‘वेद’विभूषण - डॉ. भाग्यलता पाटसकर

विवेक मराठी    03-Mar-2020
Total Views |

पुण्यातीलवैदिक संशोधन मंडळही 1927 साली स्थापन झालेली अनेक दिग्गजांचं योगदान - वारसा लाभलेली संस्था. या संस्थेच्या नेतृत्वाची धुरा संचालक म्हणून ज्येष्ठ वेद-संस्कृत अभ्यासक डॉ. भाग्यलता पाटसकर गेली अनेक वर्षे सांभाळत आहेत. या संस्थेच्या कार्याविषयी संस्थेतील डॉ. पाटसकर यांच्या आजवरच्या वाटचालीविषयी घेतलेली त्यांची विशेष मुलाखत..


ved_1  H x W: 0 

 

वैदिक संशोधन मंडळ ही जवळपास 90 वर्षांहून अधिक इतिहास असलेली संस्था आहे. वि.का. राजवाडे, .चिं. केळकर, दत्तो वामन पोतदार, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी अशा दिग्गजांचं योगदान या संस्थेला लाभलं आहे. हा असा मोठा वारसा लाभलेल्या संस्थेची जबाबदारी सांभाळताना कसं वाटतं? येथील तुमची वाटचाल कशी घडली?

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/
 

या संस्थेची जबाबदारी सांभाळण्याची संधी मिळणं हे मी माझ्या आयुष्यातील परमोच्च भाग्य समजते. 1927 साली संस्थेची स्थापना झाली आणि अनेक मान्यवर दिग्गजांनी ही संस्था लोकमान्य टिळकांच्या स्मरणार्थ स्थापन केली. यामागील त्यांचा उद्देश प्रामाणिक आणिव्हिजनरीम्हणावा असा होता. तोपर्यंत वेदाध्ययन हे केवळ वेदपाठशाळांतून होत असे, जिथे सर्वसामान्यांना पोहोचणंही अवघड होतं. त्यामुळे पुस्तकरूपाने वेद, किमान वेदाक्षरं जरी उपलब्ध झाली तरी ती सर्वांपर्यंत पोहोचू शकतील, या विचारांनी वैदिक संशोधन मंडळ स्थापन झालं. मी संस्थेत जेव्हा आले, तेव्हा ऋग्वेदाच्या सायणभाष्यासह तैत्तरीय संहितेच्या मूळ भाष्याचं प्रकाशन झालं होतं. काण्वसंहितेच्या दोन्ही भाष्यांचं प्रकाशन झालं होतं. संस्थेच्या आतापर्यंतच्या वाटचालीवरून असं लक्षात येईल की ही संस्था केवळ वेद आणि वेदासाठीच वाहिलेली आहे. वेदात ज्याला श्रौतयज्ञ म्हणतात, त्याचा इथे विशेष अभ्यास चालतो. ही दोन्ही क्षेत्रं आजच्या भाषेत ज्यालापुरुषसत्ताकम्हणतात, अशी आहेत. पण मला हे सांगताना अत्यंत अभिमान वाटतो की, मला पुढे आणण्यात, प्रोत्साहन देण्यात ज्यांना एरवी बाहेर सनातनी वा प्रतिगामी मानलं जातं त्या सर्व आदरणीयगुरुजीलोकांचा सिंहाचा वाटा आहे. श्रौतात ज्यांचं मोठं नाव आहे, ते नाना काळे, सोमैय्याजी, सेलूकर महाराज, सुधाकर कुलकर्णी, पळसकर गुरुजी अशी अनेक मंडळी माझ्यापाठी उभी राहिली. गंमत म्हणजे, तोपर्यंत मला स्वतःला सत्यनारायणाच्या पूजेपलीकडे कोणत्याही कर्माची माहिती नव्हती. या सर्व मंडळींनी मला याची सर्व ज्ञान, माहिती, बारकावे सढळ हस्ते दिले. माझी पोतडी त्यामुळे समृद्ध होत गेली. त्यापूर्वी मी पुणे विद्यापीठाच्या संस्कृत विभागातील संशोधन प्रकल्पांवर काम करत होते. वैदिक संशोधन मंडळात माझ्याआधी संचालक म्हणून त्रिविक्रम धर्माधिकारी कार्यरत होते. या संस्थेत त्यांनी इतकं मोठं काम केलं आहे, की आज त्यांच्या जागेवर बसणं ही माझ्यासाठी खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. अनेकदा असं होतं की माणसंतयारझाल्यावर खुर्चीत बसतात. माझ्या बाबतीत उलटं झालं. मी खुर्चीत बसल्यावर तयार झाले!

 

आपल्या संस्थेला केंद्र सरकारचाआदर्श संस्कृत शोध संस्थेचा दर्जा आहे. हा दर्जा म्हणजे नेमकं काय, यामुळे संस्थेच्या कामात काय फरक पडतो, कोणत्या सुविधा मिळतात, याबाबत काय सांगाल?

 

1927 साली स्थापन झालेलं वैदिक संशोधन मंडळ हा एकट्रस्टआहे. 1983 साली तत्कालीन केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने (आताचं मनुष्यबळ विकास मंत्रालय) आमच्या संस्थेलाआदर्श संस्कृत शोध संस्थाअसा दर्जा दिला. ज्याप्रमाणेडीम्ड युनिव्हर्सिटीहा एक दर्जा आहे, तशाच प्रकारचा हा एक वेगळा दर्जा आहे. आज भारतात अशा 4 संस्थांना हा दर्जा मिळालेला असून यापैकी आमची संस्था सर्वात जुनी संस्था आहे. इतर सर्व संस्था कोणत्या ना कोणत्या विद्यापीठांशी जोडलेल्या आहेत आणि त्यांना एकरकमी अनुदान मिळतं. परंतु आम्ही पूर्णतः केंद्रीय मंत्रालयाच्या अखत्यारीत आहोत. त्यामुळे आमच्या खर्चाच्या 95 टक्के इतका भार केंद्र सरकार उचलतं. त्यानुसार लागू होणारे सर्व नियम, कर्मचार्यांच्या वेतनश्रेणी आदी सर्व गोष्टी आम्हालाही लागू आहेत. राष्ट्रीय संस्कृत शोध संस्थान, जे आता विद्यापीठ बनलं आहे, त्याची एक समिती याबाबतचा समन्वय आणि अन्य प्रक्रिया पूर्ण करते. आमचं संशोधनाचं काम म्हणजे प्रामुख्याने पुस्तक वा ग्रंथनिर्मिती हेच आहे. अनेकांना वाटतं की आम्ही अमुक मंत्राने तमुक रोग कसा घालवावा वा अमुक यज्ञ करून पाऊस कसा पडावा, याबाबत काम करतो. परंतु ही संस्था यासाठी नाही. वेद आणि यज्ञकर्माबाबतची मूलभूत सामग्री संशोधनातून उपलब्ध करून देणं, हे आमचं काम आहे.

 

डॉ. भाग्यलता पाटसकर यांचे कार्यकर्तृत्व

डॉ
. भाग्यलता पाटसकर या वैदिक संशोधन मंडळाच्या संचालक म्हणून 2000 सालापासून कार्यरत आहेत. या संस्थेचं नेतृत्व करण्यासह त्यांनी स्वत:देखील वेदविषयक विपुल संशोधन लेखन केलं आहे. पाटसकर यांनी आतापर्यंत गुरुगीता, कथा अरण्यक, पवित्रेष्टी, उत्सर्ग आणि अपवाद - रिलेशन इन अष्टाध्यायी, रासपंचध्यायी आदी पुस्तकांचं लेखन केलं असून एकूण 13 पुस्तकांचं संपादन स्वतंत्रपणे आणि 6 पुस्तकांचं संयुक्त संपादन केलं आहे. शिवाय, या विषयातील त्यांचे सुमारे 75 लेख शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. डॉ. पाटसकर यांना कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक यांच्याकडूनवेदविभूषणही पदवी प्रदान करण्यात आली असून महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड यांच्याकडून पं. लाटकर शास्त्री पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. प्रसाद प्रकाशन, पुणेतर्फे त्यांना बापूसाहेब जोशी पुरस्काराने गौरवण्यात आलं असून इतर अनेक संस्कृत - वेद संशोधनविषयक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी डॉ. पाटसकर यांचा सन्मान करण्यात आला आहे.

 
 

आपल्याकडे कोणत्याही गोष्टीचा संग्रह करणं किंवा जतन करणं, याची परंपरा हवी तितकी आढळत नाही. आपल्याकडे सहजपणे गोष्टी चोरीला जातात, गहाळ होतात. अशा परिस्थितीत आपल्या संस्थेचं एवढं मोठं ग्रंथालय आहे, संग्रहालय उभं राहिलं आहे, ज्यात असंख्य जुनी, दुर्मीळ हस्तलिखितंदेखील आहेत. हे उभारताना, संग्रह करून ते जतन करताना काही अडचणी, असुविधा निर्माण झाल्या होत्या का?

आमच्या संस्थेत दोन संग्रहालयं आहेत. एक नियमित ग्रंथालय आहे, जे मुख्यतः आमच्या संशोधनासाठीच आहे. परंतु कार्यालयीन वेळेत कोणतीही व्यक्ती इथे येऊन येथील त्याला हव्या त्या पुस्तकांचा अभ्यास करू शकतो, त्यासाठी कोणतंही शुल्क आकारलं जात नाही. उलट, त्यांना अन्यत्र कुठेही मिळणार नाही, अशी सेवा इथे मिळते. म्हणजे, अनेक जण येतात आणि म्हणतात, “आम्हाला वेदातील अमुक विषयावर काहीतरी वाचायचं आहे.” आता हेकाहीतरीम्हणजे काय हे त्यांना अर्थातच माहीत नसतं. एवढ्या सगळ्या प्रचंड मोठ्या संग्रहातून त्यांचं तेकाहीतरीशोधून काढावं लागतं आणि त्यांचं समाधान करावं लागतं. मग त्यावर ती व्यक्ती ती पुस्तकं वाचते, काही संशोधन करते, लिहिते आणि क्वचित स्वत:ची पुस्तकंही छापते. हे आमच्या ग्रंथालयाचं मुख्य योगदान आहे. येथून पुस्तकं घरी नेता येत नाहीत, परंतु इथे बसून कोणतीही पुस्तकं कितीही वेळ वाचता येतात. अनेकदा वाचक ते पुस्तक घेऊन आमच्याकडे येतात, समजणार्या संदर्भांचे अर्थ विचारतात. आम्ही तेव्हाही सहकार्य करतो, त्यांचं शंकानिरसन करतो. एक हस्तलिखित संग्रहालय आहे, ज्यात असंख्य ठिकाणांहून गोळा करून आणलेली हस्तलिखितं, पोथ्या . आहेत. अनेकदा ही कागदपत्र सापडतात, तेव्हा ती अत्यंत वाईट अवस्थेत असतात. कागदांचा क्रम नसतो. कागद फाटलेले असतात. पाण्याचा थेंब जरी सांडला तरी भुगा होऊ शकतो. त्यामुळे त्यांचं जतन - संग्रह करणं हे मुश्किलीचं काम असतं. आम्ही पूर्वी त्यांचं लॅमिनेशन करत होतो, परंतु ती चांगली गोष्ट नाही, हे नंतर लक्षात आलं. आता सगळ्यात आधी आम्ही त्याचं स्कॅनिंग करतो. शिवाय, मायक्रोफिल्मिंगदेखील करत होतो. तरीदेखील, शेवटी 700-800 वर्षांपूर्वी हाताने लिहिलेला मजकूर तो कागद यांची एक वेगळीअँटीक व्हॅल्यूअसते. त्यामुळे त्यांच्या जतनासाठी वेगवेगळी जंतुनाशकं वापरावी लागतात, स्वच्छता ठेवावी लागते, कागद नाजूक हातांनी ठेवावे लागतात. पुण्यात गेल्या चार-पाच वर्षांत काही संस्थांनी हस्तलिखित या विषयावर कार्यशाळा घेतल्या, त्यामुळे आता त्याबाबत जागृती वाढली आहे. आम्ही त्यातील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवासाठी आमच्याकडे बोलावलं. त्यांना प्रात्यक्षिकं दाखवली गेली. आमच्याकडे सर्वांत जुनं हस्तलिखित 700 वर्षांपूर्वीचं आहे. या हस्तलिखितांपैकी जास्त देवनागरीत आहेत, काही ग्रंथलिपीत आहेत आणि काही मोजकी मोडीतील आहेत. यात काही कागदावरील आहेत, तर काही ताडपत्रावरील आहेत.

बाहेरून येणार्या वाचकांचा तुम्ही आत्ताच उल्लेख केलात. संस्थेशी थेट संबंधित संशोधक, अभ्यासक आदी सोडून बाहेरील व्यक्ती ज्या या विषयाशी संबंधित नाहीत, अशांचा प्रतिसाद आपल्या ग्रंथालयाला वा संग्रहालयाला किती मिळतो?

 

खरं सांगायचं झालं तर आम्ही या बाबतीत कमी पडतो. कारण प्रतिसाद हा मिळवावा लागतो. साद दिली तरच प्रतिसाद मिळेल, आणि आम्ही त्यात कमी पडतो. अशाच मुलाखती, भाषणं, व्याख्यानं ऐकून क्वचित काही जण येतात, आर्थिक मदतही करतात, हस्तलिखित जतनात मदत करतात. परंतु, आज हस्तलिखितासाठी स्वतंत्र व्यक्ती नेमण्याची गरज असूनही आम्ही नेमू शकत नाही. कारण, संस्थेची आर्थिक परिस्थिती तेवढी चांगली नाही. त्यामुळे सेवाभावी मदतीवरच अवलंबून राहावं लागतं. वाचण्यासाठी येणार्यांच्या बाबतीत बोलायचं झालं, तर आम्ही इथे उपनिषदांचा एक वर्ग चालवतो. त्याला संस्कृत वा प्राचीन इतिहासाच्या अभ्यासकांव्यतिरिक्तही अनेक मंडळी येतात. यात अगदी डॉक्टर्स, इंजीनियर्स, वकील आदींचाही समावेश असतो. संस्थेबाहेर अन्य ठिकाणीही आम्ही असाच एक वर्ग चालवतो. अशा वर्गांतून मग या विषयात रुची निर्माण झाल्यामुळे संस्थेच्या ग्रंथालयात वाचनासाठी अनेक जण येतात. आमचं दुसरं संग्रहालय हे यज्ञीय उपकरणांचं आहे. वेदांमध्ये ज्या यज्ञाचा उल्लेख आहे, तो श्रौतयज्ञ आहे. त्यासाठी लागणार्या सामग्रीचं येथे संग्रहालय आहे. हे संग्रहालय पाहताना सर्वसामान्य माणसांनाही मजा येते. आपण आपल्या सांस्कृतिक वारशाला जुना, ऐतिहासिक, प्राचीन, समृद्ध वगैरे शब्द सहजपणे वापरतो, पण ते का? याचा प्रत्यय ही सामग्री पाहताना येतो. हे संग्रहालय पाहायला अनेक ठिकाणहून असंख्य लोक येतात. मध्यंतरीपुणे हेरिटेज वॉकमधील मंडळीही येत होती. हे संग्रहालयही विनाशुल्क पाहता येतं. यातूनही अनेकांमध्ये जिज्ञासा निर्माण होते, मग ते ग्रंथालयात याबाबतची अधिक माहिती वाचण्यासाठी येतात!

संस्थेचं एकूणच काम - मग ते संशोधन असेल, लेखन-प्रकाशन असेल, अन्य उपक्रम, प्रचार-प्रसार असेल, याचं आजघडीला एकूण स्वरूप आणि व्याप्ती काय आहे?

आत्ताच सांगितल्याप्रमाणे, संशोधन प्रकल्प घेणं आणि त्यावर पुस्तक/ग्रंथनिर्मिती करणं हे संस्थेचं मुख्य काम आहे. राष्ट्रीय संस्कृत शोध संस्थानने एकूण 50च्या आसपास संशोधन संस्थांची यादी केली आहे, त्यांना हे संशोधन ग्रंथ पाठवले जातात. दुसरं म्हणजे, आम्ही अनेक ठिकाणी व्याख्यानं, भाषणं आदींच्या माध्यमातून हे विषय मांडत असतो, त्यातून वेदांबाबत माहितीचा प्रचार-प्रसार करत असतो. आमच्या संस्थेच्या या इमारतीबाबत लोकांमध्ये फारशी माहिती नाही, त्यामुळे इथे होणार्या अशा उपक्रमांचं प्रमाण कमी आहे. शिवाय, आमच्याकडे मनुष्यबळाचा बराच तुटवडा आहे, आम्ही जेमतेम 5-6 माणसं हे काम चालवतो आहोत. त्यामुळे इंटरनेटसारख्या माध्यमातून प्रचार-प्रसार चालवणं आम्हाला दुर्दैवाने शक्य होत नाही.

 

आपल्या संस्थेत पारशी धर्मग्रंथाचाही अभ्यास होतो. ‘वैदिकसंशोधन मंडळ अशा संस्थेत अचानक पारशी धर्मग्रंथ कसे काय अभ्यासले जाऊ लागले? याची सुरुवात कशी झाली?

झेन आवेस्ताहा पारशी धर्मग्रंथ आणिवेदही जुळी भावंडं म्हटली जातात. भाषाशास्त्राच्या दृष्टीने त्यांचं कूळ एक आहे. संकल्पनाही बर्याच सारख्या आहेत, काही कर्मकांडदेखील सारखी आहेत, पुराणकथाही बर्याच मिळत्याजुळत्या आहेत. त्यामुळे आमच्या संस्थेनेआवेस्ताच्या अभ्यासाला सुरुवात केली. मा.. कांगा हे यामध्ये काम करत होते. आवेस्ताची लिपी ही उर्दू लिपीसारखी दिसते. उजवीकडून डावीकडे लिहिली जाणारी. आज एकूणच आवेस्ताचा अभ्यास करणारी मंडळी खूपच कमी उरली आहेत. त्यात लिपीचा अडसर नको म्हणून आम्ही आवेस्ताची देवनागरी आवृत्ती प्रकाशित केली. बाकी जे काही आहेत ते इंग्लिशमध्ये आहेत किंवा गुजरातीत आहेत. इंडो-इराणियन शाखेच्या अभ्यासकांसाठी देवनागरीतील आवेस्ताचा खूप उपयोग होतो. खेरीज, ‘गाथा झरतृष्ट्राच्या’, ‘आवेस्ता रीडरअशीही आमची काही पुस्तके आहेत. अलीकडे पुण्यात याविषयात काम करणार्या व्यक्ती उपलब्ध होत नसल्यामुळे या विभागाचं काम बंद पडलं. आम्हाला जेवढी माहिती आहे, त्यावर आम्ही काही शिकवू शकतो, परंतु दुर्दैवाने आता हा विषय शिकायला येणारी माणसंदेखील उरलेली नाहीत.

 

एका ठरावीक, सुशिक्षित वर्गाच्या पलीकडे जाऊन सर्वसामान्य जनतेत वैदिक वा याबाबत माहिती सोप्या भाषेत पोहोचवणं आणि वेदांबाबत असलेले अनेक समज-गैरसमज दूर करणं, यासाठी आपल्या संस्थेने काही पुढाकार घेतला आहे का?

खरं सांगायचं तर आमच्या संस्थेचं संग्रहालयच या बाबतीत बरंच तगडं आहे. ते बघायला मोठा प्रतिसाद असतो. यात अनेक बाजूंनी विचार करणारे लोक असतात आणि त्यांनी हे संग्रहालय पाहिल्यावर त्यांचा दृष्टीकोन बदलतो. अनेकदाकाय हे वैदिक संशोधन, त्याचा काय उपयोग, कशाला सरकार याला पैसे देतं आहेअसे विचार घेऊन इथे माणसं आली, पण जेव्हा त्यांना संग्रहालय दाखवलं, तेव्हा या माणसांचे विचार बदललेले मी स्वतः पाहिले आहेत. अशा लोकांना इतर माध्यमांतून काहीतरी चुकीची, अवास्तव माहिती मिळते आणि त्यानुसार काही ठरावीक ग्रह मनात बाळगून ते वावरत असतात. परंतु, सुदैव म्हणून त्यातील काही जण तरी आमच्याकडे येतात आणि मग त्यांना खरं काय ते कळतं. एकदा तर बाहेर टि..वि.मध्ये काही जण कामानिमित्त आले, परंतु तेथील कार्यालय बंद असल्याने आणि मोठा पाऊस आल्याने ते आपल्या संस्थेच्या इमारतीत आले. मग त्यांनी उत्सुकतेने संग्रहालयही पाहिलं, आम्ही त्यांना माहिती दिली. गंमत म्हणजे सुरुवातीला 3-4 असताना नंतर त्याचे 7-8 जण झाले, कारण मग त्यांनी फोनवरून इतरांनाही बोलावून घेतलं. अशी अनेक उदाहरणं, प्रसंग आहेत. त्यामुळे अनेक लेख लिहून, व्याख्यानं देऊन, पुस्तकं काढूनही जे साध्य होत नाही, ते अनेकदा आमच्या संग्रहालयातून साध्य होतं, हा माझा अनुभव आहे. त्यामुळे आम्ही सध्या त्यावरच लक्ष केंद्रित केलं आहे.

वेद म्हटलं की एका ठरावीक वर्गाची, जातिसमूहाची मक्तेदारी मानली जाते आणि मग त्यातून वेदांना बहिष्कृत केलं जातं. अनेकदा, आजच्या काळात वेदांचा काय उपयोग, हे थोतांड आहे वा अंधश्रद्धा आहे, असंही सरसकट विधान केलं जातं. या अशा सर्व समज-गैरसमजांचा संस्थेच्या कार्याला कधी फटका बसतो का?

अजिबात नाही! उलट आम्हाला नवी क्षितिजं सापडतात.. की इथे अधिक काम करण्याची गरज आहे, या विषयात पुरेसं साहित्य उपलब्ध नाही, वगैरे. त्यामुळे याची अडचण वगैरे अजिबातच येत नाही हे मी ठामपणे सांगेन.