त्वचाविकार आणि होमिओपॅथी

विवेक मराठी    03-Feb-2020
Total Views |

***डॉ. सुबोध नाईक***

'नाही निर्मळ जीवन। काय करील साबण॥' - एखाद्या गोष्टीचा गाभाच जर चांगला नसेल, तर वरवरचे कोणतेही उपाय त्याला पूर्णांशाने सुधारू शकणार नाहीत. त्यासाठी आपल्याला तो गाभाच सुधारावा लागेल. जगद्गुरू तुकोबाराय ह्यांची ही ओवी होमिओपॅथी आणि त्वचाविकार ह्यांचा परस्परसंबंध यथार्थाने वर्णन करणारी! होमिओपॅथी त्वचाविकारांकडे कोणत्या नजरेने बघते, त्याच्यामागची शास्त्रीय मीमांसा काय, त्यासाठी होमिओपॅथी कशी मदत करते आणि वेगवेगळया त्वचाविकारांमध्ये होमिओपॅथिक औषधे काय विशेष मदत करतात, हे सर्व समजून घेण्यासाठी आपण सर्वात आधी एक छोटेसे उदाहरण बघू.

Homeopathy Treatment for

 

माझ्या दादरच्या दवाखान्यात आलेल्या, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात नामवंत असणाऱ्या त्या व्यक्तीने मला अगदी स्पष्ट शब्दात विचारले, ''डॉक्टर, जर तुम्ही मला खरंच काही मदत करू शकत असाल तरच सांगा, नाहीतर मी कंटाळलो आहे!'' त्यांच्या सगळया तपासण्या झाल्या होत्या, आजाराचे निदान व्यवस्थित झाले होते, झाडून सगळया चिकित्सापध्दतींची औषधे घेऊन झाली होती आणि तरीही गेली तीन वर्षे त्यांचा त्वचाविकार त्यांना त्रास देतच असल्याने ही निराशा आणि चीड येणे स्वाभाविकच होते. मी त्यांना खरी होमिओपॅथी म्हणजे काय, त्यांचा आजार म्हणजे नेमके काय, त्यांच्या आजाराचे नेमके कारण असे सगळे समजावून सांगितले. त्यांना औषधोपचार सुरू केला आणि अपेक्षेप्रमाणे फार थोडया दिवसांत त्यांचा त्रासही कमी झाला. त्वचेचा आजार असूनही बाहेरून लावायचे कोणत्याही प्रकारचे मलम वगैरे नाही, सगळी औषधे पोटातूनच तरीही आपण लवकर बरे झालो, ह्याचे त्यांनाच नवल वाटत होते. मग हे घडले कसे हेच आता आपण समजून घेऊ!

 आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

आपण आजारी का पडतो?

मानसशास्त्रातील 'fight or flight response' आणि शरीररचना आणि कार्य नियंत्रित करणारा 'psycho-neuro-endocrine axis' (मन-चेतासंस्था-ग्रांथीसंस्था अक्ष) ह्या दोन संज्ञांच्या आधारे आजारी पडण्याचे कारण आपण समजावून घेऊ. समाजशील असणाऱ्या माणसाचे घर, कार्यस्थळ आणि समाज ह्या तिन्ही पातळयांवर घर्षण होतच असते. त्यातून निर्माण होणारा ताण हा आधी चेतासंस्थेला उद्दीपित करतो. उद्दीपित चेतासंस्था वेगवेगळया ग्रांथींना (glandsना) उद्दीपित करते, वेगवेगळी आंतर्द्रव्ये (hormones) स्रवली जातात. एका मर्यादेपर्यंत हा ताणजन्य बदल शरीर सहन करू शकते आणि आरोग्य जपले जाते. पण जेव्हा हा ताण माणसाच्या सहनशक्तीपेक्षा वाढतो आणि किंवा परत परत येतो, तेव्हा सुरुवातीच्या काळात शरीराचे कार्य बिघडते, त्याला functional diseases (कार्य आजार) होतात आणि हळूहळू त्यांचे रूपांतर रचना आजारांत (structural diseases) होते. होमिओपॅथी आधुनिक वैद्यकशास्त्राच्या नजरेतून माणसाच्या आजारी पडण्याकडे अशा नजरेने बघते.

म्हणजेच निरनिराळी लक्षणे (signs and symptoms) एखाद्या अवयवात किंवा कार्यात असली, तरी तो आजार हा फक्त त्या अवयवाचा किंवा शरीरकार्याचा नसतो, तर पूर्ण माणसाचा असतो. आजारांकडे होमिओपॅथी पूर्णांगाने (Holistic concept) बघते हेच खऱ्या होमिओपॅथीचे खास वैशिष्टय!

शरीराचे बाह्यावरण असणारी, बाहेरील रोगजंतू, इतर आक्रमक इत्यादींपासून शरीराला वाचवणारी, शरीराचे उत्सर्जनकार्य (घाम वगैरे) करणारी, शरीराचे तापमान राखणारी, स्पर्शज्ञान देणारी, चरबी साठवून ठेवणारी, सौंदर्य राखणारी यासारखीच अनेक कामे करणारी त्वचा ही शरीराच्या रक्तसंस्थेशी, चेतासंस्थेशी (autonomic nervous systemशी), ग्रांथीसंस्थेशी निगडित असतेच. म्हणजेच माणूस आजारी पडण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अक्षाशी त्वचा संस्था जवळून संबंधित आहे. म्हणजेच त्वचाविकार हे केवळ त्वचेच्या लक्षणांपुरते (signs and symptoms) मर्यादित नसून त्याचा खोलवर शरीर आणि मन ह्या दोघांशीही संबंध आहेच. माणसाचा आहार, त्याचे राहणीमान, दैनंदिन स्वच्छतेच्या व इतर सवयी ह्याही ह्याच आजारांशी संबंधित आहेतच.

 

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

औषध देताना त्वचाआजाराचा इतका सखोल, विस्तारात (Holistic) विचार केल्यानंतरच होमिओपॅथी त्वचाआजार मुळापासून बरे करू शकत.

निरनिराळया प्रकारचा मानवी स्वभाव, निरनिराळया प्रकारचा ताण (- निराशा, संताप, भीती इत्यादी) आणि त्वचाविकारांची लक्षणे ह्यांच्या परस्परसंबंधांचा अभ्यास करणारेसुध्दा एक शास्त्र आहे - Psychodynamics. काही उदाहरणे बघू. एखाद्या घटनेमुळे वरचेवर होणारा जबरी संताप आणि त्वचेचा लालपणा (redness, excoriation इत्यादी) ह्यांचा जवळचा संबंध आहे. आयुष्यातील रस निघून जाणे आणि त्वचेचा पांढरेपणा (hypopigmentation) ह्यांचाही संबंध असल्याचे बऱ्याच वेळा लक्षात आले आहे. मनातला एखादा त्रास देणारा विचार विसरायचे आटोकाट प्रयत्न करूनही तो परत परत मनात डोकावत राहणे आणि त्वचेची खाज (itch) ह्यांचाही संबंध असू शकतो. सगळयाच वेळी हेच नियम सर्व रुग्णांना लागू होत नाहीत, त्यामुळे आपला आजार मुळापासून बरा करायचा असेल तर ह्या शास्त्राचा अभ्यास असणाऱ्या होमिओपॅथिक तज्ज्ञाचाच सल्ला घ्यावा, हे इथे मुद्दाम नमूद करतो.

होमिओपॅथिक चिकित्सापध्दती

माणसाला आजार कसा होतो हे समजून घेतल्यावर त्याच अंगाने होमिओपॅथिक औषधचिकित्सा केली गेली तरच रुग्ण मुळापासून बरा होईल हे वेगळे सांगायला नकोच. रुग्णाचा मूळ स्वभाव, त्याच्या आयुष्यात आलेला ताणतणाव, त्याचा त्याच्यावर झालेला दृश्य व अप्रत्यक्ष परिणाम, त्याचा आहार, विहार, निद्रा, मैथुन, स्वप्ने, त्याला पूर्वी झालेले आजार, त्याच्या रक्ताच्या नातेवाइकांना असणारे आजार (family and personal history of diseases), त्याच्या आजाराचा उगम, वाढ आणि कालावधी (origin, duration and progress) अशा सर्व बाबींचा सखोल अभ्यास केला जातो. त्याचे ताणतणाव आणि त्याचा आजार व त्याची लक्षणे ह्यांचा काही संबंध आहे काय, ह्याचा सखोल अभ्यास केला जातो. आणि मग ह्या सर्व गोष्टींचा विचार करून मग त्याचे औषध Constitutional medicine ठरवले जाते.

 

होमिओपॅथी ही एक व्यक्तिमत्त्व औषध चिकित्सापध्दती आहे. त्यामुळे सारखेच आजार असतील तरीही प्रत्येक माणसाचे त्यावरील औषध वेगवेगळे आहे. तसेच एका वेळी एकच औषध हा होमिओपॅथीमधील महत्त्वाचा नियम आहे, हेही लक्षात ठेवणे अत्यंत गरजेचे!

 

इतक्या सखोलपणे अभ्यास करूनच दिले गेलेले हे औषध त्याला लवकरात लवकर आराम द्यायला सुरुवात करते व त्यालाच मुळापासून बरे करते. हे औषध 'पूर्णांग' (Holistic) असल्याने त्याला बाकीच्याही आजारांमध्ये त्याच औषधाने आराम वाटायला सुरुवात होते. त्याची दुसरी काही औषधे चालू असतील तरीही हे औषध सुरू करता येते. गरजेनुसार अभ्यास करूनच ही इतर औषधे बंद केली जातात किंवा हळूहळू कमी केली जातात.

त्वचाविकार आणि होमिओपॅथी

अगदी लहानपणापासून ते वृध्दत्वापर्यंतच्या सगळया त्वचाआजारांत होमिओपॅथी उपयुक्त ठरतेच. कोणत्याही प्रकारे मलमे, टिंक्चर्स त्वचेवर लावण्यास होमिओपॅथीचा विरोधच आहे. बाहेरून काही लावले आणि होणारा त्रास कमी झाला म्हणजे आजार बरा झाला, असे होमिओपॅथी मानत नाही. बाहेरून काही लावले आणि बरे वाटले, तरी तो आजार दाबला गेला असल्याची शक्यता असू शकते. औषध दिल्यावर आजार खरोखरीच बरा झाला आहे की फक्त लक्षणांमध्येच आराम पडला आहे, हे पडताळून पाहण्यासाठीसुध्दा होमिओपॅथीचे नियम (हेरिंग लॉ ऑफ क्युअर) आहेत.

 आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

आजार बरा होण्याऐवजी दाबला गेला, तर तो आजार आणखी गंभीर अशा दुसऱ्या आजाराच्या रूपात बाहेर पडतो असेच निरीक्षणात आले आहे. Suppression of Disease ह्या संज्ञेखाली होमिओपॅथीत ह्याविषयी बरेच विस्तारात लिहिले गेले आहे. होमिओपॅथीत 'suppression of skin ailments from' ह्यासाठीसुध्दा औषधे आपल्याला आढळतात. वेगवेगळया आजारांच्या इतर चिकित्सापध्दतीतील औषधोपचारामुळे आपल्याला कित्येकदा येणारा घाम बंद किंवा कमी झाला आहे असे आढळते. घाम हा एक उत्सर्जित पदार्थ आहे. त्याचेच उत्सर्जन बंद झाले की त्यापासूनही वेगवेगळे आजार होऊ शकतात, कारण तेव्हा आपण नैसर्गिक प्रक्रियेत ढवळाढवळ करत असतो. घाम कमी होण्यासाठी वेगवेगळे प्रकार अवलंबणाऱ्या लोकांनी हे मुद्दाम लक्षात घेतले पाहिजे. होमिओपॅथीत 'suppression of perspiration' ह्याचाही विचार केला आहे आणि त्यासाठी औषधेसुध्दा नमूद केली गेली आहेत.

अलीकडे कित्येकदा वेगवेगळया मलमांमध्ये स्टिरॉइड्स असतात. त्याचे वेगवेगळे दुष्परिणाम असतातच. तसेच बऱ्याचदा त्यामुळे आजार दाबलासुध्दा जातो, जो नंतर आणखी गंभीर स्वरूपात बाहेर पडतो. लहान मुलांमध्ये आढळणारा atopic dermatitis आजार जर दाबला गेला, तर बऱ्याचदा ह्या मुलांना पुढे श्वसनमार्गाचे आजार झाल्याचे निदर्शनास आले आहे. ह्या मुलांना होमिओपॅथिक उपचार दिल्यास असे होत नाही.

थोडक्यात त्वचाविकार बरे करण्यासाठीची औषधेसुध्दा पोटातूनच घेतली गेली पाहिजेत.

 

वरचेवर उभारणारे पित्त (urticaria) हा एक मनाशी जवळचा संबंध असणारा आजार. संताप (anger), vexation, disappointment अशा भावनांचा आणि ह्या त्रासाचा जवळचा संबंध आहे असे निरीक्षणात आले आहे. आणि त्याचा अभ्यास करून होमिओपॅथिक औषध दिले गेले, तर हा त्रास खूप लवकर बरा होतो.

केस गळण, केस लहान वयातच पांढरे होण्यास सुरुवात होणे, मुरुमे, पुटकुळया (Acne and pustules), त्यामुळे चेहऱ्यावर खड्डे पडणे, त्याच्याभोवती लाल चट्टा पडणे (excoriation), वेगवेगळया पदार्थांच्या संपर्कामुळे व अज्ञात कारणामुळे होणारे contact dermatitis (बोलीभाषेत आपण त्याला ऍलर्जी म्हणतो) असे बरेच आजार तरुण वयात जास्तच त्रास देणारे. वरील पध्दतीने होमिओपॅथिक उपचार केल्यास ते आपण लवकरात लवकर बरे करू शकतो.

तसेच अलीकडे मोठया प्रमाणात आढळणारा एक आजार म्हणजे 'पॉलीमॉर्फिक लाइट इरप्शन्स' - सूर्यप्रकाशातील अतिनील (ultraviolet) किरणांमुळे त्वचेवर उठणारी ऍलर्जी ह्या आजारावर तर कमीतकमी काळात आपण होमिओपॅथीने नियंत्रण आणू शकतो.

त्वचाविकार बरे झाल्यावर होणारे hypopigmentation किंवा hyperpigmentation (तिथली त्वचा जास्त काळी पडणे किंवा जास्त पांढरी पडणे) हेही आपण होमिओपॅथीच्या साहाय्याने बरे करू शकतो.

तसाच मोठया प्रमाणात त्रास देणारा एक आजार म्हणजे सोरायसिस. हा एक ऍंटीजेन-ऍंटीबॉडी आजार आहे - म्हणजे शरीरच शरीराच्या विरोधात काही प्रतिद्रव्ये तयार करते. 'कुंपणानेच शेत खावे' अशा प्रकारचा हा आजार व्हावा यासाठी मानसिक ताण किती कारणीभूत असेल हे वेगळे सांगायला नकोच. तिथे वरील पध्दतीने विचार करून दिले गेलेले होमिओपॅथिक औषध आजार लवकर आटोक्यात आणण्यास खूपच छान मदत करते. ह्या औषधांत स्टिरॉइड वगैरे नसतेच, त्यामुळे आजार दाबला जात नाही, तर तो आटोक्यात येतो आणि पुढे होऊ शकणाऱ्या सोरायटिक आर्थ्रोपॅथीची शक्यताही पूर्णपणे मावळते.

लायकेन प्लॅनस हा तसाच एक दुसरा आजार. हा आजार तर पूर्णपणे मानसिक ताणाशी संबंधित आहे. रिकाम्या वेळात आपला हात जिथे सहज पोहोचतो, अशा ठिकाणी - म्हणजे गुडघा किंवा पायाचा घोटा अशा ठिकाणी माणूस सहज खाजवत जातो, तिथला भाग हळूहळू लाल होतो, खाज वाढत जाते आणि मग तो भाग चामडयासारखा होतो! ह्या आजारावरसुध्दा होमिओपॅथिक औषध वेगाने काम करते.

 

दुसरा एक आजार म्हणजे मस (warts. HPV नावाच्या विषाणूच्या प्रादुर्भावाने हा त्रास होतो. एरवी ह्या चामखिळी कापून टाकल्या जातात. पण मग परत परत दुसऱ्या ठिकाणी येतात. होमिओपॅथिक औषधाने ह्या विषाणूंवरच हल्ला केला जात असल्याने तो आजार मुळापासून बरा होतो. पायावर येणारी भोवरी ह्या आजारातसुध्दा होमिओपॅथिक औषध उत्तम रीतीने मात करते.

 

कोणताही आजार झाल्यावर माणूस त्या आजारावर विचार करणे सुरू करतो. ह्या विचार करण्यामुळे एरवी तोच आजार बरा व्हायला वेळ लागतो. पण वरील पध्दतीने होमिओपॅथिक औषध देताना मनाचाही विचार केला गेला असल्याने हे औषध तो ताणही दूर करतेच, ज्यामुळे वेगाने आजार बरा होण्यास मदत होते. थोडक्यात, कोणताही त्वचाविकार असो, लवकरात लवकर योग्य होमिओपॅथिक तज्ज्ञाशी संपर्क साधावा. अर्थात प्रत्येक शास्त्राला जशा विशेषता आणि मर्यादा' असतात, तशा होमिओपॅथीलादेखील आहेत. त्यामुळेच ह्या बाबतीत डॉक्टरांशी मोकळेपणाने बोलून त्यांच्याकडून आपला आजार समजून घेणे, त्याबद्दलचे मार्गदर्शन घेणे व उपचार सुरू करणे ही बरे होण्याची पहिली व अत्यंत महत्त्वाची पायरी आहे.

 

9930988433