बहुविधता आणि न्या. चंद्रचूड

विवेक मराठी    29-Feb-2020
Total Views |

भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांचे गुजरात हायकोर्टात 15 फेब्रुवारी रोजी भाषण झाले. त्यांच्या विचारांचा वेगळया प्रकारे अतिशय तीव्र प्रतिवाद करता येण्यासारखा आहे. परंतु धनंजय चंद्रचूड न्यायमूर्ती असल्यामुळे शुध्द न्यायाच्या भूमिकेतूनच पाहू या...


Justice-Chandrachud-IDIA_

भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांचे गुजरात हायकोर्टात 15 फेब्रुवारी रोजी भाषण झाले. या भाषणातील महत्त्वाचा अंश लेखरूपाने 21 फेब्रुवारी 2020च्या दि टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित झाला. मनात अन्य कोणताही विचार न आणता हा संपादित भाषणाचा लेख वाचला, तर त्यात न पटण्यासारखे काही आहे असे वाचकांना वाटणार नाही. परंतु भाषणाची वेळ, भाषण जेथे दिले गेले ती जागा, देशाची सध्याची परिस्थिती, राष्ट्रीय चर्चेत येत असलेले अनेक विषय, एका विचारधारेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न, मोदी सरकारविरोधाची घेराबंदी अशा सर्व संदर्भात जर हे भाषण वाचले, तर या भाषणाचे वाटेल ते अर्थ काढता येतात. न्यायमूर्ती चंद्रचूड यांचे भाषण सार्वजनिक झालेले आहे. सार्वजनिक विषयावर उलटसुलट विचार मांडण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. चंद्रचूड यांच्याच भाषणातील शब्द वापरायचे, तर ''right to express their views in every conceivable manner, including the right to protest and express dissent against prevailing laws.''

या लेखातील विचारांचा वेगळया प्रकारे अतिशय तीव्र प्रतिवाद करता येण्यासारखा आहे. परंतु आपण असे गृहीत धरू या की, धनंजय चंद्रचूड न्यायमूर्ती असल्यामुळे शुध्द न्यायाच्या भूमिकेतूनच त्यांनी विषयाची मांडणी केलेली आहे. म्हणून ती मांडणी काय आहे, ते प्रथम पाहू या. त्यापूर्वी धनंजय चंद्रचूड यांची एक गोष्ट येथे नमूद केली पाहिजे, ती म्हणजे 1976 साली आणीबाणीत सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायमूर्तींनी एडीएम जबलपूर विरुध्द शिवकांत शुक्ला या खटल्यात घटनेने दिलेला कलम 21चा मूलभूत अधिकार (जीवन आणि स्वातंत्र्याचा) संपतो, असा निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालय इंदिरा गांधींपुढे झुकले. हा निर्णय देण्यामध्ये तेव्हा धनंजय चंद्रचूड यांचे वडीलही होते. 2017 साली 'राइट टु प्रायव्हसी'चा निकाल देताना नऊ न्यायमूर्तींच्या खंडपीठाने 1976चा निर्णय बाजूला सारला आणि तो चुकीचा निर्णय असल्याचे म्हटले. वडिलांचा निर्णय चुकीचा आहे, हे सांगण्याची हिम्मत दाखविणारे हे न्यायमूर्ती आहेत.

टाइम्स ऑफ इंडियाच्या या लेखात प्लुरॅरिझम, प्लुरॅलिटी, हा शब्दप्रयोग जवळजवळ दहा वेळा आलेला आहे. त्याचा मराठी अर्थ होतो 'बहुविधता'. आपल्या देशात बहुविधता आहे, हे वाक्य बहुतेक सर्वांना पाठ असते. नुसते पाठ असते असे नाही, तर रोजच्या आपल्या जगण्याचा तो अनुभव असतो. अनेक भाषा बोलणारे, वेगवेगळया प्रकारचे पोशाख करणारे, वेगवेगळया प्रकारची शरीर ठेवण असणारे लोक आपल्या आजूबाजूला आपण रोजच पाहत असतो. त्यामुळे बहुविधता आहे, हा काही कुणाचा शोध नसतो, ती जगण्याची वास्तविकता असते.

ही बहुविधता असल्यामुळे प्रत्येकाला आपले मत मांडण्याचे स्वातंत्र्य असते. उपासना पध्दतीचे स्वातंत्र्य असते. समाजातील कोणताही एक गट यावर आपला एकाधिकार निर्माण करू शकत नाही. चंद्रचूड यांना असे म्हणायचे आहे की, मूल्यव्यवस्था यावर एकाधिकार निर्माण करता येत नाही. राज्यघटनेचा संबंध मुख्यतः राज्याशी येतो. राज्यघटनेच्या संदर्भात चंद्रचूड यांचे म्हणणे असे आहे की, राज्याची यंत्रणा वापरून विरोधी मतावर प्रतिबंध घालणे किंवा त्यांच्या मनात भीती निर्माण करणे किंवा भाषणस्वातंत्र्यावर लगाम घालणे या गोष्टी कायद्याचे राज्य या संकल्पनेला छेद देणाऱ्या आहेत आणि संविधानाने ज्या बहुविध समाजाची संकल्पना ठेवली आहे, त्यापासून दूर जाणारी आहे.

 

लोकशाहीचा सेफ्टी वॉल विरोधी मत व्यक्त करणे हा आहे. विरोधी मतांना दाबून टाकणे किंवा त्यांच्या मनात भीती निर्माण करणे, यामुळे व्यक्तिगत स्वातंत्र्यावर बंधने येतात. तसेच संवैधानिक नीतिमूल्यांवरदेखील आघात पोहोचतो, असे न्यायमूर्ती चंद्रचूड यांचे म्हणणे आहे. बहुविधतेला सगळयात मोठा धोका वेगळे मत दाबून ठेवण्याचा आहे. तसेच विरुध्द मत व्यक्त न करू देण्याचा आहे. प्लुरॅलिझम म्हणजे बहुविधतेला दुसरा धोका हे मानण्यात आहे की, एकसारखेपणा तयार झाल्याशिवाय राष्ट्रात ऐक्य निर्माण होऊ शकत नाही.

 

ही बहुविधता टिकण्यासाठी आपल्याच संविधानाच्या निर्मात्यांनी 'बंधुता' असा शब्दप्रयोग निर्माण केलेला आहे. त्याचा अर्थ होतो बंधुभाव आणि भगिनीभाव. केवळ समानता आणि स्वातंत्र्य येथेच न थांबता बंधुभावनेची जोपसना केली पाहिजे. न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी डॉ. बाबासाहेब यांना उद्धृत केले आहे. बाबासाहेब म्हणतात, ''बंधुतेशिवाय स्वातंत्र्य आणि समता नैसर्गिकरित्या निर्माण होणार नाही. ती निर्माण करण्यासाठी पोलीस दलाची आवश्यकता लागेल.'' तसे होऊ द्यायचे नसेल, तर सार्वत्रिक बंधुभावना निर्माण झाली पाहिजे. न्यायमूर्ती म्हणतात की, बहुविधता म्हणजे विविधतेला सहिष्णुतेने स्वीकारणे एवढेच नसून बहुविधता तिचा उत्सव आहे.

 

हा झाला थोडक्यात सारांश. माझ्यासारख्या संघ स्वयंसेवकाला यामध्ये काहीही नवीन वाटत नाही. माझ्यासारखा संघ स्वयंसेवक वर्षानुवर्षे हेच विचार ऐकत आलेला आहे आणि वर्षानुवर्षे बौध्दिक वर्गात मांडत आलेला आहे. गेल्या आठवडयात दिल्लीला सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्याबरोबर दिवसभर संभाषण वर्गात बसण्याचा योग आला. त्यांनी अगदी स्वच्छ शब्दात सांगितले की, आपला हिंदू विचार सर्वसमावेशक आहे, सर्वांना बरोबर घेऊन जाणारा आहे, एकशे तीस कोटी लोकांचा विचार आहे. कोणालाही वगळण्याचा विचार नाही, कोणालाही बाहेर काढण्याचा विचार नाही, कोणावरही काही लादण्याचा विषय नाही. एका सत्पुरुषाने ख्रिश्चन असलेल्या विदेशी माणसाने हिंदू होण्याची इच्छा दाखविली असता त्याला सांगितले की, आध्यात्मिक उन्नतीसाठी हिंदू होण्याची गरज नाही. तू तुझ्या पंथाचे श्रध्दापूर्वक पालन कर. तुझी आध्यात्मिक उन्नती होईल. ही आपली परंपरा आहे. त्यामुळे प्लुरॅलिझम हा काही आपल्याला नवा नाही, तो आपल्या डीएनएमध्ये आहे.

मग प्रश्न येतो कुठे? प्रश्न येतो दुसऱ्याला समजून घेण्याच्या मानसिकतेशी. आपल्या देशात, जसे न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी विचार मांडले आहेत, तसा विचार मांडणारी माणसे शेकडयाने आहेत. विचार दोन प्रकारे मांडता येतात. एक प्रकार असतो, शुध्द विचार मांडणे. विचार मांडत असताना मनात कोणालाही लक्ष्य न करणे. कोणाला आपल्याला सुनवायचे आहे, असा भाव नसणे. हा विचार अशा अशा प्रकारचा आहे, तो मला अशा अशा प्रकारे आकलन झाला, त्याचे पालन केले असता, या प्रकारे सर्वांचे कल्याण होईल. हा झाला शुध्द विचार मांडण्याचा मार्ग. दुसरी पध्दती असते, भव्य विचार तर मांडायचा, परंतु तो कुणाला तरी लक्ष्य करून मांडायचा. कुणाला तरी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून मांडायचा. लेकी बोले सुने लागे, अशा प्रकारे मांडायचा. बोलायचे एकापुढे आणि ऐकवायचे दुसऱ्याला.

 

ही झाली बौध्दिक चलाखी. बौध्दिक चलाखीमुळे विचाराची शुध्दता अशुध्द होते. तिला हेतू चिकटले जातात. बोलणाऱ्याची मानसिकता योग्य नाही, हे लक्षात येते. त्यामुळे अशा बोलण्याचे नैतिक मूल्य आपोआप कमी होते. दुसऱ्याला ऐकविले असता ज्याला आनंद होतो, ते स्तुती करू लागतात आणि ज्याला उद्देशून बोलणे झाले आहे, ते शिव्या देऊ लागतात. संघ विचारधारा देशाची मुख्य विचारधारा बनू पाहत आहे. याचा अर्थ काही नवीन विचार देशात उभा राहणार आहे, असे मुळीच नाही. जो मुळात सहिष्णू आहे, सर्वसमावेशक आहे, सर्वांचा सन्मान करणारा आहे, शुध्द मानवतावादी आहे, तो विचार देशाची मुख्य विचारधारा बनू पाहत आहे.

 

या विचाराशी अनेक प्रकारच्या हितसंबंधी लोकांचा संघर्ष आहे. अल्पसंख्यवाद्यांचा आहे, खिचडी संस्कृतीवाल्यांचा आहे. भारत एक राष्ट्र नसून अनेक राष्ट्रांचा समूह आहे, हे मानणाऱ्यांचा आहे. भारतात धर्मांतर करून एकधर्मीय भारत करणाऱ्या विदेशी धार्मिक मानसिकतेशी आहे. अशा वेळी आपल्याला बाजू घ्याव्या लागतात. तटस्थ राहता येत नाही. महाभारतात बर्बरीकची कथा आहे. हा भीमाचा नातू आहे. त्याला महादेवाकडून वररूपाने तीन बाण मिळालेले होते. ते महाशक्तिशाली होते. युध्दात तो अजेय होता. त्याने ठरविले की, ज्या पक्षाचा पराजय होताना दिसेल त्यात मी सामील होईल. कृष्ण त्याला म्हणाला की, तू ज्या पक्षात सामील होशील त्याच्या विरोधी पक्षाचा पराजय होणार. मग तुझ्या प्रतिज्ञेप्रमाणे पराजित पक्षात तुला जावे लागेल. असा तू एकसारखा चकरा मारत बसणार का? श्रीकृष्णाने त्याचे डोके मागितले. ते डोके उंच टेकडीवर ठेवून दिले. बर्बरिकाने सर्व युध्द पाहिले. युध्दात भाग न घेता. असे या वैचारिक संग्रामात करता येणार नाही.

 

आपण कोठे आहोत, याची जागा निश्चित करण्याचा हा क्षण आहे. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आहेत. न्यायदेवतेचे प्रतीक आहेत. ते न्यायाच्याच बाजूने उभे राहतील, असा विश्वास बाळगण्यास हरकत नाही.

 

vivekedit@gmail.com