संशोधन क्षेत्र आणि स्त्रिया

विवेक मराठी    02-Mar-2020
Total Views |

संशोधनात, विशेषत: शास्त्र शाखेच्या संशोधन क्षेत्रात आजही स्त्रिया क्वचितच आढळतात. संशोधन क्षेत्राचा ध्यास असूनही केवळ मुलांचे संगोपन, कुटुंबाची गरज, शारीरिक अडचणी, सामाजिक घडण यामुळे स्त्रीला शास्त्रज्ञ होणे आणि त्या क्षेत्रात टिकून राहणे शक्य होत नसेल, तर त्या त्यासाठी अनुकूल वातावरण निर्मिती करून देणे हे समाज म्हणून आपलेच कर्तव्य आहे.

 
 Science Research on Wome

प्रत्येक कालखंडाची स्वतंत्र अशी आव्हाने असतात. मागच्या शतकामध्ये स्त्रियांनी शिक्षण घेणे हेच आव्हान होते. मुलींनी शिकायचे कशाला? शिकून त्या काय मिळवणार आहेत? मुलीला शिक्षणाची काय गरज? अगदीच आवश्यक असेल तर अक्षर ओळख हिशेब तेवढी शिकवा! असा समाजाचा एकंदरीत विचार होता.

शिक्षण क्षेत्रात काम करणार्या तत्कालीन विचारवंतांना, समाजसुधारकांना या जगरहाटीमध्ये बदल घडवून आणावा लागला. जगरहाटी आपल्या बाजूने वळवून समाजाने आपल्यासह यावे, यासाठी अनेक पातळ्यांवर काम करावे लागले.

 

आज मुलींच्या शिक्षणाबाबत कोणीही आक्षेप घेत नाही, इतके ते स्वाभाविक झाले आहे. शिक्षणामुळे स्त्रियांनी उद्योग-व्यवसाय, अध्यापन, वैद्यक, अभियांत्रिकी, संगणक प्रोग्रामिंग-डिझायनिंग, बँकिंग, राजकारण, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, कॉर्पोरेट जगत या सगळ्याच क्षेत्रांमध्ये उत्तम प्रकारे आपला ठसा उमटवला आहे. याचबरोबर परंपरेने समुपदेशक, रिसेप्शनिस्ट, परिचारिका, शिक्षिका आदी व्यवसाय स्त्रीप्रधान असतील असे समाजानेच ठरवूनदेखील टाकले आहे.

 

मात्र संशोधनात, विशेषत: शास्त्र शाखेच्या संशोधन क्षेत्रात आजही स्त्रिया क्वचितच आढळतात. काही जणी शास्त्र-तंत्राचे उच्च शिक्षण घेतात, परंतु पीएच.डी.नंतर अध्यापनाच्या कामाकडे वळतात किंवा हे क्षेत्रच सोडतात. तसे मानव्यविद्या, अर्थशास्त्र आदी इतरही ज्ञानशाखांमध्ये संशोधक स्त्रियांचा टक्का कमीच आढळतो.

 

संशोधनाच्या क्षेत्रात आजही महिलांचे प्रमाण कमी असण्यामागची कारणे कोणती? त्यातली किती बौद्धिक कुवतीशी, शारीरिक अक्षमतेशी संबंधित? बौद्धिक क्षमतेबाबत समजुतीचे घोटाळे का आहेत? कौटुंबिक जबाबदार्या आणि सामाजिक वातावरण किती कारणीभूत? स्त्रियांची संख्या कमी असण्याचा संशोधन क्षेत्रावर - विषय आणि निष्कर्ष दोन्हीवर काही परिणाम होतो का? तो दृश्य असतो का? यावर चिंतन करणे आवश्यक आहे.

 

समान संधी उपलब्ध असताना, लिंग समभाव प्रस्थापित होत असतानादेखील शास्त्रज्ञ होण्याचा ध्यास घेतलेल्या महिला खूप कमी का असतील? हे कमी प्रमाण केवळ भारतातच नाही, तर जगभरात आहे.

 

या विषम प्रमाणाला शरीरशास्त्र कारणीभूत आहे असे काही काळ मानले गेले. त्यावर बरेच शोधनिबंध लिहिले गेले. या शोधनिबंधांचे म्हणणे असे आहे की उत्क्रांतीच्या टप्प्यावर स्त्री आणि पुरुष दोघांत वेगवेगळ्या क्षमता विकसित होत गेल्या. पुरुष शिकारीसाठी बाहेर पडायचा कुटुंबाचे भरणपोषण करायचा. स्त्री टोळीतील महिलांसमवेत राहायची, मुलांसाठी कंदमुळे गोळा करायची, घर सांभाळायची. मूलभूत कामांची कर्तव्यांची वाटणी यामुळे संप्रेरके मेंदूची विशेष जडणघडण होते. म्हणून स्त्री-पुरुषांच्या मानसिक, भावनिक बौद्धिक कुवतीत फरक पडला आहे. भाषिक कौशल्ये, सेवा क्षेत्रे ही स्त्रियांची गणित, भौतिकशास्त्र आदी विषयांतील कौशल्ये पुरुषी असतात, असा सरधोपट निष्कर्ष काही काळ सांगितला जात होता.

मात्र आधुनिक संशोधनाने हा मुद्दा खोटा ठरवला आहे. मुलामुलींच्या बौद्धिक कुवतीत कोणतीही भिन्नता नाही. समाजामध्ये रूढ असलेल्या कल्पना आणि अनुकरण या बाबी स्त्री-पुरुषांच्या अभ्यासक्षेत्राच्या निवडीमध्ये मोठी भूमिका निभावतात. अन्यथा समान संधी असेल कोणतेही कौटुंबिक सामाजिक दडपण नसेल तर मुलगा आणि मुलगी यांची ज्ञानशाखा निवड ही अंत:स्फूर्त असेल!

 

मूलभूत शिक्षण (उदा. एम.फिल., पीएच.डी.) संशोधनाच्या दृष्टीने शून्य पायरी समजले जाते. तिथूनच पुढे खरे काम सुरू होते. संशोधन करायचे असेल तर कार्यावर एकाग्रता करायला हवी. आपले शिक्षण कौशल्य अवगत झालेले असावे. सतत अद्ययावत राहण्याची संशोधन क्षेत्रामध्ये सगळ्यात जास्त गरज असते. त्यामुळे सतत ज्ञान संपादन करत राहणे हेदेखील गरजेचे असते. अंतर्गत कौशल्यांचा कस येथे लागत असतो. स्वतंत्र जबाबदारी घेऊन ती पार पाडायची, असा ध्यास घेतलेल्या उच्चशिक्षित स्त्रिया याच दरम्यान संसारात पडतात. मग सामाजिक गृहीतके आणि सांसारिक जबाबदार्या यामुळे त्यांच्या वाटचालीत खंड पडतो, असे दिसून येते. हे क्षेत्र झोकून देऊन काम करण्याचे आहे. संशोधनाची गती कुणासाठी थांबत नाही आणि दरी पडली तर सांधणे कठीण असते, हे दिसले की स्त्री संशोधक पाऊल मागे घेते.

आता कुणी म्हणेल की स्त्रियांनी शास्त्रज्ञ होणे ही काळाची गरज आहे का? त्यांनी स्वत:होऊन जर संशोधन सोडून अन्य काही काम आनंदी संसार करायचा असे ठरवले असेल, तर तुम्ही यावर इतके दीर्घ चिंतन कशासाठी करीत आहात? त्या ज्या क्षेत्रात करिअर करू इच्छितात त्यात करत आहेत ना, मग संशोधनात असल्या पाहिजेत याबाबत आग्रही का असावे.?

 

या प्रश्नाची दोन पातळ्यांवर उत्तरे आहे. एक म्हणजे स्त्री हा समाजाचा महत्त्वाचा अर्धा घटक आहे. तिची सर्जनशीलता, तिचा स्वतंत्र विचार हा संशोधनाच्या कक्षेला स्पर्श करून त्यामध्ये काही वेगळेपण निश्चित आणू शकतो. संशोधनाच्या कक्षा स्त्रीच्या तेथील अभावामुळे अपूर्ण राहतात, अस्पर्शित राहतात. त्यामुळे स्त्रीचे संशोधनात असणे महत्त्वपूर्ण मानले जाण्याची गरज आहे. तिच्या अडचणी या क्षेत्राला अपुरे ठेवतात. तिचे योगदान संशोधनाची गती द्विगुणित करू शकते. मात्र त्यासाठी धोरणात्मक पावले उचलण्याची गरज आहे.

 Science Research on Wome

दुसरे म्हणजे या क्षेत्राचा ध्यास असूनही केवळ मुलांचे संगोपन, कुटुंबाची गरज, शारीरिक अडचणी, सामाजिक घडण यामुळे स्त्रीला शास्त्रज्ञ होणे आणि त्या क्षेत्रात टिकून राहणे शक्य होत नसेल, तर त्या त्यासाठी अनुकूल वातावरण निर्मिती करून देणे हे समाज म्हणून आपलेच कर्तव्य आहे. क्षमता असूनही ती तेथे पोहोचू शकत नाही. तेथील प्रशासकीय, उच्च अधिकाराच्या जागा मिळवू शकत नाही, हा समाज म्हणून आपलाच दोष आहे. या क्षेत्रात मूलभूत सुविधा, खंबीर पाठिंबा आणि समान संधी उपलब्ध व्हावी, म्हणून दूरदृष्टीने धोरणे आखणे गरजेचे आहे.

इस्रो आणि डीआरडीओ हे सन्माननीय अपवाद वगळता स्त्री तंत्रज्ञांचे लक्षणीय प्रमाण अन्य कोठेही आढळत नाही, ही खरोखर चिंतेची बाब आहे. एवढ्या उच्चशिक्षित शास्त्र शाखेतील उच्च शिक्षित मुली मूलभूत संशोधन आणि उपयोजित संशोधन क्षेत्रामध्ये काम करू शकत नाहीत. कारण संशोधन क्षेत्रे त्यांच्यासाठी सुकर नाहीत. एखाद्या पुरुषाला जसे गृहस्थाश्रमात राहून संसाराचा आनंद घेत, सहजपणे संशोधनाच्या क्षेत्रातही आपला ठसा उमटवता येतो, त्याप्रमाणेच तितक्याच स्वाभाविकपणे स्त्रीलाही या क्षेत्रात काम करता आले पाहिजे. मुळात स्त्री असूनही शास्त्रज्ञ आहात हे आजही विशेष मानले जाते. कॉम्प्युटर, बँकिंग आदी क्षेत्रांप्रमाणे या क्षेत्राचे सामान्यीकरण होणे ही खरोखर काळाची गरज आहे.

लहानपणी आपण सगळ्यांनी मेरी क्युरीची गोष्ट ऐकलेली असते. आपले काम करता करता प्रश्न सुटला नाही म्हणून ती थकून झोपली. तिला तिच्या मनातल्या प्रश्नांची उकल दुसर्या दिवशी टेबलावर पूर्ण झालेली आढळली आणि मग तिच्या लक्षात आले की मध्यरात्री कधीतरी तिनेच ते काम पूर्ण केले होते, ज्याचा तिच्या कॉन्शस माइंडला पत्ता नव्हता. अबोध मनाने हे काम केलेले होते. ही मेरी क्युरी खरोखर सगळ्या महिला शास्त्रज्ञांसाठी एक मोठा आदर्श आहे. पोलंडमध्ये कोणत्याही विद्यापीठात महिलेला शिकवले जाणार नाही, हे समजल्यावर तिने आणि तिच्या बहिणीने यावर विचार केला. एकीने पोलंडमध्ये नोकरी केली एकीने फ्रान्समध्ये जाऊन आपले शिक्षण पूर्ण केले. असे दोघींनी आळीपाळीने केले. पदार्थविज्ञानाची पदवीधर असलेल्या मेरी क्युरीला पदार्थविज्ञान आणि रसायनशास्त्र या दोन विषयांमध्ये नोबेल पारितोषिक मिळाले. तिची संघर्षगाथा, तिचा संशोधनाचा ध्यास हा संशोधक महिलांसाठी आदर्श आहे. भारतातील स्त्री शास्त्रज्ञांनीसुद्धालीलावतीज डॉटर्सया पुस्तकात आपल्या अनुभवाची शिदोरी प्रेरणा म्हणून नवशास्त्रज्ञ मुलींसाठी संकलित करून ठेवली आहे.

 
 Science Research on Wome

महान शास्त्रज्ञ डॉ. .पी.जे. अब्दुल कलाम म्हणतात, “संशोधन-तंत्रज्ञान ही सर्वांनी मिळून साकारायची बाब आहे. या कामांमध्ये बुद्धी, हृदय आणि आत्मा ओतून काम करणारे शास्त्रज्ञ हवेत, शेकडो अभियंते हवेत आणि संशोधक हवेत आणि या सर्वांना सोबत घेऊन जाणारे नेतृत्व हवे.”

समाजाचा अर्धा हिस्सा असलेल्या महिलांनी तरी याबाबत मागे का राहावे? ज्या स्त्रियांना या क्षेत्राचा ध्यास आहे, त्यांनी ही वाट अवश्य चालावी. आतल्या आवाजाला द्यायला शिकावे. पायथागोरस म्हणतो, ‘सर्व गोष्टींआधी स्वत:चा आदर करा, मग, स्वत्वाच्या जाणिवेबरोबर जीवनाचा संग्रम धैर्याने जिंकणे निश्चित शक्य आहे.’