''ग्रामीण भागाने जपली भारताची सांस्कृतिक ओळख'' - मा. राज्यपाल

विवेक मराठी    06-Mar-2020
Total Views |

पालघर : ''भारताची सांस्कृतिक ओळख आणि संवर्धन हे ग्राामीण भागातील लोकांनी केले आहे. म्हणूनच भारत आज जगात आपले वेगळे स्थान निर्माण करू शकला,'' असे प्रतिपादन मा. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केले. विवेक रूरल सेंटर संचालित राष्ट्र सेवा समितीमार्फत घेण्यात आलेल्या बांबू हस्तकला प्रशिक्षण वर्गाच्या समारोपानिमित्त आयोजित सोहळयाचे प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.

bhalivali_1  H

बुधवार दि. 4 मार्च रोजी भालिवलीच्या राष्ट्र सेवा समितीच्या 'स्वामी विवेकानंद सभागृहा'मध्ये हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष रमेश पतंगे, सा. विवेकचे प्रबंध संपादक दिलीप करंबेळकर, दै. तरुण भारतचे संपादक व राष्ट्र सेवा समितीचे संचालक किरण शेलार, संचालक प्रदीप गुप्ता, जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे, तहसीलदार किरण सुरवसे, सरस्वती विद्यामंदिरातील विद्यार्थी आणि पालघर जिल्ह्यातील अनेक मान्यवर आणि स्थानिकजन या सोहळयास मोठया संख्येने उपस्थित होते.

या वेळी आपल्या मनोगतात राज्यपालांनी भारताच्या दृष्टीने गोमाता व गंगामाता यांचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच राज्यपाल निधीतून जनजाती बांधवांसाठी काही मदत जाहीर केली.

सा. विवकचे प्रबंध संपादक व समितीचे संचालक दिलीप करंबेळकर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करून प्रकल्पाची माहिती दिली. ''मुंबई महानगर देशातीलच नव्हे, तर आशिया खंडातील एक महत्त्वाचे आर्थिक केंद्र आहे. परंतु येथून हाकेच्या अंतरावर असणारे जनजाती बांधव आरोग्य, शिक्षण, रोजगार, पायाभूत सुविधा इत्यादींपासून वंचित राहिले आहेत. म्हणूनच शिक्षण, कौशल्य प्रशिक्षण, पर्यावरण संरक्षण व संवर्धन या त्रिसूत्रीवर विवेक रूरल डेव्हलपमेंट सेंटरचे कार्य केंद्रित आहे. जनजाती बांधवांचा सर्वांगीण विकास हे संस्थेचे ध्येय आहे'' असे त्यांनी प्रतिपादन केले.

 
bhalivali_1  H
 

विवेक रूरल सेंटर संचालित राष्ट्र सेवा समितीमार्फत 'एक कदम ग्राामीण रोजगार की ओर' या उपक्रमाअंतर्गत जनजाती भगिनींना बांबू हस्तकला प्रशिक्षण दिले जाते. यंदाच्या प्रशिक्षणाचे वैशिष्टय असे होते की, आधी प्रशिक्षण वर्गांमधून प्रशिक्षण घेतलेल्या भगिनीच यात प्रशिक्षक म्हणून सहभागी झाल्या होत्या. प्रशिक्षणार्थी भगिनींना मा. राज्यपालांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

या वेळी राज्यपालांनी प्रकल्पातील उपक्रमांना भेट दिली. पर्यावरण विवेकच्या माध्यमातून येथे 'सैनिकी वन' तयार करण्यात आले असून या सैनिकी वनात लावण्यासाठी राज्यपालांनी एक रोपटे दिले. जनजाती बंधुभगिनींनी त्यांची सांस्कृतिक ओळख असलेले तारपा नृत्य सादर केले. सरस्वती विद्यामंदिरच्या विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केले.


मुंबई विद्यापीठाचे प्राध्यापक मंदार भानुशे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले
, तर लुकेश बंड यांनी आभारप्रदर्शन केले.