रा.स्व. संघाची अ.भा. प्रतिनिधी सभा १५ मार्चपासून बंगळुरुमध्ये

विवेक मराठी    04-Mar-2020
Total Views |

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची बैठक येत्या १५ मार्चपासून बंगळुरु येथे आयोजित करण्यात आली आहे. दरवर्षी होणारी अ.भा.प्रतिनिधी सभेची ही बैठक यंदा १५ ते १७ मार्च दरम्यान बंगळुरु येथील जनसेवा विद्या केंद्र, चन्ननहळ्ळी येथे संपन्न होणार आहे. अ.भा.प्रतिनिधी सभेची कर्नाटकमध्ये होणारी ही सातवी बैठक आहे. अ.भा.प्रतिनिधी सभेचे संचालन संघाचे सरकार्यवाह सुरेश उपाख्य भैय्याजी जोशी हे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या उपस्थितीत करणार आहेत, अशी माहिती रा.स्व.संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख अरुण कुमार यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.


Bengaluru to host the RSS 

या पत्रकात म्हटले आहे की, अखिल भारतीय प्रतिनिधी सभा ही रा.स्व.संघाची सर्वोच्च निर्णय घेणारी प्रतिनिधी सभा असून या सभेची बैठक वर्षातून एकदा देशाच्या विविध शहरांमध्ये होत असते. या प्रतिनिधी सभेच्या बैठकीमध्ये संघ कार्याविषयी, संघ कार्याचा विस्तार कशाप्रकारे करावा, शाखांची संख्या कशी वाढवावी, आदींबाबत विस्तृत चर्चा करण्यात येत असते. या सभेत सहभागी होणारे प्रतिनिधी विविध राज्यांतून येणारे असल्यामुळे संघ कार्यासंदर्भातील त्यांच्या अनुभवांची देवाणघेवाण या सभेत केली जाते. राष्ट्रीय महत्त्वाच्या मुद्द्यांवरही या सभेत चर्चा केली जाते.

 
आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/
 

तीन दिवस चालणाऱ्या या बैठकीत देशाच्या विविध भागांतील १४०० प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या प्रतिनिधी सभेत राष्ट्रीय महत्त्वाच्या मुद्द्यांबाबत प्रस्ताव संमत करण्यात येणार आहेत. विविध संघटनांच्या माध्यमातून विविध क्षेत्रांमध्ये आणि समाजाच्या विविध घटकांमध्ये कार्य करणाऱ्या संघटनांमधील स्वयंसेवकांनाही या प्रतिनिधी सभेसाठी निमंत्रित करण्यात येत असते. राष्ट्रीय प्रश्नांबाबत त्यांचे अनुभव यावेळी जाणून घेतले जातात. राष्ट्र सेविका समितीच्या महिला प्रतिनिधींनाही प्रतिनिधी सभेसाठी निमंत्रित करण्यात येत असते.

अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत घेण्यात आलेले निर्णय आणि संमत झालेले प्रस्ताव यासंदर्भातील माहिती प्रतिनिधी सभेच्या दरम्यान माध्यमांना देण्यात येणार असल्याचेही या पत्रकात म्हटले आहे.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/ 

-विश्व संवाद केंद्र