लॉकडाउन आणि घरगुती हिंसाचार

विवेक मराठी    17-Apr-2020
Total Views |

लॉकडाउन सुरू झाला आणि आठवडाभरातच दोन फोन्स आले - एक आमच्याकडे कामाला येतात त्या मावशींच्या मुलीचा आणि दुसरा एका मैत्रिणीच्या बहिणीचा. मावशींची मुलगी अनिता त्यांच्यासारखीच इतरांकडे घरकाम करून पैसे मिळवते. एरवी सकाळीच स्वतःच्याकडची सगळी कामे करून बाहेर पडते, ते घरी ४-५ वाजेपर्यंत पोहोचते. सुट्टी जवळपास नाहीच. नवराही रंगकाम करत असल्याने बाहेरच असतो. काम नसेल तर शेतकामासाठी पुण्याजवळच्या गावी जातो. आता लॉकडाउनमुळे दोघेही घरात अडकले आणि जो केवळ संध्याकाळचा वेळ एकत्र घालवावा लागत होता, तो दिवसभराचा झाला. वेगवेगळ्या कारणांमुळे आधीही तो अनिताशी भांडायचा, तिला मारायचा. आता त्याचा हिंसकपणा वाढला होता. सगळ्यात मोठे कारण ती पैसे जास्त कमावते. मुले हुशार असल्याने कामावरची कुटुंबे आर्थिक मदत करतात, काही चांगल्या गोष्टी देतात हा राग आणि संशय! हा राग तो तिच्यावर काढतोच, तसेच मुलांनाही मारतो.


Lockdowns around the worl

दुसरा आलेला फोन जिचा होता, ती अनेक वर्षे नवऱ्याचा विक्षिप्तपणा सहन करत आहे. तीसुद्धा म्हणाली की नवऱ्याबरोबर २४ तास राहणे कठीण होतेय. घरातली कामे करून घरातूनच ऑफिसचे काम करावे लागत आहे. मात्र नवऱ्याची मदत तर दूरच, ती कामाला बसली की त्याला सहन होत नाही. ती दिवसभर तैनातीला हवी असे त्याला वाटते. नाष्ट्याला, जेवणाला जराही उशीर झाला तर ओरडतो. ह्या काळातही आधीसारखेच पूर्ण साग्रसंगीत जेवण लागतेय. ऑफिसमधून त्याला लेऑफची भीती वाटतेय. मीटिंग्जचा सगळा राग तिच्यावर काढतोय. त्याचे सगळे फ्रस्ट्रेशन अखेरीस लैंगिक छळामध्ये परावर्तित होते. आणि ह्या काळात ते खूप वाढलेय.


दोन अतिशय वेगळ्या आर्थिक-सामाजिक परिस्थितीत असलेल्या महिलांची ही उदाहरणे! अनेकांसाठी घरात बंदिस्त व्हायचा हा प्रश्न वेळ घालवण्याचा आहे. हातावर पोट असलेल्या मजुरांसाठी, व्यावसायिकांसाठी हा प्रश्न अधिक गंभीर आणि उदरनिर्वाहाचा आहे. लहान मुलांसाठी मनोरंजनाचा आहे. सर्वांसाठीच आयुष्याचा राहण्याचा आहे. मात्र आयुष्य किंवा जगणे म्हणजे केवळ व्याधी न होता शरीर टिकवणे, निरोगी राहणे नाही, तर प्रतिष्ठेने जगणे. मात्र अनेक घराघरांमधून, अनेक प्रसंगी ही प्रतिष्ठा केवळ कर्त्या पुरुषाची असते असा समज आहे. ह्या लॉकडाउनच्या काळात मानसिकरीत्या सक्षम राहणे हे सर्वांसाठीच आव्हान आहे. आर्थिक विवंचना, आरोग्याचे टेन्शन, घरात राहण्याची चिडचिड, अनेक प्रसंगी व्यसनाधीन असणाऱ्यांना न मिळणारी दारू, लहान घर व त्यामध्ये कुटुंबीय एकत्र ह्यामुळे वाढलेला त्रागा अशी अनेक मानसशास्त्रीय कारणे त्याला आहेत. कोणत्याही कारणांमुळे आपला त्रागा काढण्याची एक कायमची हक्काची व्यक्ती ही स्त्री समजली जाते. तिच्या प्रतिष्ठेला अजूनही तितके महत्त्व नाही.


ह्याच कारणांमुळे ह्या लॉकडाउनदरम्यान सध्या स्त्रियांवरच्या अत्याचारांत वाढ होत आहे
. जगभरात अत्याचारांमध्ये २५%नी वाढ झाल्याचे दिसून येतेय. ह्यापूर्वी आर्थिक मंदी, भूकंप, पूर, दुष्काळ अशा नैसर्गिक आपत्तींमध्येही स्त्रियांवरच्या अत्याचारांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले होते. जगभरात फोन हेल्पलाइनवरील येणाऱ्या तक्रारी वाढत आहेत. जगात अनेक ठिकाणी महिला औषधे घ्यायला आल्यानंतर सांकेतिक भाषांमध्ये आपली समस्या सांगत आहेत. जगातील रिहाना कार्डी बी, टेलर स्विफ्ट अशा कित्येक सुप्रसिद्ध व्यक्तींनी अत्याचारग्रस्तांसाठी ह्या काळात मोठा निधी दिला आहे.


Lockdowns around the worl 

घरगुती हिंसाचार होत असलेल्या महिलांसाठी हा फार कठीण काळ आहे. भारतीय दंड विधानाप्रमाणे महिलांना ४९८असारख्या कलमान्वये संरक्षण दिले गेले आहे. त्याखाली नवरा आणि त्याचे नातेवाईक ह्यांच्यावर मानसिक, शारीरिक छळ होत असल्याच्या कारणावरून स्त्रीला गुन्हा नोंदवता येतो. त्याला ३ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षाही आहे. शारीरिक, मानसिक छळ होत असल्याच्या आधारावर घटस्फोटही घेता येऊ शकतो. मात्र मध्यमवर्गीय किंवा उच्च वर्गांमध्ये अनेक जोडप्यांमध्ये पोलीस तक्रार झाल्यानंतर पुन्हा एकत्र येण्याची शक्यता कमी होते. ह्याचउलट निम्न आर्थिक स्तरातील कुटुंबांमध्ये अशी तक्रार झाल्यास थोडासा वचक बसून अत्याचार कमी होतात, असेही इतक्या वर्षांच्या वकिली अनुभवातून दिसून येते. मात्र त्याची ठोस अशी आकडेवारी नाही. ह्या प्रश्नावर पूर्वी पोलीस तक्रार किंवा घटस्फोट इतकेच मार्ग अनेक वर्षे उपलब्ध होते. मात्र अशाही अनेक महिला आहेत, ज्यांना हे दोन्ही उपाय नको असतात किंवा लग्नाच्या सुरुवातीला नवऱ्यामध्ये काही बदल होतील असे वाटत राहते आणि त्यामुळे वैवाहिक आयुष्य चालू ठेवले जाते. अनेक लहान तक्रारींवर पोलीसही गुन्हा दाखल करून घेत नाहीत. काही अत्याचारांचे स्वरूप शारीरिक नसून मानसिक, शाब्दिक असते. मात्र ते शारीरिक त्रासाइतकेच भयानक असतात, असू शकतात. तरीही सामाजिक दडपणामुळे महिलांकडून टोकाचे मार्ग वापरले जात नाहीत. आर्थिक अवलंबित्वामुळे, कमी शिक्षणामुळे आणि स्त्री म्हणून समाजाने दिलेल्या, स्वतःहोऊन घेतलेल्या कायमच्या अपराधी, कमीपणाच्या भावनेने स्त्री आपल्यावरील अत्याचारांच्या दृष्टीने सजगच नसते, तक्रार ही त्यानंतरची गोष्ट. उदा., मनाविरुद्ध नवऱ्याकडून होणारे बलात्कार हे वैवाहिक आयुष्यात स्त्रीला तितके अयोग्य वाटत नाहीत. मात्र जेव्हा अत्याचार सहनशक्तीच्या बाहेर जाऊन अशी तक्रार करायची वेळ येते, तेव्हा अनेक वर्षांच्या सहनशीलतेमुळेही त्याची प्रासंगिकता हरवून गेलेली असते. अशा अनेक महिलांसाठी २००५ साली महिलांसाठी 'घरगुती छळापासून संरक्षण कायदा' मंजूर केला गेला. त्याअंतर्गत अशा सर्व मानसिक-शारीरिक अत्याचारांचा विचार केला गेला आणि संरक्षण अधिकारी नेमून महिलांना अनेक प्रकारचे निवारण करणारे आदेश देण्याचे अधिकार दिले गेले. अनेक महिला ह्या मंचाचा वापर करत आहेत हे दिसून येतेय. मात्र लॉकडाउनमुळे संरक्षण अधिकारी, पोलीस, न्यायालये ह्यांच्यापर्यंत पोहोचणे जिकिरीचे झाले आहे.

कौटुंबिक हिंसाचाराशी लढण्यासाठी पूर्वीपासूनच सरकारने स्थानिक पातळीवर हेल्पलाइन नंबर्स, समुपदेशन केंद्रे उपलब्ध करून दिली आहेत. तसेच खाजगी स्वयंसेवी संस्थाही अशी केंद्रे चालवितात. अशा केंद्रांवरही अत्याचारग्रस्त महिलांचे मोठ्या प्रमाणावर फोन्स येत राहतात. भारतात अशा फोनवरील तक्रारींच्या संख्येत सध्या जाणवण्याइतकी वाढ झाली आहे. महिलांबरोबरच बाललैंगिक शोषणाच्याही घटना समोर येत आहेत. चाइल्डलाइन इंडिया हेल्पलाइनवरही अशा तक्रारींचा ओघ खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तणावग्रस्त मुलांचे आणि महिलांचे तक्रारींचे फोन्स येत आहेत. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी ह्या काळात तक्रारींच्या फोन्समध्ये दुपटीने वाढ झाल्याचे सांगितले. राष्ट्रीय महिला आयोगाने ७२१७७३५३७२ हा whats app नंबर उपलब्ध करून हेल्पलाइन सुरू केली आहे. १८१ ह्या नंबरवरही महिला अत्याचाराविरोधात तक्रार करू शकतात. भरोसा सेल, तसेच दक्षता समिती ह्या संस्थांमार्फत महिलांना कायदेशीर आणि मानसिक समुपदेशन आणि तक्रार निवारण केंद्रे कार्यरत आहेत. त्यांच्या अनुक्रमे १०९३ आणि १०९१ ह्या हेल्पलाइन नंबर्सवर फोन करून तक्रार केली जाऊ शकते. ११२ इंडिया ह्या अॅप्लिकेशनद्वारेही पोलीस कंट्रोल रूमशी तत्काळ संपर्क होऊ शकतो. गंभीर मारहाणीच्या प्रसंगांसाठी पोलीस स्टेशन्स आहेतच. मात्र अनेक प्रसंगी नवऱ्याला किंवा अत्याचार करणाऱ्यांना फोनवरून समज देणे, पुढच्या स्थितीवर नजर ठेवणे, प्रसंगी घरी पोलीस वा सामाजिक कार्यकर्ता पाठविणे असे उपाय केले जाऊ शकतात. खाजगी वकिलांनी आणि समुपदेशकांनीही ठरवून काही वेळ दिल्यास हा काळ अनेकांसाठी सुसह्य होईल. अशी अत्याचारग्रस्त घरे माहीत असल्यास चाचपणीसाठी एखादा फोन करणे, तसेच अशा महिलांना समुपदेशकांची, वकिलांची मदत मिळवून देणे हे एक सामाजिक कार्यच होऊ शकते.

ही बाहेरील आणि तात्पुरती मदत झाली. मात्र सर्व वर्गातल्या स्त्रियांनी स्वतः खंबीर बनणे, सक्षम होणे आणि कोणताही अत्याचार सहन करण्याची सवय स्वतःला लागू न देणे हा त्यावर मूळ उपाय आहे. ज्या ज्या गोष्टीतून स्त्रीचा कमीपणा दाखविला जातो, ज्या ज्या गोष्टीतून स्वतःला दोष देण्याची प्रवृत्ती निर्माण होते, अपराधी आणि लज्जास्पद भावना निर्माण होते, ती ती गोष्ट - मग ती कितीही प्रतीकात्मक असू दे, प्रासंगिक असू दे, स्त्रियांनी तिचा विरोध करायला हवा. अत्याचार होतो, कारण तो सहन केला जातो. तो सहन केला जातो, त्याचे कारण स्वतःची अक्षमता असते किंवा अक्षम असण्याची भावना. दोन्ही दूर करायला पाहिजे.

- विभावरी बिडवे