जयंती बाबासाहेबांची

विवेक मराठी    14-Apr-2020
Total Views |
१४ एप्रिल रोजी महामानव, भारतरत्न, संविधानाचे शिल्पकार, कायदेतज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. सध्या आपण गृहबद्धतेचा अनुभव घेत आहोत. बाह्य जगाशी आपला संपर्क थांबला आहे. त्यामुळे आगामी काळात येणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी कशी करावी? हा प्रश्न आपल्याला पडला आहे. त्या प्रश्नाचे एक उत्तर शोधण्याचा सा. विवेकने केलेला हा प्रयत्न -

BR Ambedkar: On his 129th

कालच्या प्रश्नाचे उत्तर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना केळुसकर गुरुजींनी 'बुद्ध चरित्र' हे पुस्तक भेट दिले होते.

आजचा प्रश्न

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना नेहरू मंत्रीमंडळात कोणत्या खात्याची जबाबदारी मिळाली होती?

या प्रश्नाचे उत्तर कमेंटमध्ये लिहा.

मूर्तिमंत व्यासंग

व्यासंग आणि ज्ञानलालसा हा बाबासाहेब आंबेडकर यांचा स्थायिभाव होता. प्रा. .गं. मालशे यांनी याचा अनुभव घेतला होता. त्यांच्या महाविद्यालयीन जीवनातील प्रसंग सांगताना मालशे म्हणतात, “१९४७मध्ये मी सिद्धार्थमध्ये बी..ला होतो. नाटकाच्या तालमीच्या निमित्ताने आमची स्वारी संध्याकाळीसुद्धा कॉलेजात असायची. एका संध्याकाळी मी एक दृश्य पाहिले. माझ्या वृत्तीवर त्यांचा परिणाम झालेला आहे, माझ्या मनावर खोल ठसा उमटला आहे. एक मोटार कॉलेजच्या आवारात येऊन थांबली. चारदोन माणसे लगबगीने मोटारीजवळ गेली. त्यांनी आधार देऊन मोटारीतून एक व्यक्ती खाली उतरवली. ते बाबासाहेब आंबेडकर होते. स्वत:चे भव्य शरीर त्यांना सावरत नव्हते. बाबासाहेबांची बसायची खोली मोटारीपासून वीस-पंचवीस पावलांवर होती. दोघा माणसाच्या खांद्यावर हात टाकून जड पावलांनी ती भव्य आकृती सावकाश पुढे सरकत होती. मस्तक पुढे झुकलेले होते. मी पुढे जाऊन कुतूहलाने पाहिले, तर माझ्या उठवळ वृत्तीला धक्काच बसला. त्या तेवढ्या वेळात अशा विकलांग स्थितीत त्यांच्या हाती उघडलेले पुस्तक होते आणि ते वाचण्यात पार गढून गेले होते. आजूबाजूच्या वातावरणाला, माणसांना जणू काय ते विसरले होते. ते आंबेडकर मी कधीही विसरणार नाही. व्यासंग म्हणजे काय, ज्ञानलालसा म्हणजे काय याचे मूर्तिमंत उदाहरण होते ते!" डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा पद्धतीने आपल्या कामाशी समरस होत असत. एकदा काम हाती घेतले की त्यांना आजूबाजूच्या भवतालाचाही विसर पडत असे.