स्वप्नपूर्तीच्या दिशेने...

विवेक मराठी    07-Feb-2020
Total Views |

सुदैवाने राष्ट्रभावनेला सर्वोच्च प्राधान्य देणारे शासकही आज केंद्रीय सत्तेत असल्यामुळे न्यायालयाने कौल दिल्यानंतर फार वेळ न दवडता आता न्यासाची घोषणा करण्यात आली आहे. ही सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन लवकरच श्रीरामाच्या भव्य मंदिराची निर्मिती सुरू झालेली आपल्याला दिसेल.

'सौगंध राम की खातें है, हम मंदिर वहीं बनाएंगे..' स्वत्वाच्या अभिमानाचं स्फुल्लिंग जागृत करणारी ही घोषणा देत, रामजन्मभूमीवर श्रीरामाचं भव्य मंदिर उभारण्याचं स्वप्न या देशातील हिंदूंच्या तीन पिढयांनी उराशी बाळगलं. त्या स्वप्नाची पूर्तता होण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचं पाऊल श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या स्थापनेद्वारे पडलं आहे. अर्थात, हे पाऊल पडण्यापूर्वीची सारीच वाटचाल ही संघर्षाची, काटयाकुटयांची आणि अनंत अडचणींची होती, हे आपण सर्व जण जाणतोच. म्हणूनच, प्रत्येक राष्ट्राभिमानी हिंदूसाठी हा क्षण आत्यंतिक आनंदाचा, अभिमानाचा आणि मुख्य म्हणजे स्वप्नपूर्तीच्या दिशेने आश्वासक वाटचाल होण्याचा क्षण आहे.

ram mandir_1  H

कोटयवधी भारतीय नागरिकांच्या हृदयांत रामाचं स्थान हे केवळ एका दैवतापुरतं मर्यादित नसून राम हे या भारतवर्षाच्या राष्ट्रीय अस्मितेचं प्रतीक आहे. आसेतुहिमाचल पसरलेल्या आणि कित्येक भाषा-बोली, जाती-जमाती, भौगोलिक विविधतेने नटलेल्या या भारतातील ठिकठिकाणच्या परंपरा, चालीरिती, साहित्य-कला, मूल्यं-संस्कार यांमध्ये राम हे खोलवर रुजलेले आहेत. आदर्श, कल्याणकारक, सुजलाम-सुफलाम राज्याला आपण 'रामराज्य' म्हणतो. येता-जाता भेटणाऱ्यास आपण 'राम राम' म्हणतो, तर व्यक्तीच्या अंतिम संस्कारांच्या वेळीही आपल्याकडे रामनामाचाच जप केला जातो. राम हा आपल्यासाठी आदर्श राजा, आदर्श पुत्र, आदर्श बंधू, आदर्श योध्दा, आदर्श राजकारणी, आदर्श मित्र आणि असा अनेक बाबतींत 'आदर्श' मानण्यात आलेला आहे. इतक्या प्रचंड विविधतेने समृध्द असलेल्या भारतवर्षाला एकत्र आणण्यास, या राष्ट्राची राष्ट्रभावना जागृत ठेवण्यास जे काही घटक कारणीभूत ठरतात, त्या घटकांत 'राम'नाम अग्राक्रमाने घ्यावं लागतं. म्हणूनच, राम हे भारताच्या अस्मितेचं प्रतीक ठरतं आणि आपण ज्या अयोध्येस रामाचं जन्मस्थान मानतो, ते स्थान व त्यावरील रामाचं प्रस्तावित मंदिर हे केवळ एखाद्या हिंदू मंदिरापलीकडे जाणारं एक राष्ट्रीय स्मारक ठरतं.


आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/ 
 शेकडो वर्षांपूर्वी परकीय आक्रमकांनी आपल्या भूमीत पाऊल ठेवत इथल्या प्रतीकांचा भंग करून या समाजाचा तेजोभंग करण्याचा प्रयत्न केला. त्यातूनच अयोध्येत रामजन्मभूमीवर मंदिराऐवजी ती वास्तू उभी राहिली. परंतु समाजाचा तेजोभंग झाला नाही. काही वर्षांनंतर का होईना, दक्षिणेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने श्रीरामाच्याच पावलावर पाऊल ठेवून चालणारा आदर्श राजा निर्माण झालाच. थोडक्यात, वारंवार प्रयत्न करूनही राम हे मूल्य आणि त्यामागील राष्ट्रभावना परकीय आक्रमकांना नष्ट करता आली नाही. स्वतंत्र, सार्वभौम, प्रजासत्ताक भारतात या देशातील बहुसंख्य प्रजेच्या भावनेला न्याय मिळावा आणि श्रीरामाचं एक भव्य स्मारक - अर्थात राममंदिर हे त्याच्या जन्मस्थानी उभं राहावं, अशी स्वाभाविक अपेक्षा इथल्या बहुसंख्य समाजाने व्यक्त केली. परंतु दुर्दैवाने आपल्याच स्वकीय शासकांनीही या राष्ट्रभावनेची अवहेलना करण्याचंच धोरण अवलंबलं. परिणामी पुढे काय झालं, हे आपण जाणतोच. या देशातील असंख्य भाषांत-जातीपातींत विभागला गेलेला हिंदू समाज एका रामनामाच्या माध्यमातून एकत्र आला, 'होय, मी हिंदू आहे' असं अभिमानाने सांगणारा आणि माझ्या श्रध्देचा सन्मान होऊन भव्य राममंदिर उभं राहावं, अशी एकमुखाने मागणी करणारा कोटयवधींचा समुदाय एक झाला. आपल्या शासकांनी आपल्याच राष्ट्रप्रेमी जनतेवर लाठया चालवल्या, गोळया झाडल्या, कारसेवकांच्या रक्ताने शरयूचं पाणी लाल झालं, परंतु संघर्ष थांबला नाही. सहिष्णू, शांत, संयमी हिंदूंच्या सहनशीलतेचा अखेर अंत झाला आणि बाबरी ढाच्याचं पतन झालं. या देशात राहूनही परकीय विचारांच्या ओंजळीतून पाणी पिणाऱ्या आपल्या कथित बुध्दिवाद्यांनी, विचारवंतांनी ही घटना मात्र स्वतंत्र भारताच्या इतिहासातील काळी घटना म्हणून नोंदवली. कोठारी बंधूंवर चालवल्या गेलेल्या गोळयांची, शेकडो कारसेवकांवर झालेल्या अत्याचारांची नोंद यापैकी कुणाला घ्यावीशी वाटली नाही, पण एक ढाचा पडला ही मात्र काळी घटना ठरली. आजही राज्यशास्त्राचे अभ्यासक म्हणवणारे लोक 'रामजन्मभूमी आंदोलन' असा शब्दप्रयोग न करता मोठया हुशारीने केवळ 'बाबरीचं पतन' याच गोष्टीचा उल्लेख करतात. यातून शेकडो वर्षांचा संघर्ष मागे पाडतो आणि लक्षात राहते ती एका दिवसात घडलेली एक घटना. आपल्याच समाजाचा बुध्दिभेद करण्याचा असा हा प्रयत्न मोठया चलाखीने काही मंडळी करताना दिसतात. हे असे असंख्य प्रयत्न होऊनही, पुन्हा एकदा ते अपयशीच ठरले आणि भारताच्या सर्वोच्च न्यायालयानेही श्रीरामाच्या, पर्यायाने या देशातील बहुसंख्य जनतेच्या राष्ट्रभावनेच्याच बाजूने कौल दिला.


सुदैवाने राष्ट्रभावनेला सर्वोच्च प्राधान्य देणारे शासकही आज केंद्रीय सत्तेत असल्यामुळे न्यायालयाने कौल दिल्यानंतर फार वेळ न दवडता आता न्यासाची घोषणा करण्यात आली आहे. ही सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन लवकरच श्रीरामाच्या भव्य मंदिराची निर्मिती सुरू झालेली आपल्याला दिसेल. अर्थात, यामध्येही अडथळे आणण्याचे प्रयत्न काही किरकोळ मंडळी करतीलच. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासात अमुक जातीचेच लोक का, अमुक जातीचे का नाहीत वगैरे गरळ काही मंडळींनी ओकली आहेच. परंतु इतकी वर्षं उराशी बाळगलेलं स्वप्न पूर्ततेच्या दिशेने वाटचाल करत असताना अशा स्थितीत सकल हिंदू समाज अशा क्षुल्लक मंडळींना थारा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तूर्तास, न्यास स्थापनेच्या या निर्णयाबद्दल केंद्रीय नेतृत्वाचं व मंत्रीमंडळाचं अभिनंदन. आता या स्वप्नाची पूर्तता लवकरच होईल आणि अयोध्येतील 'त्या' जागेवर भव्य राममंदिर लवकरच उभं राहील, अशी अपेक्षा करू या.

- विशेष संपादकीय 

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/