गडचिंचले हल्लेखोरांना चिथावणी देणारे कोण?

विवेक मराठी    21-Apr-2020
Total Views |

‘विवेक विचार मंचा’कडून पालघर हत्याकांडाच्या सखोल चौकशीची मागणी

पुणे  : पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात गडचिंचले गावी जमावाने पोलिसांसमक्ष दोन साधूंसह तिघांच्या केलेल्या निर्घृण हत्येने देशभरात खळबळ उडाली आहे. याप्रकारे पोलिसांसमक्ष वा पोलिसांवर हल्ले करणाऱ्या घटनांमध्ये शासनविरोधी, अराजकवादी, सामाजिक संघर्ष निर्माण करू पाहणाऱ्या जहाल डाव्या व फुटीरतावादी व्यक्ती किंवा संघटनांचा हात असण्याची शक्यता ‘विवेक विचार मंच’ या संघटनेने व्यक्त केली असून, या घटनेतील हल्लेखोरांना चिथावणी देणारे किंवा जमावाची दिशाभूल करणारे लोक वा संघटना कोणत्या याची सखोल चौकशी करण्याची मागणीही ‘विवेक विचार मंचा’ने केली आहे.

संघटनेचे अध्यक्ष प्रदीप रावत व कार्यवाह महेश पोहनेरकर यांनी याबाबत पत्रक प्रसिद्ध केले असून यामध्ये पालघर गडचिंचले घटनेचा तीव्र निषेध संघटनेतर्फे करण्यात आला आहे. तसेच, या हत्याकांडात सहभागी सर्व हल्लेखोरांना अटक होऊन त्यांना न्यायालयात कठोर शिक्षा होईपर्यंत पोलिसांनी योग्य तो तपास करावा तसेच, घटनास्थळी उपस्थित पोलिसांवरही कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. गडचिंचले व आसपासच्या परिसरात विविध अफवा पसरल्याने त्या संशयातून जमावाने दोन साधूंसह तिघांची ठेचून हत्या केली, असे आता म्हटले जात आहे. तरीही, घटनास्थळी पोलीस उपस्थित असतानाही जमावाकडून निष्पाप लोकांची हत्या होणे अत्यंत गंभीर बाब आहे. अशाने पोलीस यंत्रणेवर समाजाचा विश्वासच उरणार नाही, असेही विवेक विचार मंचाने म्हटले आहे.

डाव्या व फुटीरतावादी संघटनांकडून चिथावणी?

भारतीय कायदे अमान्य करणारे लाल रंगाचे फलक डहाणू तालुक्यातील काही गावांत गेल्यावर्षी झळकले होते, याची आठवण करून देत डहाणू परिसरात कायदा व्यवस्थेच्या विरोधात काम करणारे संशयास्पद गट सक्रीय असल्याचे दिसते, असेही विवेक विचार मंचने या पत्रकात म्हटले आहे. तसेच, त्यामुळे गडचिंचले घटनेच्या वेळी विविध अफवा कोणी जाणीवपूर्वक पसरवल्या का? आतापर्यंत अटक झालेल्या आरोपींत संविधानिक मार्ग नाकारणाऱ्या व डाव्या, जहाल चळवळीचा प्रभाव आहे का? याबाबत कसून तपास होण्याची गरज व्यक्त करत आता गुन्हेगारांना मदत करण्यासाठी कोन पुढे येत आहेत, त्यांचीही सखोल चौकशी करण्याची मागणी ‘विवेक विचार मंचा’ने केली आहे.
mob_1  H x W: 0