ही हत्या नव्हे, खूनच!

विवेक मराठी    21-Apr-2020
Total Views |

**देविदास देशपांडे***

पालघर जिल्ह्यातील गडचिंचले गावात झालेल्या दोन साधू आणि त्यांच्या एका चालकाचा मृत्यू महाराष्ट्राला हादरवून गेला. श्री पंच दशनाम जुना आखाड्याचे संत कल्पवृक्षगिरी महाराज आणि सुशीलगिरी महाराज माथेफिरू झुंडीला बळी पडले. पोलिसांच्या साक्षीने जमावाने केलेल्या या हत्येने राज्याच्या सार्वजनिक जीवनात नवीन नीचांक प्रस्थापित झाला. साधूंच्या या झुंडहत्येमुळे शिवसेनाकाँग्रेसराष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीची अब्रूची लक्तरे देशाच्या वेशीवर टांगली गेली. देशभर सरकारची छी:-थू: झाली आहे.


palghar_1  H x

झालेल्या दुर्घटनेपेक्षाही चीड आणणारी आणि किळसवाणी गोष्ट म्हणजे स्वनामधन्य लिबरल, सेक्युलर टोळ्यांनी आणि हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्या सरकारने केलेली झाकाझाक. एखाद्या साध्या गुन्ह्यासारखाच हाही प्रसंग असल्याचे भासवत, अफवांमुळे घडलेल्या हत्यांमध्ये आणखी एक भर म्हणून तो खपवण्याचा पूरेपूर प्रयत्न करण्यात आला. दोन दिवस तर ही घटना कळलीच नाही. घटना घडल्यानंतर समाजमाध्यमांमध्ये व्हिडिओ फिरू लागले, तेव्हा त्याची दाहकता लोकांच्या लक्षात आली. तेव्हा कुठे मुख्यमंत्र्यांना तिचा उच्चार करावासा वाटला. मात्र पडलो तरी नाक वर असे दाखवत यामागे 'आपली' मंडळी नसल्याचा कांगावा सुरू झाला. तरीही या घटनेच्या जेवढ्या बाजू आतापर्यंत समोर आल्या आहेत, त्यावरून हा जमावाने अविचाराने केलेला हल्ला नव्हता, तर विचारपूर्वक केलेला खूनच होता, हे लक्षात येते.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

साधूंच्या हत्येनंतर हिंदुत्ववाद्यांमध्ये क्षोभ उसळणे स्वाभाविक होते. राज्यात सत्ताधारी असलेली शिवसेना कालपर्यंत हिंदूंची हितरक्षक असल्याचा दावा करत होती. आपले हिंदुत्व पातळ झालेले नाही, असा आजही शिवसेनेचा दावा असतो. त्यामुळे आपण आपल्या वचनाला जागत असल्याचे दाखवून देण्याची संधी शिवसेनेला होती. मात्र झाले काय? तर जिथे साधूंची हत्या केली, त्या गावाच्या सरपंच भारतीय जनता पक्षाच्या आहेत आणि अटक केलेल्यांपैकी बहुतांश आरोपी भाजपाचे कार्यकर्ते आहेत, असा खोटा प्रचार काँग्रेसने सुरू केला. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी तसे ट्वीट केले. त्याला मम म्हणायचे काम सेनेने केले आणि गृहखाते ताब्यात असलेली राष्ट्रवादी काँग्रेस मूग गिळून गप्प बसली.

प्रत्यक्षात वस्तुस्थिती काय आहे? पालघर जिल्हा ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या कारवायांसाठी प्रसिद्ध आहे. त्यांना जोड आहे ती डाव्या पक्षांची. परिसरातील स्थानिक ग्रामपंचायती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या ताब्यात आणि पंचायत समित्यांचे व जिल्हा परिषदांचे स्थानिक सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे. अगदी स्थानिक आमदारही माकपचे आहेत. मग काँग्रेसने असा प्रचार का करावा? तर पोलिसांनी कशा प्रकारे तपास करावा आणि या प्रकारणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न करावा, याचे हे संकेत आहेत. सरपंच चित्रा चौधरी भाजपाच्या आहेत, हे खरे आहे; पण त्यांच्याच प्रयत्नाने तर या प्रकरणातील संशयितांना अटक करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मारे दावा केला की प्रकरणाच्या दिवशीच १००पेक्षा जास्त संशयितांना अटक करण्यात आली, परंतु हे झाले कोणामुळे ते काही त्यांनी सांगितले नाही.

 

mob_1  H x W: 0

काँग्रेस आणि सेना यांचा या प्रयत्नांना हातभार लावायला माध्यमातील मंडळीही सरसावली. सुधीर सूर्यवंशी आणि निखिल वागळे हे यात आघाडीवर होते. सूर्यवंशी यांनी तर प्रत्यक्षात भाजपा सरपंचाला अटक झाल्याची लोणकढी मारली. या हत्याकांडामागे भाजपाचा हात आहे आणि पोलिसांनी त्यापैकी काही जणांना अटक केली आहे, असे वागळेंनी ट्वीट केले. देशातील असहिष्णुतेबाबत ज्यांचे कान नेहमी टवकारलेले असतात, परंतु त्या असहिष्णुतेचे निवडक मासलेच ज्यांना दिसतात, त्यांच्यापैकी काही जणांमध्ये एवढी हिंमत नव्हती. म्हणून शहामृगासारखे ते वाळूत तोंड खुपसून बसले.

वस्तुस्थिती किती वेगळी होती! या प्रकरणात जे पकडले गेले आहेत आणि ज्यांची नावे प्राथमिक माहिती अहवालात आहेत, ते आहेत जयराम धाक भावर, महेश सीताराम रावते, गणेश देवजी राव, रामदास रुपजी असारे, सुनील सोमाजी रावते आणि सीताराम चौधरी. यातील पहिले चार जण माकपचे कार्यकर्ते होत आणि पाचवा राष्ट्रवादी काँग्रेसचा पंचायत समिती सदस्य आहे.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/


ज्या चौधरी यांच्या प्रयत्नाने आरोपी पकडले गेले, त्यांना आता 'तुमचे घरदार फोडून दोन्ही लहान मुलांसह सर्वांना जीवे ठार मारू' अशी धमकी देण्यात आली आहे. म्हणून आपल्याला पोलीस संरक्षण मिळावे, अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे. साधू आणि चालकाची मोटार वन विभागाने अडवल्यानंतर हळूहळू जमाव जमू लागला. आपल्या मुलांच्या किडन्या काढण्यासाठी आल्याच्या संशयाने त्यांना जमावाने ताब्यात घेतले. सरपंच या नात्याने चौधरी यांना बोलावण्यात आले. त्या वेळी 'कायदा हातात घेऊ नका, पोलिसांना येऊ द्या' असे त्यांनी लोकांना सांगून पाहिले. तेव्हा ते लोक भडकले. लोक आक्रमक झाल्याने त्या घरी निघून गेल्या. पोलीस आल्यानंतर त्या पुन्हा आल्या. राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य काशीनाथ चौधरी तिथे आले, तेव्हा तिघेही जिवंत होते. मात्र त्यांच्या समोरच लोकांनी तिघांवर हल्ला केला, तेव्हा काशीनाथ चौधरी यांनी लोकांना थांबवण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. तसेच जमाव खूप आक्रमक झाल्याने मारहाणीच्या भीतीने त्या पुन्हा घरी गेल्या, असे चित्रा चौधरी यांचे म्हणणे आहे.

जमावाच्या या भडक्यामागे उत्स्फूर्तता कमी होती आणि नियोजन जास्त होते, याला दुजोरा देणारी माहिती त्या भागात संघाचे माजी प्रचारक असलेल्या हर्षल भानुशाली यांनी दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, कल्पवृक्षगिरी महाराज, सुशीलगिरी महाराज यांना आणि चालकाला पकडल्यानंतर लगेच मारहाण झाली. त्यांना जमावाने ताब्यात घेतल्यावर बरीच फोनाफोनी झाली आणि नंतर ही जीवघेणी मारहाण झाली. भानुशाली यांच्या मते, यात सर्वात दोषास्पद भूमिका जर असेल तर ती पोलिसांचीच. कारण घटना घडली तेथून कासा हे गाव केवळ १०-१५ किलोमीटर अंतरावर आहे. तेथून या तिघांची मोटार जात असताना पोलिसांना कसे कळले नाही? पोलिसांना बोलावल्यावर केवळ दोन - तेही वयस्कर आणि निःशस्त्र पोलीस का पाठवले? जमाव आक्रमक झाला असताना साधूंना व त्यांच्या चालकाला गाडीत बसवून पोलीस निघून का गेले नाहीत? कारण जमावाने साधूंची गाडी आडवी केली असली, तरी पोलिसांची गाडी शाबूत होती. मात्र पोलिसांनी निव्वळ बघ्याचीच भूमिका घेतली नाही, तर चक्क मारहाण करणाऱ्यांना मदत केल्याचे चित्र उभे राहते.

भानुशाली यांनी आणखी एक मुद्दा मांडला. पालघर परिसरात गेले दहा दिवस चोर आल्याच्या अफवा पसरवण्यात आल्या होत्या. ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनीही याच अफवांचा आधार घेऊन या हत्येची कारणमीमांसा करण्याचा प्रयत्न केला. पण दहा-दहा दिवस अशा प्रकारच्या अफवा पसरतात आणि तरीही पोलीस किंवा प्रशासन त्याची दखल घेत नाही, हे अनाकलनीय आहे. त्याही पुढे जाऊन लॉकडाउनच्या काळात, संचारबंदी चालू असताना शेकडो लोकांचा जमाव रात्रीच्या वेळी लाठी-काठ्यांसह बाहेर येतो, हे हादरवून टाकणारे दृश्य आहे.

मुळात ठाणे-पालघर-नाशिक या जिल्ह्यांतील आदिवासी भागाचा पट्टा हा मिशनरी, डावे आणि जिहादी गेली काही वर्षे सुपीक जमीन म्हणून पाहतात. (कासा या गावात मुस्लिमांची मोठी वस्ती आहे). या भागात त्यांच्या कारवाया अगदी खोलवर गेल्या आहेत. स्वतःला रावणाचे वंशज म्हणवून घेणे, हिंदू प्रतीकांची नासधूस करणे असे प्रकार तिथे सररास होताहेत. या कारवायांशिवायही विविध कारणांनी द्वेषाचा प्रसार चालूच असतो. त्या सगळ्याची परिणती या हत्याकांडात झाली आहे. त्यामागे सुनियोजित षङ्यंत्र होते की नाही, हा तपासाचा मुद्दा आहे. पण गेल्या महिन्याभरातील पोलिसांच्या एकूण इतिहासाकडे पाहिले, तर हा तपास तरी योग्य होईल का नाही, ही शंकाच आहे.

एकुणात काय, तर राजकीय द्वेषाने, निर्ढावलेल्या झुंडशाहीने आणि सत्त्वहीन शासनयंत्रणेने केलेला खून म्हणूनच या संतांच्या हत्येची नोंद होईल.

- देविदास देशपांडे