कोरोनाचं जगभरातलं आर्थिक थैमान

विवेक मराठी    27-Mar-2020
Total Views |

आपल्या डोळ्यांनाही दिसणारा हा सूक्ष्मातिसूक्ष्म विषाणू जगभर अत्यंत वेगाने पसरत आहे आणि आपल्या आरोग्यावर होऊ शकणार्या परिणामांपेक्षाही अत्यंत गंभीर परिणाम जगभरातल्या अर्थव्यवस्थांवर करत आहे. कोरोनाच्या सार्वत्रिक साथीच्या जगभरातल्या अर्थव्यवस्थेवर होत असलेल्या आणि होऊ शकणार्या परिणामांचा वेध घ्यायचा प्रयत्न ह्या लेखामध्ये करत आहे.


coronavirus and economy23

 

गेल्या आठवड्यात कामासाठी लंडनला गेलो होतो. त्या आठवड्यात भारत आणि ब्रिटन दोन्हीकडे कोरोनाचा उद्रेक वाढायला लागल्याने काम अर्धवट सोडून शुक्रवारी तातडीने भारतात परत आलो. शुक्रवारी परत येताना लंडनच्या हीथ्रो ह्या जगातल्या सर्वाधिक वाहतुकीच्या आणि नेहमी गजबजलेल्या असलेल्या विमानतळावर अक्षरशः शुकशुकाट होता. ज्या गोष्टींना नेहमी तासनतास लागतात असे चेकइन आणि सिक्युरिटी चेकचे सोपस्कार अक्षरशः दहा मिनिटांत पार पडले. जगभरातली अनेक विमानं रद्द होत होती. अनेक देश आपल्या देशांमध्ये परदेशी नागरिकांना यायला मज्जाव करत होते. अक्षरशः आदल्याच दिवशी भारताने सर्व परदेशी नागरिकांचे व्हिसा रद्द केले होते. अमेरिकेने युरोपमधून येणार्या विमानांना बंदी घातली होती. एकुणात विमानतळावर अत्यंत नैराश्याचं आणि अनिश्चिततेचं वातावरण होतं.

त्याच शुक्रवारी जगभरातले शेअर बाजार भीषण पद्धतीने कोसळले. अमेरिकन शेअर निर्देशांक डाऊ जोन्स आणि भारताचा सेन्सेक्स ह्यांची इतिहासातली एका दिवसातली सगळ्यांत मोठी पडझड झाली. त्याआधीही आठ-पंधरा दिवस बाजार कोसळतच होते. वर्षाच्या सुरुवातीच्या तुलनेत जगभरातील बहुसंख्य शेअर बाजार निर्देशांक किमान 25% ते 30% खाली आले आहेत.

हे सारे अर्थातच कोरोनाच्या पँडेमिक म्हणजे जगद्य्वापी सार्वत्रिक साथीच्या ह्या आठवड्यात दिसलेल्या जगभरातल्या आर्थिक परिणामांची एक झलक. आपल्या डोळ्यांनाही दिसणारा हा सूक्ष्मातिसूक्ष्म विषाणू जगभर अत्यंत वेगाने पसरत आहे आणि आपल्या आरोग्यावर होऊ शकणार्या परिणामांपेक्षाही अत्यंत गंभीर परिणाम जगभरातल्या अर्थव्यवस्थांवर करत आहे. कोरोनाच्या सार्वत्रिक साथीच्या जगभरातल्या अर्थव्यवस्थेवर होत असलेल्या आणि होऊ शकणार्या परिणामांचा वेध घ्यायचा प्रयत्न ह्या लेखामध्ये करत आहे.

चीनच्या वुहान प्रांतामध्ये ह्या विषाणूचा सर्वांत प्रथम उद्रेक झाला आणि तिथून तो जगभर पसरत गेला, हे आपण सगळे जाणतोच. चीनपाठोपाठ इटली, स्पेन, इराण, ब्रिटन, अमेरिका या देशांत आणि आता भारतातही तो वेगाने पसरत आहे हेही आपल्याला माहीत आहे. अन त्या विषाणूशी सामना करू शकेल अशी रामबाण लस किंवा औषध अद्याप आपल्याजवळ नाही, म्हणून त्याविषयी आपल्या मनात अफाट भीती आहे हेही आपल्याला माहीत आहे. खरं तर आपल्याला वातावरण बदलल्यावर होणारे सर्दी, खोकला, ताप (फ्लू) हे आजार कोणत्या ना कोणत्या व्हायरसमुळेच होतात, अनेक वर्षं होत आले आहेत. पण त्यांना आपण फारसं घाबरत नाही, कारण ते सर्दी, खोकला, ताप आपला जीव घेत नाहीत. हा कोरोना व्हायरस (खरं तर कोव्हिड 19) हा जरा जास्त चिवट आणि जास्त धोकादायक आहे. आपली प्रतिकारशक्ती कमी असेल, तर तो आपला जीवही घेऊ शकतो. आणि म्हणूनच जगभरात ह्याविषयी प्रचंड घबराट पसरली आहे. ही साथ आटोक्यात आणण्यासाठी (किंवा नियंत्रणाबाहेर जाऊ नये म्हणून) जगभरातली सरकारं अनेक उपाययोजना करत आहे. त्या उपाययोजनांचा आपल्या रोजच्या आयुष्यावर आणि व्यवसाय-धंद्यांवर मोठा परिणाम होतो आहे.

कोरोनाचा प्रसार रोखण्याच्या उपायांमधले दोन प्रमुख उपाय म्हणजे प्रवासावर बंदी किंवा निर्बंध आणि सामाजिक विलगीकरण (social distancing) हे सुचवले आणि केले जात आहेत. प्रवासावर बंदी घालून की इतर देशातल्या, शहरातल्या कोरोनाग्रस्त व्यक्ती आपल्या देशात / शहरात येणं थांबवलं जातं. तर सामाजिक विलगीकरण करून आपल्या देशातल्या शहरातल्या लोकांचं एकमेकांत मिसळणं कमीत कमी करून कोरोनाचा स्थानिक प्रसाराचा वेग कमी करता येतो. जगभरात जिथे जिथे कोरोना पोहोचला आहे, तिथले देश ह्या दोन्ही उपायांची अंमलबजावणी करत आहेत.

1. प्रवासावरील बंदी किवा निर्बंध : भारताने सर्व परदेशी नागरिकांचे व्हिसा रद्द केलेत आणि सुमारे 14 देशांमधून भारतात विमानाने येण्यास बंदी घातली आहे. अमेरिकेसह इतर अनेक देशांनी अशाच प्रकारची बंदी घातली आहे. ह्याचा सगळ्यांत मोठा फटका ट्रॅव्हल आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्राला बसतो आहे. अनेक विमान कंपन्या दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहेत किंवा लवकरच जातील. पर्यटनावर अवलंबून असलेल्या देशांना किंवा शहरांना मोठा आर्थिक फटका बसायला सुरुवात झाली आहे. जगभरातल्या मोठ्या कॉन्फरन्सेस, इव्हेंट्स, प्रदर्शने रद्द होत असल्याने, त्या क्षेत्रात आणि हॉटेल्स संबंधित क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी निर्माण होईल असं दिसत आहे. थोडक्यात, ट्रॅव्हल, टूरिझम, हॉस्पिटॅलिटी आणि इव्हेंट्स-कॉन्फरन्सेस ह्या क्षेत्रांमध्ये जगभर होत असलेला अब्जावधी रुपयांचा व्यवहार काही काळ ठप्प होण्याची आणि ह्या क्षेत्रांतील लाखो लोक काही काळासाठी बेरोजगार होण्याची दाट शक्यता दिसत आहे.

2. सामाजिक विलगीकरण - लोकांनी एकमेकांमध्ये मिसळू नये म्हणून अनेक प्रकारचे उपाय केले जात आहेत. ह्यामध्ये स्थानिक दुकानं, बाजारपेठा, मॉल्स, रेस्टॉरंट्स इत्यादी काही काळासाठी बंद ठेवण्यापासून ते ज्यांना शक्य आहे त्यांनी ऑफिसेसमध्ये जाता घरून काम करायला सांगेपर्यंत अनेक उपाय केले जात आहेत. स्थानिक बाजारपेठा बंद केल्याचे तात्पुरते आर्थिक परिणाम त्या त्या शहरांमध्ये होत आहेत. ऑफिसेस बंद केल्यामुळे किंवा लोकांनी भेटीगाठी (व्यवसायानिमित्तच्याही) कमी किंवा बंद केल्याने सर्वच प्रकारच्या छोट्या-मोठ्या व्यवसायांना मोठा फटका बसत आहे. किमान एखाद-दोन महिने ही परिस्थिती राहील, असा अंदाज आहे.

एकुणात, काही इंडस्ट्रीजमध्ये व्यवहार पूर्णपणे ठप्प होणे आणि इतर बहुसंख्य इंडस्ट्रीजमध्ये रोजच्या कामाची, व्यवहारांची प्रचंड उलथापालथ होणे हा कोरोनाचा सर्वत्र होत असलेला परिणाम आहे. ह्या दोन्हीबाबतीत सगळ्यांत मोठी भीती अनिश्चिततेची आहे. कोरोनाशी ह्या प्रकारची लढाई किती काळ चालू राहील हे कोणीच ठामपणे सांगू शकत नाहीये. तीन-चार महिन्यांपासून ते कदाचित वर्षभर हे सुरू राहू शकेल अशी मुख्य भीती आहे. आणि इतकी प्रचंड उलथापालथ वर्षभर सुरू राहिली, तर त्याचा आपल्या अर्थव्यवस्थांवर नेमका काय परिणाम होईल, ह्याचं भाकित कोणी करू शकत नाहीये.

ह्याच अनिश्चिततेचं प्रतिबिंब जगभरातल्या शेअर बाजारांमध्ये पडलेलं दिसत आहे. ह्या उलथापालथीमुळे आणि अनिश्चिततेमुळे जगभरातल्या गुंतवणूकदारांनी विक्रीचा जोर लावला आहे, अन शेअर्सचे भाव पर्यायाने निर्देशांक जोरदार कोसळत आहेत.

आगीततेल

याच सुमारास रशिया आणि सौदी अरेबिया ह्या दोन प्रमुख तेल उत्पादक राष्ट्रांमध्ये क्रूड ऑइलच्या उत्पादन आणि दरांवरून युद्ध पेटलं आहे. रशियाने आपल्या तेल उत्पादनाचा वेग कमी करण्यास नकार दिला आणि तेलाचे जागतिक बाजारातले भाव कोसळायला लागले. त्याला उत्तर म्हणून सौदी अरेबियानेही तेच केलं अन भाव अधिकच कोसळले. जगभर कमी होत चाललेली वाहतूक, त्यातून क्रूड ऑइलची कमी होत चाललेली मागणी आणि ह्या दोन देशांनी वाढवलेलं तेलाचं उत्पादन ह्याने जागतिक बाजारात क्रूड ऑइलची किंमत एका बॅरलला 70 डॉलर वरून 25 डॉलरला येऊन पोहोचली. क्रूड ऑइल निर्यात करणार्या मध्यपूर्वेतील देशांना ह्याचा मोठा फटका बसत आहे. (भारतासारख्या क्रूड ऑइल आयात करणार्या देशांना मात्र ह्याचा फायदा होणार आहे.)

पुढे काय?

शेअर बाजारातली गुंतवणूक आणि व्यवहार हे भविष्यातील नफ्याच्या आशेवर सुरू असतात. कोरोनाच्या थैमानामुळे नेमकं किती नुकसान होईल अन काय उलथापालथ होईल, ह्याचा अंदाज येत नाही. सर्वच गुंतवणूकदारांचा भविष्याविषयीचा दृष्टीकोन नकारात्मक रहाण्याची शक्यता आहे अन तो तसा राहील, तोपर्यंत शेअर बाजार आणखी कोसळत रहातील. ह्या परिस्थितीमध्ये दोन गोष्टींमुळे सुधारणा होऊ शकते.

1. कोरोनाची सध्याची साथ आटोक्यात येणं - चीनमधील कोरोनाची साथ आटोक्यात येऊ लागल्याची लक्षणं दिसत आहेत. नवे रुग्ण सापडण्याचं प्रमाण नगण्य झालं आहे, जुने रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढत चाललं आहे. चीनमधला इतर देशांमधला ह्या साथीच्या प्रसार आणि आटोक्यात आणण्याच्या पद्धतीचा डेटा इतरांना मिळत आहे. त्याचा अभ्यास करून साथ नेमकी कशी आटोक्यात आणता येते त्याला किती काळ लागतो हे स्पष्ट होत चाललं आहे. ह्यावर अधिक स्पष्टता येत जाईल, तशी शेअर बाजारातली अनिश्चिततेची भावना कमी होत जाईल.

2. कोरोनावरचा निश्चित उपाय किंवा लस सापडणं - जगभर ह्यावर संशोधन सुरू आहे. काही सकारात्मक बातम्याही यायला लागल्या आहेत. कोरोनावर पक्का उपाय सापडल्याचं जेव्हा निश्चित होईल, तेव्हा त्याविषयीची जगभरात असलेली भीती कमी होईल अन आर्थिक व्यवहार वातावरण सुधारण्यास त्याचा फायदा होईल.

शेवटी महत्त्वाचं

भारतासाठी पुढचे चार ते सहा आठवडे अत्यंत महत्त्वाचे आहेत. कोरोनाची साथ आटोक्यात ठेवण्यासाठी अन त्यावर मात करण्यासाठी आपलं केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनं युद्धपातळीवर काम करत आहेत. आपण शासनाला सर्व पातळ्यांवर सहकार्य केलं आणि शासन करत असलेल्या उपाययोजनांमध्ये पूर्णपणे सहभागी झालो, तरच कोरोनाचा उद्रेक आटोक्यात ठेवू शकणार आहोत. तो उद्रेक आपण आटोक्यात ठेवला, तर अर्थव्यवस्था आणि पर्यायाने शेअर बाजारावर होत असलेला परिणाम आपण मर्यादित ठेवू शकू. आपण कोरोनाचा देशव्यापी उद्रेक होऊ दिला नाही, तर त्याचं सध्याचं अर्थव्यवस्थेत होत असलेलं थैमान आपण थांबवू शकू. आपण सगळ्यांनी मिळून सरकारबरोबर काम केलं, तरच हे घडू शकेल.

(लेखक मुक्तस्रोत तंत्रज्ञानामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणारे प्रशिक्षक आणि वक्ते आहेत)