भारताच्या महिला क्रिकेट संघाचे भवितव्य उज्ज्वल!

विवेक मराठी    16-Mar-2020
Total Views |

 ***केदार लेले*** 

 
विश्वचषकाच्या साखळी फेरीत भारतीय संघाने एकही सामना गमावला नव्हता. तसेच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे साखळी फेरीच्या पहिल्याच सामन्यात भारताने ऑॅस्ट्रेलियाला पराभूत केले होते. जरी टी-20 महिला विश्वचषक अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत केले असले, तरी स्पर्धेत प्रत्येक खेळाडूंने केलेली कामगिरी नक्कीच भारताच्या महिला क्रिकेट संघाचे भवितव्य उज्ज्वल आहे, हे दाखविणारी आहे.
 

india vs australia women

भारतीय संघ महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला, पण त्यांना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. या विश्वचषकाच्या साखळी फेरीत भारतीय संघाने एकही सामना गमावला नव्हता. तसेच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे साखळी फेरीच्या पहिल्याच सामन्यात भारताने ऑॅस्ट्रेलियाला पराभूत केले होते, हे विशेष! पण अंतिम फेरीत मात्र ऑॅस्ट्रेलियाने भारताला पराभूत करत पाचव्यांदा विश्वचषकाला गवसणी घातली.

 

नियतीने केला हिंदुस्थानचा घात!

टी-20 अंतिम सामन्यामधील भारताच्या महिला क्रिकेट संघाच्या पराभवाचे वर्णन कसे करता येईल? मला वाटते, ‘हिंदुस्थान हरला, पण भारतीय महिला संघ जिंकला.’ नियतीने योग्य न्याय केला नाही. निदान संघसंचालक वुर्केरी रामन, गोलंदाज पूनम यादव आणि फलंदाज शेफाली वर्मा यांच्यासाठी तरी नियतीने हा सामना हिंदुस्थानच्या पदरात टाकायला हवा होता! पण घडले भलतेच!

ऑॅस्ट्रेलियाची दमदार सलामी, भारताचे ढिसाळ क्षेत्ररक्षण आणि बोथट गोलंदाजी!

सलामीवीर हिली आणि बेथ यांनी मिळालेल्या जीवदानांचा फायदा उठवीत भारताच्या गोलंदाजीवर जोरदार प्रहार केला आणि सामना ऑॅस्ट्रेलियाच्या बाजूने झुकवला, ज्यामुळे भारताची गोलंदाजी बोथट झाल्याचे दिसून आले!

भरवशाचे खेळाडू ऐन वेळी अपयशी!

नेमकी अंतिम सामन्यात सलामीवीर शेफाली अपयशी ठरली. तसेच लौकिकाला साजेशी कामगिरी करू शकणार्या स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर, वेदा कृष्णमूर्ती यांनी हाराकिरी केली, ज्याचा मोठा फटका भारतीय संघाला बसला!

दीप्ती शर्माची अष्टपैलू कामगिरी!

पहिल्याच षटकाच्या पाचव्या चेंडूवर दीप्तीने स्वत:च्याच गोलंदाजीवर हिलीचा झेल सोडला होता. पण तिने 16व्या षटकात दोन विकेट्स घेऊन ह्याची भरपाई केली, तसेच मोलाच्या 33 धावासुद्धा केल्या! तिने गोवर्धन आपल्या बॅटवर पेलायचा प्रयत्न केला. पण शेवटी ती माणूस आहे, देव नाही. कधी तरी तिची चूक होणार होती, ती झाली. दीप्ती आणि वेदा कृष्णमूर्ती असेपर्यंत नियतीचे हृदय हिंदुस्थानसाठी धडधडतेय असे वाटले. त्यानंतर एका क्षणी ती नियती कठोर झाली आणि आशेचा सूर्य अस्ताला गेला!

 
india vs australia women

जागतिक महिला दिन आणि मेलबर्नचे कुरुक्षेत्र!

महिला टी-20 विश्वचषकात जेव्हा ऑॅस्ट्रेलिया आणि भारत आमने-सामने आले, तेव्हा नकळत महाभारतातील कर्ण आणि घटोत्कच यांच्यातील युद्धाशी त्याची तुलना झाली. साखळी फेरीच्या पहिल्याच सामन्यात भारताने ऑॅस्ट्रेलियाला पराभूत केले. या पराभवामुळे ऑॅस्ट्रेलिया अंतिम सामन्यात पोहोचेपर्यंत त्यांची चांगलीच दमछाक झाली होती.

पण अंतिम सामन्यात सलामीवीर हिली आणि बेथ ह्या अमोघ अस्त्रांनी जणू भारतीय गोलंदाजी छिन्नविच्छिन्न केली आणि त्यांची भागीदारी खर्या अर्थाने ऑॅस्ट्रेलियाच्या विजयाचा पाया ठरली!

 

सुनील गावस्कर यांचे बीसीसीआयला साकडे

भारतामध्ये भरपूर गुणवत्ता आहे. पण जर महिला क्रिकेटमधील ही गुणवत्ता पुढे आणायची असेल, तर त्यांच्यासाठी आयपीएलचे आयोजन करणे महत्त्वाचे आहे. महिलांचे आयपीएल सुरू झाले की बरेच गुणवान खेळाडू पुढे येऊ शकतात. भारतामध्ये गुणवत्तेची कमतरता नाही, पण त्यासाठी त्यांना आयपीएलसारखे व्यासपीठ मिळायला हवे.

 

तसेच जर महिलांच्या आयपीएलचे आयोजन करायचे झाले आणि आठ संघ निर्माण झाले नाहीत, तरीही ही लीग खेळवता येऊ शकते. यामुळे गुणवत्तेला चांगले व्यासपीठ मिळेल. बीसीसीआय महिला क्रिकेटकडे चांगल्या पद्धतीने लक्ष देत आहे. त्यामुळे महिला क्रिकेटचा चांगला विकास आणि प्रसार होऊ शकतो.

 

ऑॅस्ट्रेलियामध्ये महिलांसाठी बिग बॅश लीग खेळवली जाते. या लीगमध्ये भारतातील हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधना या दोघी खेळल्या होत्या आणि त्याचा त्यांना फायदाही झाला. जसा आयपीएलचा पुरुष खेळाडूंना फायदा मिळाला, तसाच फायदा महिलांनाही होऊ शकतो.’

 

असे वक्तव्य करीत मा. सुनील गावस्कर यांनी भारताच्या महिला क्रिकेटच्या वतीने बीसीसीआय आणि सौरव गांगुली यांना जणू साकडे घातले आहे!

 

सचिन तेंडुलकर आणि शरद पवार यांची स्तुतिसुमने!

सोळा वर्षांच्या शेफालीने रचलेल्या धडाकेबाज खेळींमुळे तिलालेडी सेहवागअसे संबोधत सचिन तेंडुलकर आणि विरेंद्र सेहवाग यांनी तिचे कौतुक केले आहे. तसेच शरद पवार यांनी वेळोवेळी प्रतिक्रिया आणि शुभेच्छा देत भारतीय महिला संघाचे मनोबल उंचावले आहे.

भारतीय महिला क्रिकेट संघाचे संघाचे भवितव्य उज्ज्वल!

या स्पर्धेत सोळा वर्षांची धडाकेबाज फलंदाज आणिलेडी सेहवागम्हणून उदयास आलेली शेफाली वर्मा, बिग बॅश लीग खेळणार्या हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधना, तसेच अनुभवसंपन्न पूनम यादव, दीप्ती शर्मा आणि वेदा कृष्णमूर्ती यांच्या रूपाने भारताचा महिला क्रिकेट संघ बाळसे धरतेय. त्यात जोड आहे संघसंचालक वुर्केरी रामन यांची. राहुल द्रविडने लक्ष घातले तरसोन्याहून पिवळे!’

 

म्हणून मी इतकेच म्हणेन - जरी टी-20 विश्वचषक यशाचे कुंकू लागले नसले, तरीदेखील भारताच्या महिला क्रिकेट संघाचे भवितव्य उज्ज्वल आहे, हे निश्चित!

(लंडन)