जयंती बाबासाहेबांची

विवेक मराठी    13-Apr-2020
Total Views |
१४ एप्रिल रोजी महामानव, भारतरत्न, संविधानाचे शिल्पकार, कायदेतज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. सध्या आपण गृहबद्धतेचा अनुभव घेत आहोत. बाह्य जगाशी आपला संपर्क थांबला आहे. त्यामुळे आगामी काळात येणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी कशी करावी? हा प्रश्न आपल्याला पडला आहे. त्या प्रश्नाचे एक उत्तर शोधण्याचा सा. विवेकने केलेला हा प्रयत्न -

ambedar_1  H x


कालच्या प्रश्नाचे उत्तर -

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर माणगाव येथील सभेत राजर्षी शाहू महाराज यांनी शिक्कामोर्तब केले होते.

आजचा प्रश्न

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना केळुसकर गुरुजींनी कोणते पुस्तक सप्रेम भेट दिले होते?

या प्रश्नाचे उत्तर कमेंटमध्ये जरूर लिहा.


सहभोजन

कोल्हापूरचे राजर्षी शाहू महाराज यांनी माणगावच्या सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले. १९२५च्या मे महिन्यात बाबासाहेब कोल्हापुरात होते. कोल्हापूर संस्थानाचे दिवाणपद बाबासाहेबांनी स्वीकारावे असे दरबारी मंडळाचे मत होते, पण बाबासाहेबांनी त्याला स्पष्ट नकार दिला आणि बाबासाहेब मिरज स्टेशनकडे निघाले. बाबासाहेबांसोबत दत्तोबा पवार व गणाचार्य हे दोन कार्यकर्ते होते. दत्तोबा चांभार समाजाचे, तर गणाचार्य मांग समाजाचे. मिरज स्टेशनमध्ये रेल्वेची वाट पाहणाऱ्या बाबासाहेबांना काही महार बांधवांनी ओळखले. गाडीला वेळ असल्यामुळे बाबासाहेब आणि दत्तोबा, गणाचार्य गप्पा मारत बसले. काही वेळाने महार वस्तीतून मटणाचे जेवण करून आणले गेले. बाबासाहेबांचे डोळे पाणावले. आपले दलित बांधव आपली किती काळजी करतात, हे त्यांनी सहकाऱ्यांना सांगितले. महार बांधवांनी आणलेले जेवण तिघांनी मिळून थट्टामस्करी करीत संपवले. खरे तर त्या वेळी दलित समाजात उच्च-नीचता पाळली जात होती. महार समाजापेक्षा चांभार आणि मांग हे स्वतःला उच्च समजत. बाबासाहेबांनी या दोन्ही कार्यकर्त्यांना महाराघरचे जेवण खायला घालून सहभोजनाचा आनंद घेतला. आपल्या कार्यकर्त्यांच्या मनातील जातीपातीची भावना पूर्णपणे कशी घालवता येईल, यासाठी बाबासाहेब छोटे छोटे प्रयोग करीत. अनेक लहान लहान प्रसंगांतून ते समानतेची शिकवण देत असत. जाती-धर्मापेक्षा 'माणूस' हा एक केंद्र किती महत्त्वाचा आहे, हे बाबासाहेबांनी कार्यातून दाखवून दिले.