडी, मात्र यातला शिव हा इंग्लिशमधील काही अक्षरांप्रमाणे सायलेंट आहे!) सरकारने पूर्वीच्या फडणवीस सरकारचे सर्व लोकोपयोगी निर्णय रद्द केले आहेत. या निर्णयांमध्ये दुष्काळी मराठवाडयामधल्या जलयुक्त शिवार व वॉटर ग्रिड या महत्त्वाच्या योजनांचाही समावेश आहे. महाआघाडी सरकारने कर्जमाफीचे निकष बदलून शेतकऱ्यांचीही फसवणूक केली. महानगरातील झोपडपट्टीवासीयांना 500 चौ.फुटाचे घर देण्याचे आश्वासन दिले होते. त्यालाही वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या. जणू आपला अवतार हा दिलेला शब्द पाळण्यासाठी नसून फक्त आधीच्या सरकारचे निर्णय फिरविण्याचेच आहे, असे या सरकारचे धोरण आहे.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

 

सत्तेवर आल्यानंतर या सरकारने फिरविलेले निर्णय पाहिले तरी फडणवीस सरकारने किती काम केले होते, याची प्रचिती येते. ही एक विसंगतीच म्हणावी लागेल. जलयुक्त शिवार, पोखरा, 25/15 या योजनेचा निधी, शहर विकासासाठीचा निधी, मेट्रो प्रकल्पाचा निधी, सारथी प्रकल्प, महापोर्टल अशा विविध विकासकामांना स्थगिती देण्यात आली. किंबहुना या सरकारने स्थगितीशिवाय तीन महिन्यांत कोणतेच काम केले नाही. त्यामुळे हे प्रगती सरकार नसून स्थगिती सरकार आहे, असा शेलका शेरा फडणवीस यांनी मारला. त्यात नक्कीच तथ्य आहे. एवढेच कशाला, ज्या नाणार प्रकल्पावरून थयथयाट करण्यात शिवसेनेची अडीच-तीन वर्षे गेली, त्याच प्रकल्पाची जाहिरात पक्षाच्या मुखपत्रात आली. माघारीचे यापरते आणखी कोणते उदाहरण हवे?

 
sivsena_1  H x

आज हे सरकार येऊन तीन महिने झाले. शिवसेना भाजपसह सत्तेत असताना परंतु विरोधी पक्षासारखे दुभंग व्यक्तिमत्त्वाचे राजकारण करत असताना तिचे वर्तन कसे होते? शेतकऱ्यांचे दीड लाखापर्यत कर्ज माफ न करता सर्व सातबारा कोरा केला पाहिजे व अतिवृष्टी झाल्याने एकरी 50 हजार रुपये मदत मिळाली पाहिजे, अशी शिवसेनेची मागणी होती. आता महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर असताना सेनेचा हात कोणी धरला आहे? अजूनही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालेला नाही किंवा अतिवृष्टीची मदत म्हणून एकरी पन्नास हजार रुपये दिलेले नाहीत.


आपण शेतकऱ्यांचे कैवारी असल्याचा आव ठाकरे यांनी अनेकदा आणला आहे. त्यांचे नवीन जोडीदार-धनी शरद पवार हे तर शेतकऱ्यांचा मुलगा म्हणवून घेतात. मात्र ठाकरे सरकार आल्यानंतर पहिल्या काही निर्णयांमध्ये कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर करण्यात आलेल्या विशेष निमंत्रितांच्या (तज्ज्ञ संचालक) नियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय समाविष्ट होता. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळासाठी निवडणूक होत असे आणि त्याद्वारे सदस्य निवडले जात असत. या समित्यांवर राष्ट्रवादीचा आणि काँग्रेसचा ताबा असल्याने त्यांनी मक्तेदारी स्थापन केली होती. त्यातून शेतकऱ्यांची पिळवणूक होत असे. ती बंद करण्यासाठी फडणवीस सरकारने कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर संचालकांच्या नियुक्त्या केल्या होत्या. यातून बाजार समितीवर येण्याचा काही तज्ज्ञ मंडळींचा मार्ग मोकळा झाला होता. त्याला ठाकरे सरकारने खोडा घातला. म्हणजेच शेतकऱ्यांची पिळवणूक आता पूर्वीसारखी सुखेनैव सुरू राहील. हा यांचा शेतकऱ्यांचा कैवार!

sivsena_1  H x

तीच गत 'सारथी' संस्थेची. मराठा-कुणबी समाजाच्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक सक्षमीकरणासाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) या स्वायत्त अधिकार संस्थेची स्थापना राज्य सरकारने केली होती. 'सारथी' संस्थेला मराठा समाजासाठी आर्थिक आणि शैक्षणिक उन्नतीच्या विविध योजना राबविण्यासाठी कंपनी कायद्यानुसार स्वतंत्र अधिकार देण्यात आले होते. फडणवीस सरकारने त्या बाबतचा धोरणात्मक निर्णय घेतला होता. पण सरकार बदलताच संस्थेच्या अधिकारांना लगाम लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामुळे 'सारथी'ची स्वायत्तता अबाधित ठेवावी, या मागणीसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासह मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकाऱ्यांनी आणि सारथीच्या विद्यार्थ्यांनी जानेवारी महिन्यात पुण्यात आंदोलन केले. या संस्थेच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न आजही प्रलंबित आहेत.

असाच आणखी एक तुघलकी निर्णय होता तो रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत मुंबई विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण रद्द करण्याचा. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी ही प्रसिध्द प्रशिक्षण आणि संशोधन संस्था आहे. मुंबई विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांना ती संघ विचारांचे प्रशिक्षण देईल आणि त्यातून भारावून जाऊन हे अधिकारी संघ विचारांचाच प्रसार करतील असे मानणे निव्वळ भाबडेपणाचे आणि तद्दन मूर्खपणाचे आहे. (प्रत्यक्षात तसे केले तर ते चांगले का वाईट, हा भाग सध्या तरी बाजूला ठेवू!) स्वत: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही या संस्थेला भेट देऊन तिचे कौतुक केले होते. मुख्यमंत्री उध्दव ठाकरेही तेथे जाऊन आलेले आहेत. म्हाळगी प्रबोधिनीत नेहमीच वेगवेगळया संस्था, कंपन्यांसह राजकीय पक्षांचेही प्रशिक्षण वर्ग होतात. भारतीय जनता पक्षाबरोबरच शेतकरी कामगार पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षांचे प्रशिक्षण वर्गही म्हाळगी प्रबोधिनीत झाले आहेत. याहीपेक्षा कडी म्हणजे खुद्द शिवसेनेचे प्रशिक्षण वर्ग या संस्थेत झाले आहेत. मात्र आता ही संस्था अचानक शिवसेनेच्या मंत्र्यांना अस्पृश्य वाटते आहे, याचे कारण म्हणजे सूड आणि असुरक्षितता.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

 

हतबल शिवसेना

ही सगळी फिरवाफिरव शिवसेनेचे स्वत:चे कर्तृत्व असते तर ते समजूनही घेता आले असते. मात्र दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या कर्तृत्वाचे पितृत्व शिवसेनेला टेकू देणाऱ्या काँग्रेस-एनसीपीकडे जाते. काका बोले आणि उध्दव हाले, अशी सध्याची परिस्थिती आहे. तसे नसते तर अभिनेते शरद पोंक्षे यांचा 'अथांग सावरकर' हा कार्यक्रम सेनेने रद्द केला नसता. स्वा. सावरकर म्हणजे शिवसेनेचे मर्मस्थान. सावरकरांवर भक्ती करावी तर ती शिवसैनिकांनी, असा काहीसा तोरा हा पक्ष आतापर्यंत मिरवत होता. म्हणूनच केंद्रातील भाजपा व राज्यातील तत्कालीन फडणवीस सरकारला अडचणीत आणण्यासाठी सावरकरांना भारतरत्न देण्याची सातत्याने मागणी केली जात होती. मात्र एका मुख्यमंत्रिपदासाठी उध्दव ठाकरेंनी सावरकर नावाची माळ खुंटीला टांगली आणि सत्तेची बिर्याणी खायला सुरुवात केली. त्यातूनच हा कार्यक्रम रद्द करण्याचा प्रमाद घडला आणि तोही अत्यंत थातूरमातूर कारण देऊन! शिवसेनाप्रणीत स्थानिय लोकाधिकार समिती महासंघाने प्रभादेवी येथील रवींद्र नाटयगृहात 'अथांग सावरकर' कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मात्र, महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची मनोरंजनात्मक कार्यक्रमाची इच्छा असल्यामुळे शिवसेनेने कार्यक्रम रद्द केला. अभिनेते शरद पोंक्षे हे स्वतः शिवसेनेचे उपनेते, त्यामुळे हा घाव आणखी वर्मी बसला.


मांडे करणारीचा शेंबूड काढावा लागतो
, या न्यायाने शिवसेनेला पवारांच्या इशाऱ्यावर नाचणे भाग आहे. त्यामुळे भाजपाची रेषा कमी करण्यासाठी आपली स्वतःची मोठी रेषा काढायची उसंत त्यांना मिळणार नाही. कारण त्यांच्या बोलवित्या धन्यालाही ते नको आहे. भाजपाच्या कामावर पाणी फेरणे, ते अस्तित्वहीन करणे हा त्यांचा उद्देश आहे. त्यामुळे संगणकाच्या भाषेत सांगायचे तर उध्दव ठाकरे यांच्या हस्ते भाजपच्या निर्णयांना कंट्रोल+झेड करणे एवढेच त्यांना करायचे आहे. कणाहीन ठाकरे सरकारपुढे मम म्हणण्याशिवाय पर्यायही नाही. अर्थात आपल्या संभावित औट घटकेच्या राज्यात त्यांनी करून ठेवलेला उपद्वयाप निस्तरताना नंतर येणाऱ्यांच्या नाकी नऊ येणार, हे नक्की!

8796752107