संकल्प नव्या भारतासाठी

विवेक मराठी    29-Mar-2020
Total Views |
***राजेश मंडलिक***
 

कोरोनाची साथ ओसरल्यानंतर जग वेगळं रूप धारण करेल, यात शंका नाही. ह्या विषाणूबाबत चीनची भूमिका संदिग्ध आहे. आंतरराष्ट्रीय षडयंत्राच्या ज्या सुरस कथा ऐकायला येत आहेत, त्यात किती तथ्य आहे, यावर भाष्य करण्याइतका माझा अभ्यास नाही. पण मी एक मात्र ठामपणे म्हणू शकतो की जरी हे जैविक शस्त्र म्हणून बनवलं नसेल, तरीही चीन या प्रकरणात हात झटकू शकत नाही. त्या विषाणूचे परिणाम काय होतील याची चीनला कल्पना नसणं हा तकलादू भोंदू भाबडा आशावाद जरी ग्राह्य धरला, तरी सारं जग मात्र चीनला आरोपीच्या बॉक्समध्ये उभं बघतोय. आणि इथे भारताला संधी आहे.

 
आजच्या मितीला कोरोना हा विषय निघाला की दुसरा शब्द मनात येतो, तो म्हणजे चीन. एकेकाळी अत्यंत मागास असलेल्या या देशाने नव्वदीत कात टाकायला सुरुवात केली आणि बघता बघता गेल्या तीस वर्षांत तो एक प्रबळ महासत्ता म्हणून नावारूपाला आला. भौतिकतेच्या कसोटीवर त्याने केलेली प्रगती ही नेत्रदीपक आहेच आणि अचंबित करणारीसुद्धा.

Coronavirus_1   

पण या सगळ्या प्रगतीला एक दुसरी काळी बाजू आहे आणि ती म्हणजे तिथलं कम्युनिस्ट शासन, त्यांनी वेगवगेळ्या पद्धतीने अवलंबलेली मानवी मूल्यांना हरताळ फासणारी त्यांची कार्यपद्धती. व्यवसायाच्या निमित्ताने मला दोन वेळा चीनला जाण्याची संधी मिळाली. अमेरिका, युरोप किंवा तैवानच्या मानाने माझ्या चीनला जास्त चकरा नाही झाल्या. पण चिनी व्यावसायिकांशी संभाषण मात्र खूपदा करावं लागलं. आणि खोटं कशाला सांगू, या संपन्न देशातील अनुभव पाहून माझ्या पदरी घोर निराशा पडली. ती का पडली, कशामुळे मी या देशाबद्दल फार आग्रही नाही याचा ऊहापोह करण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात मी काही खूप मोठा उद्योजक नाहीये, त्यामुळे माझ्या मताला फारशी किंमत नाही हे मला माहीत आहे आणि काहीशे लोकांना भेटल्यावर पूर्ण देशाचा अंदाज बांधणं चुकीचं हेही कळतं. पण या काहीशे व्यावसायिकांमध्ये किमान एखादी तरी आदर्श केस निघावी.. मात्र तिथेही निराशाच पदरी आली.

 

चीनच्या आणि आपल्या उत्पादनाचा जर तौलनिक अभ्यास केला, तर तुमच्या लक्षात येईल की चीन हा लो कॉस्ट आणि हाय व्हॉल्यूम अशी उत्पादनं आपल्याकडे पाठवतो. आणखी एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की यांचा दर्जा जर खराब असेल - आणि तो बहुतेकदा असतोच, तर त्याविरुद्ध दाद मारायला काही यंत्रणा नाहीये. पण मुळात त्याची किंमत इतकी कमी असते की त्याविरुद्ध आवाज उठवण्याची आपली इच्छा होत नाही. मुख्य म्हणजे त्या खराब दर्जामुळे आपल्या दैनंदिन जीवनात फार मोठं नुकसान होत नाही आणि त्यामुळे आपण बेफिकीर राहतो. २००५मध्ये मी चीनमध्ये एक लगेज आणि ब्लेझर घेतला होता. लगेज तर इथे येईपर्यंत तुटलं आणि तो स्वस्त ब्लेझर इतक्या भंगार दर्जाचा होता की मॉन्यूमेन्ट म्हणून लटकवून ठेवला आहे.


ह्या उलट आपला भारत देश
. लो व्हॉल्यूम पण हाय कॉस्ट आणि दर्जा मात्र आंतरराष्ट्रीय स्तराचा, अशा उत्पादनांमध्ये जगभर लोकप्रिय आहे. याचं मोठं उदाहरण म्हणजे, वाहन उद्योग. दशकापूर्वी मोठी बातमी आली होती की या क्षेत्रात चिनी उत्पादक येणार म्हणून. पण भारतीय उद्योजकांच्या कल्पकतेसमोर आणि राजकीय इच्छाशक्तीसमोर चीन भारतात प्रवेशसुद्धा करू शकत नाही. इतकंच नाही, तर वाहन उद्योगामध्ये लागणाऱ्या सुट्या भागांमध्येसुद्धा भारतातील उत्पादकांनी आपल्या गुणवत्तेच्या जोरावर वरचश्मा टिकवून ठेवला आहे.


Coronavirus_1  
मी ज्या उद्योग क्षेत्राचं प्रतिनिधित्व करतो
, ते आहे मशीन टूल क्षेत्र. अतिशय भांडवलप्रधान क्षेत्र. या क्षेत्रातसुद्धा चिनी कंपन्या शिरकाव नाही करू शकल्या. त्या देशाचा अंतर्गत वापर हा जरी एक मुद्दा असला, तरी चिनी उत्पादनांचा अत्यंत खराब दर्जा हा एक मोठा मुद्दा आहे.


या चिनी लोकांची सगळ्यात बेकार गोष्ट म्हणजे अतिशय खालच्या पातळीची विश्वासार्हता
. एका पंजाबी उद्योजकाला चिनी कंपनीने इलेक्ट्रिक स्कूटरच्या व्यवहारामध्ये कोट्यवधी रुपयांना कसा गंडा घातला, याची सुरस कथा आहे. माझ्या अत्यंत जवळच्या मित्राला एका निर्जन गावात उद्योग करार करण्यासाठी नेलं आणि धाकदपटशा करून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. अक्षरश: जीव वाचवून पळून यावं लागलं होतं. मीसुद्धा तीसेक चिनी व्यावसायिकांशी संवाद साधला आहे. इतक्या टीचभर लोकांशी बोलून सगळ्या देशाचा अंदाज बांधणं चुकीचं, हे कळतं मला, पण मी ज्यांना भेटलो त्यातले बहुतेक सुमार बुद्धिमत्तेचे आणि आढ्यताखोर असे वाटले.


चिनी लोकांनी कसं गंडवलं याच्या आणखी चार
-पाच कथा माझ्या पोतडीत आहेत. दुसऱ्यांच्या बौद्धिक संपदेचा आदर आणि आर्थिक शिस्त नावाचा प्रकार या चिनी मंडळींच्या जवळपासही फिरकत नाही. आपल्याकडे जी उत्पादनं पाठवली जातात, ती खूप कमी नफ्यावर बनतात. पण थोडंही काही बिघडलं की ते दिवाळखोरी घोषित करतात. पण ती केल्यावर त्यांना वाळीत टाकलं जात नाही, तर तिथला राजकीय पाठबळ आणि बँकिंग प्रणाली त्यांना परत दिवाळखोरी करण्यासाठी उभं करते.


आपल्याला जी चांगली चिनी उत्पादनं मिळतात
, ती पाश्चात्त्य आस्थापनेखाली बनवली जातात. त्याचं सगळ्यात भारी उदाहरण म्हणजे Apple. फॉक्सकोन नावाच्या तैवानी कंत्राटी उत्पादकाबरोबर अॅपलचं व्यवसाय प्रारूप (बिझनेस मॉडेल) बेजोड आहे.


अत्यंत राक्षसी महत्त्वाकांक्षेने झपाटलेल्या चीनला मानवताविरोधी कामपद्धतीची काळी किनार आहे
. त्यांच्या एकुणात कार्मिक संस्कृतीपेक्षा आपल्या भारतात उन्नत मान व्हावी अशी वस्तुस्थिती आहे.

थोडक्यात सांगायचं, तर चीन जसा आहे तसाच राहिला तर ते त्यांच्यासाठी कबर खणत आहेत. आणि तसं नाही झालं तरी त्यांची तथाकथित डोळे दिपवणारी प्रगती त्यांनाच लखलाभ.


Coronavirus_1  
ही झाली चीनची नकारात्मक बाजू
. त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीवरून काही चांगल्या गोष्टी असाव्यात. अंदाज तर नक्कीच बांधू शकतो. सगळ्यात मुख्य म्हणजे ते एका गोष्टीने झपाटले आहेत आणि ते म्हणजे जगात अव्वल नंबर होणे.. तेही एका कुठल्या क्षेत्रात नाही, तर जी काही क्षेत्रे आहेत, तिथे सगळीकडे पहिला नंबर. उत्पादन, सेवा, बांधकाम, अंतराळ, रेल्वे, खेळ, बायोटेक्नॉलॉजी, लष्कर.. तुम्ही नाव घ्या आणि त्या क्षेत्रात त्यांना जगात अव्वल व्हायचं आहे. मग त्यातून 'जगातली सगळ्यात उंच इमारत' किंवा '५० मजली इमारत अकरा दिवसात' किंवा 'जगातली सगळ्यात वेगवान रेल्वे' किंवा 'ऑलिम्पिकमध्ये सगळ्यात जास्त पदकं' अशा प्रकारच्या सगळ्या बातम्या चीनच्या संदर्भांत आजकाल आपण ऐकतो. तिथलं स्वनियुक्त सरकार ही भावना लोकांच्या गळ्यात अडकवण्यात कमालीचं यशस्वी झालं आहे. त्यामुळे चीनमधील प्रत्येक स्त्री-पुरुष हे व्यापारउदीम वाढवण्यासाठी कायम झटत असतात. मग त्यात 'वर्क एथिक्स' वगैरे ते पासंगालाही वापरत नाहीत. येनकेनप्रकारेण, किंवा इंग्लिशमध्ये बाय हूक ऑर क्रूक असं म्हणतात, त्यांना जगात वरचशमा प्रस्थापित करायचा आहे, हे जाणवतं.


हा कोरोना व्हायरस येण्याच्या अगोदरच अमेरिका आणि चीन यांच्यात व्यापारयुद्ध चालू झालं होतं
. त्यातूनच अमेरिकेने चीनच्या मालावर २५% आयात शुल्क लावलं. त्याने चीन बिथरला. तिथला बराचसा व्यवसाय इतर आग्नेय आशियाई देशांत गेला. भारतालाही त्याचा फायदा झाला. ह्या अशा व्यापारयुद्धाच्या मध्येच ही कोरोनाची भानगड उत्पन्न झाली.


कोरोनाची साथ ओसरल्यानंतर जग वेगळं रूप धारण करेल
, यात शंका नाही. ह्या विषाणूबाबत चीनची भूमिका संदिग्ध आहे. आंतरराष्ट्रीय षडयंत्राच्या ज्या सुरस कथा ऐकायला येत आहेत, त्यात किती तथ्य आहे, यावर भाष्य करण्याइतका माझा अभ्यास नाही. पण मी एक मात्र ठामपणे म्हणू शकतो की जरी हे जैविक शस्त्र म्हणून बनवलं नसेल, तरीही चीन या प्रकरणात हात झटकू शकत नाही. त्या विषाणूचे परिणाम काय होतील याची चीनला कल्पना नसणं हा तकलादू भोंदू भाबडा आशावाद जरी ग्राह्य धरला, तरी सारं जग मात्र चीनला आरोपीच्या बॉक्समध्ये उभं बघतोय. आणि इथे भारताला संधी आहे.


चीनला पर्याय म्हणून अनेक देश उभे राहणार आहेत. मेक्सिको, इंडोनेशिया, आफ्रिकन प्रदेश, पूर्व युरोप आणि भारत हे प्रबळ दावेदार असावेत असं मला वाटतं. आणि भारताने त्याचा पूर्ण लाभ घ्यावा. ही संधी का आहे याची काही तार्किक कारणं आहेत.

. भारताची शिक्षणपद्धती कितीही विवादास्पद असली, तरी मनुष्यबळ उपलब्ध होण्याइतकी नक्कीच चांगली आहे.

. आपण इंग्लिश भाषेचा वापर मोठ्या प्रमाणात करतो.

. मेक्सिकोसारखी गुन्हेगारी संस्कृती नाहीये.

. कितीही वाद असले तरी लोकशाही आहे.

. चीनच्या मानाने आपण मूल्याधिष्ठित कार्मिक संस्कृती वर बऱ्यापैकी विश्वास ठेवतो.

. आपल्या अकाउंटिंग पद्धती पाश्चात्य देशांनी मान्य केल्या आहेत.

. कामाची आवड आहे. आठवड्याला ४८ तास काम करणारा आपला एकमेव देश असावा.

. पायाभूत सुविधांच्या क्षेत्रामध्ये आपण संवादसंपर्क (कम्युनिकेशन) या क्षेत्रात चांगली मुसंडी मारली आहे आणि आंतरराष्ट्रीय व्यवसायात त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

. आपला श्रम-खर्च (लेबर कॉस्ट) आजही बऱ्यापैकी कमी आहे. सध्या चीनच्या निम्मा आहे.

१०. फ्रुगल पद्धतीने - म्हणजे काटकसरीने काम करायची आपल्याला सवय.

 

या गोष्टींमुळे चीनला पर्याय म्हणून आंतरराष्ट्रीय समुदायात आपल्या भारत देशाला प्राधान्य मिळेल असा मला विश्वास आहे. अर्थात आपले काही कच्चे दुवेही आहेत. त्यावर एक राष्ट्र म्हणून, समाज म्हणून आपण जर काम केलं तर आपली विश्वासार्हता आणखी वाढेल. ते मुद्दे खालीलप्रमाणे -

. आपल्याकडे व्यवसायपूरक प्रणाली अजूनही तयार नाही आहे. यामध्ये बँकिंग प्रणाली आणि कस्टम्स याचा प्रामुख्याने समावेश होतो. कररचना हा प्रश्न जीएसटीमुळे बऱ्यापैकी सुटला आहे.

. पायाभूत सुविधांमध्ये अजूनही सुधारणेला खूप वाव आहे. वीज आणि दळणवळण यात आपण खूप मागे आहोत. रस्ते आणि रेल्वे मार्ग यात प्रचंड काम करण्याची गरज आहे. रस्ते ही शासनाची बाब असली, तरी एक समाज म्हणून कॉन्ट्रॅक्टर लोकांनी इमानेइतबारे काम करून चांगल्या प्रतीचे रस्ते बनवण्याचं उत्तरदायित्व आपल्या अंगावर घ्यावं.

. स्वच्छतेचा अभाव हा एक खूप मोठा दुर्गुण आहे. स्वच्छ इंडिया ही फक्त घोषणा न राहता आपली जीवन प्रणाली बनावी.

. चीनपेक्षा आपली विश्वासार्हता चांगली असली, तरी त्यात सुधारणेला वाव आहे.

. आपण मूलभूत संशोधन करत नाही.

. एक समाज म्हणून आपण मूल्याधिष्ठित प्रणाली निर्माण करू शकलो नाही. त्यामुळे एक ब्रँड म्हणून आपला देश खूप मागे आहे.

एकंदरीत वरील आणि आणखी काही मुद्दे असतील, तर त्यावर आपण जर काम केलं तर भारत एक सशक्त राष्ट्र म्हणून पुढील दशकात वाटचाल करेल असं वाटतं. चीनइतकी राक्षसी महत्त्वाकांक्षा आपल्याला नको आहे, पण भांडवलवाद आणि समाजवाद याची योग्य सांगड घालून आपल्या देशातील मोठा प्रवर्ग दारिद्र्यरेषेच्या वर ओढण्याची संधी आपल्याला आहे, याबाबत मला शंका नाही. श्रीमंत लोक जास्त श्रीमंत झाले तर देशाची प्रगती झाली, असा एक गैरसमज आहे. याउलट एक देश प्रगतिपथावर तेव्हाच जातो, जेव्हा गरीब प्रवर्ग मध्यमवर्गात ओढला जातो.

कोरोनाचं संकट नक्कीच टळेल, त्यासाठी तुम्हा सगळ्यांना बळ येवो ही सदिच्छा आणि मुख्य म्हणजे त्यानंतर ज्या संधी उपलब्ध होणार आहेत, त्यावर काम करून आपला देश सुदृढ बनवू, हा संकल्प करू या.

- राजेश मंडलिक