‘संपर्क सेतू’ ना. बा. उर्फ बापूराव लेले

विवेक मराठी    09-Mar-2020
Total Views |

हिंदुस्थान समाचार वृत्तसंस्थेचे सहसंस्थापक, प्रेस काउन्सिल सदस्य, स्व. लाल बहादुर शास्त्री यांच्या निधनसमयी ताश्कंद येथे त्यांच्याबरोबर असलेले पत्रकार बापूराव लेले यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ही आदरांजली.

 
article about  Bapurao Le

दि. 14 ऑक्टोबर 2001. पंतप्रधान अटलबिहारी बाजपेयी यांच्या निवासस्थानातील पंचवटी सभागृहात बापूराव लेले यांच्या सहस्रचंद्रदर्शनानिमित्त एक हृद्य कार्यक्रम चालू होता. मा. राम नाईक यांच्या अध्यक्षतेखालील एका समितीने हा कार्यक्रम आयोजित केला होता. सर्वश्री राम नाईक, लालकृष्ण अडवाणी, मदनदास देवी, दत्तोपंत ठेंगडी यांची गौरवपर भाषणे झाली आणि.

 
आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/
 

समोर उपस्थित 200 निमंत्रितांमध्ये भाजपाचे सर्व केंद्रीय मंत्री, आजी-माजी भाजपा अध्यक्ष, सुषमा स्वराज, सुमित्रा महाजन दिसत होते. अटलजींशी मतभेद असूनही मा. दत्तोपंत ठेंगडी उपस्थित होते. अटलजींना संघात आणणारे नारायणराव तरटेही होते. श्रीकांतजी जोशी, श्रीपाद उर्फ आबासाहेब पटवारी, अप्पा घटाटे - सत्कार समिती सदस्यही हजर होते. माझे भाग्य की मी, पत्नी सुरेखा, मुलगी नेहा हजर होतो. नेहाची तर स्वाक्षर्‍या घेताना तारांबळ उडाली.

 

अडवाणीजी, तरटे आणि अटलजी यांनी त्यांच्या भाषणात बापूरावांनी आणि हिंदुस्थान समाचारने उमेदीच्या काळात त्यांना कशी मदत केली त्याचे वर्णन केले. या सत्कार सोहळ्यानंतर अगदी आतापर्यंत एका पत्रकाराला 51,000 रुपयांचा पुरस्कार बापूरावांच्या नावे दिला जातो.

 

बापूरावांनी 1940 साली सिडनहॅम कॉलेजमधून वाणिज्य पदवी मिळवताच सोलापूर, सांगली आणि वडोदरा येथे पूर्णवेळ प्रचारक म्हणून काम केले.

 

एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक मा. गोळवलकर गुरुजी जळगावला आले असता बापूरावांच्या वडिलांबरोबर (बाबा लेले) बोलताना म्हणाले की “बापूचे लग्नाचे पहा.” त्यावर बाबांनी मिश्कीलपणे उत्तर दिले की “त्याच्या गुरूचे झाले की याचासुद्धा बार उडवू या.” श्रीगुरुजी आणि सर्व जोराने हसले. महाराष्ट्रातील ज्या पत्रकारांनी दिल्लीत जाऊन हिंदी भाषा आत्मसात करून आदरस्थान प्राप्त केले, त्यात ना.बा. उर्फ बापूराव लेले यांचा फार वरचा क्रमांक लागतो. 1950च्या दरम्यान दादासाहेब आपटे यांनी हिंदुस्थान समाचार वृत्तसंस्थेची सहकारी सोसायटी म्हणून स्थापना केली व बापूराव त्यांच्याबरोबर खजिनदार होते ते 1976 साली इंदिरा गांधी यांनी सर्व वृत्तसंस्था बरखास्त करीपर्यंत. मुंबईचे घोघा स्ट्रीटवरील हिंदुस्थान समाचारचे कार्यालय म्हणजे जणू पत्रकार संघाचे ऑफिसच. वि.ना. देवधर, भालचंद्र वैद्य, वसंतराव देशपांडे, वा.य. गाडगीळ, विद्याधर गोखले, दि.वि. गोखले, चंद्रशेखर वाघ हजेरी लावायचे. कधीकधी अप्पा पेंडसेसुद्धा! लहान वृत्तपत्रांना त्यांच्या भाषेत बातम्या देणे हे मुख्य काम होते.

 

त्या वेळी वृत्तपत्र कागदाची फार टंचाई होती, काळा बाजार व्हायचा. इतरही अनेक समस्या होत्या. राष्ट्रीय विचारधारेच्या भारतभर असलेल्या छोट्या वृत्तपत्रांच्या समस्या सोडविण्यासाठी संघ आणि हिंदुस्थान समाचार यांचा कोणी जबाबदार माणूस दिल्लीत नव्हता, म्हणून बापूरावांना 1956 साली दिल्लीत पाठविण्यात आले. तेव्हापासून 2001पर्यंत अशी 45 वर्षे बापूरावांनी दिल्लीत लीलया वावर केला.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/ 
 

खरा पत्रकार सर्वांना प्रिय असतो, सर्वांचा त्याच्यावर विश्वास असतो. ते सर्वांनाच जवळचे वाटत. यशवंतराव चव्हाण आणि वेणूताई यांच्याकडे तर ते घरचेच होते. श्रीगुरुजी हे भारतभर भ्रमण करीत असत. यशवंतराव त्यांना नियमित भेटत असत आणि त्यांची भेट बापूराव घडवून आणीत असत. इतर एक-दोन काँग्रेसी मंत्र्यांबरोबरही श्रीगुरुजींच्या अशा भेटी घडवीत असत.

 

लाल बहादुर शास्त्री हे बापूरावांना फार मान देत असत. सप्टेंबर 1965मध्ये भारत-पाकिस्तान 17 दिवसांचे युद्ध झाले होते, तेव्हा भारताने पाकिस्तानला सपाटून मार देऊन फार मोठा भूप्रदेश जिंकला होता व पाकिस्तानात घोडदौड चालू होती. संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा गटाच्या दबावाखाली 22 सप्टेंबरला भारताला युद्धबंदी जाहीर करावी लागली होती, पण जिंकलेला भूप्रदेश भारताच्या ताब्यात होता. या पार्श्वभूमीवर रशियन राष्ट्राध्यक्ष कोसिजिन यांच्या दडपणामुळे भारताचे पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री रशियात ताश्कंदला दाखल झाले. बापूराव हिंदुस्थान समाचारतर्फे ताश्कंदला त्यांच्याबरोबर होते. करार केला नाही तर रशिया युद्धात पाकिस्तानच्या बाजूने उतरेल, अशी धमकी रशियाने दिली आणि शास्त्री यांना दडपणाखाली पाकिस्तान अध्यक्ष अयुब खान यांच्याबरोबर ताश्कंद करारावर सही करावी लागली, जिंकलेला प्रदेश परत करावा लागला. हा करार करून मी देशाचा, जवानांचा, हुतात्मा सैनिकांच्या कुटुंबांचा विश्वासघात केला आहे, मला देशवासीय माफ करणार नाहीत हा एकच विचार त्या अतिसंवेदनशील पंतप्रधानांच्या मनात होता व त्या प्रचंड दडपणाखाली त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल अनेक अफवा उठल्या, पण बापूरावांनी श्रीगुरुजींची भेट घेऊन सत्य परिस्थिती कथन केली व तरुण भारतद्वारे देशासमोर आणली.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

 

ते संघाचे कट्टर अनुयायी हे त्यांनी कधी लपवून ठेवले नाही. त्यांनी कधीही तत्त्वांना मुरड घातली नाही आणि तरीही राष्ट्रपती भवनापासून पंतप्रधान कार्यालयापर्यंत त्यांचा मुक्त संचार असे. महाराष्ट्रातील काही घटनेवर प्रतिक्रिया द्यायची असेल तर इंदिरा गांधी यांचे प्रसिद्धी प्रमुख शारदा प्रसाद संपर्क साधीत. बापूरावांच्या बहिणीने - शांता परांजपे यांनी 1980 साली लहान मुलांसाठी इंदिराजींचे चरित्र लिहिले. त्यावर इंदिराजींनी एका प्रतीवर इंग्लिशमध्ये, तर दुसर्‍या प्रतीवर हिंदीत सही करून त्यांना परत दिले. नरसिंह रावांच्या कार्यालयातील राम खांडेकर संपर्क साधीत. स्वतः अटलजींना अनेकदा त्यांची आठवण व्हायची. अटलजी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर पुणे येथे फार सुंदर भाषण पोवाड्यासह केले होते, त्याचे संहिता लेखक बापूराव होते. बापूरावांचा भाचा सुनील परांजपे (रामभाऊ मराठे चरित्र अनु. इतर पुस्तके - लेखक) याचा मो.ग. तपस्वी यांच्या मुलीशी सुनीताशी (35 पुस्तकांचा हिंदीत अनुवाद करणारी) विवाह झाला. त्यानंतर हे जोडपे बापूरावांबरोबर अटलजींच्या घरी अर्धा तास भेटून आले होते.

 

मनुष्यस्वभावाची दांडगी पारख असणारे बापूराव राजकीय पक्षांची पुढील खेळी काय असेल याचा अचूक अंदाज वर्तवीत. 1960 साली संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेची मंगल वार्ता देणारे (तरुण भारत) ते पाहिले वार्ताहर! आणीबाणीच्या काळ्या पर्वात इंदिराजी निवडणुका घेणार ही बातमी प्रथम झळकवली बापूरावांनी ‘तरुण भारत’मध्ये व नंतर इतर वृत्तपत्रांनी तरुण भारतचा हवाला देऊन ती छापली. पत्रकार कक्षात आणि संघटनांमध्ये त्यांच्यासाठी विशेष स्थान असे. भारतभर अनेक ठिकाणी त्यांचे चेले वृत्तपत्रसृष्टीत किंवा सरकारमध्ये मानाने मिरविले. जेष्ठ पत्रकार, तरुण भारतचे माजी संपादक आणि लोकसत्ताचे निवासी संपादक सुधीर जोगळेकर म्हणतात, “माझ्यासारख्या नवशिक्या, तरुण पत्रकाराशीही त्यांचे संबंध जिव्हाळ्याचे होते. मला घेऊन ते दिल्लीत फिरले आहेत हे मी विसरूच शकत नाही. अखेरीअखेरी त्यांनी त्यांच्याकडचा कात्रणसंग्रहदेखील मला पाठविला.”

 

1970 ते 75 या कालावधीत प्रेस काउन्सिलवर त्यांची नियुक्ती झाली. पत्रकार या नात्याने राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्यासमवेत त्यांनी अनेक देशांचे दौरे केले.

 

दिल्लीत खासदार म्हणून जाणार्या मराठी आणि गुजराथी मंडळींना बापूराव हे मार्गदर्शक होते. हिंदी शिकण्यापासून ते संसदेत कसे वागायचे, प्रश्न कसे विचारायचे हे बापूराव शिकवीत. सुमित्रा महाजन, सुषमा स्वराज यांच्यासाठी ते बापूकाका होते. म्हाळगी यांच्या मृत्यूनंतर खासदार म्हणून कल्याण मतदारसंघातून निवडून दिल्लीत गेलेले जगन्नाथ पाटील यांच्यासाठी बापूराव सर्व काही होते. सर्व सरसंघचालक त्यांचा आदर करीत.

 

लेले यांचे बळीराम पेठेतील घर म्हणजे गंधर्व संगीत आणि इतर नाटक कंपन्यांचे जळगावमधील हक्काचे ठिकाण. ते लहानपणीच पेटी शिकले. दिल्लीतील सर्व मराठी कार्यक्रमांना त्यांची हजेरी असायचीच व कलावंतांना रेल्वे तिकिटे सरकारी कोट्यातून उपलब्ध करून देणे, राहण्याची सोय करणे या प्रकारे सर्व मदतही करीत. अरुण जोगळेकर आणि सई परांजपे जोगळेकर नॅशनल स्कूल फॉर ड्रामामध्ये नाट्यप्रशिक्षण घ्यायला दिल्लीत गेल्यावर काही दिवस त्यांच्याकडेच राहत होते.

 

1960 साली यशवंतरावांकडे पाठपुरावा करून त्यांनी दिल्लीत महाराष्ट्र परिचय केंद्र चालू केले व त्याचे व्यवस्थापक म्हणून ज्येष्ठ पत्रकार भा.कृ. केळकर यांची नेमणूक करून घेतली. इतर राज्यांनीही महाराष्ट्राचे अनुकरण केले.

 

महाराष्ट्रातील पत्रकारांशी त्यांचे फार जवळचे नाते होते. दिल्लीस्थित मो.ग. तपस्वी, भा.कृ. केळकर, अनंत सात्त्विक हे फार जवळचे. मुकुंदराव किर्लोस्कर यांच्यावरील स्नेहामुळे ते किर्लोस्करमध्ये ‘नारायण’ या नावाने लिहायचे.

 

आयुर्वेदाचा त्यांचा दांडगा अभ्यास होता. अनेक जणांना बापूराव औषधांसाठी आठवत. ते आजन्म अविवाहित राहिले, पण अनेकांना संसार वसविण्यात मदत केली. काही पत्रकारांना आर्थिक बळ मिळावे, म्हणून स्वतःची लोकप्रिय सदरे त्यांना दिली. स्वदेशी चळवळीला पाठिंबा म्हणून त्यांनी बेचाळीस सालापासून मरेपर्यंत अंगाला साबण लावला नाही. त्यांनी गुणसागर हेडगेवार आणि स्मरणगाठ ही पुस्तके लिहिली.

 

नवाकाळच्या एका अग्रलेखात म्हटल्याप्रमाणे, ते छायाचित्रकाराप्रमाणे स्वतः अंधारात राहून इतरांना प्रकाशात आणणारे होते. त्यांची स्मृती संगणकाला लाजवील अशी होती.

 

माझी व त्यांची ओळख 1976पासून, पण प्रत्यक्ष भेटलो 16 फेब्रुवारी 1980ला, ज्या दिवशी भारतातील फार गाजावाजा केलेले खग्रास सूर्यग्रहण होते. बाहेर पडलो तर आंधळे होऊ, या भीतीने लोक घरात बसले होते. दूरदर्शन गाजलेले चित्रपट दाखवत होते. रस्त्यावर चिटपाखरू नव्हते. मी त्याच वेळी जयपूरहून दिल्लीत पोहोचलो. बापूराव त्यांची स्कूटर घेऊन मला अंतरराज्य बस आगारावर न्यायला आले व पुढील दोन तास पोलिसांची विनंती दुर्लक्षून आम्ही स्कूटरने दिल्ली फिरलो.

 

आणीबाणीमध्ये त्यांचे घर म्हणजे भूमिगतांचा अड्डा होता. त्या वेळच्या विरोधी पक्षातील किंवा संघातील अनेक जणांनी त्यांच्याकडे आश्रय घेतला होता.

 

जळगाव येथे जन्मघरात 11 ऑगस्ट 2002 रोजी त्यांचे देहावसान झाले. नुकतेच त्यांचे जन्मशताब्दी वर्ष समाप्त झाले.

 

या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाला सादर प्रणाम.

 

माधव ज. जोशी

9223409123