या घटनेला जबाबदार कोण ?

विवेक मराठी    22-Apr-2020
Total Views |

*** गोपीनाथ भीमा अंभिरे***

१६ एप्रिल  रोजी पालघर जिल्ह्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली, ज्याचे पडसाद संपूर्ण भारतात उमटत आहेत. ही घटना लोकक्षोभातून, समूह मानसिकतेतून (mob lynching) की गैरसमजातून घडली? ज्या वनवासी बांधवाकडून सदैव माणुसकीचे दर्शन घडते, त्यांच्याचकडून हे असे कृत्य कसे झाले? कोण याला जबाबदार आहे?

mob_1  H x W: 0

पालघर हा आदिवासी जिल्हा आहे. याच परिसरात आदिवासी एकता परिषद, कष्टकरी संघटना, ख्रिश्चन मिशनरी, कम्युनिस्ट इत्यादी संघटनांचे काम चालते. त्यांची कामे परस्परांशी संगनमताने चालत असतात. भोळ्याभाबड्या आदिवासींना, 'तुम्ही मूलनिवासी आहात, हिंदू नाही, जंगलात तुमचेच राज्य, आदिवासींना धर्म नाही, आदिवासींचा देव रावण आणि राम अन्यायी राजा' अशी चिथावणी देण्याचे काम राजरोसपणे चालू असते.

दिनांक १४ एप्रिलपासून विचित्र प्रचार सुरू झाला. पालघर जिल्ह्यात "चोर येतात, लुटतात, लहान मुलांना पळवतात, किडनी काढून नेतात" अशा अनेक अफवांना ऊत आला. या अफवा अचानक कोणी सुरू केल्या? एखाद्या कुटिल कारस्थानाचा तो भाग आहे का? या प्रश्नांची उत्तरे शोधणे अत्यावश्यक आहे. याच्या परिणामी डहाणू सारणी येथे डॉक्टर विलास वळवी आणि पोलीस अधिकारी काळेसाहेब ह्यांना जमावाकडून मारहाण झाली. गरिबांना मदत देण्यास गेलेल्या लोकांवर हल्ला कोणत्या विचारातून होतो? मारहाणीच्या अन्यही दोन-चार घटना घडतात. पण याची बातमी जगासमोर येत नाही, का?

पोलिस यंत्रणेद्वारे 'अफवांना बळी पडू नका, शांतता राखा' असे आवाहन केले जाते, परंतु अद्यापही विद्यमान आमदार विनोद निकोले (CPM), सुनील भुसारे (NCP), श्रीनिवास वनगा (शिवसेना), राजेश पाटील (BVP) ह्यांच्याकडून कोणतीही दखल घेतली गेली नव्हती.

दि. १६ एप्रिल  गुरुवारी रात्री ९च्या सुमारास एका कारला गडचिंचले येथे अडवले गेले. जमावाने तीन यात्रेकरूंना थोडीफार मारहाणही केली. गावच्या भाजपा सरपंच सौ. चित्रा चौधरी ह्यांनी मध्यस्थी करून जमावाला शांत केले आणि त्या यात्रेकरूंना वनविभागाच्या चौकीत आश्रय दिला. वनविभागाच्या अधिकाऱ्याने कासा पोलीस स्टेशनला घटनेची माहिती दिली. जिल्हा परिषद सदस्य श्री. काशिनाथ चौधरी ह्यांना घेऊन पोलिसांची जीप रात्री १०:३० ते ११:००च्या सुमारास आली. दरम्यानच्या एक-दीड तासाच्या कालावधीत अशा घडामोडी घडल्या की स्थानिक कम्युनिस्ट आमदार निकोले ह्या प्रकरणाशी "मी या गावचा नाहीच" अशा शहाजोगपणे राहिले. पण आजूबाजूच्या दाभाळी, दिवसी, किन्हवली ह्या गावातील कार्यकर्ते (कम्युनिस्ट पक्षाचे असल्याचे बोलले जाते) काठ्या, दांडके, दगड घेऊन मोठ्या संख्येने गडचिंचले येथे जमा झाले. श्री. काशिनाथ चौधरी ह्यांनी जमावाला समजावण्याचा असा काय प्रयत्न केला की जमाव जास्तच उग्र झाला? समोर चोर नाहीत, साधू आहेत, ते विनवणी करीत आहेत हे लक्षात येऊनसुद्धा हिंदुद्वेषाचे विष प्यालेला जमाव दोन्ही साधूंना क्रूरपणे मारतात आणि सर्व काही ठरल्याप्रमाणे गुरुवारच्या दिवशी दोन गुरूंची अमानुषपणे हत्या केली जाते, शिवाय साक्षीदार जिवंत राहू नये म्हणून ड्रायव्हरलासुद्धा ठार मारले जाते; उपस्थित पोलीस बघ्याची भूमिका घेतात, हे सर्व व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसून येते.

त्याच रात्री पोलिसांचे अटकसत्र सुरू झाले. अटक झाली, परंतु गडचिंचले येथील जंगलात पळून गेलेल्या खऱ्या मारेकऱ्यांचा शोध घेतला गेलेला नाही. दुर्दैवाची बाब म्हणजे तिन्ही हुतात्म्यांचे पार्थिव देह सकाळपर्यंत रस्त्यावर बेवारसपणे पडून होते. शासनाने रुग्णवाहिकेची सोयसुद्धा केली नव्हती. सकाळी शासनाने खटारावजा वाहनांची सोय तर केली, परंतु त्यांचे शव उचलायला पोलिसांनी नकार दिला, तेव्हा नाशिकच्या साधूंनीच त्यांना वाहनात ठेवले आणि शवविच्छेदनासाठी (Post mortemसाठी) तलासरी आरोग्य केंद्रात नेले, ह्या घटनेला नाट्यमय स्वरूप दिले जाते.

दि. १७  एप्रिल  रोजी कोणीतरी तीन चोरांना ठार मारले अशी बातमी पसरली. ते हिंदू साधू होते हे शासन दरबारी दडपले गेले, परंतु व्हिडिओ व्हायरल झाला आणि वास्तव समोर आले. पोलीस चौकशीत भाजपाच्या एकमेव सरपंच असलेल्या सौ. चित्रा चौधरींनी मारेकऱ्यांची माहिती दिली. लगेच त्यांना कुटुंबीयांसहित जीवे मारण्याची धमकी आली. त्यांनी पोलीस संरक्षणाची मागणी केलेली आहे, परंतु भय इथले संपलेले नाही.

येथील सुजाण नागरिकांना प्रश्न पडतात, ते असे -

) सुरुवातीला चोर म्हणून हत्या झाली असे का भासवले गेले?

) हिंदू साधूंना चोर किंवा अतिरेकी ठरवण्याचा हा प्रयत्न तर नव्हता?

) प्रत्यक्ष घटना घडताना पोलिसांची बघ्याची भूमिका संशयास्पद नाही का? पोलिसांनी हवेत गोळीबार का केला नाही??

) असे मारहाणीचे प्रकार घडले असताना आणि या वेळी जमाव हिंसक झाला आहे हे माहीत असताना पुरेसा पोलीस फोर्स का पाठवला गेला नाही?

) मृतदेहाकरिता सरकारी वाहनाची सोय केली, पण त्यांना उचलून ठेवण्याचे कामसुद्धा केले नाही. पहाटेपर्यंत शव रस्त्यावर ठेवणे ही अनास्था ते हिंदू साधू होते म्हणून का?

) टाळेबंदी असताना हा जमाव एकत्र आलाच कसा?

) साधू वनअधिकाऱ्याच्या सुरक्षेत असताना जमावाला चिथावणी कोण देत होते?

) गडावर पळून गेलेल्या अपराध्याबाबत शासनाला माहिती आहे का? असेल तर काय कार्यवाही झाली?

) भोळ्याभाबड्या आदिवासींना हिंदूविरोधात चिथावणी देऊन त्यांच्याकडून अमानुष कृत्य घडवणारे नेमके कोण आहेत? त्याच्या विरोधात कारवाई होणार का?

१०) आमचे माननीय मुख्यमंत्री ह्या *जघन्य* अपराधाला गैरसमजुतीचे पांघरूण का घालत आहेत? तसेच दुसऱ्या राज्यातील पोलीस यंत्रणेवर खापर फोडण्याचा केविलवाणा प्रयत्न का करीत आहेत??

११) हे शासन हिंदूंना न्याय देणार का? की हिंदूंनी अन्याय निमूटपणे सहन करावा?

गोपीनाथ भीमा अंभिरे

धाकटी डहाणू