चार महा राष्ट्रीयीकृत बँकांच्या निर्मितीची पार्श्वभूमी व होणारे फायदे

विवेक मराठी    31-Mar-2020
Total Views |

**सुधाकर अत्रे***

१ एप्रिल २०२०पासून चार महा राष्ट्रीयीकृत बँका अस्तित्वात येतीललोकशाही व्यवस्थेत सर्व घटकांना त्यातल्या त्यात राजकीय पक्षांना व कर्मचारी संघटनांना सरकारच्या निर्णयाला विरोध करण्याचा पूर्ण अधिकार आहेपरंतु या चार महा राष्ट्रीयीकृत बँकांच्या निर्मितीमागील कारणमीमांसा व सामान्य नागरिक त्यातल्या त्यात करदातेठेवीदारग्राहक यांच्यावर व अर्थव्यवस्थेवर या एकत्रीकरणाचा काय प्रभाव पडेलयाचा थोडक्यात परामर्श घेण्याचा प्रयत्न हा या लेखाचा उद्देश आहे.


दि. १ एप्रिल २०२०पासून देशातील दहा राष्ट्रीयीकृत बँकांचे एकत्रीकरण (amalgamation) करून चार मोठ्या राष्ट्रीयीकृत बँका निर्माण करण्याची घोषणा ३० ऑगस्ट २०१९ला सरकारने केली होती. या घोषणेनंतर, विलीनीकरण व एकत्रीकरण (merger) या शब्दांची गल्लत झाल्यामुळे हे एकत्रीकरण कायदेशीरदृष्ट्या १ एप्रिल २०२०पासून होऊ शकणार नाही असे ठाम मत माध्यमांतून मांडले जाऊ लागले. विलीनीकरणाची प्रक्रिया किचकट व वेळकाढू, तर बँकिंग कायदा १९७० व १९८०नुसार केंद्र सरकारला, रिझर्व्ह बँकेच्या सल्ल्याने राष्ट्रीयीकृत बँकांचे एकत्रीकरण करण्याचे अधिकार आहेत, त्यामुळे सरकारने हा मार्ग काढला असावा. विलीनीकरणात मोठ्या बँकेला लहान बँकेचे भागभांडवल विकत घ्यावे लागते व त्यासाठी त्या भागधारकांना त्याचा मोबदलादेखील द्यावा लागतो. याउलट एकत्रीकरणात, एकत्रित होणाऱ्या बँकांचे समभाग स्वॅप करून पूर्वीच्या बँकेच्या भागधारकांना नव्या एकत्रित बँकेचे शेअर्स देण्यात येतात. १ एप्रिल २०२०पासून हे एकत्रीकरण लागू होईल, असे अर्थमंत्र्यांनी २६ फेब्रुवारी २०२०ला स्पष्ट केले. सध्या उद्भवलेल्या कोरोना विषाणूच्या संकटामुळे हे एकत्रीकरण पुन्हा लांबणीवर टाकण्याची मागणी होऊ लागली. परंतु २८ मार्च २०२० रोजी या सर्व चर्चांना पूर्णविराम देत रिझर्व्ह बँकेने अगदी स्पष्ट शब्दात घोषणा केली की १ एप्रिल २०२०पासून ह्या चार महा राष्ट्रीयीकृत बँका अस्तित्वात येतील. लोकशाही व्यवस्थेत सर्व घटकांना - त्यातल्या त्यात राजकीय पक्षांना व कर्मचारी संघटनांना सरकारच्या निर्णयाला विरोध करण्याचा पूर्ण अधिकार आहे. परंतु या चार महा राष्ट्रीयीकृत बँकांच्या निर्मितीमागील कारणमीमांसा व सामान्य नागरिक - त्यातल्या त्यात करदाते, ठेवीदार, ग्राहक यांच्यावर व अर्थव्यवस्थेवर या एकत्रीकरणाचा काय प्रभाव पडेल, याचा थोडक्यात परामर्श घेण्याचा प्रयत्न हा या लेखाचा उद्देश आहे.

bank _1  H x W:
सर्वात पहिला मुद्दा म्हणजे एकत्रीकरण हे रालोआ (मोदी) सरकारने घिसाडघाईने उचलेले पाऊल आहे, असा आरोप केला जातो आहे. समाजाची स्मरणशक्ती तात्कालिक असते असा समज आहे. परंतु या विषयावर इतिहासात थोडे डोकावून बघण्याची गरज आहे. १९६९ व नंतर १९८० साली या बँकांचे राष्ट्रीयीकरण करताना तत्कालीन सरकारने या बँकांचे स्वतंत्र अस्तित्व जपण्यात येईल असे आश्वासन दिले होते, हा या एकत्रीकरणाला विरोध करणाऱ्यांचा मुख्य आक्षेप आहे. त्यांनी हे लक्षात घ्यायला हवे की कुठलाही निर्णय हा सार्वकालिक नसतो, तर काळानुसार त्यात बदल करणे अपरिहार्य असते. १९९१च्या आर्थिक संकटामुळे, स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाने स्वीकारलेल्या समाजवादी अर्थव्यवस्थेवर देशात व जागतिक स्तरावर चौफेर सुरू झालेल्या टीकेला शमविण्यासाठी, १४ ऑगस्ट १९९१ला नरसिंह राव पंतप्रधान असताना तत्कालीन अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर एम. नरसिंघम यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली होती. समितीला आर्थिक क्षेत्राला सशक्त करण्यासाठी सुधारणा सुचविण्यास सांगण्यात आले होते. या समितीने नोव्हेंबर १९९१ला अर्थमंत्री मनमोहन सिंग यांना आपला अहवाल सादर केला व तो त्यांनी १७ डिसेंबर १९९१ला संसदेत मांडला. या समितीने देशाच्या आर्थिक धोरणात आमूलाग्र बदल करण्याची सूचना केली व एक प्रकारे तत्कालीन अस्तित्वात असलेल्या समाजवादी अर्थव्यवस्थेचा त्याग करून लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन व ग्लोबलायझेशन (एलपीजी) अर्थात उदारीकरण, खाजगीकरण व जागतिकीकरण यांचा अवलंब करण्याची सूचना केली. याच अहवालात भारतीय बँकिंग व्यवस्थेत आमूलाग्र बदल करण्यासाठी पुढील तीन उपाय सुचविले होते - . बँकांचे एकत्रीकरण करून जागतिक स्तरावर काम करू शकतील अशा तीन ते चार बँका तयार कराव्यात. . उर्वरित बँकांचे पुनर्गठन करून राष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या ८ ते १० बँका ठेवाव्यात. . लहान बँकांना त्यांच्या प्रभावक्षेत्रात काम करण्यासाठी त्यांचे स्थानिक बँकात रूपांतर करावे.


म्हणजे बँकांच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव १९९१ सालीच आला होता व त्याला अनुसरून तत्कालीन सरकारांनी कामदेखील सुरू केले होते. १९९३ साली तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव व अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी तेव्हा अडचणीत आलेल्या न्यू बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयीकृत बँकेचे पंजाब नॅशनल बँक या राष्ट्रीयीकृत बँकेत एकत्रीकरण केले. याआधीसुद्धा १९६३ साली तत्कालीन पंतप्रधान नेहरू व अर्थमंत्री कृष्णम्माचारी यांच्या कार्यकाळात स्टेट बँक ऑफ जयपूर व स्टेट बँक ऑफ बिकानेर यांचे आपसात व २००८ साली तत्कालीन पंतप्रधान व अर्थमंत्री मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात स्टेट बँक ऑफ सौराष्ट्रचे स्टेट बँक ऑफ इंडियात एकत्रीकरण करण्यात आले व नंतर २००९ साली तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग व अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्या कार्यकाळात स्टेट बँक इंदोरचे स्टेट बँक ऑफ इंडियात एकत्रीकरण करण्यात आले. म्हणजे राष्ट्रीयीकृत बँकांच्या विलीनीकरणाची ही काही पहिलीच वेळ नाही. अगदी अलीकडच्या काळात १ एप्रिल २०१८ला पंतप्रधान नरेंद्र मोदी व अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या कार्यकाळात स्टेट बँकेच्या पाच सहयोगी बँका - . स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर, . स्टेट बँक ऑफ पतियाळा, . स्टेट बँक ऑफ त्रावणकोर, . स्टेट बँक ऑफ हैदराबाद व ५. स्टेट बँक ऑफ म्हैसूर यांचा स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विलय करण्यात आला. वरील सर्व विलीनीकरणात लहान बँकांच्या कर्मचाऱ्यांना मोठ्या बँकांच्या कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सोयीसुविधा आपोआपच मिळाल्या. कदाचित याच कारणास्तव या सर्व विलीनीकरणाला कामगार संघटनांनी तेवढा प्रखर विरोध केला नसावा, किंबहुना स्टेट बँकांच्या सहयोगी बँकांच्या काही कामगार संघटनांनी स्वतःच त्यांच्या सहयोगी बँकांचे, स्टेट बँक ऑफ इंडियात एकत्रीकरण करण्याची मागणी केली होती.


आता प्रमुख राजकीय पक्षाची भूमिका तपासून बघणे योग्य ठरेल. काँग्रेस पक्षाने २०१९च्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रकाशित केलेल्या त्यांच्या जाहीरनाम्यात पान क्रमांक २३वर अगदी स्पष्टपणे 'दोन किंवा जास्त राष्ट्रीयीकृत बँकांचे एकत्रीकरण करून राष्ट्रीय स्तरावर सहा ते आठ राष्ट्रीयीकृत बँका तयार करण्याचे' आश्वासन दिले होते. काँग्रेस पुरस्कृत इंटक या कामगार संघटनेशी संलग्नित इंडियन नॅशनल बँक एम्प्लॉइज फेडरेशनचे अध्यक्ष सुभाष सावंत यांनी तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पत्र लिहून काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यातून हे आश्वासन वगळण्याची विनंती केली होती. एवढेच नव्हे, तर त्यांनी असा आरोप केला होता की एकत्रीकरण हा काँग्रेसचा अजेंडा नाही, तर तो डाव्या कामगार संघटनांचा अजेंडा आहे असे आम्ही आजवर आपल्या सदस्यांना सांगत आलो आहोत आणि काँग्रेसदेखील तोच अजेंडा राबविणार असेल, तर आम्हाला आमच्या सदस्यांना उत्तर देणे कठीण होईल. वरील मजकूर, राजकीय पक्षांच्या व कामगार संघटनांच्या प्रत्येक विलीनीकरणाला विरोध करण्याच्या त्यांच्या अधिकाराबद्दल आदर बाळगून, फक्त वस्तुस्थिती स्पष्ट करण्यासाठी दिला आहे, किंबहुना लोकशाहीत रचनात्मक विरोध आवश्यकच असतो, कारण त्यामुळे अचूक निर्णय घेण्यास मदत होत असते.

या एकत्रीकरणासाठी सरकारला असंख्य आव्हानांना तोंड द्यावे लागणार आहे. परंतु मुख्य विरोध कामगार संघटनांचा राहणार आहे. कर्मचारी संघटनांना यामुळे कामगार कपातीची भीती वाटते आहे. परंतु अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नि:संदिग्ध शब्दात याचे खंडन केले आहे व त्यावर अविश्वास ठेवण्याचे काही कारण वाटत नाही. त्यांची दुसरी भीती खाजगीकरणाची आहे व त्याला कारणही तसेच आहे. सध्याच्या सत्तारूढ पक्षाने आपल्या पूर्व रूपात राष्ट्रीयीकरणाचा विरोध केला होता, हे ते विसरायला तयार नाहीत. परंतु १९६९नंतर देशात बरेच बदल झाले आहेत. प्रत्येक सरकारच्या आर्थिक / सामाजिक सुधारणा राबविण्यात राष्ट्रीयीकृत बँकांची मोलाची भूमिका राहिलेली आहे. नोटबंदीसाठी, प्रधानमंत्री जन धन योजनेच्या अंमलबजावणीसाठी व सध्याच्या कोरोना संकटाच्या वेळी बँक कर्मचाऱ्यांनी घेतलेले परिश्रम वाखाणण्याजोगे आहेत व सत्तारूढ पक्षाला त्याची जाणीव आहे. त्यामुळे राष्ट्रीयीकृत बँकांचे खाजगीकरण करण्याची 'राजकीय हाराकिरी' करण्याइतपत सध्याच्या सत्तारूढ पक्षाचे नेतृत्व अपरिपक्व आहे यावर विरोधकदेखील विश्वास ठेवणार नाहीत.

आता या एकत्रीकरणामुळे होणाऱ्या फायद्यांची चर्चा करू या.

. एकत्रीकरणाचा सर्वात मोठा फायदा ग्राहकांना होणार आहे. अगदी बँकनिहाय विचार केला, तर आज ओबीसीच्या २,३९० शाखा, तर युनायटेड बँक ऑफ इंडियाच्या २,०५५ शाखा आहेत; विलीनीकरणानंतर नवगठित पीएनबीच्या ११,४३७ शाखांचे जाळे त्यांच्या दिमतीला असणार आहे. १७,९४,५२६ कोटी रुपयांच्या एकूण व्यवसायामुळे नवगठित पीएनबी भारतातील स्टेट बँकेनंतर दुसऱ्या क्रमांकाची बँक ठरणार आहे. त्याच प्रकारे आज आंध्र बँकेच्या २,८८५, तर कॉर्पोरेशन बँकेच्या २,४३२ शाखा आहेत; नवगठित युनियन बँकेच्या ११,४३७ शाखांचे जाळे त्यांच्या दिमतीला असणार आहे. कॅनरा व सिंडिकेट, इंडियन व अलाहाबाद या बँकांच्या ग्राहकांनादेखील असाच फायदा होईल. अर्थात एकत्रीकरणानंतर एकाच गावात पूर्वाश्रमीच्या बँकांच्या शाखा जवळपास असल्यास त्यांचेही एकत्रीकरण होईल व नवगठित बँकेच्या शाखांची संख्या थोडी कमी होऊ शकते. आजवरचा अनुभव पाहता स्वतःच्या मालकीच्या इमारतीत असलेल्या शाखा किंवा अधिक व्यवसाय असलेल्या शाखा बंद न करता भाड्याच्या जागेत असलेल्या शाखा व कमी व्यवसाय असलेल्या शाखा बंद करून प्रशासकीय खर्च कमी करण्यात येईल, असे वाटते. कॅनरा बँकेच्या व सिंडिकेट बँकेच्या दक्षिण भारतात व प्रामुख्याने कर्नाटकात जास्त शाखा असल्यामुळे त्यांच्या एकाच गावात असलेल्या शाखांच्या एकत्रीकरणाची शक्यता जास्त आहे. परंतु इंडियन
bank _1  H x W: बँकेच्या शाखा दक्षिण भारतात
, तर अलाहाबाद बँकेच्या शाखा पूर्व व उत्तर भारतात जास्त असल्यामुळे त्यांच्या शाखांचे एकत्रीकरण होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे विलीनीकृत इंडियन बँकेच्या ग्राहकांना सहा हजार शाखांचे विस्तृत जाळे उपलब्ध होऊ शकेल. थोडक्यात, यामुळे सध्या एका बँकेच्या शाखेतील खात्यातून दुसऱ्या बँकेच्या शाखेतील खात्यात व्यवहार करण्यासाठी एनईएफटीचा किंवा आरटीजीएसचा वापर करण्याची गरज पडणार नाही व तो व्यवहार ताबडतोब होऊ शकेल. याच प्रकारे एकत्रीकृत बँका पूर्वाश्रमीच्या बँकांच्या एटीएमचेदेखील समायोजन करतील, त्यामुळे एकंदरीत एटीएमची संख्या जरी कमी झाली, तरी प्रस्तावित बँकेत विलीन झालेल्या बँकांच्या ग्राहकांना या नवीन एटीएमच्या जाळ्याचा फायदा मिळेल.

. आजचे बँकिंग हे टेक्नॉलॉजी आधारित आहे व त्याबरोबरच सायबर सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. ह्या दोन्ही बाबीं प्रचंड खर्चाच्या व जलद गतीने बदलणाऱ्या आहेत. आर्थिक व्यवहारातील तंत्रज्ञानाचा वाढता उपयोग बघता, ग्राहकांना ह्या सोयी माफक दरात देण्याचे मोठे आव्हान आज सर्वच बँकांसमोर आहे. लहान बँकांना यासाठी करावी लागणारी प्रचंड गुंतवणूक परवडणारी नाही. परंतु नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार केला नाही, तर ग्राहक व पर्यायाने व्यवसाय गमावण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर उभे आहे. यासाठी एकत्रीकरण हाच एकमेव पर्याय आहे, जेणेकरून या नव्या आव्हानाला सामोरे जाता येईल.

. कर्जपुरवठ्यासाठी प्रत्येक बँकेला एका निश्चित प्रमाणात भागभांडवल ठेवणे बंधनकारक आहे. त्याला 'सीआरएआर' असे म्हणतात. सध्या हे प्रमाण ८% इतके आहे. परंतु नव्या नियमानुसार कमीतकमी १०.% भागभांडवल ठेवणे आवश्यक राहणार आहे. आजवर हे भागभांडवल सरकारच्या तिजोरीतून पुरविले जात आहे. अगदी खूप आधीचा विचार केला नाही, तरी २००९ ते २०१९पर्यंत सरकारी तिजोरीतून तीन लाख पंधरा हजार कोटी रुपयांचे भागभांडवल राष्ट्रीयीकृत बँकांना देण्यात आले आहे. हा सर्व पैसा सर्वसामान्यांच्या करातून जमा झालेला असतो, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. एकत्रीकरणानंतर ह्या अशक्त बँकांना सुदृढ बँकेच्या भांडवलाचा फायदा होईल. त्याचबरोबर एकत्रीकरणानंतर या बँकांची आर्थिक स्थिती सुधारल्यास ह्या बँका भांडवल आणून शेअर बाजारात आपले समभाग उभारू शकतील. यामुळे सरकारवर व पर्यायाने करदात्यावर पडणारा भार नक्कीच कमी होईल किंवा हाच पैसा सरकारला दुसऱ्या विकासात्मक कामासाठी वापरता येईल. सध्या सुरू असलेल्या चर्चेत ह्या मुद्द्याकडे दुर्लक्ष होताना दिसते.

. वाढत्या एनपीएमुळे सध्या राष्ट्रीयीकृत बँका आपल्या अस्तित्वाची लढाई लढत आहेत. २०१४ साली नेमलेल्या पी.जे. नायक समितीने यासाठी राष्ट्रीयीकरणानंतर, राष्ट्रीयीकृत बँकांच्या संचालनात अमर्याद राजकीय हस्तक्षेपाबरोबरच सनदी अधिकाऱ्यांना दिले गेलेले अवास्तव महत्त्व व त्यामुळे राष्ट्रीयीकृत बँकांमधील कुशल प्रबंधनाचा अभाव ही प्रमुख कारणे अधोरेखित केली होती. त्यामुळे एकत्रीकरणाने सर्व समस्या सुटतील असे नाही, परंतु चार महा राष्ट्रीयीकृत बँकांच्या निर्मितीचे एक धाडसी पाऊल उचलून सरकारने या दिशेने सुरुवात केली आहे व त्यासाठी ते नक्कीच अभिनंदनास पात्र आहे.

. यातील बऱ्याच बँकांची प्रशासकीय कार्यालये एकाच शहरात कार्यरत आहेत. एकत्रीकरणाने त्यांचे उचित समायोजन केल्यास विलीनीकृत बँकेचा प्रशासकीय खर्च कमी करता येईल. सध्या एखाद्या बँकेच्या शाखा एखाद्या विशिष्ट भौगोलिक भागात कमी असल्यास, सुदूर भागातील प्रशासकीय कार्यालयातून त्यांचे नियंत्रण करण्यात येते. यामुळे ग्राहकांची फार गैरसोय होत असते. सध्या एका बॅंकेचे नागपूरस्थित प्रशासकीय कार्यालय विदर्भ, मराठवाडा व खानदेश येथील बँकांचे नियंत्रण करते. एका बँकेने तर अगदी सोलापूरजवळील शाखेचे प्रशासकीय नियंत्रण नागपुराच्या प्रशासकीय कार्यालयाकडे सोपविले आहे. दुसऱ्या एका राष्ट्रीयकृत बँकेने तर प्रत्येक वेळी नवीन उच्चपदस्थ आला की मुंबईच्या मुख्य कार्यालयात बसून भिंतीवर नकाशा पाहून प्रशासकीय कार्यालयांचे पुनर्गठन केले असावे, अशी शंका येते. एका राष्ट्रीयीकृत बँकेने मागील पंधरा वर्षांत चंद्रपूरसारख्या संवेदनशील जिल्ह्यातील शाखांचे प्रशासकीय कार्यालय किती वेळा बदलले, हा एक विनोदाचा भाग ठरावा. त्यामुळे ग्राहकांना व त्या बँकेच्या कर्मचाऱ्यांना होणारा त्रास व या पुनर्गठनात होणारा अनावश्यक खर्च सहज टाळता येऊ शकतो. बँकांच्या प्रशासकीय कार्यालयांचे कार्यक्षेत्र हे सरकारच्या महसूल विभागातील कार्यक्षेत्रानुसार असल्यास त्यांच्यात जास्त सुसूत्रता व समन्वय राहू शकेल. उदाहरणार्थ, महाराष्ट्रात नागपूर, अमरावती, नाशिक, औरंगाबाद, पुणे व मुंबई अशी रचना केल्यास ग्राहकांच्या व कर्मचाऱ्याच्या तर सोयीचे होईलच, तसेच सरकारलासुद्धा समन्वयाच्या दृष्टीने सोयीचे होईल. या प्रशासकीय कार्यालयांच्या नावातदेखील सुसूत्रता आणण्याची गरज आहे. यांना क्षेत्रीय / आंचालिक कार्यालय नाव निश्चित करावे. या बँकातील सुबुद्ध कर्मचाऱ्यांच्या मते या कामाचे व्यवस्थित नियोजन केल्यास ग्राहकांना व कर्मचाऱ्यांना होणारा त्रास तर टाळता येईलच, त्याचबरोबर असल्या पुनर्गठनावर होणाऱ्या अनावश्यक खर्चातदेखील बचत करता येईल.

. आज जगातील पहिल्या शंभर बँकांत आपली फक्त एक बँक आहे. २०२५पर्यंत आपली अर्थव्यवस्था पाच लाख कोटी डॉलर्सची करण्याचे स्वप्न साकारण्यासाठी त्यासाठी आवश्यक अशा सुदृढ बँकांच्या निर्मितीची नितांत गरज आहे. ह्या एकत्रीकरणाकडे या दृष्टीने बघण्याची गरज आहे.

एकत्रीकरणाची घोषणा करणे जितके सोपे होते, त्यापेक्षा त्याच्या अंमलबजावणीचे प्रचंड मोठे आव्हान या बँकांसमोर व सरकारसमोर राहणार आहे.


bank_1  H x W:

(लेखक आर्थिक / बँकिंग विषयाचे विश्लेषक आहेत.)