ही 'गरुड'झेप ठरेल का?

विवेक मराठी    13-Mar-2020
Total Views |

ज्योतिरादित्य शिंदे भारताला लाभलेलं सक्षम युवा नेतृत्व होते, जातीयवादाच्या आणि धर्मांधतेच्या विरोधातील काँग्रेसच्या लढाईतील एक निष्ठावंत शिलेदार होते. उदयनराजे, संभाजीराजे यांचाही गौरवगान केलं जात होतं. आता ते एकदम दगाबाज वगैरे झाले. हे एका रात्रीत कसं काय घडलं? या सर्व राजघराण्याच्या वंशजांची एकेकाळी न थकता स्तुती करणारे आज एकदम त्यांना शिव्यांची लाखोली का बरं वाहू लागले? कारण एकच - त्यांनी 'भारतीय जनता पक्षा'त केलेला प्रवेश! 

 
Jyotiraditya Scindia Join 
 
1857च्या स्वातंत्र्ययुध्दात ग्वाल्हेरच्या शिंदे राजघराण्याने ब्रिटिशांना कशी मदत केली, झाशीच्या राणीला कसा धोका दिला, त्याच शिंदे राजघराण्याचे आजचे वंशज ज्योतिरादित्य शिंदे हेही कसे दगाबाज आहेत, वगैरे असंख्य गोष्टी गेल्या काही दिवसांत तुम्हाला समाजमाध्यमांतून वाचायला मिळाल्या असतील. महाराष्ट्रातील साताऱ्याच्या गादीचे वंशज छ. उदयनराजे भोसले यांच्या व्यक्तिमत्त्व आणि वर्तनाबद्दलही काही महिन्यांपूर्वी अशाच गोष्टी वाचायला मिळाल्या असतील. तर काही वर्षांपूर्वी, कोल्हापूर गादीचे छ. संभाजीराजे भोसले यांच्याबाबतही असंच काहीसं घडलं असेल. ते कसे संधिसाधू आहेत, धोकेबाज आहेत, आपल्या भूमिकांशी त्यांनी कशी तडजोड केली, हे रंगवून रंगवून सांगणारे लेख व्हायरल झाले असतील. विशेष म्हणजे अगदी कालपरवापर्यंत हेच ज्योतिरादित्य शिंदे भारताला लाभलेलं सक्षम युवा नेतृत्व होते, जातीयवादाच्या आणि धर्मांधतेच्या विरोधातील काँग्रेसच्या लढाईतील एक निष्ठावंत शिलेदार होते. उदयनराजे, संभाजीराजे यांचाही गौरवगान केलं जात होतं. आता ते एकदम दगाबाज वगैरे झाले. हे एका रात्रीत कसं काय घडलं? या सर्व राजघराण्याच्या वंशजांची एकेकाळी न थकता स्तुती करणारे आज एकदम त्यांना शिव्यांची लाखोली का बरं वाहू लागले? कारण एकच - त्यांनी 'भारतीय जनता पक्षा'त केलेला प्रवेश!
 
 आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/
 

काय गंमत असते पाहा. लोकशाहीत राजघराण्यांना अवाजवी महत्त्व नको, आपला समाज कसा अजूनही मध्ययुगीन बुरसटलेल्या कल्पनांना धरून आहे, वगैरे ज्ञान तथाकथित पुरोगामी, सेक्युलर-लिबरल मंडळी आता एकदम आपल्याला पाजू लागली आहेत. भारतीय लोकशाही, भारतीय समाजमन आणि भारतीय राजकारण या बाबतच्या या मंडळींच्या आकलनाच्या मर्यादा उघडया पडतात त्या या अशा. याच मर्यादांमुळे आणि त्याआड लपलेल्या दांभिकतेमुळे 2014 आणि 2019मध्ये ही मंडळी तोंडावर आपटली. आता ज्योतिरादित्य शिंदे यांच्या भाजपाप्रवेशामुळेही असंच काहीसं घडण्याच्या मार्गावर आहे.

 

मुळात, संस्थानिक घराण्यांच्या आजच्या वंशजांच्या राजकारणाचं विश्लेषण करताना एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते, ती म्हणजे ही सर्व मंडळी कुणाचीही वारसदार असली तरी शेवटी त्यांना त्यांचं आजचं राजकारण हे आज देशात अस्तित्वात असलेल्या लोकशाहीच्या आणि घटनात्मक मूल्यांच्या चौकटीतच करावं लागतं. ते तुम्ही कसं करता, यावरच तुमचं राजकीय यशापयश अवलंबून असतं. राजघराण्याचा वारसा हा फारतर तुमचा एक अतिरिक्त गुण असतो. कारण, त्या त्या भागातील जनता त्या राजघराण्याला मानते, त्याचा आदर करते. त्या घराण्याच्या इतिहासाशी तेथील भावना जोडल्या गेलेल्या असतात. त्या अर्थाने ही घराणी आणि त्यांचे वंशज यांचं आजच्या लोकशाहीतील मूल्य हे प्रतीकात्मक असतं. हे प्रतीकात्मक मूल्य आज आहेच आणि उद्याही राहणार आणि आपली ताकद वाढवण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्ष हे मूल्य वापरणारच, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. परंतु म्हणून या एका अतिरिक्त गुणाच्या आधारे त्या व्यक्तीला सबंध राजकारण चालवता येत नाही. ते राजकारण त्याच्या वैयक्तिक कामगिरीवरच अवलंबून असतं. उदयनराजे, संभाजीराजे किंवा ज्योतिरादित्य, सर्वांनी निवडणुकीत पराभव पाहिलेले आहेत ते याचमुळे. त्यामुळे स्वतःला जबाबदार राजकीय अभ्यासक वा विश्लेषक वगैरे म्हणवत दुसरीकडे शिंदेंच्या भाजपा प्रवेशानंतर थेट 1857चे संदर्भ काढणाऱ्यांनी तरी एवढा प्राथमिक विचार करणं आवश्यक आहे.

 आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/
 

ज्योतिरादित्य शिंदे यांचं एकूण राजकारण पाहिलं, तर राजघराण्यातील जन्म आणि त्यात पुन्हा घरामध्ये वडील, आत्या, आजी यांचा पक्षीय राजकारणातील वारसा असे दोन अतिरिक्त गुण ज्योतिरादित्य यांच्या खात्यात आहेत. मध्य प्रदेश, राजस्थान आदी राज्यांतील शिंदे घराण्याच्या राजकारणावर ज्योतिरादित्य यांच्या आजी राजमाता स्व. विजयाराजे शिंदे यांच्या व्यक्तिमत्त्वाची, कारकिर्दीची मोठी छाप आहे. त्यामुळे राजकीय कारकिर्दीची सुरुवातच काँग्रेसमधून करूनही ज्योतिरादित्य यांच्या भाजपा प्रवेशाला लोक 'घरवापसी' म्हणत आहेत. विजयाराजे जनसंघ-भाजपाशी अखेरपर्यंत एकनिष्ठ राहिल्या, त्यांचे पुत्र माधवराव शिंदे यांनी वेगळी वाट धरून काँग्रेसप्रवेश केला, परंतु तिथे त्यांची दुर्दशा झाली. पध्दतशीर खच्चीकरण झालं. असं असूनही ज्योतिरादित्य यांनी 18-19 वर्षं काँग्रेसशी एकनिष्ठ राहत राजकीय कारकिर्द घडवली, इतक्या वर्षानंतरही अडखळत असलेले - दोनदोन लोकसभा निवडणुकांतून अपयशी ठरलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांची एक मित्र म्हणून साथ दिली. पत्रकार परिषदा, सार्वजनिक कार्यक्रम, मुलाखती अशा सर्वच ठिकाणी राहुल यांना सांभाळून घेताना आपण ज्योतिरादित्य यांना पाहिलं. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत सर्वशक्तिमान भाजपापेक्षा अधिक जागा काँग्रेसला मिळण्यात ज्योतिरादित्य यांचा सिंहाचा वाटा होता. परंतु, इकडे ज्योतिरादित्य आणि राजस्थानात सचिन पायलट या दोन्ही युवा कार्यक्षम नेत्यांचं खच्चीकरण करण्यातच काँग्रेस नेतृत्वाने धन्यता मानली. या बाबतीत काँग्रेस नेतृत्वाने आपल्या घराण्याच्या परंपरेला साजेशी वाटचाल केली. शेवटी व्हायचं तेच झालं. पक्ष्याने सोनेरी पिंजरा तोडून भाजपा नावाच्या वृक्षाच्या फांदीकडे झेप घेतली. इतक्या गटांगळया खाऊनही न सुधारणारं काँग्रेसचं गलिच्छ दरबारी राजकारण, त्यात कमलनाथ-दिग्विजय आदी झारीतील शुक्राचार्य अशा सर्व गोंधळात आपलं राजकारण सुरक्षित नाही, आपल्याला पुढे जायचं असेल तर भाजपामध्ये गेलं पाहिजे हा विचार त्यांनी केला.

 

आता कदाचित लवकरच मध्य प्रदेशात कमलनाथ सरकार कोसळेल, पुन्हा शिवराज'मामाजी' मुख्यमंत्रिपदी विराजमानही होतील. ज्योतिरादित्य भाजपामध्ये स्थिरस्थावर होतील. त्यानंतरच्या त्यांच्या वाटचालीवरच, ज्योतिरादित्य यांची ही झेप 'गरुडझेप' ठरेल का, हे स्पष्ट होईल. तूर्तास ज्योतिरादित्य यांची बंडखोरी आणि त्यावरून थेट 1857वर पोहोचणाऱ्यांनी ज्योतिरादित्य यांना भाजपामध्ये का जावसं वाटलं, याची उत्तरं शोधली, तर अधिक बरं होईल.