मास्कची विल्हेवाट - गरज जाणीवजागृतीची

विवेक मराठी    22-Apr-2020
Total Views |

disposable मास्कऐवजी पुन्हा पुन्हा वापरता येणारे व कापडी मास्क वापरण्याबाबत ISRC आग्रही आहे. N-95 किंवा FFP1 हे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उच्च प्रतीचे व अधिक सुरक्षित मास्क मानले जातात. मात्र ते सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे आहेत. खरे तर केवळ आरोग्य सेवेतील लोकांनी हे मास्क वापरणे बंधनकारक आहे. शिवाय त्यांच्याकडे या मास्कची योग्य विल्हेवाट लावण्याची व्यवस्था उपलब्ध असते. बाकीच्यांसाठी पुनर्वापर करता येणारे कापडी मास्क पुरेसे असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. अगदी जागतिक आरोग्य संघटनाही हेच सांगत आहेत.


How to make your own face

गेले कित्येक दिवस जगभर सुरू असलेल्या कोरोना महामारीबरोबरच्या लढाईत तोंडाला लावण्याचे मास्क हे एक महत्त्वाचे संरक्षणात्मक आयुध बनले आहे. सर्वसामान्यांपासून ते वैद्यकीय सेवेकऱ्यांपर्यंत प्रत्येक जण या आयुधाच्या मदतीने कोरोना विषाणूंच्या संक्रमणापासून स्वत:चा आणि इतरांचाही बचाव करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र हे आयुधच या संक्रमणाच्या साखळीची कडी होत असेल, तरकाय? हो, जर मास्कचा वापर करताना किंवा त्याची विल्हेवाट लावताना जर योग्य काळजी घेतली नाही, तर त्याचे भयानक परिणाम होऊ शकतात. आपल्या वैयक्तिक आरोग्याचा विचार करून आपण मास्कचा वापर करण्याबाबत योग्य ती काळजी घेतही असू, पण मास्कची विल्हेवाट लावण्याबाबतही आपण तितकीच काळजी घेतो का, याचा विचार प्रत्येकाने करावा लागेल. कारण त्यामुळे आपल्याच समाजातील काही लोकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. आज सफाई कर्मचारी स्वत:च्या जिवाची पर्वा न करता आपला परिसर स्वच्छ ठेवत आहेत. मात्र आपल्या एका छोट्याशा चुकीने आपण त्यांच्याच आरोग्यशी खेळत आहोत. याच विषयावर जनजागृती करण्यासाठी Indian Scientists Response to COVID-19 (ISRC) हा गट पुढे सरसावला आहे. ISRC हा भारतीय वैज्ञानिकांचा व अन्य क्षेत्रांतील तज्ज्ञांचा गट असून कोव्हिड-१९च्या संकटाच्या निवारणासाठी शास्त्रीय आणि अभ्यासपूर्ण उपाययोजना करणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे. ISRC कोरोनाशी संबंधित चुकीच्या माहितीविरोधातही जनजागृती करीत आहे. डाॅक्टर, इंजीनिअर, तंत्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य अभ्यासक, अध्यापक, गणितज्ञ, पत्रकार, विद्यार्थी अशा अनेक क्षेत्रांतील लोक कार्यकर्ता म्हणून आपापल्या परीने त्यात योगदान देत आहे. भारतातील आणि भारताबाहेरील ५००हून अधिक भारतीय यात सहभागी आहेत. अमरजा कुलकर्णी या ISRCशी जोडल्या गेलेल्यांपैकी एक आहेत. ISRCच्या या उपक्रमाविषयी माहिती देताना त्या म्हणाल्या, "मास्कची विल्हेवाट आणि त्यातून निर्माण होत असलेल्या समस्या हा महत्त्वाचा विषय ISRC हाताळत आहे. या आणि यासारख्या अनेक विषयांवर जनजागृती करण्यासाठी आम्ही सर्व सक्रिय आहोत. मास्कविषयीच्या जनजागृतीत आम्हाला देशातील राज्य प्रशासने, स्थानिक प्रशासने, माध्यमे यांचा सहभागही हवा आहे. त्यासाठी ISCRने एक अभ्यासपूर्ण प्रस्ताव तयार केला आहे."

 

अमरजा कुलकर्णी 
How to make your own face

Disposable मास्क धोकादायक

कोरोनाच्या संसर्गाचा सगळ्यात जास्त धोका संभवतो तो एकदा वापरून फेकून द्यायच्या मास्कमुळे. कारण अशा disposable मास्कमुळे कचऱ्याच्या व्यवस्थापनाचा आणि त्याच्याशी संबंधितांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अनेकदा कोरोनासंक्रमित असलेल्या, पण त्याची लक्षणे नसलेल्या व्यक्तीने असे disposable मास्क वापरून कचऱ्यात असेच फेकले जाण्याची शक्यता असते. कचऱ्यातील अशा संसर्गित मास्कच्या संपर्कात सफाई कर्मचारी किंवा कचरा गोळा करणारे आले, तर साहजिकच कोरोनाच्या संक्रमणाचा बळी ठरू शकतात.


How to make your own face
यातला दुसरा एक धोका म्हणजे मोठ्या लोकसंख्येला मास्कची गरज असल्याने मास्कचा तुटवडा निर्माण होत आहे. या परिस्थितीत वापरलेले आणि दूषित मास्क गोळा करून, त्यावर पुन:प्रक्रिया करून काळ्या बाजारात त्यांची विक्री होऊ शकते. म्हणजे पुन्हा या टप्प्यावरही संक्रमणाचा धोका आहेच. त्यामुळे ISRC अशा disposable मास्कची योग्य काळजी घेऊनच विल्हेवाट लावण्याचा सल्ला देते. मास्कच्या विल्हेवाटीची योग्य प्रक्रिया - हात स्वच्छ धुवा > चेहऱ्यावरचा मास्क काढा > मास्क अशा प्रकारे दुमडा, ज्यामुळे दूषित भाग आतल्या बाजूला जाईल > मास्क आणखी एकदा दुमडून त्याची गुंडाळी करा > मास्कची दोन्ही टोके एकत्र बांधा आणि प्लास्टिकच्या पिशवीत टाका > पिशवी कचरा पेटीत टाकून हात स्वच्छ धुवा.



त्याही पुढे जाऊन disposable मास्कऐवजी पुन्हा पुन्हा वापरता येणारे व कापडी मास्क वापरण्याबाबत ISRC आग्रही आहे. N-95 किंवा FFP1 हे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उच्च प्रतीचे व अधिक सुरक्षित मास्क मानले जातात. मात्र ते सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे आहेत. खरे तर केवळ आरोग्य सेवेतील लोकांनी हे मास्क वापरणे बंधनकारक आहे. शिवाय त्यांच्याकडे या मास्कची योग्य विल्हेवाट लावण्याची व्यवस्था उपलब्ध असते. बाकीच्यांसाठी पुनर्वापर करता येणारे कापडी मास्क पुरेसे असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. अगदी जागतिक आरोग्य संघटनाही हेच सांगत आहेत.

कापडी मास्कची स्वच्छता आणि विल्हेवाट

कापडी मास्क किंवा पुनर्वापर करता येणारे मास्क औषधाच्या दुकानामध्ये उपलब्ध असतात. हे कापडी मास्क आपण घरीही बनवू शकतो. सरकारने याबाबत योग्य नियोजन केले, तर आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या कित्येक महिलांसाठी रोजगाराची संधीही उपलब्ध होऊ शकते. असे DIY (Do It Yourself) मास्क तयार करण्याची कृती WHO आणि US CDC या आरोग्य संघटनांच्या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.


त्याचबरोबर हे DIY कापडी मास्क वापरण्याबाबत, त्यांच्या स्वच्छतेबाबत आणि विल्हेवाटीबाबत मार्गदर्शक तत्त्वेही या संकेतस्थळांवर दिलेली आहेत. त्यानुसार टिकाऊ घरगुती कापडापासून (शक्यतो सुती) हे मास्क बनवले पाहिजेत. प्रत्येक वापरानंतर ते १% ब्लीचने किंवा १०% व्हिनेगरने किंवा साबणाच्या द्रावणाने स्वच्छ करावे. अशा प्रकारे काळजी घेऊन हे मास्क अनेकदा वापरता येतात. जर मास्क फाटल्यामुळे फेकण्याची वेळ आली, तर त्यापूर्वीही वरील द्रावणाने ते स्वच्छ करावे. त्यानंतर योग्य प्रकारे पिशवीत टाकून त्याची विल्हेवाट लावावी.
 
 
CPCBने (Central Pollution Control Boardने) या विल्हेवाटीबाबत काही सूचना केल्या आहेत. त्यात क्वारंटाइन केलेल्या किंवा संशयित रुग्णांची घरे असलेल्या परिसरात तेथील जैविक कचरा जमा करण्यासाठी पिवळ्या पिशव्यांचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच या पिशव्या थेट कचरा पेटीत टाकण्याऐवजी संबंधित कचरा जमा करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या स्वाधीन कराव्या, असेही सांगितले आहे.
 

mask_1  H x W:  

जनजागृतीसाठी अपेक्षित सहभाग

जागतिक किंवा देशांतर्गत आरोग्य व्यवस्थांनी मास्कच्या वापराबाबत दिलेली ही मार्गदर्शक तत्त्वे किंवा सूचना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याची गरज असून ते करण्यासाठी ISRC प्रयत्नशील असल्याचे अमरजा यांनी सांगितले. या जनजागृती मोहिमेसाठी आरोग्य विभाग, राज्य प्रशासन, स्थानिक प्रशासन, सोसायटी व्यवस्थापन आणि वैयक्तिक अशा क्रमवार स्तरावर प्रयत्न व्हावेत, असे ISRC ने आपल्या प्रस्तावात म्हटले आहे.
आरोग्य विभाग - कापडी मास्कच्या वापराबाबत आणि विल्हेवाटीबाबत योग्य सूचना देतील.
राज्य प्रशासन - या मोहिमेत माध्यमे, समाजातील प्रभावी व्यक्तिमत्त्वे यांना सहभागी करून घेतील आणि या मोहिमेला योग्य दिशा देतील.

स्थानिक प्रशासन - पोस्टर्स, पत्रके, ध्वनिक्षेपक प्रसारण आदी माध्यमांद्वारे प्रभावीपणे ही मोहीम आपल्या भागात राबवतील. तसेच लाॅकडाउनच्या काळात सर्व सोसायट्यांना साबण, ब्लीच आदी स्वच्छतेची साधने उपलब्ध करून देण्याची जबाबदारी त्यांची राहील.
सोसायटी व्यवस्थापन - सोसायटी व्यवस्थापन स्थानिक प्रशासनाच्या मदतीने आपल्या सोसायटीत काम करेल.
वैयक्तिक - प्रत्येकाने स्वच्छता आणि जैविक कचऱ्याच्या विल्हेवाटीबाबत असलेली मार्गदर्शक तत्त्वे कठोरपणे पाळावीत.

इन्सिनरेटर (Incinerator)
ISRC मास्क विल्हेवाटीला ठोस पर्याय म्हणून इन्सिनरेटर वापराला प्राधान्य देण्याचा सल्ला देते. केवळ मास्कच नव्हे, तर सर्व प्रकारचा जैविक कचरा या इन्सिनरेटरमध्ये नष्ट करता येईल. त्यासाठी राज्य प्रशासनाने इन्सिनरेटर निर्मिती करणाऱ्या कंपन्यांच्या मदतीने जास्तीत जास्त ठिकाणी ते उपलब्ध करून दिले पाहिजे, असेही या प्रस्तावात म्हटले आहे.

अमरजा सांगतात, "कोरोनाच्या या संसर्गाला रोखायचे असेल तर ही माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. मात्र राज्य प्रशासन, स्थानिक प्रशासन यांच्या माध्यमातून हे काम अधिक जलदपणे घडू शकते."

www.indscicov.in या वेबसाइटवर ISRCच्या उद्देशांविषयी आणि उपक्रमाविषयी अधिक माहिती मिळू शकेल‌. देशातील सर्व राज्य सरकारांना या जनजागृती मोहिमेसाठी प्रवृत्त करण्याच्या दिशेने हे समाजचिंतक सकारात्मक प्रयत्न करत आहेत. मात्र हा विषय फक्त शासन-प्रशासनाचा नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या संघर्षात मास्कची विल्हेवाट हा महत्त्वाचा टप्पा आहे. प्रत्येक सजग नागरिकाने वैयक्तिक स्तरावर यात आपला सहभाग दिला, मास्कची स्वच्छता, विल्हेवाट याविषयीच्या सर्व सूचनांचे पालन केले, तर समाज म्हणून अधिक सक्षमतेने आपण हे आयुध वापरू शकू.

सपना कदम-आचरेकर