भारताचे सामरिक महत्त्व वाढवणारा ट्रम्प दौरा

विवेक मराठी    29-Feb-2020
Total Views |

या दौऱ्यातील सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चेदरम्यान ट्रम्प यांनी एका अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्टीचा उल्लेख केला. भारताची भूमिका ही केवळ दक्षिण आशिया पुरती महत्त्वाची आणि मर्यादित नसून जागतिक राजकारणात सत्तासमतोल साधण्याचा प्रयत्न जो अमेरिका करत असते, त्यात भारताचा समावेश कसा करता येईल, या दृष्टीने अमेरिका प्रयत्न करणार असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. भारत आता अमेरिकेचा वैश्विक सर्वसमावेशक सामरिक भागीदार असणार आहे.

modi_1  H x W:

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दोन दिवसीय भारतदौरा नुकताच पार पडला. गेल्या आठ महिन्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांची ही पाचवी भेट होती. भारताच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वाचा होता. भारत- अमेरिका संबंध एका नव्या उंचीवर नेण्याचे काम ट्रम्प यांच्या या भारतभेटीने झाले आहे. वास्तविक गेल्या दोन-अडीच वर्षांपासून भारत ट्रम्प यांच्या भेटीच्या प्रतीक्षेत होता. भारताच्या प्रजासत्ताक दिनालाही त्यांना निमंत्रित करण्यात आले होते. परंतु डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यग्रातेमुळे त्यांना भारताला वेळ देता आला नाही. या वर्षी नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका पार पडणार असताना अत्यंत व्यग्रा वेळापत्रकातून वेळ काढून, तब्बल 18 तास प्रवास करून ट्रम्प यांनी केवळ आणि केवळ भारताचा दौरा केला, ही बाब उल्लेखनीय आहे. किंबहुना, त्यामुळे ही भेट ऐतिहासिक म्हणून नोंदवली जाणार आहे. ह्या भेटीचे वर्णन स्टँड अलोन म्हणून करता येईल. आजवर अमेरिकेचे सात राष्ट्राध्यक्ष भारत दौऱ्यावर येऊन गेले, त्यांनीही 18 तास प्रवास केला, परंतु त्या सातही राष्ट्राध्यक्षांनी भारताबरोबरच इतर राष्ट्रांना भेटी दिल्या. डोनाल्ड ट्रम्प यांच्याप्रमाणे त्यांनी कधीच फक्त भारताला भेट दिली नव्हती. 2006पर्यंत तर ज्या ज्या वेळेला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष भारतभेटीवर यायचे, तेव्हा ते पाकिस्तानला हमखास भेट द्यायचे. भारत व पाकिस्तान यांचा एकत्रित दौरा असेच त्यांच्या दौऱ्याचे स्वरूप असायचे. 2006नंतर हा प्रवाह खंडित झाला. बराक ओबामा यांनी त्यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या दोन्हीही टर्ममध्ये भारताला भेट दिली, तेव्हा ते पाकिस्तानात गेले नाहीत. 2015मध्ये ओबामांनी भारताबरोबरीने इंडोनेशिया, दक्षिण कोरिया या दोन देशांच्या भेटीला गेले होते. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी एक प्रकारे ही परंपराच तयार केली होती. ती ट्रम्प यांनी खंडित केली. रिपब्लिकन पक्षाच्या वर्धापन दिनालाही उपस्थिती न लावलेले ट्रम्प यांचे सहकुटुंब भारतभेटीवर येणे आणि इथे 36 तास इथे घालवणे यातून भारताचे अमेरिकेच्या दृष्टीकोनातून वाढत जाणारे सामरिक महत्त्व अधोरेखित होते.

आपल्या भारतदौऱ्यादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी मोटेरा स्टेडियमवरून केलेले भाषण, हैदराबाद हाऊसमध्ये झालेल्या चर्चा, करार, त्यानंतर सादर झालेले संयुक्त निवेदन या सर्वांमधून असे अधोरेखित झाले की गेल्या तीन वर्षांत त्यांनी भारतविरोधी अनेक निर्णय घेतले असले, तरीही त्यांचा भारताविषयीचा दृष्टीकोन सकारात्मक होता. त्यामुळेच कदाचित डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झाले, तर अमेरिका-भारत संबंधांना नवी कलाटणी मिळेल अशा स्वरूपाचे वातावरण या भेटीमुळे निर्माण झाले आहे. या भेटीदरम्यान अमेरिका-भारत यांच्यामध्ये अत्यंत महत्त्वाचे करार झाले असून त्यातील सर्वांत महत्त्वाचा करार होता तो तीन अब्ज रुपयांचा संरक्षण साधनसामग्राी खरेदी करार. भारत नौदलासाठी 24 एमएच 60 रेमिओ लष्करी हेलिकॉप्टर्स (2.12 अब्ज डॉलर्स) आणि भूदलासाठी एएच 64 श्रेणीतील सहा ई-अपाचे हेलिकॉप्टर्स (7.96 कोटी डॉलर्स) अमेरिकेकडून आयात करणार आहे. पर्वतीय भागात - विशेषतः भारत-चीन सीमेवर गस्तीसाठी रेमिओ हेलिकॉप्टरचा वापर होईल. हे अत्याधुनिक हेलिकॉप्टर शत्रूच्या उरात धडकी भरवणारे आहे. आजघडीला चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांकडे अशा प्रकारचे हेलिकॉप्टर नाही. या गुणवत्तेचे हेलिकॉप्टर केवळ अमेरिकाच निर्माण करते. फ्रान्स किंवा रशियादेखील याचे उत्पादन करू शकत नाहीत. असे हेलिकॉप्टर अमेरिकेने भारताला देण्याची तयारी दर्शवली आहे. त्याचप्रमाणे भारताबरोबर सध्या सुरू असलेल्या संयुक्त लष्करी कवायती या भविष्यात वाढवण्यात येणार आहेत. त्यामुळे भारताला संरक्षणदृष्टया अधिक मजबूत आणि सुसज्ज करणे हे अमेरिकेचे उद्दिष्ट आहे. सर्वात जमेची बाजू अशी की चीनची संरक्षणसज्जता अमेरिकेसाठी धोकादायक आहे, तशी भारताची संरक्षणसिध्दता अमेरिकेसाठी उपकारक आहे. त्यामुळे अमेरिका पूर्ण प्रयत्न करून भारताची संरक्षणसिध्दता वाढवण्याच्या प्रयत्नात आहे आणि ही अर्थातच भारतासाठी जमेची बाजू आहे.


modi_1  H x W:  

या दौऱ्यातील सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चेदरम्यान ट्रम्प यांनी एका अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्टीचा उल्लेख केला. भारताची भूमिका ही केवळ दक्षिण आशिया पुरती महत्त्वाची आणि मर्यादित नसून जागतिक राजकारणात सत्तासमतोल साधण्याचा प्रयत्न जो अमेरिका करत असते, त्यात भारताचा समावेश कसा करता येईल, या दृष्टीने अमेरिका प्रयत्न करणार असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. भारत आता अमेरिकेचा वैश्विक सर्वसमावेशक सामरिक भागीदार असणार आहे. आजवर भारत केवळ दक्षिण आशियातील विभागीय सत्ता राहिला होता; पण येणाऱ्या काळात जगाच्या राजकारणात आणि संपूर्ण आशिया खंडाच्या राजकारणात भारताचा समावेश होणार आहे, ही बाब नक्कीच कौतुकास्पद बाब आहे.

ट्रम्प यांनी यादरम्यान 'क्वाड'चाही उल्लेख केला. क्वाड म्हणजे चार. भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान या चार देशांचा गट सध्या आकाराला आला आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडून पहिल्यांदाच त्याचा उल्लेख झाला. संपूर्ण आशिया प्रशांत क्षेत्राचे संरक्षण करण्यासाठी या चार देशांनी कशा प्रकारे जबाबदारी पार पाडायची, या दृष्टीने क्वाडची निर्मिती करण्यात आली आहे. चीनच्या वाढत्या वर्चस्ववादाला शह देण्यासाठी तयार करण्यात आलेला हा गट आहे. या क्वाडमध्ये भारताची भूमिका कशी वाढली पाहिजे, हे या दौऱ्यात स्पष्ट करण्यात आले आहे. यापूर्वी हिंदी महासागराच्या संरक्षणासाठीच भारताचा विचार करण्यात आला होता. आता हिंदी महासागराबरोबर संपूर्ण आशिया खंडात भारताची भूमिका कशी वाढवता येईल, त्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा निर्णय झाला.


modi_1  H x W:  

भारतीय अर्थव्यवस्थेची तेलाची गरज मोठी आहे. ती पूर्ण करण्यासाठी आपल्याला जवळपास एकूण गरजेच्या 75 टक्के तेल आयात करावे लागते. सध्या अमेरिकेच्या निर्बंधांनंतर आणि दबावामुळे भारताने इराणकडून तेल आयात पूर्णतः थांबवलेली आहे. मुळात, पश्चिम आशियामध्ये सातत्याने तणावपूर्ण परिस्थिती असते, नागरी युध्द होतात, दहशतवादी हल्ले होतात, त्याचा परिणाम भारताला होणाऱ्या तेलाच्या पुरवठयावर होतो. त्यामुळे भारताने अमेरिकेकडून तेल आयात करायला सुरुवात केली आहे. अमेरिका हा भारताला तेलपुरवठा करणारा सहावा देश आहे. हा तेलपुरवठा आणि नैसर्गिक वायुपुरवठा आता येणाऱ्या काळात वाढवण्याचा अमेरिकेचा मनोदय आहे. वाजवी दरांमध्ये हे तेल मिळाले, तर भारतासाठीही ते उपकारकच ठरणार आहे. कारण पश्चिम आशियामध्ये काहीही गडबड झाली तरीही भारताला तेलझळा सोसाव्या लागणार नाहीत. भारताच्या आर्थिक विकासावर त्याचा परिणाम होणार नाही, ही मोठी शाश्वती भारताला यामधून मिळाली आहे. चौथा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भविष्यात भारताची अंतर्गत सुरक्षा सज्ज ठेवण्यासाठी अमेरिकेच्या गुप्तहेर संघटनांकडून त्याविषयीच्या सूचना मिळत राहणार आहेत. भारताच्या अंतर्गत आणि बाह्य अशा दोन्ही पातळयांवरील सुरक्षाव्यवस्थांसाठी पाकिस्तानच्या छुप्या कारवाया ही नेहमीची डोकेदुखी आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी या दौऱ्यात पाकिस्तानलाही सज्जड इशारा दिला. त्यांनी पहिल्यांदा पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद असा उल्लेख केला. तसेच भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी पाकिस्तानच्या भूमीवरून जो दहशतवाद पोसला जात आहे, तो थांबवण्यासाठी अमेरिका पाकिस्तानवर दबाव वाढवेल, अशी हमीही ट्रम्प यांनी दिली. हीदेखील भारतासाठी नक्कीच महत्त्वाची बाब आहे. त्याचप्रमाणे दोन्ही देशांदरम्यान एक मोठा व्यापार करार लवकरच पूर्णत्वाला जाईल, अशीही ग्वाही ट्रम्प यांनी दिली आहे.

 

गेल्या 20 वर्षांपासून भारत-अमेरिका संबंध सातत्याने विकसित होत आहेत. अमेरिकेत रिपब्लिकन पक्षाचा किंवा डेमोक्रॅटिक पक्षाचा राष्ट्राध्यक्ष असला, तरीही भारताशी असलेले संबंध सातत्याने विकसित होत आहे. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या संबंधात काही महत्त्वाच्या गोष्टी घडल्या असतील, तर त्या रिपब्लिकन पक्षाच्या सत्ताकाळातच झाल्या आहेत. जॉर्ज बुश राष्ट्राध्यक्ष असतानाच भारत आणि अमेरिका यांच्यातील आण्विक करार झाला. त्यामुळे ट्रम्प पुन्हा दुसऱ्या कार्यकाळात निवडून येतील, तेव्हा भारत आणि अमेरिका यांच्या संबंधामध्ये काही क्रांतिकारक बदल घडवून आणतील आणि या दोन्ही देशांची युती भविष्यात संपूर्ण आशिया खंडातील सत्तासमतोलाच्या राजकारणाला दिशा देणारी ठरेल, अशी अपेक्षा या दौऱ्यातून तयार झाली आहे.

लेखक परराष्ट्र धोरण विश्लेषक आहेत.