संविधान आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्यासमोरचे प्रश्नचिन्ह

विवेक मराठी    10-Apr-2020
Total Views |


jitendra awhad and look d
देशाच्या पंतप्रधानांनी देशवासीयांना पाच एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता आपल्या घरात दिवे लावण्याचे आवाहन केले आणि त्या क्षणापासून मोदींनी दिलेल्या उपक्रमास विरोध करण्यास आपण कसे आणि किती पुरोगामी आहोत हे दाखवण्यासाठी काही जण तातडीने पुढे आले. 'मी दिवा लावणार नाही' ते 'ही अंधश्रद्धा आहे' इथपर्यंत विविध प्रकारच्या भूमिका घेत काही जणांनी कोरोनाच्या अंधारात स्वत:ला उजळून घेतल्याचा प्रयत्न केला. यामध्ये महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हेही सहभागी झाले होते. त्यांनी सोशल मीडियावर आपली मोदीविरोधी भूमिका मांडली होती. दिवे लावण्याने कोरोनाचे संकट संपणार नाही, मात्र नैराश्याचा, भीतीचा आणि एकटेपणाचा शिकार झालेला भारतवासी 'आम्ही एक आहोत, या संकटाशी आम्ही एक होऊन लढत आहोत' हा भाव जागृत करून आपले नैराश्य झटकून टाकेल अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खात्री होती आणि झालेही तसेच. देशाची लोकसंख्या पाहता अगदी चिमूटभर लोकांनी मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद दिला नाही. मात्र अशा देशाच्या लोकसंख्येच्या तुलनेत चिमूटभर तथाकथित पुरोगामी मंडळींना त्यांची जागा दाखवत साऱ्या देशभर दीपोत्सव साजरा करण्यात आला. आम्ही एक आहोत, आम्ही कोरोनाला हरवू शकतो हा आत्मविश्वास त्या नऊ मिनिटांच्या उपक्रमाने देशाच्या कानाकोपऱ्यात प्रस्थापित झाला.

त्या यशस्वी उपक्रमानंतर सोशल मीडियावर आत्मविश्वासाची अनुभूती प्रकट होऊ लागली, तर याचप्रमाणे ज्यांनी या उपक्रमाला विरोध केला, त्यांची टिंगलही सुरू झाली. ठाण्यातील एका अभियंत्याने सोशल मीडियावर मंत्री जितेंद्र आव्हाड यांची टिंगल करणारी पोस्ट टाकली. त्याच रात्री त्यांना पोलिसांकरवी उचलून नेले आणि जीवघेणी मारहाण करण्यात आली. पीडिताच्या जबाबानुसार प्रत्यक्ष मंत्रीमहोदयांच्या समक्ष पोलीस, सुरक्षा रक्षक व कार्यकर्ते यांनी ही मारहाण केली. पीडिताने पोलिसांत तक्रार दाखल केली, पण त्यात मंत्रीमहोदयांचा उल्लेख नाही. त्यांच्या खाजगी निवासस्थानी ही मारहाण केली गेली आहे. विरोधी पक्षाने तातडीने मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली आहे, समाजमाध्यमातून या घटनेबाबत प्रचंड राग व्यक्त केला जात आहे. मात्र मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर आतापर्यंत कोणत्याही कारवाई केली गेली नाही.
 

jitendra awhad and look d 

प्रश्न केवळ एका व्यक्तीला जीवघेणी मारहाण झाली आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई केली गेली नाही एवढ्यापुरता मर्यादित नाही. आपले राज्य पुरोगामी आहे असा आपण आजवर डांगोरा पिटत आलो आहोत. हा पिटण्यात अग्रेसर असणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांनी आपला पुरोगामित्वाचा चेहरा दाखवून महाराष्ट्राचा लौकिक धुळीस मिळवला आहे. ज्याला मारहाण झाली, ती व्यक्ती गेली पाच वर्षे आपल्याला बदनाम करत होती असे पुरावे देऊन सिद्ध करण्याचा प्रयत्न जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणानंतर केला. आमचा त्यांना प्रश्न आहे की आपण संविधान आणि फुले-शाहू-आंबेडकर यांचा नामघोष करत असता. आपला संविधानावर, संविधानाच्या कायद्यावर विश्वास आहे, तर मग आपणास बदनाम करणाऱ्या त्या व्यक्तीविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी पुढाकार का घेतला नाही? आणि एखाद्या व्यक्तीला त्याच्या घरातून बाहेर आणून आपल्या खाजगी निवासस्थानी मारहाण कोणत्या कायद्यानुसार केली? सतत संविधान, फुले-आंबेडकर यांचे नामस्मरण केले की आपण पुरोगामी आहोत हे सिद्ध होते, अशा भ्रमात जे जगत असतात त्यांचे प्रतिनिधित्व जितेंद्र आव्हाड करत असून पाच तारखेला रात्री झालेल्या मारहाणीच्या घटनेमुळे त्यांच्या पुरोगामित्वाचा बुरखा टराटरा फाटला आहे. संविधानाच्या चौकटीत राहून समाजजीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आज सर्वांनी पुढाकार घेण्याची ही वेळ आहे. मात्र पुरोगामित्वाची झूल पांघरलेल्या काही नतद्रष्टांच्या असांविधानिक कृतीमुळे सर्वसामान्य माणूस संविधान आणि फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांपासून कोसो दूर जातो आहे. संविधान आणि फुले-शाहू-आंबेडकर यांना अपेक्षित नसलेला जातीयवाद पुन्हा नव्याने जागवला जात आहे आणि याला जितेंद्र आव्हाड यांच्यासारखे स्वतःला पुरोगामी मसीहा म्हणवणारे जबाबदार आहेत. ठाण्यातील मारहाणप्रकरणी संविधानाला आणि कायद्याला अपेक्षित काय कारवाई केली जाते, याची वाट पाहणे एवढेच आपल्या हाती आहे.

संविधान आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्य या दोन गोष्टी या प्रकरणाशी जोडलेल्या आहेत. संविधान म्हणजे कायद्याची चौकट. ठाण्यातील मारहाण प्रकरण आपण थोडे बाजूला ठेवून विचार करू या. आपण सर्व जण खरोखरच कायद्याच्या चौकटीत राहून समाजजीवनात आपले व्यवहार करतो का? आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्य म्हणजे काय? यांचाही सारासार विचार पुन्हा नव्याने करायला हवा. आज तंत्रज्ञानाच्या साहाय्याने समाजमाध्यमातून व्यक्त होताना आपण खऱ्या अर्थाने अभिव्यक्तिस्वातंत्र्य उपभोगतो की द्वेष, मानहानी, घृणास्पद कृत्य, चारित्र्य विडंबन इत्यादींसाठी आपण संविधानाने दिलेल्या या अधिकाराचा वापर करत असतो, याचा विचार केला पाहिजे. अभिव्यक्तिस्वातंत्र हे द्वेषाच्या आणि विकृतीच्या आधिपत्याखाली गेले की काय होते, याचे प्रात्यक्षिक ठाण्यातील घटनेने आपल्याला दाखवून दिले आहे आणि आपण वेळीच सावध झालो नाही, तर पुढील काळात अशी प्रात्यक्षिके जागोजागी पाहण्यास मिळतील.

हा विषय संविधान समजून घेण्याचा आहे, तसाच संविधानाच्या चौकटीत राहून मिळालेले अधिकार जगण्याचाही आहे. आज संविधान आणि फुले -शाहू-आंबेडकर यांच्या नावाने घोषणा देणारे पण प्रत्यक्षात संविधानविरोधी व्यवहार करणारे आणि संविधानाबाबत उदासीनता दाखवणारे अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा अधिकार अमर्याद वापरणारे अशा दोन गटात विभागले गेलो आहे. ही विभागणी आपल्या देशासाठी घातक आहे. अशातून एकरस समाज निर्माण होणार नाही, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

आपले वर्तन किती उथळ आहे, हे ठाण्यातील घटनेने दाखवून दिले आहे. या उथळपणामुळे कधीही भरून न येणारी हानी झाली आहे. संविधान आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्य यांच्यासमोर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचे काम ठाण्यातील घटनेने केले आहे. या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आता प्रत्येकाने प्रयत्न करायला हवा.