सोनाराची कानटोचणी

विवेक मराठी    20-Mar-2020
Total Views |

 एखादा निर्णय आपल्या मनाविरुध्द झाला की त्या व्यक्तिविरोधात बोलताना वाट्टेल ती पातळी गाठायची, ही अंगवळणी पडलेली सवयच आहे. इतकी वर्षं या देशात हे सगळं खपत होतं, त्याला उलट 'खतपाणी'ही मिळत होतं. गेली सहा-सात वर्षं त्या खतपाण्याचा पुरवठा बंद झाल्याने आणि उलट तडाखेच अधिक मिळू लागल्याने ती आगतिकता, ते नैराश्य असं उफाळून येतं आहे. गोगोईंच्या निमित्तानेही ती पुन्हा एकदा उफाळून आली आहे.

 Ranjan Gogoi  Rajya Sabh

 
कान टोचण्याचं काम स्वतः सोनारानेच करणं केव्हाही उत्तम असतं, त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश आणि नवनियुक्त राज्यसभा खासदार रंजन गोगोई यांनी स्वतःच न्यायव्यवस्थेचे आणि त्याआडून आपलं घोडं पुढे दामटणाऱ्या मंडळींचे कान टोचले, हेही उत्तमच. केवळ आपल्या नैराश्यातून, अगतिकतेतून वाट्टेल ती आगपाखड करणारे आणि नैतिकतेचा ठेका घेतलेले लोक जेव्हा वाट्टेल तसा उन्माद करू लागतात, तेव्हा त्यांच्या या तथाकथित नैतिकतेचे बुरखे देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनीच फाडलेलं केव्हाही चांगलं. निमित्त ठरलं ते न्या. रंजन गोगोई यांची देशाच्या राष्ट्रपतींद्वारा नियुक्त राज्यसभा खासदार म्हणून झालेली निवड. तसंही गोगोई हे गेले अनेक महिने काही मंडळींच्या डोळयात खुपत होतेच. परंतु ते मुख्य न्यायाधीश होते, तोपर्यंत त्यांना लक्ष्य करण्यावर मर्यादा येत होत्या. त्यामुळे गोगोई निवृत्त झाले काय, त्यानंतर चार-पाच महिन्यांनी राष्ट्रपती नामनिर्देशित राज्यसभा खासदार म्हणून त्यांच्या नावाची घोषणा झाली काय, सर्व मंडळी जणू गोगोईंनी काही गंभीर गुन्हा केला असल्यासारखे त्यांच्यावर तुटूनच पडले. न्यायालयीन व्यवस्थेचं स्वातंत्र्य, स्वायत्तता, विश्वासार्हता कशी धोक्यात आली आहे, अयोध्या-रामजन्मभूमी प्रकरणी दिलेल्या निकालाचं हे बक्षीस आहे वगैरे. गोगोईंनी खासदारकीची शपथ घेईपर्यंत या सर्व गदारोळावर एक अवाक्षरही प्रतिक्रिया दिली नाही. गोगोई शपथ घेत असतानाही सभागृहात विरोधकांनी घोषणाबाजी केली. अखेर गोगोईंनी तोंड उघडलं आणि गेले अनेक दिवस बोंबाबोंब करणाऱ्या मंडळींची कानटोचणी केली.

''न्यायालयीन व्यवस्थेची स्वायत्तता आणि विश्वासार्हता प्रस्थापित करण्यासाठी जेमतेम अर्धा डझन लोकांचं न्यायव्यवस्थेवरील आज असलेलं वर्चस्व मोडून काढावं लागेल. आज हे मूठभर लोक न्यायव्यवस्था ही स्वतःची मक्तेदारी असल्याचं मानतात आणि त्यानुसार वागतात. कुणा न्यायाधीशाने आपल्याला हव्या त्या मार्गाने पावलं उचलली नाहीत, तर हे लोक त्याची यथेच्छ निंदानालस्ती करतात'' अशा शब्दांत न्या. गोगोई यांनी न्यायव्यवस्थेतील 'लॉबी'चा पर्दाफाश केला. गोगोई यांच्यापूर्वीचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात जानेवारी 2018मध्ये सर्वोच्च न्यायालयातील काही वरिष्ठ न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेत अनेक आरोप करत देशभरात एकच खळबळ उडवली होती. जे. चेल्लमेश्वर, एम.बी. लोकूर, कुरियन जोसेफ आदींसह रंजन गोगोईदेखील त्यामध्ये होते. गोगोई आज त्याबद्दल म्हणतात, ''मी या पत्रकार परिषदेला गेलो, त्यामुळे मी या लॉबीचा लाडका बनलो होतो. परंतु मी नेहमीच माझ्या सदसद्विवेकबुध्दीला जे पटलं, त्यानुसार वागलो. या लॉबीला एखाद्या न्यायाधीशाने आपल्या मर्जीनुसारच वागावं अशी अपेक्षा असते आणि तरच ते त्याला निष्पक्षपाती, स्वतंत्र विचार करणारा न्यायाधीश वगैरे प्रमाणपत्र देतात. अयोध्या निकाल हा 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाने एकमताने दिलेला निर्णय होता. राफेल प्रकरणीही 3 सदस्यीय घटनापीठाचा एकमताचा निर्णय होता'' अशी यादीच सांगत माझ्यावर टीका करता करता ही मंडळी संपूर्ण न्यायव्यवस्थेवरच ओरखडे उमटवत असल्याचं गोगोई यांनी सांगितलं. गोगोई यांची ही टीका, हे प्रत्युत्तर कुणाला उद्देशून होतं, ही 'लॉबी' म्हणजे नेमके कोण, हे सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजाबाबत माहिती असणाऱ्यांच्या, भारतीय न्यायव्यवस्थेचे अभ्यासक असणाऱ्यांच्या आणि नवी दिल्लीतील उच्चभ्रू वर्तुळाची माहिती असणाऱ्यांच्या लगेच लक्षात येईल आणि मग गोगोई यांची ही टीका, खदखद रास्त का आहे, हेही लक्षात येईल.

ही तीच मंडळी आहेत, जी स्वतःला डावे, पुरोगामी, सेक्युलर आणि बुध्दिवादी वगैरे म्हणवून घेतात. देशात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीकडे ठरावीक चश्म्यातूनच पाहतात आणि त्यानुसारच व्यक्त होतात. 'आम्ही म्हणू ते धोरण आणि आम्ही बांधू ते तोरण' अशीच यांची गुर्मी असते. अर्थात, अशी मंडळी ठिकठिकाणी आढळतील. परंतु त्यातही शक्तिशाली अशी, महत्त्वाच्या जागा अडवून फणा काढून बसलेली आणि न्यायव्यवस्थेलाही वाकवू पाहणारी अशी ही मंडळी म्हणजेच न्या. गोगोई यांच्या शब्दांतील मूठभर लोकांची 'लॉबी' होय. यातील काही जण मोठे वकील आहेत, काही पत्रकार आहेत, तर काही नुसतेच स्वतःला अभ्यासक, विचारवंत वगैरे म्हणवून घेतात. याच वर्गवारीत मोडणाऱ्या एका ज्येष्ठ पत्रकाराने अलीकडेच एका दैनिकात गोगोईंवर टीका करणारा लेख लिहून न्यायालयात सीलबंद पाकिटातून पुरावा सादर करण्याच्या पध्दतीवर वाट्टेल त्या भाषेत अकलेचे तारे तोडले आहेत. 'पाकिटातून पुरावे येतात का आणखी काय येतं, कुणास ठाऊक' अशी या लेखातील भाषा. गोगोईंनी जे वास्तव सांगितलं, ते ठळकपणे अधोरेखित करणारा पुरावा म्हणून हा लेख ग्राह्य धरता येईल! एखादा निर्णय आपल्या मनाविरुध्द झाला की त्या व्यक्तिविरोधात बोलताना वाट्टेल ती पातळी गाठायची, ही अंगवळणी पडलेली सवयच आहे. इतकी वर्षं या देशात हे सगळं खपत होतं, त्याला उलट 'खतपाणी'ही मिळत होतं. गेली सहा-सात वर्षं त्या खतपाण्याचा पुरवठा बंद झाल्याने आणि उलट तडाखेच अधिक मिळू लागल्याने ती आगतिकता, ते नैराश्य असं उफाळून येतं आहे. गोगोईंच्या निमित्तानेही ती पुन्हा एकदा उफाळून आली आहे. मात्र या वेळी गाठ थेट सर्वोच्च न्यायालयाच्या माजी मुख्य न्यायाधीशांशी असल्याने 'अंगावर आल्यास शिंगावर घेऊन' उत्तर मिळतं आहे, इतकंच.