कर्मयोगिनी वंदनीय ताई आपटे

विवेक मराठी    11-Mar-2020
Total Views |

राष्ट्र सेविका समितीच्या द्वितीय संचालिका वंदनीय सरस्वती ताई आपटे ह्यांच्या 25व्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या कार्याचे स्मरण करणारा लेख.

 
rss_1  H x W: 0

तापी ताप हरण करता

सरस्वती है ज्ञान दिलाती।

लक्ष्मी ने जो राह दिखाई

यशस्विनी उसे गती दे जाती।

 
आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/ 
 

गेल्या 84 वर्षांपासून निरपेक्षपणे कार्य करणाऱ्या राष्ट्र सेविका समितीच्या द्वितीय संचालिका वंदनीय सरस्वती ताई विनायकराव आपटे ह्यांचे हे 25वे स्मृतिवर्ष! सामान्यांतले असामान्य व्यक्तिमत्त्व म्हणजे वं. ताई! कारण सामान्यांतला सामान्यांत मिसळून सामान्यांसारखे वागणे हेच त्यांचे असामान्यत्व. 'आईपण' हा त्यांच्या व्यक्तित्वाचा स्थायिभाव होता. म्हणूनच कर्मयोगाहूनही पुढचा असा सेवेचा सहजयोग त्यांना सहज साध्य झाला.

अशा विशाल मातृहृदयी अंत:करण लाभलेल्या वं. ताईंचा जन्म कोकणात आंजर्ले गावी सावित्रीबाईच्या कुशीत फाल्गुन वद्य एकादशी, शके 1882 - म्हणजे दि. 17 मार्च 1910 रोजी झाला. जन्मनाव तापी - तापी म्हणजे तापहारिणी, दु:खहारिणी! लोकमान्य टिळकांची ही नात जन्मत:च देशभक्तीचे संस्कार घेऊनच आली होती.

1925 साली विनायकराव आपटेंची 'सरस्वती' बनून त्यांच्या जीवनरथाची सारथी, सहधर्मचारणी म्हणून 'आपटें'च्या घरात प्रवेश करती झाली. तापी, सरस्वती ही दोन्ही नद्यांची नावे. जगाला जीवनदायिनी असणाऱ्या वं. ताईंचे जीवनही असेच गतिमान होते. ध्येयपूर्तीसाठी निरंतर कार्यरत राहत या दोन्ही नावांना सार्थ करणारे. वं. मावशींप्रमाणेच पुण्यामध्येसुध्दा संघविचारांनी प्रेरित होऊन महिलांना सक्षम, सुदृढ, शारीरिक-मानसिकदृष्टया सबल बनवण्याच्या दृष्टीने राष्ट्रभक्तीतून राष्ट्रदेवतेचे पूजन करण्याचे संस्कार करण्याच्या उद्देशाने महिलांच्या संघटनेचे कार्य सुरू केले व डॉ. हेडगेवारांच्या सूचनेनुसार सहजपणे 'मी'पणाचे अवडंबर न करता पुण्याचा हा समिती ओघ वर्धेच्या लक्ष्मीच्या समिती कार्यात विनाअट समर्पित केला. समर्पणाच्या भावनेतून, कार्यावरील श्रध्देने लौकिक जीवनात लक्ष्मी आणि सरस्वती एकत्र नांदत नाही. पण राष्ट्राच्या परमवैभवाचे समान ध्येय समोर ठेवून कार्य करणाऱ्या ह्या दोघीही एकरूप झाल्या.

लक्ष्मी और सरस्वतीकी ज्योत एक हो गयी

समीपता, स्वरूपता का दिव्य मंत्र दे गयी।

 

समरस होऊन परिवाराची जबाबदारी पार पाडत असतानाच बाहेरच्या जगात घडणाऱ्या घडामोडींकडेही त्यांचे बारीक लक्ष असायचे. त्याचे चिंतन करायच्या. त्यात विनायकरावांवर 'पुणे संघचालक' म्हणून जबाबदारी आली आणि आपटेंचे घर 'संघाचे कार्यालय' बनले. संघाची शिस्त, वैचारिक मंथन-चिंतन, आचार-विचारपध्दती, कार्यपध्दती, राष्ट्रभक्ती ह्या सर्वाचा ताईंच्या मनावर, विचारांवर सकारात्मक परिणाम होऊ लागला. ताईंच्या आपुलकीच्या वागण्याने, 'मातृहस्तेन भोजनम्' ह्या संस्कारामुळे त्यांचे घर स्वयंसेवकांची 'पंढरी' बनले. प्रसाद भोजनातून देशभक्तांची निर्मिती 'आपटें'च्या घरातून होऊ लागली. ह्या वैचारिक मंथनातूनच समाजाची अर्धी शक्ती असणाऱ्या स्त्रीशक्तीच्या आत्मशक्तीच्या जागृतीतून समिती जन्माला आली. स्वत:च्या परिवाराप्रमाणेच हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंतचा विशाल भारत देश तुझा मोठा परिवार आहे. स्त्री ही या देशाची आधारशीला आहे. ह्या देशाला बलसागर करून विश्वमान्य करण्याकरिता स्त्रीला तिच्यातील स्वसामर्थ्याची जाणीव करून देण्याची गरज भासू लागली. 'कोण करेल हे काम? आणि कुणीतरी तर, 'मी' का नाही?' ह्या वैचारिक भूमिकेतून वं. ताईंनी समिती सुरू केली.

ज्या स्त्रीच्या सतित्वासाठी इथे रामायण घडले, महाभारत घडले, आपल्या शीलरक्षणासाठी पद्मिनीने जोहर केला, तिथेच आज स्त्रियांची अब्रू खुलेआम लुटली जातेय, स्त्रीभ्रूणहत्या केली जातेय हे सगळे लांच्छनास्पद आहे, ह्याविरुध्द स्त्रियांनी जागृत होऊन पेटायला हवे, लढायला हवे. अन्यायाविरुध्द झुंजायला, सक्षम, संघटित व्हायला हवे. त्या संदर्भात पतीशी सविस्तर विचारविनिमय करून घरातच ह्या स्त्रीशक्तीच्या संघटनेची मुहूर्तमेढ झाली.

तत्पूर्वी दादांनी (पतीने) त्यांना एकच गोष्ट सांगितली की ''पूर्ण विचार करून उडी घे, नंतर माघार घेऊ नको. हे व्रत अत्यंत कठीण आहे. घेतला वसा टाकू नको. शेवटच्या श्वासापर्यंत पाळ!'' आणि ताईंनी शेवटच्या श्वासापर्यंत त्यांना दिलेला शब्द पाळला.

आणि समितीचे कार्य वं. मावशींच्या आज्ञेनुसार वं. ताईंच्या निरंतर कार्यरत प्रवृत्तीने जोर धरू लागले. समितीच्या सेविका घडू लागल्या. वं. ताईंच्या मते समिती ही समाजाचा अविभाज्य भाग बनायला हवी व सेविका कशी हवी? तर 'स्वधर्म, स्वशब्द, स्वसंस्कृती यांच्या कल्याणासाठी आणि वैभवासाठी जिवापाड प्रयत्न करते, ती सेविका.' आपले व्यक्तिगत जीवन स्वत:होऊन आनंदाने समष्टीच्या जीवनाच्या सागराला समर्पित करते, ती सेविका. समाजाची व राष्ट्राची निःस्वार्थी सेवा करताना आपले कर्तव्य निःस्वार्थी बुध्दीने पार पाडते, ती सेविका. त्यांना अपेक्षित असलेली सेविका आरोग्यसंपन्न, खंबीर, देश-विदेशातल्या घटनांबाबत जागृत, चिंतन-मनन व अभ्यासू व सकारात्मक दृष्टीने कार्य करणारी, विज्ञानाशी मैत्री असणारी, आचार-विचार-व्यवहारातून हिंदुत्व, स्वदेशी भाव, स्वधर्म, स्वराष्ट्र, स्वभाषा, स्वसंस्कृती, स्वाभिमान जपणारी असावी व हृदयात विशाल मातृत्वभाव, सेवाभाव. कारण समाज समिती ही मातृशक्तीची संघटना आहे. व्यक्ती, कुटुंब, परिवार, समाज व राष्ट्र हा सोपान ह्याच गुणांनी चढला जाईल.

आणि त्यांनी स्वत:च्या ह्याच गुणसूत्रांनी समिती कार्य केले. त्यासाठी त्यांचा संपर्क व प्रचंड प्रवास! तोंडात खडीसाखर, डोक्यावर बर्फ पण हृदयात प्रखर राष्ट्रभक्ती व कार्यनिष्ठा. कौटुंबिक व सामाजिक आघातांच्या वेळी खंबीरपणे कार्यकर्त्यांच्या मागे उभ्या राहून सर्वांना आधार दिला. 1940पासून पतीच्या इच्छेनुसार त्यांच्याकडून देशभरात तिळगूळ पाठवून आपले मातृस्नेहाचे सिंचन केले. महात्मा गांधी वधाच्या वेळी, 1975च्या आणीबाणीच्या वेळी समिती कार्य प्रत्यक्षात बंद असले, तरी संपर्कातून भजनी मंडळ, पौरोहित्य वर्ग, योगावर्ग इ. माध्यमातून सुरूच होते. तुरुंगाच्या बाहेर राहून सेविकांनी वं. ताईंच्या नेतृत्वात मनोधैर्याची अचाट कामे केली, ती बघून दादांनी 'सहधर्मचारिणी व मनोवृत्तानुसारिणी' अशा शब्दांत तुरुंगातूनच वं. ताईंचा गौरव केला.

 

समिती कार्यासाठी स्वत:ला परिपूर्ण करण्यासाठी म्हणून एवढया व्यग्रातेत पतीकडून संस्कृत, गणित, इंग्लिश, हिंदी विषयांचा अभ्यास केला. संपर्कासाठी सायकलही शिकल्या. पोहणेही.

12 जुलै 1961 रोजी पानशेत धरण फुटले, त्या वेळी पूरग्रास्तांना अन्नपाणी, वस्त्र, औषध पुरवठा व पुन: जिद्दीने उभे राहण्यासाठी मानसिक आधार, तेही त्यांचा स्वाभिमान राखून

1972-73मध्ये महाराष्ट्रात पडलेल्या दुष्काळात 'राऊतवाडी' हे गाव समितीने दत्तक घेऊन त्याचे पुनर्वसन केले. पुण्यातला पद्मशाली समाज, बिडी कामगार भगिनी, कागदीपुरा भजन मंडळ, म्युनिसिपल कॉलनी, त्रिशुंडा गणपती, चर्मकार वस्ती इ.मध्ये सेविकांसह सतत संपर्क व मदतकार्य करून समरसतेचा पाया घातला. संपूर्ण संघपरिवाराशी बंधुत्वाचे, प्रेमाचे नाते शेवटपर्यंत पाळले. त्या म्हणत, ''स्त्री ही संसार रथाचे दुसरे चाक नसून अधिक कुशल सारथी आहे.''

 

ह्या अशा कर्मयोगिनाच्या जीवनात पतिवियोगाचा पहाड कोसळला आणि त्या अवस्थेतून मोठया बहिणीच्या नात्याने वं. मावशींनी प्रेमाचा आधार देऊन बाहेर काढले व श्रीरामांचे 'रामायण' सांगायला प्रवृत्त करून प्रेरणा दिली. बाळासाहेब देवरसांचा वाढदिवस वं. ताईंनी येरवडयात थाटात साजरा केला.

स्वत:च्या हाताने राख्या तयार करून सर्व सेविका संघबंधूंनाच नव्हे, तर फळवाले, भाजीवाले, टॅक्सीवाले यांनाही या रक्षासूत्रातून बहिणीचे प्रेम देऊन समरस होत.

गोवा सत्याग्राहात जायची खूप इच्छा होती, पण मागे राहून ताईंनी अन्नपूर्णेचे कर्तव्य केले. कारसेवा मात्र केली. वं. मावशींनंतर समिती प्रमुख संचालिका म्हणून त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी, दायित्व आले व शेवटच्या श्वासापर्यंत तेवढयाच निष्ठेने, श्रध्देने पार पाडले. शाखा ही वं. ताईंची संजीवनी होती. ध्वजप्रणाम व प्रार्थना हा त्यांचा कटाक्ष होता. त्या म्हणत, ''सेविकेने कार्य करताना गाईसारखे चिंतनशील, कोळयासारखे चिकाटी असलेले व मधमाशीसारखे गुणग्रााहक असावे. जनसेवा हीच ईश्वरसेवा हाच समिती कार्याचा भाव आहे. समिती कार्य ईश्वरी कार्य आहे यावर त्यांचा विश्वास होता. त्यांचा पत्रव्यवहार खूप मोठा होता व त्या स्वत: उत्तर देत असत. एखादी महत्त्वाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्या व्यक्तीचे कौतुक करून बंदा 1 रुपया नाणे व खाऊ देत. तो रुपया आशीर्वाद म्हणून आजही अनेकांच्या देवघरात आहे.

आलेला पाहुणा नेहमी हसत आला व हसतच बाहेर पडला. कोणीही विन्मुख/उपाशी घरातून गेले नाही. समिती कार्य वाढत होते. त्याला काळानुरूप गती यावी म्हणून प्रचारिका, विस्तारिका ही संकल्पना प्रत्यक्षात आणली. समितीचे कार्यक्षेत्र आता देशाच्या सीमा पार करून विदेशात कार्यविस्तार होऊ लागला. ताईंच्या काळात समिती कार्याचा वेग वाढत होता. ताईंच्या कुशल नेतृत्वामुळे, संघटनकौशल्यामुळे बंगलोर, कर्णावती, दिल्ली, नागपूर येथे अतिशय शिस्तबध्द, नियोजनबध्द अ.भा. संमेलने झाली. मावशींच्या कार्यकाळात सुरू झालेल्या विविध आयामांना गती आली. त्यांनी समितीला समाजाभिमुख बनवले. त्यांच्या प्रेरणेने ईशान्य भारतातच नव्हे, तर देशातील विविध जनजाती क्षेत्रांतील मुलींच्या शिक्षणासाठी, सर्वांगीण विकासासाठी सेविका कार्यरत झाल्या. छात्रावासांची निर्मिती करण्यात आली. स्वदेशी अभियान, डंकेल प्रस्ताव, वंदे मातरम् अभियान इ.मध्ये वं. ताईंचा सक्रिय सहभाग होता. याच काळात रुग्णोपयोगी साहित्य केंद्रही सुरू करण्यात आले. मावशींनी सुरू केलेला संसार वं. ताईंनी मायेने, निष्ठेने सांभाळला, फुलवला आणि विस्तारला.

1982मध्ये महिला निकेतनची, 1985मध्ये भारतीस स्त्री विद्या निकेतनची व सिकंदराबादला राणी रुद्रांबा ट्रस्टची स्थापना करण्यात आली. 'हे विश्वचि माझे घर' ही ज्ञानेश्वरांची ओवी त्या प्रत्यक्ष जगत होत्या. जे जे उत्तम उदात्त आहे, ते समाजाला द्यावे हीच भावना प्रत्येक कृतीमागे होती. भगवद्गीता व दासबोध प्रत्यक्ष आचरणात आणली होती.

 

समितीच्या व्यापक कार्याला शिस्त लागावी, म्हणून विविध प्रतिष्ठाने उभारण्यात आली - उदा., 1) नागपूर - देवी अहिल्या मंदिर, 2) नाशिक - राणीभवन, 3) बंगळुरू - सुकृपा, 4) वर्धा - देवी अष्टभुजा मंदिर.

अशा ह्या कर्मयोगिनी वं. ताई, ज्यांनी आपला देहच नव्हे, तर तन-मन समर्पित भावनेने चंदनासारखा झिजवून ह्या राष्ट्रदेवतेच्या परमवैभवाच्या ध्येयाने प्रेरित कार्य करणाऱ्या समितीला समर्पित केल्या. या विशाल मातृहृदयाच्या ताईंच्या सर्वांवरील मायेचा झरा 9 मार्च 1993, माघ वद्य द्वादशी 1921ला थांबला. त्यांच्या कामाचा आणि कर्तृत्वाचा आलेख मात्र सदैव उंचावतच राहिला.

हे वर्ष त्यांचे 25वे स्मृतिवर्ष आहे. त्यानिमित्त आम्हा सेविकांना हाच आशीर्वाद द्यावा, की आम्हाला तुमच्यासारखेच ध्येयवेड द्या. आमचे पाऊल ध्येयपथावर सारखे पुढे जाऊ द्या. आम्हाला ध्येयभाव द्या. देशभक्तीचे व्रत द्या. वैष्णवी व्रताचा आम्हा वसा आज द्यावा. हीच विनम्र आदरांजली!

चाह जिनकी है जमी पर। ईश भी चाहे उन्हे।

ताप हरसे सरस कर दे। सरस्वती कहते उन्हे।

राष्ट्रहीत जीवन तपाकर। बन गयी सद् तपस्वीनी।

कार्य से रत राष्ट्र सेविका। प्रणाम तुम्हे कर्मयोगिनी।

- वैजयंती वडनेरकर

राष्ट्र सेविका समिती,

यवतमाळ.