रंगपंचमीमुळे धाराशीवच्या महिलांना मिळाला रोजगार

विवेक मराठी    02-Mar-2020
Total Views |

धाराशिव जिल्हा तसा आर्थिकदृष्टया मागास. ना इथे मोठे उद्योग आहेत, ना रोजगाराच्या संधी. पण छोटासा व्यवसाय सुरू करून आर्थिकदृष्टया सक्षम होता येते, हे या जिल्ह्यातील महिलांनी दाखवून दिले आहे. रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर इथल्या महिलांना रंगनिर्मिती करण्याचे काम मिळाले आहे. यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ग्रामविकास समितीचे मोठे पाठबळ लाभत आहे.


Eco friendly holi colour

मराठवाडयातील धाराशिव जिल्ह्याच्या विकासाचा विचार करता आजही आर्थिक व सामाजिक दृष्टीकोनातून तो मागास असल्याचे दिसते. हे मागासलेपण पुसून टाकण्यासाठी अनेक स्तरांतून प्रयत्न सुरू आहेत. त्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 'ग्रामविकास समिती'ने एक पाऊल पुढे टाकले आहे.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

धाराशिव जिल्ह्यातील महिलांना आर्थिकदृष्टया स्वावलंबी बनवण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून विविध माध्यमातून ग्रामविकास समितीचे प्रयत्न सुरू आहेत. ग्रामस्तरावरील महिलांचे संघटन करणे व त्यांचे सक्षमीकरण करणे यावर भर देण्यात येत आहे. ग्रामविकासाच्या मुख्य प्रवाहात महिलांचा समावेश होण्यासाठी गावातच लघुउद्योगाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्याचे, तयार केलेल्या उत्पादनास वेगवेगळया पध्दतीने बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे, तसेच उत्पादनाची गुणवत्ता वाढविण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करण्याचे काम ग्रामविकास समितीच्या वतीने करण्यात येत आहे.

सध्या ग्रामविकास समितीच्या वतीने रंगपंचमीनिमित्त महिलांना नैसर्गिक रंग तयार करण्याचा रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे.

 
Eco friendly holi colour

दहा गावांत कामास प्रारंभ

ग्रामविकास समितीने सुरू केलेल्या कामाची व्याप्ती वाढली असून जिल्ह्यातील वलगूड, देवसिंगा तूळ, पिंपळा खुर्द, घोगळगाव, माळेगाव, निपाणी, सावरगाव, तांदूळवाडी आणि वागदरी या दहा गावांत काम सुरू आहे. प्रत्येक गावात महिलांची ग्रामसमिती स्थापन करण्यात आली आहे. त्यानुसार दिवाळीत लागणारे शुध्द नैसर्गिक उटणे निर्मिती, रंगपंचमीनिमित्त लागणारे शुध्द नैसर्गिक रंगनिर्मिती असे छोटे-मोठे उद्योग सुरू झाले आहेत. शिवाय ग्रामविकास समितीअंतर्गत गावात ग्रामस्वच्छता, तसेच गावातील पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे. त्याचबरोबर आरोग्य तपासणी शिबिरासारखे वेगवेगळे उपक्रम राबविले जात असून त्यात कार्यकर्ते मोठया उत्साहाने घेत असतात.

 

शुध्द नैसर्गिक रंगांची निर्मिती

होळी आणि रंगपंचमीसाठी वापरल्या जाणाऱ्या रासायनिक रंगांचे दुष्परिणाम लक्षात घेता, त्याला पर्याय म्हणून शुध्द नैसार्गिक रंगांना बाजारात मोठी मागणी असते. ग्रामसमितीने महिलांची क्षमता ओळखून त्यांच्यात कौशल्य विकसित केले. देवसिंगा तूळ व वागदरी येथील महिलांनी बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन शुध्द नैसर्गिक रंगांची निर्मिती केली आहे. अगदी कमी कालावधीमध्ये थोडे पैसे गुंतवणूक करून या महिलांना गुंतवणुकीच्या तिप्पट नफा मिळाला आहे. यासाठी कमी वेळेत रंगांची निर्मिती करताना चांगलीच कसरत घ्यावी लागली आहे.

 
 
hoil_1  H x W:
 
आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/ 
 

पानां-फुलांसापासून या शुध्द रंगांची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये मका पावडरचा उपयोग केला गेला आहे.

गुणवत्ता हीच ठरली खरी ओळख

उत्पादनाची दर्जेदार गुणवत्ता, उत्तम सेवा यामुळे नैसर्गिक रंगांच्या उत्पादनाला बाजारपेठेत मोठी मागणी वाढत आहे. सोलापूर, लातूर, सातारा आदी जिल्ह्यांत या रंगांना विशेष मागणी आहे. धाराशिव जिल्ह्यातील महिलांनी तयार केलेले शुध्द नैसर्गिक रंग ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत.

Eco friendly holi colour

 

कुटुंबाला मिळाली आर्थिक ताकद

कामधंदा मिळावा यासाठी नेहमी प्रयत्न करत असलेल्या महिलांना गावात आणि घरातच रोजगारांच्या संधी उपलब्ध झाल्यामुळे, त्यांच्या कुटुंबाला मोठा आर्थिक हातभार लागला आहे. देवसिंगा गावातील ग्रामसमिती संयोजिका भाग्यश्री भोसले म्हणाल्या, ''आमच्या गावात गेल्या दोन वर्षांपासून संघाच्या माध्यमातून ग्रामविकासाचे कार्य सुरू आहे. ग्रामविकास समितीच्या माध्यमातून आमच्या गावात विविध उपक्रम सुरू आहेत. ग्रामस्वच्छता, विषमुक्त शेती, आरोग्य तपासणी यासह महिलांद्वारे दिवाळीनिमित्त लागणारे सुगंधी उटणे व रंगपंचमीसाठी विविध प्रकारचे नैसर्गिक रंग यांची निर्मिती केली जाते. या दोन्ही उद्योगांत मिळून जवळपास 20 महिलांचा सहभाग आहे. गावातच रोजगारांची संधी उपलब्ध झाल्यामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक आधार मिळाला आहे. अगोदर या महिला एकत्र येण्यास लाजत होत्या. आता त्याच महिला लघुउद्योग सुरू करण्याविषयी बोलत आहेत. त्यांच्यात आता धीटपणा आला आहे.''

 

''आमच्या गावातील बायकांना या उद्योगातून पैसा मिळाला, चांगले आरोग्य मिळाले, आनंद मिळाला आणि जिल्ह्यातच नव्हे, तर प्रांतात आमच्या गावाचे नाव झाले.''अशी प्रतिक्रिया देवसिंगा ग्रामविकास समितीच्या सदस्या आशा दळवे यांनी दिली.

''आमच्या गावात लघुउद्योग सुरू झाल्यामुळे मी स्वावलंबी झाले. मला नैसर्गिक उटणे व नैसर्गिक रंगनिर्मिती उद्योगातून चांगला अर्थिक नफा मिळाला. त्यामुळे माझा उत्साह वाढला आहे. याच आमच्या गटाला शासनाच्या वतीने घेण्यात आलेला जिल्हास्तरीय हिरकणी महोत्सवात पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले, त्यामुळे आम्ही खूप भारावून गेलो आहोत. यापुढे अनेक उद्योग सुरू करून महिलांना पुढे आणायचे आहे'' असे देवसिंगा येथील राणी मस्के यांनी सांगितले.


आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/ 
 

''सर्वच गावांत महिलांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे. आगामी काळात गोआधारित वस्तू तयार करणे, रांगोळी तयार करणे आदी उपक्रम हाती घेणार आहोत'' असे ग्रामविकास समितीचे जिल्हा संयोजक जयंत पाटील यांनी सांगितले.

 

''ग्रामीण महिलांना खूप काही शिकण्याची, करण्याची जिद्द असते, केवळ त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. मला जिल्ह्यातील सर्व गावातील महिलांशी बोलता आले, संवाद साधता आला. त्यांना खूप काही करायचे आहे. यापुढे ग्रामविकास समितीच्या माध्यमातून महिलांना पुढे आणू''असे समितीचे पूर्णवेळ कार्यकर्ते अंकुश चिनकरे यांनी सांगितले.

 

''गेल्या दोन महिन्यांपासून आमच्या गावात ग्रामविकास समितीचे काम सुरू आहे. नैसर्गिक रंगनिर्मितीच्या कामात 9 महिला सहभागी झाल्या आहेत. मक्याचे पीठ, खाण्याचे रंग आदींचा उपयोग करून रंग तयार करण्यात येत आहेत. आतापर्यंत रंगांच्या 50 ग्रॅमच्या दोन हजार पुडया तयार करण्यात आल्या आहेत. लाल, पिवळा, हिरवा आणि केशरी अशा प्रकारच्या नैसर्गिक रंगांची निर्मिती करण्यात आली आहे'' असे वागदरी गावातील संयोजिका लतिका पाटील यांनी सांगितले.

 

ग्रामविकास समितीने सुरू केलेले कार्य निश्चितच प्रेरणा देणार आहे. विशेष म्हणजे शेतीवर गुजराण करणाऱ्या महिलांना वर्षभरात गावातच आश्वासक रोजगार मिळाला आहे. कामधंदा मिळण्यासाठी गावातून शहारात स्थलांतर होणाऱ्या महिलांनी आपल्या गावात राहून असा उद्योग सुरू केला, तर स्वयंपूर्ण गावाचे स्वप्न सत्यात उतरण्यास वेळ लागणार नाही.

 

9970452767.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/