युगपुरुष महात्मा जोतिराव फुले

विवेक मराठी    10-Apr-2020
Total Views |


आपल्या देशात अनेक महापुरुष जन्माला आले आणि त्यांनी आपल्या कृतीतून, लेखनातून, भाषणातून समाजजीवनाला विकसित करण्याचा प्रयत्न केला. या प्रबोधन पर्वात महाराष्ट्र अग्रेसर होता. अव्वल इंग्रजी कालखंडापासून महाराष्ट्र राज्यात समाजप्रबोधन आणि सामाजिक परिवर्तन चळवळींना सुरुवात झाली होती. सामाजिक जीवनातील विविध समस्या आणि सामाजिक भेदभाव यांच्या विरोधात धीटपणे काम करणाऱ्या महापुरुषांच्या मालिकेत महात्मा जोतिराव फुले यांना अग्रपूजेचा मान आहे.


jyotiba_1  H x

जोतिराव गोविंदराव फुले यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी झाला. १८३४ ते १८३८ या काळात पंतोजीच्या शाळेत त्यांचे शिक्षण झाले. १८४०मध्ये सावित्रीबाईंशी त्यांचा विवाह झाला. १८४१ ते १८४७ या काळात त्यांनी पुण्यात मिशनरी शाळेत माध्यमिक शिक्षण (इंग्लिश) घेतले. त्याच काळात ते लहुजी वस्ताद यांच्या तालमीत विविध प्रकारचे व्यायाम शिकले, देशभक्ती शिकले आणि याच तालमीत त्यांना समाजभानही आले. लहुजी वस्ताद यांच्या सहवासात आलेले भान आणि इंग्लिश शिक्षण यामुळे निर्माण झालेल्या जाणिवा जोतिराव फुले यांना स्वस्थ बसू देत नव्हत्या. आपल्या समाजाची ही हीनदीन स्थिती का झाली? आपल्या अवतनीचे कारण काय? महिलांना दुय्यम वागणूक का द्यायची? अशा अनेक प्रश्नांनी जोतिरावांना पछाडले होते. खूप विचार करून त्यांनी या प्रश्नाचे उत्तर शोधून काढले, ते उत्तर म्हणजेच शिक्षण. अज्ञानामुळे सर्व अनर्थ झाला आहे, असे त्यांचे ठाम मत झाले. ते आपल्या अखंडात लिहितात,

विद्येविना मती गेली।

मतीविना नीती गेली।
नीतीविना गती गेली।
गतीविना वित्त गेले।
वित्ताविना शूद्र खचले।
इतके अनर्थ एका अविद्येने केले।

अज्ञान हे सर्व दु:खांचे कारण आहे. अज्ञानामुळे अंधविश्वासाला, अंधरूढींना, अनाचाराला आणि अमानुषतेला खतपाणी मिळत असते. जोतिराव फुले या निष्कर्षाप्रत आले होते आणि यातून बाहेर पडण्यासाठी शिक्षण हाच एक मार्ग आहे अशी त्यांची धारणा झाली होती. जोतिराव फुले यांनी अंधविश्वास मुक्तीसाठी, अज्ञान नष्ट करण्यासाठी ज्ञानाचा दिवा लावला. शूद्रातिशूद्रांसाठी शाळा सुरू केली. प्रस्थापित समाजव्यवस्थेला त्यांनी दिलेला हा मोठा धक्का होता. धर्मशास्त्रानुसार, सामाजिक धारणांनुसार ज्यांना हीन दर्जाची कामे करायची आहेत, अशांच्या मुलामुलींना शिक्षण देणारी व्यवस्था जोतिराव फुले यांनी उत्पन्न केली. जोतिराव फुले यांच्या या नवसमाजनिर्मितीच्या प्रयत्नाला घरातून विरोध झालाच, तसेच धर्माला आधार मानून आपली उपजीविका करणाऱ्या मंडळींनीही जोतिराव फुले यांच्या कामास विचार केला. या नव्या शाळेत शिकवण्यासाठी शिक्षक मिळेना, तेव्हा जोतिरावांनी आपल्या पत्नीला शिक्षण दिले आणि शिक्षक म्हणून नव्या शाळेत शिकवण्याची जबाबदारी दिली. मुलींची - तीही अस्पृश्य मानल्या गेलेल्या समाजातील मुलींची शाळा सुरू केल्यानंतर फुले दांपत्याला खूप त्रास झाला. घरचा विरोध, सामाजिक बहिष्कार, शेणादगडाचा मारा सहन करत या दांपत्याने जिद्दीने शाळा चालवली.


महात्मा जोतिराव फुले यांनी सामाजिक कुप्रथा आणि दंभ यांच्यावर प्रहार करणारे विपुल लेखन केले आहे. तृतीय रत्न, गुलामगिरी, शेतकऱ्याचा आसूड, ब्राह्मणाचे कसब इत्यादी महत्त्वाचे ग्रंथ लिहिले. अशा लेखनातून ते सामाजिक कुप्रथा आणि सामाजिक भेदभाव यांच्यावर सडकून टीका करत असत, तर दुसरीकडे याच समस्यांचे निराकारण व्हावे म्हणून कृतिशीलही राहत असत. त्यांनी विधवा केशवपनाविरुद्ध पुण्यात न्हावी समाजाचा मोर्चा काढला. विधवा विवाहाचे समर्थन केले. असे विवाह घडवून आणले. अनाथ बालकांना सांभाळले, शेतकऱ्यांना शेतीसाठी मार्गदर्शन केले. १८६८ साली स्वत:च्या वाड्यातील पाण्याचा हौद महार-मांगांसाठी खुला करून सामाजिक समतेचा जागर केला.

आपली वाणी आणि लेखणी सामाजिक परिवर्तनासाठी उपयोगात आणणारे जोतिराव स्वत: बांधकाम व्यावसायिक होते. खडकवासला धरण, कात्रज बोगदा, पुण्यातील मंडई अशी अनेक बांधकामे महात्मा जोतिराव फुले यांनी केली. या कामातून मिळणारे उत्पन्न त्यांनी आपल्या सामाजिक परिवर्तन चळवळीसाठी वापरले. जोतिराव फुले यांचा सामाजिक कळवळा मातृहृदयी होता. समाजातील कोणत्याही घटकांचे दु:ख पाहून त्यांना वेदना होत असत आणि ते दु:-वेदना दूर करण्यासाठी जोतिराव प्रयत्न करत असत. महात्मा फुले यांनी ज्या ज्या समस्यांची उत्तरे शोधण्यासाठी प्रयत्न केला, त्यातील बहुतांश समरसता या स्वत:ला उच्चवर्णीय समजणाऱ्या समाजगटाच्या होत्या, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. जोतिराव फुले यांनी विपुल प्रमाणात लेखन केले, या लेखनातून त्यांनी प्रस्थापित व्यवस्थेवर कोरडे ओढले आहेत. त्यांची भाषा तिखट आहे. मात्र त्यामागचा हेतू आपण लक्षात घेतला तर असे लक्षात येईल की समाजजीवन बदलण्यासाठी जोतिराव फुले यांनी वापरलेली भाषा खूप सौम्य आहे. कारण आपला समाज इतका हीन पातळीवरचे व्यवहार करत होता की त्यांची अशा तिखट शब्दांत कानउघडणी करणे आवश्यक होते. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी जोतिराव फुले यांच्या साहित्यावर भाष्य करताना म्हटले आहे की, महात्मा जोतिराव फुले यांच्या साहित्याचा शब्दशः अर्थ घेऊन विचार करण्यापेक्षा विवेकाने त्यांना समजून घेतले पाहिजे. विवेकाने आणि त्या काळातील सामाजिक परिस्थिती लक्षात घेऊन महात्मा फुले यांच्या साहित्याचा विचार केला पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने आपण महात्मा जोतिराव फुले यांना समजून घेऊ शकतो. शब्दप्रामाण्य, रूढीप्रामाण्य, ग्रंथप्रामाण्य, जातिभेद, अस्पृश्यता यापलीकडे जाऊन माणसाने माणसासारखे वागावे अशी माफक अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती आणि त्यासाठी बंधुतेचे, समतेचे अधिष्ठान हवे, हेही त्यांनी अधोरेखित केले होते. आज आपण जेव्हा महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या चरित्राचा अभ्यास करतो, तेव्हा त्यांना अपेक्षित असलेल्या समतेच, बंधुतेचा आपण अंगीकार केला आहे का? हेही तपासून घेतले पाहिजे. महात्मा जोतिराव फुले 'सर्व एका निर्मिकाची लेकरं' असे म्हणतात, तेव्हा सर्व पातळीवरचे भेद लुप्त होतात. जोतिराव फुले आपल्या अखंडात लिहितात,

धर्म राज्य भेद मानवा नसावे
सत्याने वागावे ईशासाठी ।
ख्रिस्त महंमद मांग ब्राह्मणाशी
धरावे पोटाशी बंधुपरी ।
निर्मिकाचा धर्म सत्य आहे एक
भांडणे अनेक कशासाठी ।

ख्रिश्चनांना आणि मुस्लिमांना आपण सध्या चर्चेच्या बाहेर ठेवू या, पण ब्राह्मण आणि मांग ही ज्या हिंदू समाजाची दोन टोके आहेत, त्यांच्यात तरी समता प्रस्थापित झाली आहे का? या प्रश्नाचे उत्तर आपण कधी शोधणार आहोत?

महात्मा फुले यांना साधारणपणे त्रेसष्ट वर्षांचे आयुष्य लाभले. त्यातील चाळीस वर्षे सामाजिक जीवनात परिवर्तन व्हावे यासाठी खर्ची घातली आहेत. वाणी, लेखणी आणि कृती यांचा त्रिवेणी संगम आपल्याला महात्मा जोतिराव फुले यांच्या जीवनात पाहायला मिळतो. त्यांनी समाजपुरुषाला गदगदून हलवले. समाजाला जागे केले. केवळ कुप्रथांवर आसूड ओढले नाहीत, तर सत्याचे आणि समतेचे अधिष्ठान असलेल्या भेदविरहित समाजाचे प्रारूप तयार केले. २८ नोहेंबर १८९० रोजी महात्मा फुले यांचे निधन झाले. महात्मा फुले यांच्या निधनानंतर त्यांनी दिलेला सामाजिक परिवर्तनाचा कृती आराखडा अजूनही पूर्णपणे प्रत्यक्षात येऊ शकला नाही. त्यांचा कृती आराखडा खूप व्यापक आहे. त्यांनी विकार, द्वेष यांचा आधार न घेता सामाजिक जीवनात प्रेम आणि समन्वयाची बरसात केली. सर्वाना सोबत घेऊन जाण्याचा आणि सर्वांनी मिळून सामाजिक प्रश्न सोडवण्याचा मार्ग महात्मा जोतिराव फुले यांनी चोखाळला होता. सर्व जण एकाच ईश्वराची लेकरे आहेत आणि म्हणूनच सर्व जण एकमेकांचे बांधव आहेत, हा जोतिराव फुले यांच्या चळवळीचा मूलमंत्र होता. हा मूलमंत्र आपल्या जगण्याचा भाग बनवणे हीच त्यांना आदरांजली ठरेल.

रवींद्र गोळे
९५९४९६१८६०