लोकनाटयाचा राजा

विवेक मराठी    03-Mar-2020
Total Views |

**अनुप कुलकर्णी***

राजा मयेकर म्हणजे अंगकाठीने बारीक व्यक्ती. पण या लहान व्यक्तीच्या अंगी मात्र हजरजबाबीपणाचा आणि उत्स्फूर्त विनोदाचा मोठाच गुण होता. मग शाहीर साबळे आणि राजा मयेकर यांची जोडी अशी जमली की लोक त्यांना राजा-कृष्णाची जोडी म्हणून ओळखू लागले. लोकरंगभूमीची सेवा करणाऱ्या राजा मयेकर यांचे 15 फेब्रुवारी 2020 रोजी निधन झाले. त्यांच्या कारकीर्दीचा हा संक्षिप्त आढावा.


raja_1  H x W:

 

मराठी रंगभूमीला अनेक कलाकारांनी आपल्या अभिनय सेवेने अत्युच्च उंचीवर नेऊन ठेवले. त्यातला एक लखलखता हिरा म्हणजे राजा मयेकर. राजा मयेकर यांनी आपल्या विविधरंगी भूमिकांद्वारे तब्बल साठ वर्षे रंगभूमीची सेवा केली, रसिक प्रेक्षकांना खळखळून हसवले आणि अंतर्मुखही केले. शेवटी आपल्या जीवननाटयाच्या अंकावर पडदा पाडून ते 15 फेब्रुवारी 2020 रोजी आपल्यातून निघून गेले. पण जाताना त्यांनी मागे ठेवले आहे असे संचित, ज्याला वगळून मराठी नाटयभूमीचा इतिहास लिहिला जाऊ शकत नाही. त्यांच्या स्मृतींचा आढावा घेणारा हा लेख.

महाराष्ट्राचे भूषण शाहीर साबळे यांनी स्वातंत्र्यानंतर नुकतीच मुंबईमध्ये जम बसवण्यास सुरुवात केली होती. चाळीत राहणाऱ्या कामगारांना हेरून त्यांच्यामार्फत काहीतरी समाजप्रबोधनपर कार्य करावे, असा त्यांचा मानस होता. मूळचे कलावंत असणारे शाहीर साबळे त्यासाठी रंगमंचाचा आधार घेणार हे ओघाने आलेच. त्यांनी चाळीत राहणाऱ्या कामगारांपैकी नाटयकलागुण असणारे कलावंत शोधायला सुरुवात केली आणि त्यांना गवसला राजा मयेकर नावाचा अस्सल मालवणी हिरा! राजा मयेकर हे मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्याच्या चेंदवण गावचे रहिवासी. कामाच्या शोधात इतर कोकणी माणसांप्रमाणे ते मुंबईला वाण्याच्या चाळीत आले होते. पुढे चालून गावातल्या शिक्षण संस्थेचे अध्यक्षही झाले. परंतु तेव्हा घाटावरून आलेल्या इतर लोकांपेक्षा त्यांचे मराठी बोलणे उत्तम होते. इतरांपेक्षा बरेच शुध्द मराठी बोलणारे राजा मयेकर शाहीर साबळेंना आवडले. शिवाय कलाक्षेत्र आणि भाषा हे दोघांच्या आवडीचे समान विषय होतेच.

राजा मयेकर म्हणजे अंगकाठीने बारीक व्यक्ती. पण या लहान व्यक्तीच्या अंगी मात्र हजरजबाबीपणाचा आणि उत्स्फूर्त विनोदाचा मोठाच गुण होता. मग शाहीर साबळे आणि राजा मयेकर यांची जोडी अशी जमली की लोक त्यांना राजा-कृष्णाची जोडी म्हणून ओळखू लागले. विनोदाच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांवर आसूड ओढणारी आणि लोकांना हसवत हसवत अंतर्मुख करणारी त्यांची प्रहसने चांगलीच गाजू लागली. अल्पावधीतच राजा मयेकर लोकप्रिय झाले. लोकनाटय हा प्रकार ग्राामीण बाजाचा समजला जातो, परंतु लोकनाटयाला शहरी भागात लोकप्रिय करण्याचे काम साबळे आणि मयेकर जोडीने केले. त्यांचे रंगभूमीसाठी आणखी एक महत्त्वाचे योगदान आहे. लोकनाटयासारखाच 'मुक्तनाटय' हा प्रकार त्यांनी उदयास आणला. यमराज्यात एक रात्र हे त्यांचे पहिले मुक्तनाटय प्रचंड लोकप्रिय झाले आणि राजा मयेकरांवर विनोदाचे अचूक टायमिंग साधणारा विनोदवीर हा शिक्का कायमचा बसला. मग नंतर तो बादशाह, ग्यानबाची मेख, आंधळं दळतंय, असून खास मालक घरचा वगैरे मुक्तनाटयांमधून मयेकरांनी तीच परंपरा कायम ठेवली.

राजा मयेकर यांनी नाटक, चित्रपट, टीव्ही मालिका आणि आकाशवाणी अशा चारही माध्यमांमध्ये चौफेर कामगिरी केली. दशावतारी नाटकांपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास चित्रपटापर्यंत जाऊन पोहोचला. बापाचा बाप, नशीब फुटकं सांधून घ्या, कोयना स्वयंवर ही त्यांची विशेष गाजलेली नाटके. दूरदर्शनवरील 'गप्पागोष्टी' ही मालिका तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली. राजा मयेकरांचे सर्वात मोठे वैशिष्टय म्हणजे त्यांनी विनोदाचा दर्जा कधीही घसरू दिला नाही. लोकनाटयात सररास चालणारे अश्लीलतेकडे झुकणारे संवाद त्यांनी टाळले. त्यांच्या विनोदाची पातळी ही समाजातील प्रत्येक घटकाला आवडणारी होती. गुंतता हृदय हे, सूर राहू दे, गहिरे रंग, श्यामची आई, धांदलीत धांदल, भावबंधन, एकच प्याला, संशयकल्लोळ, बेबंदशाही, झुंजारराव ही व्यावसायिक नाटके, धाकटी बहीण, स्वयंवर झाले सीतेचे, कळत नकळत, या सुखांनो या, झंझावात, लढाई, धमाल गोष्ट नाम्याची हे चित्रपट प्रेक्षकांना भावले. दूरदर्शनवरचे हास परिहास, गजरा, श्रध्दा, असे पाहुणे येती या कार्यक्रमात मयेकरांनी आपली विशेष छाप उमटवली.

 

मुंबई शहरात त्या काळी मराठी माणसाची अवस्था तितकीशी बरी नव्हती. मराठी माणूस म्हणजे कामगार असेच गृहीत धरले जायचे. या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम शिवसेनेच्या जोडीला शाहीर साबळे, राजा मयेकर आणि सुहास भालेराव या त्रिकूटाने आपल्या कलेद्वारे केले. तळागाळातील समाजात अन्यायाविरुध्द लढण्याची भावना त्यांनी रुजवली. पुढे मराठी मानसिकतेवर त्याचा झालेला मोठा परिणाम आपल्याला बघायला मिळतो.

मयेकरांनी त्या काळी एक अभिनव प्रयोग केला होता. आज आपण नाटक-चित्रपटाची तिकिटे जशी ऑनलाइन बुक करतो, त्याचप्रमाणे तेव्हा नाटक-चित्रपटाची तिकिटे त्यांनी फोटो स्टुडिओमध्ये विकण्याची संकल्पना यशस्वी करून दाखवली होती. राजा मयेकरांना फोटोग्रााफीचेही वेड होते. शाहीर साबळे आणि राजा मयेकर यांचा स्वतःचा 'कलाकार' नावाचा फोटो स्टुडिओ होता, हे फार कमी जणांना माहीत असेल. पुढे राजा मयेकर यांचे फोटोग्रााफीवरचे प्रेम बघून शाहीर साबळे यांनी तो स्टुडिओ मयेकरांच्या नावे करून टाकला. याच फोटोग्रााफीवरील समान प्रेमापोटी लता मंगेशकर यांच्याशी त्यांची चांगली मैत्री झाली होती. पेडर रोडवर असलेला लता मंगेशकर यांचा फोटो स्टुडिओ म्हणजे त्यांचा गप्पांच्या मैफलीचा अड्डाच होता.

 

अशा या मनस्वी कलावंत, समाजप्रबोधनकार आणि आपल्या अभिनयाची चिरंतन छाप उमटवणाऱ्या राजा मयेकरांनी वयाच्या नव्वदाव्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे. आपल्या असंख्य भूमिकांतून राजा मयेकर नावाचा कलाकार मराठी रंगभूमीच्या कायम स्मरणात राहणार आहे. त्यांच्या निस्सीम कलासेवेसाठी नमन आणि भावपूर्ण श्रध्दांजली!