जनुकीय उत्क्रांती आणि कोरोना

विवेक मराठी    14-Mar-2020
Total Views |

***शैलेंद्र कवाडे*** 

भारतापुढे असलेले आव्हान दुहेरी आहे परंतु त्यापासून बचाव होण्याची संधीही चांगली आहे. अगदी स्पष्ट सांगायचे तर आपली लोकसंख्या इतकी दाट आहे की इथे हा विषाणू अत्यंत वेगाने पसरू शकतो. परंतु त्याच वेळी अशा प्रकारचा विषाणू भारतात कितपत टिकू शकेल किंवा किती नुकसान करू शकेल ह्याबद्दल संदिग्धता आहे. आपल्यातील अनेकांना ह्या विषाणूचा संसर्ग झाल्याचे कळणारही नाही. परंतु आपण त्याचे वाहक प्रसारक असू शकतो. ह्या गोष्टीकडे खरेतर एक संधी म्हणून बघता येईल. मृत्यूच्या सावटाखाली का असेना पण आपल्या सार्वजनिक आयुष्यातील वाईट सवयी सोडण्याची संधी म्हणून ह्या संकटाकडे पाहिले पाहिजे.

तिबेटी पठाराच्या दोन्ही बाजूंना जगातल्या दोन महान संस्कृती जन्मल्या आणि वाढल्या. शेकडो नद्यांनी शिंपलेला हा प्रदेश जगातील सगळ्यात सुपीक प्रदेशांपैकी एक आहे. आजही जगातली 40-45% लोकसंख्या ह्याच भागात नांदते. अवघ्या काही शे वर्षांपूर्वी जागतिक अर्थव्यवहाराच्या 50% वाटा ह्याच प्रदेशाचा होता.

Coronavirus_1  

हिमालयाची मोठी भिंत भारत आणि चीन ह्या दोन संस्कृतींना हजारो वर्ष विभागून आहे. तिबेटच्या पूर्वेला तिबेटसह चीन हे एकमेव राष्ट्र संस्कृती वाढली. तिबेटच्या दक्षिण पश्चिमेला मात्र अनेक लोकसमुदाय सतत येत गेले. अनेक राज्य, राष्ट्र घडत आणि मोडत गेले. जगभरातल्या संस्कृती इथे आल्या, नांदल्या, विरघळल्या आणि लयाला गेल्या.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

कोरोना व्हायरसबद्दल सुरू असलेला सगळा गदारोळ अनुभवत असतानाच पूर्वीपासून सतावणारे दोन महत्त्वाचे प्रश्न परत मनात उभे राहिले आणि त्याच अनुषंगाने पूर्वी नजरेखालून गेलेले दोन शोधनिबंध आठवले.

त्यातला पहिला प्रश्न होता की चीन किंवा भारतीय उपखंडात इतकी घनदाट, भरगच्च लोकसंख्या का आहे? आणि दुसरा प्रश्न होता की अशा लोकसंख्येत, पूर्वीच्या काळी जेव्हा एखादी साथ येत असेल तेव्हा नेमके तिचे नियंत्रण कसे होत असेल?

हे दोन्ही प्रश्न एकमेकांत पाय अडकवून बसलेले आहेत.

पूर्वीच्या काळी जेव्हा मानवाला औषध, सूक्ष्मजीव, आजार ह्याबद्दल पुरेसे ज्ञान नव्हते तेव्हाही कित्येक साथी यायच्या आणि जायच्या. कित्येक आजार असे होते की ज्यांनी जगाची लोकसंख्या जवळपास संपुष्टात आणली होती. मानवी वंश आणि त्याची जनुके बदलण्याचे सामर्थ्य ह्या सूक्ष्मजीवांच्या आक्रमणात आहे. हे विधान आता हास्यास्पद वाटेल, पण जेव्हा औषधांचा जन्म झालाच नव्हता तेव्हा, म्हणजे दोन-तीन दशलक्ष वर्षांपूर्वी उत्क्रांत होत असलेल्या मानवसदृश्य प्राण्यांकडे ह्या आजाराशी लढण्याचे एकच साधन होते, ते म्हणजे त्याचे स्वतःचे शरीर. ज्या मानवाच्या शरीरात त्या सूक्ष्मजीवाला जास्त प्रतिरोध होत असेल, तोच जगू शकत असेल, पुनरुत्पादन करेल आणि मग त्याचाच वंश वाढेल.

आज जगात नांदत असलेल्या आपणा सगळ्या माणसांची शरीरे ह्या अग्निदिव्यातून तावून सुलाखून निघालेली आहेत.

पण तरीही एक प्रश्न अनुत्तरित राहतो, की जगभरातील एखाद्या प्रदेशात लोकसंख्येचे केंद्रीकरण का होते? त्यामागचे कारण काय? खासकरून आर्थिक आणि औद्योगिक प्रेरणा नसताना असे केंद्रीकरण का घडले? शेतीची शक्यता किंवा शेतजमिनीची उपलब्धता हेच ते एकमेव कारण आहे का? अशा सघन लोकसंख्या असलेल्या संस्कृती साथीच्या रोगांना कसे तोंड देत असतील?


आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

भारत आणि चीन ह्या दोन प्रदेशांच्या बाबतीत ह्या प्रश्नांची उत्तरे वेगवेगळी आहेत.

 

साधारण सत्तर हजार वर्षांपूर्वी आधुनिक मानव आफ्रिकेतून बाहेर पडला आणि त्याचा जगभरातील प्रवास सुरू झाला. ह्या काळात त्याचे पहिले पाऊल ज्याला लेवांत म्हणतात, म्हणजे आजचा सीरिया वगैरे भाग, त्या प्रदेशात पडले. तिथून तो अफगाणिस्तानमार्गे भारतात आला आणि बहुदा समुद्रकिनार्याने भारतात पसरला. ज्याला आपण जांबूद्वीप म्हणतो त्या भागात त्याचे आगमन साधारण 65 हजार वर्षापूर्वी झाले आणि तो इथे सगळ्यात जास्त स्थिरावला. इतका की साधारण 60 हजार वर्षांपूर्वीपासून ते 40 हजार वर्षांपूर्वीपर्यंत, म्हणजे उणीपुरी 20 हजार वर्षे, जगातील बहुतांश आधुनिक मानव भारतीय उपखंडात राहत होते. बहुतांश म्हणजे किती, तर जगाच्या लोकसंख्येच्या 60% आणि आफ्रिकेतूून बाहेर पडलेल्या मानवाच्या 80-85% टक्के लोकसंख्या तेव्हा ह्या भारतीय उपखंडात रहायची. आधुनिक मानव इथूनच समुद्र किनार्याची रेषा पकडून दक्षिण पूर्व आशियात, ऑस्ट्रेलियात गेला.

अर्थातच असे कितीतरी विषाणू-जिवाणू त्याकाळी ह्या प्रदेशात येऊन गेले असतील आणि ज्याला आपण आज भारतीय वंश म्हणतो त्याने त्यांना तोंड दिले असेल. भारतीय वंशाची रोगप्रतिकारशक्ती सगळ्यात जास्त चांगली असण्याचे मूळ ह्या 20-30 हजार वर्षांच्या सघन लोकसंख्येच्या आणि हजारो सूक्ष्मजीवांना तोंड देण्याच्या इतिहासात आहे. त्यानंतरही हजारो वर्षे भारतात बाहेरून लोक येत राहिले, त्यांच्याबरोबर नवे आजार येत राहिले. पाचशे वर्षांपूर्वी जेव्हा युरोपीय लोक अमेरिकेत अचानक गेले तेव्हा त्यांच्या आगमनानंतर काही शे वर्षातच नेटिव्ह अमेरिकन लोकांची लोकसंख्या झपाट्याने उतरली. हे काही युरोपियन लोकांनी केलेल्या कत्तलीमुळे घडलेले नव्हते, तर नेटिव्ह अमेरिकन लोकांची प्रतिकारशक्ती, युरोपीय लोकांनी आणलेल्या कित्येक सूक्ष्मजीवाना तोंड देण्यास अक्षम असल्याने घडलेले होते. भारतात असे कधीही घडले नाही कारण भारत कधीही अमेरिकेसारखा वेगळा पडलेला नव्हता.

दुसरी गोष्ट म्हणजे अशी साथ पसरण्यात सगळ्यात जास्त महत्त्वाची भूमिका हवामानाची असते. कारण एखादा विषाणू एखाद्या विशिष्ट हवामानात जितका वाढू शकतो किंवा जितका त्रासदायक असतो तितका दुसर्या हवामानात असेलच असे नाही. विषाणू बदलतो पण तो बदल अपघाती असतो आणि बदललेला विषाणू घातक असेलच असे नाही. अर्थातच विषाणूचा प्रसार प्रभाव वेगवेगळा असतो. खासकरून जे विषाणू हवेतून पसरतात त्यांच्याबाबत हे जास्त खरे आहे कारण वातावरणाचा परिणाम होऊन ते फार लवकर बदलत असतात.

 

वांशिकदृष्ट्या जगातील प्रत्येक भागातील वंशाने वेगवेगळी आव्हाने पेलली आहेत आणि त्यात तगून राहिल्याने त्यांची प्रतिकारशक्तीही वेगवेगळी असते. भारतासारख्या प्रदेशाने ती आव्हाने जास्त पेलली आहेत.

 

नोव्हेल करोना विषाणूबद्दल ह्याच संदर्भात एक संशोधन नुकतेच केले गेले, ते ह्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. हा विषाणू मानवी पेशीच्या ज्या भागावर स्वतःचे बस्तान बसवतो त्या भागाला त्याचा रिसेप्टर म्हणतात. ACE-2 नावाच्या जीन्सने संश्लेषण होणारे एक प्रोटीन हे ह्याविषाणूचे बस्तान बसवण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडते. प्रत्येक प्रोटीन हे अमिनो आम्लांच्या साखळीने बनलेले असते. ही साखळी जीन्समधील गुणसूत्राच्या रचनेनुसार तयार होते. जीन्समधील छोटासा बदलही ह्या अमिनो आम्लामध्ये रचनात्मक बदल घडवून आणतो त्यामुळे आपले शरीर एखाद्या विषाणूला जास्त बळी पडते किंवा जास्त प्रतिकार करू शकते. ह्यासंदर्भात नुकतेच जे संशोधन केले गेले आहे, त्यात चिनी वंशात असलेल्या ह्या प्रोटीनची घडण जगभरातील इतर वंशात असलेली घडण ह्यात बरेच अंतर आढळून आले आहे. कोरोनाच्या आधी येऊन गेलेल्या सार्स विषाणूच्या साथीतही हीच गोष्ट लक्षात आली होती. कदाचित ह्याच कारणाने सार्स जगभर पसरला नाही. भारतात तर आलाही नाही. हे संशोधन फारच थोड्या लोकांवर केले गेले. त्यामुळे त्याचे निष्कर्ष संदिग्ध आहेत, मात्र त्यांना शास्त्रीय आधार नक्कीच आहे.

 

थोडक्यात सांगायचे झाल्यास भारतापुढे असलेले आव्हान दुहेरी आहे परंतु त्यापासून बचाव होण्याची संधीही चांगली आहे. अगदी स्पष्ट सांगायचे तर आपली लोकसंख्या इतकी दाट आहे की इथे हा विषाणू अत्यंत वेगाने पसरू शकतो. परंतु त्याच वेळी अशा प्रकारचा विषाणू भारतात कितपत टिकू शकेल किंवा किती नुकसान करू शकेल ह्याबद्दल संदिग्धता आहे. आपल्यातील अनेकांना ह्या विषाणूचा संसर्ग झाल्याचे कळणारही नाही. परंतु आपण त्याचे वाहक प्रसारक असू शकतो. ह्या गोष्टीकडे खरेतर एक संधी म्हणून बघता येईल. मृत्यूच्या सावटाखाली का असेना पण आपल्या सार्वजनिक आयुष्यातील वाईट सवयी सोडण्याची संधी म्हणून ह्या संकटाकडे पाहिले पाहिजे.

 

कुठेही थुंकणे, मलमूत्रविसर्जन, स्वच्छतेबद्दल अनास्था ह्या गोष्टींनी भारतात रोज शेकडो लोक मरतात. मात्र त्या आजारांना ह्या नव्या कोरोना विषाणूसारखे ग्लॅमर नाही. ह्या विषाणूची प्रचंड भीती आणि जागरूकता आपल्याला आणि सरकारी यंत्रणेला सुधारवू आणि बदलवू शकली तर आपली संपूर्ण आरोग्यव्यवस्था सुधारेल.

 

ही साथ भारतात पसरेल का ह्याचे खरे उत्तर आजतरी भविष्याच्या पोटात आहे. सरकारी यंत्रणा, समाजमाध्यमे आणि इतर संबंधित खरोखरच खूप चांगल्या पद्धतीने ह्याला तोंड देण्याचा प्रयत्न करत आहेत. मुळातच खूप सशक्त जनुके लाभलेला भारतीय समाज ह्या साथीला, ह्या विषाणूला बळी पडणार नाही अशी आशा बाळगायला जागा आहेच, त्याच बरोबर सजगपणे स्वतःला आणि समाजाला बदलण्याची ही एक संधीही आहे.

 
 -9324089302
 
 आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

 

Ref

 

mtDNA Variation Predicts Population Size in Humans and Reveals a Major

Southern Asian Chapter in Human Prehistory

Quentin D. Atkinson,* Russell D. Gray, and Alexei J. Drummond)

https://academic.oup.com/mbe/article-abstract/25/2/468/114123

Comparative genetic analysis of the novel

coronavirus (2019-nCoV/SARS-CoV-2) receptor

ACE2 in different populations

Yanan Cao 1, Lin Li1

Cell Discovery https://doi.org/10.1038/s41421-020-0147-1 www.nature.com/celldi.

24 Feb 2020