फादर, तुम्ही कुठे आहात?

विवेक मराठी    24-Apr-2020
Total Views |


१६ एप्रिल रोजी गडचिंचणे गावात भगव्या वस्त्रातील दोन साधू आणि एक वाहन चालक यांचा हिंसक झुंडीने बळी घेतला. पोलिसाच्या उपस्थितीत हे हत्याकांड झाले, हे तुम्हाला माहीत असेल. गडचिंचणे गाव पालघर जिल्ह्यात आहे आणि तुम्हीही पालघर जिल्ह्यातील वसईत राहत आहात. तुम्ही ज्या धार्मिक विचाराचे पाईक आहात, त्या वसई धर्मप्रांतात ही अमानुष हत्या झाली, हे तुम्हाला कळले असेलच.


father_1  H x W

दोन साधूंसह एकूण तीन जणांना दगड-धोंड्यांनी आणि काठ्यांनी ठेचून मारले. ही झुंडशाही दोन दिवस दाबून ठेवण्याचा प्रयत्न झाला. तुम्हाला माहीत असेलच की समाजमाध्यमातून व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर गुन्हेगारांना अटक करण्यात आली. तरीही मुख्य सूत्रधार अजूनही फरार आहेत, हेही तुम्हाला माहीत असेलच.

फादर, या घटनेला आज आठ दिवस होऊन गेले. या झुंडशाहीविषयी तुम्ही निषेधाचा सूर आळवला का? या परिसरात तुमच्या विचारधर्माचे प्राबल्य आहे आणि तुमच्या धर्मप्रांतात ही अमानुष हत्या झाली आहे, त्यामुळे तुम्ही साधा निषेध तरी कराल, अशी अपेक्षा होती. पण तुम्ही काही भूमिका घेतली आहे असे ऐकिवात नाही.

फादर, तुम्ही साहित्यिक आहात, म्हणून तुम्ही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झालात आणि संमेलनाच्या व्यासपीठावरून तुम्ही झुंडशाहीचा निषेध करून आपले पुरोगामित्व सिद्ध केले होते. तुमच्या या बाण्याला अनुसरून तुम्ही पालघर जिल्ह्यात घडलेल्या हत्याकांडामागच्या झुंडशाहीचा निषेध करावा, अशी अपेक्षा होती. मात्र फादर, आपण अपेक्षाभंग केलात. आपण म्हणता, साहित्याला धर्म नसतो, मानवतेची पाठराखण केली पाहिजे.. मग या अमानुष हत्येचा निषेध करताना तुमचा धर्म आडवा आला की काय? मृतांची भगवी वस्त्रे त्यांचा धर्म अधोरेखित करतात, म्हणून तुम्ही शांत आहात का?

फादर फ्रान्सिस दिब्रिटो, तुम्ही संतसाहित्याचे अभ्यासक आणि करुणामूर्ती येशूचे उपासक आहात. करुणा ही सहजभावना आहे, असे संतसाहित्य सांगते. मग तुम्ही सिलेक्टिव्ह कसे काय? ज्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी आपण विराजमान झाला आहात, ज्या मराठी साहित्यविश्वाचे आपण नेतृत्व करत आहात, त्यांच्या वतीने या अमानुष हत्येचा निषेध करावा असे तुम्हाला वाटत नाही का? की मराठी साहित्यविश्वही सिलेक्टिव्ह आणि हिंदू साधूंच्या हत्येबाबत उदासीन झाले असून तुम्ही त्याचा प्रातिनिधिक चेहरा आहात?

फादर फ्रान्सिस दिब्रिटो, साहित्यविश्व काही क्षण बाजूला ठेवून सहृदयी माणूस म्हणून तुम्हाला या घटनेचा निषेध करण्यासाठी इच्छा होते की नाही? की ती इच्छा बाह्य दबावामुळे दाबून ठेवत आहात? आपण निषेध केला तर चर्चला काय वाटेल? मिशनरी यंत्रणा त्यांचा कसा स्वीकार करेल? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण निषेध केला तर आपल्या पुरोगामित्वावर काय परिणाम होईल? अशी भीती तर तुम्हाला वाटत नाही ना?

फादर, गडचिंचणे येथे भगव्या वस्त्रातील माणसे ठेचून मारली आहेत, ती कोणत्या धर्माची होती यापेक्षा ती माणसे होती या एका कारणासाठी तरी तुम्ही निषेध करायला हवा होता आणि झुंडशाहीच्या विरोधातील आपला स्वर धारदार करायला हवा होता. पण फादर, शेवटी तुम्हीही सिलेक्टिव्ह भूमिका घेणारे आणि सोईचे पुरोगामित्व जपणारे ठरलाय, हेच खरे.

फादर फ्रान्सिस दिब्रिटो, तुमच्या धर्मप्रांतात अशी अमानुष हत्या होते आणि तुम्ही शांत आहात, म्हणून प्रश्न पडतो - तुम्ही कुठे आहात? माणूसपणाच्या पक्षात की ढोंगी पुरोगाम्यांच्या कंपूत?

फादर, उत्तर द्या.