हिंसा – मनातली आणि जनातली....

विवेक मराठी    18-Apr-2020
Total Views |

**डॉ. अनघा लवळेकर***


कोविड-१९च्या संकटामुळे घराघरांमध्ये खरं तर नाइलाजाने २४ तास एकत्र राहावं लागणाऱ्या कुटुंबीयांना अगदी इतक्या तीव्रतेने नसला, तरी काही प्रमाणात या परिस्थितीचा नक्कीच कंटाळा येत असणार. त्यावर मात करण्यासाठी काही जण अतिशय कल्पकतेने मार्ग शोधून काढत आहेत, तर काही जण मात्र या परिस्थितीला स्वीकारण्यात अपयशी ठरून त्यातून negative copingकडे वळत आहेत आणि त्यातून क़्वचित घरगुती असे काही उद्रेक घडताना दिसत आहेत.


women_1  H x W:

तेजाब नावाच्या जुन्या चित्रपटातलं सो गया है जहां। सो गया आसमा। सो गयी है सारी मंजिले.. सो गया है रस्ता।हे गाणं त्याच्या अनवट ठेक्यामुळे लक्षात राहिलं आहे. आज कोरोनाच्या संकटामुळे शहरंच्या शहरं अशी आपापल्या घरात चक्क बंदिस्त होऊन एका अर्थाने झोपी गेल्यासारखी दिसत आहेत. हे एक अतिशय अनपेक्षित आव्हान आहे. माणूस अशा अनेक आव्हानांचा सामना करत असतो हे खरंच, पण जेव्हा एखादं आव्हान सगळ्या पृथ्वीवरच्या मानवजातीला वेढून टाकतं, तेव्हा एक सामायिक मानसिकताही तयार होत असते. माणसाच्या मेंदूमध्ये स्व-संरक्षणासाठी काही प्रतिक्षिप्त केंद्रं दिलेली आहेत, त्यामुळे कुठलंही संकट समोर आलं की तत्काळ त्याच्यापासून पळ काढायचा, भीतीने थिजून जायचं किंवा त्याचा सामना करायचायापैकी कुठलीतरी एक प्रतिक्रिया दिली जाते. कोरोनाच्या संकटाला वेगवेगळी माणसं या तिन्ही वेगवेगळ्या प्रकारांनी तोंड देत आहेत, असं आपल्याला दिसतं. अनेक जणांनी या संकटाचा काहीसा स्वीकार केलेला दिसतो आणि त्याला तोंड देण्यासाठी काही प्रमाणात स्वतःचं मनोबल आणि व्यावहारिक बल एकवटलेलं दिसतंय, पण काही जणांना मात्र अजून या संकटाला तोंड देण्यासाठी खूप अडचणी येत आहेत असं दिसतं. मुळात हे संकट असं काही नाहीच आहे.. हे फारच किरकोळ आहे..' किंवा 'ते माझ्यापर्यंत कधीच पोहोचणार नाही...' अशा भ्रमात काही जण आहेत, काही जण या सगळ्या परिस्थितीमुळे मनावर येणारं मळभ दुसऱ्या कुठल्यातरी गोष्टीवर परावर्तित करताना दिसत आहेत, तर काही जण अतिशय दडपण घेऊन स्वतःच्या कोषात लपून गेलेले दिसताहेत. कोरोनाच्या संकटामुळे कुटुंबामध्ये लोक जसे एकमेकांच्या जवळ येताना दिसत आहेत, तसेच दुसऱ्या टोकाला एकमेकांना जगणं असह्य करतानाही दिसत आहेत. ह्या संदर्भातली एक छोटीशी गोष्ट आठवते - एका राजपुत्राचं एका मुलीवर प्रेम होतं. त्या दोघांना लग्न करायचं होतं, परंतु राजाला ते पसंत नव्हतं. राजपुत्राने खूप हट्ट केला. राजा अतिशय चतुर आणि धोरणी होता. "तुमचं प्रेम किती खरं आहे?" ह्या प्रश्नाला राजपुत्राने उत्तर दिलं, "जगाच्या अंतापर्यंत आम्ही एकमेकांना अंतर देणार नाही. कुठलीही अडचण असली, कितीही मोठं संकट आलं तरी आम्ही दोघं कायम बरोबरच असू." राजाने बरोबर ते शब्द उचलले आणि त्या दोघांनाही एकत्र बांधून कारावासात टाकायला सांगितलं. ज्या वेळी साखळदंडांनी एकमेकांना घट्ट जखडलेले ते दोघं कारावासाच्या कोठडीमध्ये आले, तेव्हा खरं तर सुरुवातीला त्यांना बरंच वाटलं. कितीतरी वेळ एकमेकांसोबत आता घालवता येईल, एकमेकांचा स्पर्श मनापासून अनुभवता येईल, एकमेकांना सुखदुःख सांगता येतील, अशा कल्पनांनी ते रोमांचित झाले. पण भविष्य कुणाला माहीत? दोन दिवस गेल्यानंतर त्यांना वास्तवाचे चटके बसायला सुरुवात झाली. ‘अगदी देहधर्मासाठीसुद्धा एकमेकांपासून विलग होता येत नाहीये. सतत एकमेकांना चिकटून राहिल्यामुळे विविध प्रकारच्या संवेदना अतितीक्ष्ण झाल्या आहेतहे भान यायला लागलं. एकमेकांच्या सहवासाची आधी वाटणारी ओढ कमी होत होत हळूहळू दोन-तीन दिवसांत त्यांना एकमेकांचा तिरस्कार कधी वाटायला लागला आणि भांडण करून अक्षरश: एकमेकांना बोचकारेपर्यंत त्यांची परिस्थिती कशी बनली, ते त्यांचं त्यांनाही कळलं नाही. त्या वेळेला राजाने त्यांना विचारलं, "अजूनही तुमचं एकमेकांवर प्रेम आहे का?" दोघांनीही एका सुरात उत्तर दिलं, "मुळीच नाही.. आम्हाला एकमेकांचं तोंडही बघायची इच्छा नाही!"

कोविड-१९च्या संकटामुळे घराघरांमध्ये खरं तर नाइलाजाने २४ तास एकत्र राहावं लागणाऱ्या कुटुंबीयांना अगदी इतक्या तीव्रतेने नसला, तरी काही प्रमाणात या परिस्थितीचा नक्कीच कंटाळा येत असणार. त्यावर मात करण्यासाठी काही जण अतिशय कल्पकतेने मार्ग शोधून काढत आहेत, तर काही जण मात्र या परिस्थितीला स्वीकारण्यात अपयशी ठरून त्यातून negative copingकडे वळत आहेत आणि त्यातून क़्वचित घरगुती असे काही उद्रेक घडताना दिसत आहेत.

माणसाला जेव्हा कुठलाही ताण जाणवायला लागतो, तेव्हा आपल्या जुळवून घेण्याच्या क्षमतेच्या अगदी उलट प्रपोर्शनमध्ये तो असतो. म्हणजेच आपण किती कुशलतेने ताण हाताळू शकतो असं आपल्याला वाटतं, त्या प्रमाणात ताण कमी किंवा जास्त अनुभवला जातो. जुळवून घेण्यासाठीची ही कौशल्यं शारीरिक (आपली तंदुरुस्ती, प्रतिकारक्षमता, निरोगीपणा), सामाजिक (जिवलगांचा सपोर्ट, आपले नातलग, आपला सोशल कनेक्ट), भावनिक (आपल्या मनात खंबीरपणा, भावनांना हाताळण्याची आपली क्षमता) असतात आणि याही पलीकडे काही आध्यात्मिक किंवा तत्त्वज्ञानात्मकही कौशल्य किंवा धारणा असायला लागतात, ज्या आपण आपल्या जीवनाचा अर्थ शोधण्याची वृत्ती किंवा दृष्टीकोन कमावला आहे का, हे दर्शवत असतात.


women_1  H x W:

ज्या व्यक्तींना अशा आव्हानांच्या वेळी अपयश येतं, त्यांना सगळ्यात जास्त कुठली भावना भेडसावत असेल तर ती निराशेची!! ही निराशा कशातून येते? ’परिस्थितीवर आपलं काहीच नियंत्रण नाहीही असाहाय्यता जशी जशी मनात घर करायला लागते, तशी तशी निराशेची पातळी वाढत जाते. मग एरवी काही प्रमाणात का होईना, व्यावहारिक किंवा विवेकी विचार करणारी आपली बुद्धी या निराशेमुळे रूळ सोडून अविवेकी विचारांकडे वळू लागते. त्यातूनच चटकन टोकाचे निष्कर्ष काढणं किंवा एखाद्या गोष्टीचा महाभयंकर धसका घेणं हे घडू शकतं. यातूनच कधीकधी एक प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून व्यक्ती स्वतःला किंवा इतरांना इजा पोहोचण्याचा मार्ग स्वीकारते. मानसशास्त्रामध्ये एक अतिशय प्रसिद्ध गृहीतक आहे - 'Frustration-Aggression hypothesis' म्हणजेच तीव्र निराशेतून माणूस तीव्र आक्रमकतेकडे झुकू शकतो, ही वस्तुस्थिती आहे. मघाशी उल्लेखलेल्या तीन प्रतिक्रियापैकी फ्लाइटम्हणजे पळून जाण्याची प्रतिक्रिया असेल, तर स्वतःच्या कोषात जाणारी व्यक्ती पुढे कधीकधी आत्महत्येच्या विचारापर्यंत पोहोचू शकते. सर्व परिस्थितीतून सुटका करून घेण्याचा तोच एकमेव मार्ग आहे असं वाटून अतिशय अविवेकी विचारांना बळी पडून जगातूनच नाहीस होण्याचा मार्ग स्वीकारताना दिसते. कोविडच्या ह्या वातावरणात अशाही काही घटना नोंदवल्या गेल्या आहेत. दुसरा मार्ग म्हणजे परिस्थितीला सामोरं जाणं म्हणजे फाइटकरणं.' हेही दोन प्रकारचं असू शकतं - एक म्हणजे ज्याला आपण रचनात्मक किंवा विधायक सामना करणं असं म्हणू शकतो, ज्यात व्यक्तीने या परिस्थितीला आहे त्या सुसज्जतेने तोंड देण्याचा ठाम निर्धार केलेला असतो आणि ती विवेकाच्या मार्गाने जाताना मनातल्या घालमेलीना सांभाळत राहते; पण याच फाइटचा दुसरा चेहरा अनावश्यक आक्रमकतेचा असू शकतो. ‘कशावर तरी माझं नियंत्रण आहेहे दाखवण्यासाठी व्यक्ती इतरांना स्वतःच्या दडपणाखाली आणू शकते किंवा शारीरिक-मानसिक इजा पोहोचवू शकते. हा नियंत्रणाचा भ्रम जेवढा ताकदवान, तेवढी हिंसा जास्त! ‘आपण कशावर तरी सत्ता गाजवू शकतोही कल्पना अशा माणसाला एक सुप्त असा आधार देत जाते. खरं तर अशा विचारांमुळे ही व्यक्ती स्वतःचं आणि स्वतःच्या जिवलागांचं नुकसानच करत असते, हे तिच्या लक्षात येत नाही.

कुठल्या कुठल्या प्रकारच्या व्यक्ती असं वागू शकतात? ज्या व्यक्ती मनाने मुळातच कमकुवत असतात, त्यासुद्धा अशा प्रकारच्या हिंसेच्या माध्यमातून किंवा इतरांवर सत्ता गाजवण्याच्या भ्रमातून स्वतःला आत्मविश्वास देऊ बघतात. ज्या व्यक्ती काही प्रमाणात मानसिकदृष्ट्या आजारी असतात किंवा विकृतीच्या सीमारेषेवर असतात, त्या व्यक्ती तर अशा हिंसात्मक कृतीकडे खूपच पटकन ओढल्या जाऊ शकतात. अशाही काही व्यक्ती असतात, ज्यांचा अहम् खूप बळकट असतो. त्यामुळे आपण घाबरलो आहोत किंवा निराश होत आहोत हे इतरांना थोडंसुद्धा कळू नये, असं त्यांना वाटतं आणि मग अशा स्वतःच्या प्रेमात असलेल्या, अतिशय अहंकारी असलेल्या स्वमग्न व्यक्ती इतरांना त्रास देऊन आपण खूपच ताकदवान असल्याचा भ्रम स्वत:च्या आणि इतरांच्या मनात निर्माण करत राहतात. यातूनच मग कुटुंबाअंतर्गत छोट्या छोट्या चकमकी, लैंगिक हिंसा आणि समाजमाध्यमांचा वापर करून चाइल्ड पॉर्नोग्राफीसारख्या साइटना भेटी देणं अशा गोष्टी केल्या जातात. (हीसुद्धा अप्रत्यक्षपणे हिंसाच.)

हे सगळं का घडतं? याच्यामागे महत्त्वाची दोन-तीन कारणं आहेत. एक तर अचानक आलेल्या संकटांचा सामना न करता येणं हे तात्कालिक कारण आहेच, पण त्याही पलीकडे जे मूलगामी कारण आहे, ते म्हणजे ज्या परिस्थितीमधून आपण स्वतःला घडवत गेलेलो असतो, ही परिस्थितीम्हणजेच ते संस्कार आणि त्या संस्कारांमुळे बनलेला आपला स्वभावही आहेत. भूतकाळातली परिस्थिती बदलणं शक्य नाही हे खरंच, पण स्वभाव आणि संकटाचा सामना करायला वापरत असणारी कौशल्य किंवा धारणा यात बदल करता येणं शक्य आहे. असे हिंसात्मक विचार कधी ना कधी, क्वचित जवळजवळ प्रत्येकाच्याच मनात ठसठशीतपणे किंवा अलगदपणे तरळून गेलेले असतात. काही जण ते बाजूला ठेवून पुन्हा कल्पक आणि विधायक उपायांकडे वळतात, तर काही जण तसं वळू शकत नाहीत. याचं मुख्य कारण म्हणजे असे हिंसक किंवा बाधक विचार आपल्या मनात जेव्हा येतात, तेव्हा त्यांचा मागोवा घेण्याची त्यांची क्षमता विकसित झालेली नसते. आधी आपल्या मनात असे विचार किंवा भावना येऊ शकतात याची लाज / राग / संकोच न बाळगता त्याचा स्वीकार करता येणं खूप महत्त्वाचं आहे. तसा स्वीकार करता आला, तर मग या विचारांचा मागोवा घेत वेळेवर ते नियंत्रित करता येतात. कधीकधी परिस्थिती खूप बिकट असते, आपले विचार नियंत्रित करण्याच्या पलीकडे जातात असं वाटायला लागतं. अशा वेळी एखाद्या विश्वासू व्यक्तीकडे मोकळेपणाने ते मांडणं, त्याचा निचरा होऊ देणं खूप महत्त्वाचं आहे. अनेक समुपदेशक यासाठी मदत करायला उपलब्ध असतात. आणखी एक महत्त्वाची गोष्ट करता येते, ती म्हणजे अशा प्रकारचे विचार मनात येत आहेत हे लक्षात आल्यावर, शरीर आणि मन दोन्हीही गुंतवून ठेवणाऱ्या एखाद्या रचनात्मक विधायक कामात स्वतःला आवर्जून बुडवून घेणं. त्यामुळे तात्कालिक का होईना, या विचारांपासून आपण दूर जाऊ शकतो आणि असं काम करताना मिळणाऱ्या आनंदामुळे नकारात्मक विचारांना अधिकाधिक वेळ दूर ठेवणं शक्य होतं. ‘मला कोणाची गरज नाहीहा आपला अहंकार बाजूला ठेवून आपलं सामाजिक वर्तुळ अधिक सक्षम करणं, चांगल्या विचारांच्या आणि आचारांच्या माणसांना आपल्याशी जोडत जाणं, त्यांच्याबरोबरचा संवाद चालू ठेवणं अशा अनेक गोष्टी करता येतात. मघाशी म्हटल्याप्रमाणे आपल्या धारणा बदलण्यासाठी चांगलं सकस दिशादर्शक असं साहित्य वाचणं, ऐकणं, त्यावर मनन-चिंतन करणं यातूनही आपण अशा प्रकारचे निराशेचे किंवा हिंसात्मक विचार बाजूला ठेवू शकतो. आपल्या आवतीभोवती जर कोणी असं वागत असेल आणि आपल्याला त्याचा त्रास होत असेल, तर अशा मनाने आजारी व्यक्तींनाही योग्य ती मदत मिळवून देणं हेसुद्धा माणूस म्हणून आपलं कर्तव्य आहेच. आपल्या घरातली निकटची व्यक्ती असं वागत असेल तर आपल्याला त्याचा ताण येणं - त्रास होणं स्वाभाविक आहे. अशा वेळी मदत करणाऱ्या काही संस्थांकडे ही गोष्ट नोंदवणं आणि त्यांच्याकडून आपण स्वतः अशा परिस्थितीला हाताळण्यासाठी सक्षम होणं, त्यासाठीचे उपाय माहीत करून घेणं हेसुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे.

मुळात कोविड-१९मुळे ही हिंसा निर्माण झाली आहे असं अजिबात नाही. हे तर फक्त निमित्त आहे. मुळात हिंसा ही माणसाच्या मनात कुठेतरी रुजलेली, उत्क्रांतीच्या काळातही तगून राहिलेली एक प्रतिक्षिप्त अशी भावना आहे. तिच्याशी सामना करायचा, तर आपल्या विवेकाचं बळ आपल्याला वारंवार अधिकाधिक दृढ आणि भक्कम करत जावं लागेल. युद्धाची तयारी ही शांततेच्या काळातच करावी लागते. कसोटीच्या वेळी ती ताकद वापरून संकटाचा सामना करता येतो, इतकंच नाही, तर त्याला इष्टापत्तीमध्ये परिवर्तित करता येतं. अशी माणसं, अशी कुटुंबं आणि असा (आज कमी प्रमाणात असलेला) समाज आपण कसा निर्माण करू शकू, हे आपल्यापुढचं खरं आव्हान आहे.

डॉ. अनघा लवळेकर