शिकवण कोरोनाची - 3

विवेक मराठी    23-Apr-2020
Total Views |

मागील भागात आपण आहारासंदर्भात चर्चा केली. आज 'विहार' या मुद्द्याचा थोडा विचार करू.

कोरोनाचा प्रसार होत असताना काही दृश्ये टीव्हीवर दिसत होती. मुख्यत्वे अमेरिका आणि फ्रान्स, स्पेन या देशात कोरोना दाखल झाला होता. अशा वेळेस या देशांमधील पब्स आणि बीच भरभरून वाहत होते आणि तेथे असणारे नागरिक उद्दामपणे "कोरोना आम्हाला काही करणार नाही. जीवन हे एन्जॉय करायचे असते आणि आम्ही ते करत आहोत" असे म्हणत त्यांचा वीकेंड साजरा करत होते. इटलीमध्येसुद्धा तेच घडले. मध्ये तर तेथे 'हग चळवळ' (Hug movement) उभी राहिली होती. जीवन हे उपभोगण्याची गोष्ट आहे, जे काही जगायचे ते एकदाच जगायचे, पैसे मिळवायचे आणि पैसे उधळायचे. येनकेन पद्धतीने उपभोग घेणे हाच जीवनाचा उद्देश.


Wuhan before  coronavirus

यानंतरची बातमी आणखी अस्वस्थ करणारी आहे. जसाजसा कोरोनचा प्रादुर्भाव वाढला, तसे अमेरिकेत शस्त्रांच्या विक्रीत आश्चर्यकारक वाढ झालीं आहे. आता ही शस्त्रे घेण्याची आवश्यकता कशातून निर्माण झाली आहे? भविष्यातील असुरक्षितता त्यांना हे करायला लावत आहे का? अशा प्रकारचे संकट आल्यावर मानसिक अवस्था स्थिर टिकवण्याची जगात आज कुठलीच पद्धत उपलब्ध नाही, (तणाव व्यवस्थापन), जी भारतीय जीवनपद्धतीत आहे. एकूणच ही जी काही मन:स्थिती दिसत आहे, ती चिंताजनक आहे, पण याला कारणीभूत मुख्यत्वे उपभोगकेंद्रित आणि भौतिक सुखाच्या केंद्रित विकासाची कल्पना आहे.

बऱ्याच वेळेस नागरी जीवनाचा विचार करताना, भारतीय नागरी जीवनाला पश्चिम दिशेने येणाऱ्या विचाराशी तुलना करताना नेहमी कमी लेखले गेले आहे. पण प्रत्यक्षात या महामारीबरोबर आज जरी आपण लढाई पूर्ण जिंकलेली नसली, तरी या लढाईत आपली स्थिती त्या देशांपेक्षा खूप चांगली आहे! कशामुळे? सरकारकेंद्रित व्यवस्था आहेतच, त्याचप्रमाणे समाजातले नानाविध घटक एकमेकांना सावरायला पुढे येत आहेत. ज्यांच्याकडे भोजनव्यवस्था नाही, ज्यांच्याकडे शिधा नाही, त्यांना सरकार तर मदत करत आहेच, तसेच अनेक परिवार, स्वयंसेवी संस्थांमार्फतही हे काम केले जात आहे. पोलीस, डॉक्टर स्वतःचे जीव धोक्यात घालून आपली सामाजिक बांधिलकी जपत आहेत. समाजाला सावरण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. प्रमुख कलाकारांनी 'संगीत सेतू' नावाचा प्रयोग सादर केला, हा एक अभिनव प्रयोग होता. त्यातून अनेकांची एकटेपणाची भीती नाहीशी त्यांना होऊन नवप्रेरणा मिळाली.

जगाला याचे आश्चर्य वाटत आहे. पण यात आश्चर्य वाटण्यासारखे खरे तर काही नाही. आपल्याकडील चिंतनात नेहमीच माणसाचा विचार करताना त्याच्या फक्त शरीराचा विचार कधीच नव्हता. मनुष्याच्या शरीरात न दिसणारे एक चैतन्य आहे, कुणी त्याला चिती, तर कुणी आत्मा म्हणतात अशी आपल्या द्रष्ट्या ऋषिमुनींनी मांडणी केली आहे. माणूस हा समाजप्रिय माणूस आहे, हे येथील विचाराने ओळखले आणि त्या आधारावर सर्वात आधी नागरी जीवन या भूमीवर विकसित झाले. हडप्पा आणि मोहेंजोदडो येथील संस्कृती उत्खननात सापडली, तेव्हा सर्व जगाने आश्चर्य व्यक्त केले. पूर्वी भारतात येणाऱ्या यात्रिकांनी जे प्रवासवर्णन केले, त्यात 'स्त्री आणि संपत्ती सर्वात जास्त सुरक्षित असणारा देश' असे आमच्या देशाचे वर्णन केले होते. काळाच्या प्रवाहात आक्रमणे आणि पारतंत्र्य यामुळे आम्ही ज्या अनेक गोष्टी विसरलो, त्यात आम्ही काही प्रमाणात नागरी जीवन विसरलो. कोरोना पुन्हा आता हे शिकवत आहे - नव्हे, साऱ्या जगाला ते शिकण्यास बाध्य होईल की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

कोरोनाचा प्रसार सुरू झाला आणि पहिला मुद्दा आला हस्तांदोलन करण्याचा आणि मग हस्तांदोलन न करता भारतीय संस्कृतीचे प्रतीक असलेली, हात जोडून नमस्कार करण्याची पद्धत सगळ्यांनी सुरू केली. पश्चिमी संस्काराची आणखी एक पद्धत म्हणजे आलिंगन देणे. आनंद आणि प्रेम व्यक्त करण्याची ही पद्धत आता आत्मघातकी ठरत आहे. काही कारण नसताना ओठाचा स्पर्श करून स्वागत करणे हेसुद्धा पश्चिमी संस्कृतीचे द्योतक! आता अशा सर्वांना आणि आपल्या भारतात अतिरेकी डाव्या विचाराच्या जेएनयू आणि जाधवपूर यासारख्या शिक्षण संस्थात जे विद्यार्थी या सगळ्या पद्धतीचे बीभत्स प्रदर्शन करतात आणि विरोध करणाऱ्यांना संस्कृतीचे ठेकेदार म्हणून हिणवतात, त्यांना कोरोना ही भानावर आणणारी आपत्ती आहे. अर्थात ते भानावर येतील याची खात्री नाही. आमच्या वागण्या-बोलण्यातील भारतीय पद्धती जगाला स्वीकारावी लागेल आणि आम्हाला ती जगाला शिकवावी लागेल, अशी परिस्थिती कोरोनाने निर्माण केली आहे.


Wuhan before  coronavirus

आपल्याकडे प्राचीन काळापासून शरीराचा व्यायाम हा महत्त्वाचा मानला गेला आहे. 'शरीरमाद्यम् खलु धर्मसाधनम्!' आरोग्य चांगले हवे असेल, तर शरीराला व्यायामाची गरज आहे. आमच्याकडे शरीर, बुद्धी, मन आणि आत्मा यांचा समन्वय साधणारा योग-प्राणायाम व्यायामप्रकार जुन्या काळापासून प्रचलित होता. यम, नियम, आसन आणि प्राणायाम यावर आधारित योगशास्त्र हे शास्त्र म्हणून प्रसिद्ध होते. आमचे सुदैव असे की या परंपरेला गेल्या २५ वर्षांत आमच्या देशात पुन्हा चांगले दिवस आले. बाबा रामदेव, रविशंकरजी, ऋषी प्रभाकरजी अशा सर्वांनी आणि योगविद्याधामसारख्या संस्थांनी एका अर्थाने योगक्रांतीच केली. ही योगक्रांती भारताच्या बाहेर गेली ती 'योगा' नावाने आणि ह्या योगसाधनेचे उपासक पंतप्रधान झाल्यावर, त्याला आंतरराष्ट्रीय योग दिवस नक्की झाल्यानंतर पुन्हा जागतिक मान्यता मिळाली. कोरोनासंदर्भात जग जेव्हा कुठे चुकले याचा विचार करेल, तेव्हा या योगशास्त्राचा विचार त्यांना करावा लागेल आणि त्या वेळेस भारताला आपली जबाबदारी पाडण्यासाठी सिद्ध राहावे लागेल.

व्यायामाबरोबरच भारतीय क्रीडाप्रकार हे कमी साधनांची आवश्यकता असलेले आणि सर्वांगीण व्यायाम होणारे होते. कदाचित त्या खेळांना पुन्हा संजीवनी मिळेल असे आता वाटायला लागले आहे. मोबाइल आणि नेट यांच्या व्यसनांतून आपल्याला ह्या पिढ्यांना बाहेर काढणे ही कोरोनाचीच शिकवण आहे. कारण अंतर्गत रोगप्रतिकारक शक्ती हाच मुद्दा महत्त्वाचा ठरत आहे आणि आपल्या व्यायामपद्धती आणि आपले मैदानी खेळ ह्यासाठी उपयोगी ठरणार आहेत. जसे योग्य आहार, तसेच योग्य विहारही रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आवश्यक आहे. सूर्यनमस्कारासारखा आदर्श व्यायाम आम्ही विसरलो. वास्तविक सूर्यदेवता ही तेजाची देवता आहे आणि आपण सगळी उपासना देवाला समर्पित करत असतो, म्हणून ह्या व्यायामाचे नाव सूर्यनमस्कार! स्टेफी ग्राफला तिच्या फिटनेसचे रहस्य विचारल्यावर तिने "मी जो व्यायाम करते, तो सूर्यनमस्कार नावाचा आहे" असे सांगितले होते. (तिच्या भाषेत 'sungod')

थुंकी ही कोरोनाच्या प्रसारात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आम्ही पथभ्रष्ट झालो आणि हा देश तर थुंकणाऱ्यांचा देश म्हणून प्रसिद्ध झाला. ज्या देशात 'समुद्र वसने देवी पर्वतावलि भूषिते, विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्श क्षमस्व मे!' हा संस्कार प्रात:स्मरणी जपला जातो, तो आमचा देश! येथे आम्ही थुंकायचे कधी शिकलो? हे आम्हाला कळलेच नाही. आमच्या विहारशास्त्रात कुठली गोष्ट कधी आणि कोठे आणि कशी, केव्हा करायची, याचे काही नियम होते. पणं त्या नियमांचे पालन आम्ही चुकवले. माणसाच्या मृत्यूनंतर त्याचे अंत्यसंस्कार 'दाहसंस्कार' करण्याची पद्धत आहे. आज कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर साऱ्या जगाला ही अंत्यसंस्काराची प्रचलित पद्धत जास्त पर्यावरणपूरक वाटत आहे. चीनमध्येही महामारी जेव्हा तांडव घालत होती, तेव्हा अंत्यसंस्कारासाठी त्यांनी हीच पद्धत अवलंबली.

जेव्हा जगाला मार्गदर्शन करणारी, संपूर्ण मानव कल्याणकारक संस्कृती, जीवनपद्धती क्षीण होते, असाहाय्य होते, पराभूत होते किंवा पथभ्रष्ट होते, तेव्हा केवळ त्या संस्कृतीच्या छायेखाली राहणाऱ्या समूहाचे नुकसान होत नाही, तर संपूर्ण मानव समूहाला ते घातक असते. सगळ्या जगाला मार्गदर्शन करणारा आपला समाज भरकटकला. त्यातून आज मनुष्यसमूहापुढे अस्तित्वाची लढाई लढण्याची वेळ आली आहे. पण शेवटी या लढाईचे नेतृत्वही आपल्यालाच करावे लागणार आहे. पुन्हा स्वामी विवेकानंद यांच्या सांगण्याप्रमाणेच येथील संस्कृतीला आणि येथील समाजाला नियतीने सोपवलेले एक कार्य आहे, ते पूर्ण करण्याची आता वेळ येत आहे. नव्या युगातील सर्व शास्त्रीय आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने मनुष्याच्या जन्माचे मूळ उद्दिष्ट सगळ्या जगाला सांगायची वेळ आली आहे. आमच्या शास्त्रात छोट्या खनिज स्वरूपापासून ते वनस्पती, सूक्ष्म प्राणी आणि अगदी चंद्र-मंगळावर पाऊल ठेवणाऱ्या मानवजातीची मिळून ही जीवसृष्टी आहे. अशा सगळ्या सृष्टीलाच आम्ही 'वसुधैव कुटुंबकम!' म्हटले आहे. त्यामुळे आमचे विहारशास्त्र आम्हाला याला पूरकच बनवावे लागेल. त्यासाठी आमची शास्त्रे, उपनिषदे यांचा नव्या संदर्भात अभ्यास करून जगासमोर त्याची मांडणी करावी लागेल. स्वतःच्या बुद्धीच्या आणि शक्तीच्या गर्वामध्ये वाहून जाणाऱ्या मनुष्याला भानावर आणण्यासाठी आम्हाला आमच्या व्यवहारातून आणि आमच्या वागणुकीने कुठलाही न्यूनगंड न बाळगता जगाला सामोरे जाण्याची गरज आहे. प्रत्येक आचरण हे उपासना पद्धतीस जोडता येणार नाही, पण धर्माशी जोडावेच लागेल. हो, येथे धर्म म्हणजे जीवन जगण्याची पद्धती! ती संपूर्ण माणसाच्या हिताची असेल, तर त्या संस्कृतीचे, त्या धर्माचे नाव काय आहे यापेक्षा त्यातून मंगल काय घडू शकते, हे बघितले पाहिजे.

पुढच्या भागात आणखी काही मुद्द्यांची चर्चा करू.

(क्रमशः)
नीरक्षीरविवेक