गोरेपणाचा रोग

विवेक मराठी    05-Feb-2020
Total Views |

***प्रा. मंजिरी घरत***

पृथ्वीतलावर सौंदर्याचा प्रमुख निकष गोरेपण, हा काळा विचार फक्त भारतातच नाही, तर जगाच्या बाकी काही भागातही हे लोण पसरलेले आहे. नितळ सौंदर्य म्हणजे निरोगी त्वचा, ही सौंदर्याची व्याख्या सर्वत्र धुसर होतानाच दिसत आहे. भरीस भर म्हणजे गोरे असण्याच्या अतिरेकी जाहिरातींचा भडीमार प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मिडियावर होताना दिसतो. गोरं होण्यासाठी अनेकानेक जीवघेणे प्रयोग करताना ही मंडळी दिसतात.

gore_1  H x W:

नायजेरियात 77 टक्के स्त्रिया त्वचा उजळण्यासाठी कॉस्मेटिक्स वापरतात, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालात नमूद केले आहे. नायजेरिअन स्त्रिया अगदी रस्त्यावरसुध्दा सौंदर्यप्रसाधने खरेदी करतात. त्या उत्पादनांचा दर्जा वगैरेपेक्षा इन्स्टंट इफेक्ट आहे का, मी गोरी होणार का? हा विचार त्यांना महत्त्वाचा असतो. एकंदर आफ्रिकेत 25% ते 80% स्त्रिया, आशियाई देशात 40% स्त्रिया गोरेपणाची क्रीम्स वापरतात, हे वाचनात आल्यावर नवल वाटले. पण या पृथ्वीतलावर सौंदर्याचा प्रमुख निकष गोरेपण हा काळा विचार फक्त भारतातच नाही, तर जगाच्या बाकी काही भागातही हे लोण पसरलेले आहे, हे पाहून जरा बरे वाटले. गोरेपान युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, काळीभोर आफ्रिका आणि यातील मध्य म्हणजे उजळ, गव्हाळवर्णी आशिया अशी जगातली वैशिष्टयपूर्ण रंगांची विभागणी. भारतात पूर्वीपासूनच 'सुंदर मी होणार' या संकल्पनेत पहिला विचार असतो तो म्हणजे गोऱ्या रंगाचा. गोरी बायको हवी ही अपेक्षा मॅट्रिमोनिअलच्या जाहिरातीत देताना कुठेही आपल्याला चुकीचे वाटायचे नाही. शिक्षणाचा प्रसार, जागतिकीकरण होऊनसुध्दा भारतात हा snow व्हाइट सिन्ड्रोम कायम आहे, आणि गम्मत म्हणजे इतरही देशात आता हे फॅड वाढते आहे. अमेरिकेतसुध्दा - हो, चक्क गोऱ्यापान अमेरिकेतही त्वचा उजळवणारी अनेक क्रीम्स विकली जातात.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

आपल्याकडे पूर्वापार काळा रंग म्हणजे कमीपण, लग्न जमताना अडचणी वगैरे सार्वत्रिक मानसिकता होतीच. साधारपणे 1970च्या दशकात फेअर ऍंड लव्हली हे क्रीम बाजारात आले आणि कॉस्मेटिक सदरातील या उत्पादनांची सुरुवात झाली, असे म्हणता येईल. तोपर्यंत हळद, केशर, दूध, चंदन असे अनेक घरगुती पदार्थ आपण ऐतिहासिक काळापासून त्वचा सतेज, सुंदर होण्यासाठी किंवा रंग उजळण्यासाठी वापरत होतोच. गेल्या साधारण दोन दशकांत फेअरनेस क्रीम्सची, फेस वॉशची लाट आली. बाजारामध्ये खपतेय, ही मागणी बघून उत्पादकांनी अनेक क्लृप्त्या करत बाजारपेठ काबीज केली - नव्हे, त्याच्या अत्यंत आक्रमक जाहिरातींनी प्रिंट मीडिया, TV भरून गेले. या उत्पादनांनी खरेच माझा मूळचा रंग बदलेल का? या साऱ्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात? हे वापरणे योग्य का अयोग्य? डॉक्टरांना विचारूनच वापरावे की स्वमनाने वापरात राहावे? अशा कुठल्याही शंका न घेता, सारासार विचार न करता जाहिरातींच्या प्रभावाखाली आणि त्याच त्या सुंदर म्हणजे गोरे या मानसिकतेत गोरेपणाची क्रीम्सचा धो धो खप होत राहिला. हे बघून साधारण 15 वर्षांपूर्वी पुरुषासाठीही बाजारामध्ये अशी क्रीम आणण्याचा स्मार्टपणा उत्पादकांनी केला.

gore_1  H x W:

काळसर व्यक्तीला दुःखी दाखवणे, अपयशी, नाराज, दाखवणे आणि मग तो अशी प्रॉडक्ट्स वापरल्यावर गोरा/गोरी होऊन अधिक आत्मविश्वास, अधिक यशस्वी होतो किंवा लग्न झटपट जमते वगैरे दाखवणाचा अतिरेक जाहिरातींमध्ये चालू झाला. चेन्नईमधील वूमन ऑफ वर्थ या गटाने 'डार्क इज ब्युटिफुल' अशी मोहीमच चालू केली, शाहरुख खान असलेली फेअर ऍंड हँडसम या गोरेपणाच्या क्रीमच्या जाहिरातीला प्रखर विरोध केला. समाजाच्या अनेक थरांतून लोक अशा अपमानकारक जाहिरातींबद्दल बोलू लागले. Advertising स्टँडर्ड काउन्सिल ऑफ इंडियाने दाखल घेत अशा प्रकारे काळे-गोरे भेदभाव करणाऱ्या, काळा रंग नकारात्मक पराभूत प्रकारे जाहिरातींत दाखवण्यास मनाई केली. जाहिरातीत काळया रंगांप्रती विषमता दाखवण्यास मनाई झाली खरी, तरी मनातून तसे विचार हद्दपार होण्यास किती काळ लागेल कुणास ठाऊक! कारण अशा कॉस्मेटिकसचा खप दिवसागणिक वाढत आहे आणि त्यात नवनवीन उत्पादनांची भर पडत आहे. भारतात बाजारपेठेमधील एकूण स्किन प्रॉडक्ट्सपैकी 50% गोरेपणाशी संबंधित उत्पादने आहेत.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/ 

आता मुख्य प्रश्न असा की अशी क्रीम्स वापरून आपण खरेच गोरे होतो का? आणि ही उत्पादने सुरक्षित आहेत का? सुरुवातीस बाजारात आलेल्या क्रीम्समध्ये मुख्यतः नियासिनामाइड (Niacinamide - व्हिटॅमिन ब-3चा प्रकार) आणि ऍलेन्टॉइन (allantoin - त्वचेचा दाह, irritation कमी करणारे) यासारखे घटक होते, जे मेलॅनिन नावाचे जे त्वचेच्या रंगासाठीचे रंगद्रव्य आहे, त्याचे प्रमाण कमी करते आणि जिथे त्वचेवर खूप पिगमेंटेशन आहे, काळे डाग, वयानुसार आलेले डाग आहेत ते कमी होऊन त्वचा थोडी उजळते, पिगमेंटेशन कमी होते. ही उत्पादने फारशी धोकादायक अशी नव्हती, जरी ती एखाद्या काळयाचा कायमस्वरूपी पूर्ण गोरा रंग करणारी नव्हती. पण नंतर मात्र ब्लीचिंग agents, त्वचादाह कमी करणारी औषधे आणि अत्यंत प्रभावी आणि म्हणूनच काळजीपूर्वक वापरायची स्टिरॉइड्स असलेली क्रीम्ससुध्दा गोरेपणासाठी वापरणे चालू झाले. हायड्रोक्विनोन (hydroquinone), ट्रेटिनॉइन आणि स्टिरॉइड्स असलेली क्रीम्स, जी मेलासमा किंवा इतर काही विशिष्ट त्वचाविकारांवर डॉक्टरी सल्ल्यानेच वापरायची, तीसुध्दा झटपट गोरेपान होण्यासाठी वापरायली जाऊ लागली, नव्हे, तशा त्याच्या जाहिराती चालू झाल्या. मध्ये पुरुषांसाठीच्या एका Fairness क्रीमच्या जाहिरातींना नुसता ऊत आला होता आणि त्यात स्टिरॉइड होते. स्टिरॉइड म्हणजे हे उत्पादन औषध वर्गवारीत मोडते, पण तरी ते सौंदर्यप्रसाधन असल्यासारखी बिनदिक्कत जाहिरात चालू होती. जाहिरात इतकी आकर्षक आणि दिशाभूल करणारी होती की झटपट गोरे होण्याची घाई झालेल्या तरुणांनी ते क्रीम दिवसातून एकदा, दोनदा लावण्याचा सपाट लावला. क्रीम लावल्यावर सुरुवातीस उजळला चेहरा, नंतर काळा पडणे, डाग पडणे असे प्रकार झाले. अनेक जागरूक फार्मासिस्ट्स, त्वचाविकारतज्ज्ञ यांनी तक्रारी केल्या. अन्न आणि औषध प्रशासनाने कारवाई केली. यथावकाश जाहिराती बंद झाल्या. पण समाज माध्यमांमध्ये हे चालूच राहते.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/ 

काही वर्षांपूर्वी दिल्लीच्या सेंटर फॉर सायन्स ऍंड एन्व्हायरमेंटने 73 Fairness क्रीम्सचा अभ्यास केला आणि त्यातील 40% क्रीम्समध्ये पारा (मर्क्युरी), क्रोमियम यासारख्या जड धातूंचे प्रमाण बरेच आढळले. सर्व जड धातू एका विशिष्ट प्रमाणापेक्षा अधिक प्रमाणात असतील, तर ते आरोग्याला अत्यंत धोकादायक ठरू शकतात. मूत्रपिंडे निकामी होणे, त्वचाविकार किंवा कर्करोगाची शक्यता वाढणे असे विपरीत परिणाम होऊ शकतात. आपल्याकडे मर्क्युरीखेरीज इतर जड धातूंच्या प्रमाणाची मर्यादाच ठरवलेली नव्हती. सेंटरच्या पाहणीनंतर निदान इतके तरी झाले की सर्व जड धातूंच्या प्रमाणाच्या मर्यादेसाठी निकष ठरवले गेले. ते सर्व उत्पादक कसोशीने पाळतात का? हे नक्की सांगू शकत नाही. स्टिरॉइड्स असलेली क्रीम्स वापरल्यास सुरुवातीस त्वचा उजळते थोडीशी. पण नंतर काळी पडते, तसेच त्वचा पातळ होणे, काही ठिकाणी त्वचाला भेगा पडणे, त्यामुळे विषारी द्रव्यांना शरीरात प्रवेश मिळण्याचा मार्ग सुकर होणे, चेहऱ्यावर केस येण्याचे प्रमाण वाढणे, त्वचा कोरडी होणे, खाज येणे असे अनेक दुष्परिणाम होतायत. स्टिरॉइड्सच्या सातत्याने केलेल्या वापराने त्वचा सूर्यप्रकाशाला अत्यंत संवेदनशील होते, त्यामुळे स्टिरॉइड लावलेले क्रीम लावून दिवस उन्हात बाहेर पडले की त्वचा लगेच काळवंडते. सूर्यकिरणांचे अधिक घातक परिणाम होऊ शकतात. (त्वचेच्या कर्करोगाची शक्यताही यात येते.) हायड्रोक्विनोन hydroquinone हे मेलॅनिनची त्वचेमध्ये होणारी निर्मिती कमी करते आणि पिगमेंटेशन कमी करते, त्यामुळे त्वचा उजळते. पण त्याच्या साइड इफेक्ट्सच्या शक्यतेमुळे युरोपमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये त्याच्या वापरावर अनेक मर्यादा घातल्या आहेत, काही ठिकाणी त्यावर बंदी आहे. एकंदर कोणत्याही ब्लिचिंग एजन्ट असलेल्या, स्टिरॉइड असलेल्या क्रीममुळे त्वचा काळयाची गोरी कायमची होत नाही. तात्पुरता उजळपणा येऊ शकतो, पण त्यानंतर दुष्परिणामच अधिक भोगावे लागतात.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/ 

अलीकडे ग्लुटाथायोन (Glutathione) या ऍंटी-ऑक्सिडंटच्या गोळया आणि क्रीम त्वचा उजळण्यासाठी वापरतात. ग्लुटाथायोन ऍंटी-ऑक्सिडंट असल्याने शरीरात निर्माण होणाऱ्या फ्री रॅडिकल्सना (जे शरीरात अनेक विपरीत परिणाम करत असतात आणि अनेक रोगांचे मूळ असतात) थोपवतात, प्रतिकारशक्ती वाढवतात आणि शरीर डिटॉक्सिफाय करण्यास मदत करतात. मेलॅनिनचे प्रमाणही कमी करतात. या साऱ्याचा संयुक्त परिणाम म्हणजे त्वचा सुधारते, उजळते. पण याचाही उपयोग तात्पुरता दिसतो. ग्लुटाथायोन कायमस्वरूपी घेतल्यास साइड इफेक्ट्स होऊ शकतात आणि त्याविषयी अजून पुरेसे संशोधन झालेले नाही. बाजारात अनेक डी-टॅन क्रीम्स, लोशन्स आहेत, त्यात अगदी ब्लूबेरी वगैरे नैसर्गिक घटकही असतात. काळवंडलेली त्वचा तात्पुरती उजळण्यास याने मदत होते. याचे काही साइड इफेक्ट्स होतात का, किंवा सर्व उत्पादने उत्तम दर्जाची आहेत की त्यात काही हानिकारक घटक आहेत, लेबलवर सर्व घटक नमूद केले आहेत ना (कायद्याप्रमाणे तसे करणे गरजेचे असते) हे प्रश्न आहेतच. त्यामुळे कोणतीही अशी प्रॉडक्ट्स वारंवार वापरण्यापूर्वी त्वचारोगतज्ज्ञांना विचारणेच योग्य.


थोडक्यात महत्त्वाचे -



* मुळात गोरेपण म्हणजे सुंदर हे चुकीचे समीकरण मनातून पुसले गेले पाहिजे. जे नैसर्गिक, जे आरोग्यपूर्ण ते सुंदर, हे मनावर ठसले पाहिजे.

* वारंवार लावायची गोरेपणासाठीची कॉस्मेटिक उत्पादने वापरून मूळचा रंग कायमचा बदलण्यामागे लागणे म्हणजे केवळ मृगजळामागे धावणे आहे, तेही पैशाचा अपव्यय करत आणि शरीरावर अत्याचार करत.

* पिगमेंटेशन होण्याची अनेक कारणे असतात - लठ्ठपणा, हॉर्मोनल असंतुलन, काही औषधांचे साइड इफेक्ट्स अशी कारणे असू शकतात. त्यामुळे फेअरनेस क्रीम ही वरवरची मलमपट्टी, हा काही उपाय नव्हे, तर मूळ कारणावर इलाज करावा लागतो, जो केवळ तज्ज्ञ डॉक्टरच करू शकतात.

* जाहिरातींना भुलून स्वमनाने क्रीम्स वापरत स्वतःवर प्रयोग नुकसानीचेच. उगाच विकतचे दुखणे घेण्यात काय हशील? असे प्रयोग करून आहे तो मूळचा चेहरा विद्रूप करून घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे.

* त्वचा काळी (आहे त्या मूळच्या रंगापेक्षा) पडू नये, यासाठी पारंपरिक घरगुती उपाय, व्यायाम, समतोल आहार, पोट साफ असणे महत्त्वाचे.

* चेहरा काळवंडू नये, म्हणून उन्हात जाताना फिजिकल सन स्क्रीन - म्हणजे छत्री, डोक्याला पूर्ण बांधलेला रुमाल (पुणे स्टाइल) हे सर्वोत्तम उपाय आहेत, हे सगळया डॉक्टरांचे स्पष्ट मत आहे.



 आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

symghar@yahoo.com