सेन्सेक्स, निफ्टी आणि ‘सेक्टोरल इंडेक्स’

विवेक मराठी    01-Apr-2020
Total Views |

घरबसल्या गिरवा शेअर मार्केटची मुळाक्षरं! : भाग – २
 

जसा निफ्टी हा मुख्य निर्देशांक असतो, त्याप्रमाणे त्याचे काही उपनिर्देशांकही असतात, उदा. निफ्टी आयटी, निफ्टी एफएमसीजी, निफ्टी फार्मा, निफ्टी बँक, निफ्टी मिडकॅप ५० वगैरे. या निर्देशांकांना ‘सेक्टोरल इंडेक्स’ म्हणतात. सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोनच निर्देशांक संपूर्ण शेअर मार्केटचं प्रतिनिधित्व करू शकत नसल्याने बाकीचे उपनिर्देशांक अत्यंत महत्त्वाचे असतात. त्यातही, विशेषत: निफ्टी मिडकॅप ५० आणि निफ्टी स्मॉलकॅप ५०.

BSE/NSE Sensex, Nifty, In

मागील लेखात आपण शेअर मार्केटसंदर्भात काही मूलभत गोष्टी समजून घेतल्या. आता या लेखात आपण निर्देशांकाबद्दल (इंडेक्सबद्दल) माहिती घेऊ. भारतात शेअर मार्केटचं मूल्यमापन करण्यासाठी सर्वप्रथम दोन मुख्य निर्देशांक बघितले जातात, ते म्हणजे सेन्सेक्स (SENSEX) आणि निफ्टी (NIFTY). सेन्सेक्सबाबत बीएसई - अर्थात बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज हे नियमन करतं, तर निफ्टीबाबत एनएसई - अर्थात नॅशनल स्टॉक एक्स्चेंज.


परंतु मुळात निर्देशांक म्हणजे नेमकं काय? : निर्देशांक हा शेअर मार्केटमध्ये किती वाढ आणि घट झाली आहे वा होते आहे, हे दर्शवतो. यातील सेन्सेक्स हा ३० कंपन्यांचा बनतो, तर निफ्टी हा ५० कंपन्यांचा बनतो. दोन्ही निर्देशांकांमध्ये काही कंपन्या समान आहेत. या दोन्ही निर्देशांकांत समाविष्ट असलेल्या कंपन्या या भारतातील महत्त्वाच्या कंपन्या मानल्या जातात. आपण जेव्हा वर्तमानपत्रात किंवा टीव्हीवरील बातम्यांत पाहतो की, शेअर मार्केट अमुक अमुक अंकांनी वाढलं / उसळी घेतली / झेप घेतली किंवा कमी झालं / कोसळलं / आपटलं, याचाच अर्थ वरील दोन निर्देशांकांची वाढ किंवा घट त्यात दर्शवली जाते. म्हणजेच, त्यामध्ये फक्त सेन्सेक्समधील किंवा निफ्टीमधील कंपन्यांचं मूल्य कमी किंवा जास्त झालेलं असतं.


मी हा लेख लिहितो आहे, त्या वेळी आज आत्ता सेन्सेक्स २९,४६८वर आहे व आज तो १०२८ अंशांनी वाढला / वधारला आहे. तसंच, निफ्टी ८,५९७ आहे व तो ३१६ अंशांनी वाढला / वधारला आहे. ही वाढ / घट आदी सर्व कसं ठरतं, याचं एक गणिती सूत्र आहे. आपण आता निफ्टीबद्दल विचार करू. मागील लेखात सांगितल्याप्रमाणे शेअर मार्केट हे देशाच्या अर्थव्यवस्थेचा आरसा मानण्यात येतं. त्यामुळे निर्देशांकात देशाच्या अर्थव्यवस्थेतील प्रमुख क्षेत्र (सेक्टर्स) अंतर्भूत असावी लागतात. उदा., बँकिंग व फायनान्स, ऑटोमोबाइल्स, सिमेंट, कंझ्युमर गुड्स, आयटी, फार्मा, मेटल्स इत्यादी. सध्या निफ्टीमध्ये कोणती क्षेत्रं अंतर्भूत आहेत, ते खालील चित्राद्वारे स्पष्ट होईल.
 
BSE_1  H x W: 0
 

निफ्टी या निर्देशांकाबद्दलची सर्व माहिती niftyindices.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. जसा निफ्टी हा मुख्य निर्देशांक असतो, त्याप्रमाणे त्याचे काही उपनिर्देशांकही असतात, ते खालीलप्रमाणे :

१) निफ्टी आयटी, २) निफ्टी एफएमसीजी (फास्ट मूव्हिंग कंझ्युमर गुड्स), ३) निफ्टी फार्मा, ४) निफ्टी बँक, ५) निफ्टी रियालटी, ६) निफ्टी मिडकॅप ५०, ७) निफ्टी स्मॉलकॅप ५०, इत्यादी.

या निर्देशांकांना ‘सेक्टोरल इंडेक्स’ असं म्हणतात. उदा., ‘निफ्टी बँक’मध्ये केवळ काही ठरावीक बँका समाविष्ट असतात. सध्या ‘निफ्टी बँक’मध्ये एकूण १२ बँका समाविष्ट आहेत. त्या कोणत्या, हे खालील चित्राद्वारे समजेल.
 

BSE_1  H x W: 0 

आता आपण यात पाहू शकतो की, यामध्ये काही बँकांना अधिक वेटेज दिलं गेलं आहे, तर काहींना कमी. हे वेटेज एनएसई ठरवत असते. अशाच प्रकारे, अन्य सर्व उपनिर्देशांक किंवा सेक्टोरल इंडेक्सबाबतची माहिती आपल्याला niftyindices.com या संकेतस्थळावर मिळेल. सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोनच निर्देशांक संपूर्ण शेअर मार्केटचं प्रतिनिधित्व करू शकत नसल्याने बाकी निर्देशांक अत्यंत महत्त्वाचे असतात. यामध्येही विशेषत: निफ्टी मिडकॅप ५० आणि निफ्टी स्मॉलकॅप ५०.

याबाबतच्या अधिक माहितीसह शेअर बाजारातील अन्य काही महत्त्वाच्या संकल्पना व इतर काही मुद्द्यांबाबत जाणून घेऊ या लेखमालिकेच्या पुढील भागात...


- अमित पेंढारकर

(लेखक गुंतवणूक सल्लागार व शेअर मार्केटचे अभ्यासक आहेत.)

----------

(आपल्याला हा लेख आवडल्यास खालील कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा, तसेच आपले कुटुंबीय–नातेवाईक, मित्रपरिवार यांनाही हा लेख फॉरवर्ड करा आणि आपल्या फेसबुक / ट्विटरद्वारे शेअर करा.)