कुटुंबाचा लौकिक जपणारे, वाढवणारे दांपत्य

विवेक मराठी    09-Mar-2020
Total Views |

सीमा  आणि  पियुषजी  गोयल

राजकारणात स्वच्छ राहण्यासाठी पियुष आणि सीमा यांनी एक व्रत घेतले आहे. कुणाकडूनही फुले किंवा अन्य कोणतीही भेट घ्यायची नाही आणि कुणालाही काहीही भेट द्यायची नाही. 2014पासून पियुषजी मंत्री झाल्यापासून दोघांनीही हे तत्त्व अंगीकारले आहे. सीमाचे कौतुक म्हणजे आजही ती हे व्रत कसोशीने पाळते आहे. तसेच सीमाला समाजसेवेची मनापासून आवड आहे. ती दिल्लीत आणि अन्य ठिकाणी बालिका सक्षमीकरणाच्या कामात व्यग्र असते.


goyal_1  H x W: 

डिसेंबर 1975. आर्थर रोड कारागृह. सकाळची वेळ होती. सकाळच्या वेळी शुचिर्भूत होऊन न्याहरी संपवून आमचा ग्रूप गटचर्चा या नावाने थोड्याशा टिवल्याबावल्या करत बसला होता. आम्ही सगळ्या 16 ते 20 वयोगटातल्या महाविद्यालयीन तरुणी होतो. मोठ्या वयाच्या गटातल्या बायका वेगळ्या गटचर्चा करीत बसल्या होत्या. थोड्याच वेळात जेवणाची सुट्टी होणार होती. वातावरण प्रसन्न खेळकर होते. ही वेळ नवीन भरतीची होती. म्हणजे सत्याग्रहींचा नवीन गट कारागृहात दाखल होणार होता. अशा नव्या भरतीची आम्ही अगदी उत्साहाने वाट पाहत असू. कारण त्यांच्याबरोबर आम्ही मागवलेल्या वस्तू, पुस्तके आणि मुख्य म्हणजे भरपूर खाऊ येत असे.

 आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

या वेळचा गट आला तो महिला कार्यकर्त्यांचा. वयाने प्रौढ पण मनात सळसळते राष्ट्रप्रेम असलेल्या सक्रिय, उत्साही महिलांचा. बहुधा सर्व आमच्यासारख्याच मध्य किंवा कनिष्ठ मध्यमवर्गातल्या. फुटलेल्या पायांच्या आणि खरखरीत हातांच्या. ‘वॉश अँड वेअरसाड्या नेसणार्या आणि आंघोळ करण्याआधी डोक्याला तेल आणि नंतर तोंडाला पावडर लावणार्या. त्या आल्या त्याच मुळी स्वातंत्र्य मिळाल्याच्या आनंदात. उड्या मारत, बागडत, एकमेकींना मिठ्या मारून कारागृहाच्या टिपिकल वासाची देवाणघेवाण झाली. थैल्या, डबे उघडले गेले. ‘आज बहुतेक कारागृहातले जेवण उरणार, म्हणजे संध्याकाळी शिळासप्तमीअसे मनात आले, तरी त्याची फारशी फिकीर कुठे कोणाला होती?

 

त्यात एक सत्याग्रही मात्र थोडी वेगळी वाटत होती. तलम बारीक फुलांच्या नक्षीची साडी, मोठ्ठा अंबाडा, देखणी, मध्यम ठेंगणी शरीरयष्टी, रुबाबदार चाल, मऊसूत हात, किंचित मंद सुगंधाचा दरवळ. त्याही लहान मुलासारख्या उत्साहात आल्या. त्यांची ओळख झाली - चंद्रकांता वेदप्रकाश गोयल. आम्ही त्यांच्याशी बोलायला बिचकत होतो, कारण .पू. गोळवलकर गुरुजी, मा. अटलजी यांसारखी दिग्गज नेते मंडळी मुंबईत प्रवासासाठी आली की सायनला त्यांच्या घरी मुक्कामाला असत. एवढ्या मोठ्या घरातली बाई म्हणून त्यांच्याबद्दल सुरुवातीला कुतूहल होते. नंतर मात्र त्यांच्याशीही जवळचे नाते निर्माण झाले. सगळ्यांच्या खाण्यापिण्याची चिंता करणारी अत्यंत प्रेमळ बाई ही खूणगाठ मनाशी पक्की बांधली गेली. त्यांना दररोज घरून डबा आणण्याची मुभा मिळाली होती. त्यांच्या डब्यात सर्वांसाठी विविध पदार्थ यायचे. त्यांच्या डब्यातले पदार्थ त्यांच्यापेक्षा आम्हीच जास्त खाल्ले असतील. तेव्हा असा विचारही मनात यायचा नाही की आपण त्यांच्या डब्यातले संपवले, तर त्या काय खातील? घरी आईबद्दल असा कधी कुणी विचार करतो का? त्याच भावना त्यांच्याविषयी होत्या.


आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/ 
 

मा. वेदप्रकाशजी गोयल आणि चंद्रकांताजी यांचे घर म्हणजे भरलेले गोकुळ होते. चार मुले. पम्मी, प्रदीप, प्रतिभा आणि धाकटा पियुष. त्या कारागृहात आले, तेव्हा पियुष अकरा वर्षांचा शाळेत जाणारा मुलगा होता. कारागृहातून सुटल्यावर कधीमधी कामानिमित्त त्यांच्या सायनच्या घरी जाणे झाले असेल, पण लग्नानंतर गोयलजी आणि पंत मराठे ही जोडगोळी होती. ते मुंबईतल्या पार्टी कार्यकर्त्यांचा आर्थिक आधार असल्यामुळे नेहमीच त्यांच्या घरी येणे-जाणे होत असे. त्यांच्या घरची शिस्त जबरदस्त होती. आलेल्या लहानातल्या लहान कार्यकर्त्याला आदराने वागवले जायचे. घरातले सगळे त्याचे नमस्काराने स्वागत करायचे. जर महत्त्वाची बैठक चालू नसेल तर दोन मिनिटे बोलून मगच आपापल्या खोलीत जायचे.

 

goyal_1  H x W:

खाण्यापिण्याचे लाड करण्यात कांताबेन आणि त्यांच्याच तालमीत तयार झालेला स्वयंपाकघर सांभाळणारा महाराज - राम वाकबगार होतेच, तसेच घरातले सर्वच जण आलेल्याला आग्रहाने खाऊ घालण्यात पटाईत होते. किरीटजी आणि गोयलजी कामाचे बोलत असत, तेव्हा मी तिथे बसणे योग्य नसे. मग मी प्रतिभा, पियुष आणि प्रदीपचे लग्न झाल्यावर नीरू यांच्याबरोबरच जास्त असायची. त्यामुळे आजही पियुष गोयल कितीही मोठ्या पदावर पोहोचला, तरी पटकन माझ्या तोंडात अहो-जाहो येत नाही. त्याचे, शिक्षण, यश, अपयश, राजकारणात पाय रोवण्यासाठीची धडपड या सर्वाची मी एक साक्षीदार आहे. तरुण वयात वहिनी आणि दिराची माया वेगळीच असते. तीच आम्हा दोघांत होती. क्वचित कधी एखाद्या विषयावर मनमोकळा संवादसुद्धा होत असे, विशेषतः कांताबेन माटुंगा विधानसभेतून निवडणूक लढवत असताना आम्ही एकत्र काम करत होतो तेव्हा. त्यामुळे त्याचे लग्न, मुलांचे नामकरण . गोष्टीत घरच्यासारखेच वाटे. पियुषची पत्नी सीमा. तिचाही स्वभाव खूपच मनमोकळा. हसरा, प्रेमळ. ती आल्यावर गोयलजींकडे गणेशोत्सवात गणपतीची स्थापना होऊ लागली. गोयलजी राज्यसभेत खासदार, मग मंत्री; कांताबेन दोनदा नगरसेवक, तीन वेळा आमदार. त्यामुळे घरचे, मित्रपरिवार, कार्यकर्ते धमाल असायची. पियुष आणि सीमा ते सर्व कौशल्याने आणि प्रेमाने सांभाळायचे.

 
 

पियुष प्रथमपासूनच खूप हुशार. All India Chartered Accountantच्या परीक्षेत तो भारतातून दुसरा आला आणि कायद्याच्या परीक्षेतसुद्धा मुंबई विद्यापीठातून दुसरा आला. यशस्वी खर्पींशीीांशपीं इरपज्ञशी असून, अर्थकारणातील प्रमुख सल्लागार आहे. वयाच्या विसाव्या वर्षापासून तो भारतीय जनता पार्टीचे काम करतो आहे. वडिलांप्रमाणेच भाजपाचा राष्ट्रीय खजिनदार ही जबाबदारी सांभाळली आहे. .पू. गोळवलकर गुरुजींचे गाव गोळवली हे त्याने सांसद आदर्श ग्राम योजनेतून विकसित केले आहे. 2010पासून राज्यसभेत खासदार असून सध्या रेल्वे मंत्री म्हणून कार्यरत आहेत. (त्याच्या यशाच्या या टप्प्यावर आणि यापुढे त्याचा उल्लेख आदरानेच करायला हवा.) याआधी जेव्हा ते अपारंपरिक ऊर्जा विभागाचे मंत्री होते, तेव्हाची एक घटना माझ्या मनावर कायमची कोरली गेली आहे. काश्मीरमधल्या पूरपरिस्थितीत मी तिथे काम करत होते. वीजपुरवठा खंडित झाला होता. गावागावातून रस्ते, पूल उद्ध्वस्त झाले होते. विजेचे खांब उन्मळून पडले होते. परिस्थिती सुधारायला महिनाभर लागेल असे वाटत होते. त्या वेळी तेथील लोकांना सौर ऊर्जेवर चालणार्या दिव्यांची जरुरी होती. तसे मी पियुषजींच्या कार्यालयात सांगितले. त्याच दिवशी त्यांचा फोन आला आणि सरकारी पातळीवर असे दिवे वाटण्यात आले, इतकेच नव्हे, तर एका कंपनीने पूरग्रस्तांसाठी सौर दिवे वाटण्याचे ठरवले. बाकीच्या वेळी पियुषजींच्या राजकीय कामापासून अलिप्त असणार्या सीमाने ते दिवे गरजूंसाठी पाठवले जात आहेत ना, याची खातरजमा करून घेतली. कारण सीमाला समाजसेवेची मनापासून आवड आहे. ती दिल्लीतील आणि काही अन्य ठिकाणी बालिका सक्षमीकरणाच्या कामात व्यग्र आहे. सीमाला सार्वजनिकरीत्या व्यक्त होण्यात संकोच वाटतो, त्यामुळे तिच्याबद्दल व्यक्तिगत लिहिणे रास्त नाही, तरीही मी एवढे नक्कीच सांगेन की, या टिपिकल दिल्लीकर मुलीने पियुषला भक्कम साथ दिली आहे. घर-संसार, सासूबाई चंद्रकांताबेन गोयल यांच्या प्रकृतीची काळजी घेणे, मुलांना योग्य ते वळण लावणे यात ती कुठेही कमी पडत नाही.

 

त्याचप्रमाणे राजकारणात स्वच्छ राहण्यासाठी पियुष आणि सीमा यांनी एक व्रत घेतले आहे. खरे तर सीमा कलासक्त. मी त्याची निश्चितच साक्षीदार आहे. खरेदी करणे, भेटी देणे, त्याही पारखून - ज्याच्या-त्याच्या आवडीनिवडी आणि आवश्यकता यांचा विचार करून - योग्य त्या प्रसंगी भेट पाठवणे सीमाला आवडत असे. पण आता 2014पासून पियुषजी मंत्री झाल्यापासून दोघांनीही तत्त्व अंगीकारले आहे. कुणाकडूनही फुले किंवा अन्य कोणतीही भेट घ्यायची नाही आणि कुणालाही काहीही भेट द्यायची नाही. सीमाचे कौतुक म्हणजे आजही ती हे व्रत कसोशीने पाळते आहे.

 

सीमा मूळ दिल्लीची. 1970 सालचा जन्म. दिल्लीच्याच सलवान पब्लिक स्कूलमध्ये शालेय शिक्षण झाल्यावर मिरांडा हाउस या महाविद्यालयातून पदवी घेतली. त्यानंतर 1991मध्ये लग्न होऊन मुंबईला आली. मोठा ध्रुव पदवी घेऊन परदेशात आपल्या आवडत्या विषयात कामाचा अनुभव घेत आहे. पुढे पदव्युत्तर शिक्षण घेण्याचा त्याचा इरादा आहे. पंतप्रधान मोदींचा फॅन असलेला ध्रुव 2019च्या निवडणुकीत सुट्टी काढून राजकीय काम करण्यासाठी आला होता. मुलगी राधिकाने नुकतीच बोस्टनमधून पदवी प्राप्त केली आहे.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/ 
 

मा. मोदीजी दुसर्यांदा पंतप्रधान झाले, तेव्हा त्यांच्या नव्या मंत्रीमंडळात पियुषजींनी पुन्हा मंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांचे रेल्वे खाते कायम राहिले. राजकारणात पहिल्यांदा मिळते ती संधी आणि दुसर्यांदा तेच पद कायम राहिले तर ते काम यशस्वीपणे केल्याचा पुरस्कार. त्यामुळेच जेव्हा 30 मे 2019ला पियुषजींनी पुन्हा शपथ घेतली, तो त्यांच्या आयुष्यातला एक संस्मरणीय दिवस होता. त्यांना आपल्या पत्नीने - सीमाने पाठवलेला निरोप उद्धृत करून ट्वीट केलेलेच मी पुन्हा लिहिते -

 

My wife Seema wrote today, 30th May 2019, what a day for my family, DAUGHTER and FATHER, both graduate in their respective fields, one graduates from Harvard, one becomes a Cabinet Minister, 2nd time, one in Boston, one in New Delhi ...CAN'T THANK GOD ENOUGH...
Once again congratulations to Radhika for successfully starting another chapter in her life. I am blessed to have the support of my family in this journey and thank them from the bottom of my heart.

यापुढेही सीमा आणि पियुष यांच्या हस्ते अशीच देशसेवा होत राहो, आपल्या आईवडिलांनी मिळवलेली कीर्ती वृद्धिंगत करण्याची प्रेरणा जागी राहो आणि त्यांच्या पुढील पिढीतही राष्ट्रप्रेमाची ज्योत तेवत राहो, ही शुभकामना.