'विवेक'च्या वाचक मेळाव्यास पुणेकरांचा भरभरून प्रतिसाद

विवेक मराठी    09-Mar-2020
Total Views |

''साप्ताहिक विवेकची भूमिका 'जागल्या'ची'' - राहुल सोलापूरकर

vachak_1  H x W

 

पुणे : ''आजच्या काळातील माध्यमांशी स्पर्धा करत साप्ताहिक 'विवेक'ने राष्ट्रीयत्व जपत दिवसेंदिवस लोकाभिमुख होत 'जागल्या'ची भूमिका कायम ठेवली आहे'' असे प्रतिपादन प्रसिध्द अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केले.

रविवार दि. 8 मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता बिबवेवाडी (पुणे) येथील श्री गौड ब्राह्मण समाज, माताजी मंदिर सभागृहात सा. 'विवेक'चा वाचक मेळावा उत्साहात पार पडला. या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी कात्रज भाग संचालक वामनराव साखरे होते. व्यासपीठावर विवेकचे समूह समन्वयक महेश पोहनेरकर, कात्रज भाग कार्यवाह सुभाष रायचकर, गौड ब्राह्मण समाज मंदिर समितीचे विश्वस्त प्रकाश शर्मा उपस्थित होते.

 

वाचकांशी असलेले अनेक वर्षांपासूनचे ऋणानुबंध दृढ करत मान्यवरांपासून सर्वसामान्यांच्या साक्षीने पार पडलेल्या मेळाव्यात कात्रज, सुखसागर, धनकवडी, पद्मावती, आंबेगाव व कोंढवा परिसरातील वाचकांनी 'विवेक'च्या वाटचालीसाठी शुभेच्छा देत स्नेहमेळावा अविस्मरणीय केला. 'विवेक'च्या विविध उपक्रमांची माहिती देणाऱ्या ध्वनिफितीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. सनई-चौघडयाचा नाद कानात रुंजी घालत होता. या वेळी विविध भागातून आलेल्या वाचकांकडून आलेल्या सूचनांचे स्वागत करण्यात आले.

 

राहुल सोलापूरकर म्हणाले, ''मोबाइल संस्कृतीमुळे वाचनाचे प्रमाण कमी होते. तरुण वर्ग मोबाइलवर आलेल्या संदेशाचे वाचन न करता क्षणात दुसऱ्याला फॉरवर्ड करतोय. त्यामुळे वाचन संस्कृतीतील अशी एक मोठी समस्या सध्या निर्माण झाली आहे.'' स्वामी विवेकानंद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचे वाचन अफाट होते. त्यांच्या विचारांचे आणि आचाराचे प्रत्येकांनी अनुकरण केले आहे, असे सांगत त्यांनी वाचन का आणि कसे करावे? याविषयी मार्गदर्शन केले. आपल्या विचारांची कास धरण्यासाठी आपल्याच विचारांचे वाचन आणि चिंतन केले, असेही त्यांनी उपस्थितांना आवाहन केले.

 

संघचालक वामनराव साखरे म्हणाले, ''सा. विवेक दिवसेंदिवस वाचनीय होत आहे. अंतरंगात आणि बहिरंगात झालेले बदलही वाचकांना आकर्षित करत असल्याचे सांगत त्यांनी विवेकच्या उपक्रमांना शुभेच्छा दिल्या. विवेकचे समूह समन्वयक महेश पोहनेरकर यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात साप्ताहिक विवेकच्या उपक्रमांची माहिती सांगितली. विवेकचे मुख्य उपसंपादक निमेश वहाळकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर वर्गणी प्रमुख धनाजी जाधव यांनी आभारप्रदर्शन केले. पसायदानाने मेळाव्याची सांगता करण्यात आली.